इंटिग्रेटेड एमबीए
२०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे. पदवी ते पदव्युत्तर पदवी असा या अभ्यासक्रमाचा व्यापक अवकाश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत एमबीए ही पदवी प्रदान केली जाते. एखाद्या विद्यार्थ्यास तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडवासा वाटल्यास, बीबीए – बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. तथापि चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना किमान सीजीपीए (क्युमुलिटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज) ५ मिळवावा लागतो. हा अभ्यासक्रम १५ सत्रांमध्ये शिकवला जातो. प्रत्येक वर्षी तीन सत्रे घेण्यात येतात.
हा अभ्यासक्रम दोन भागात विभाजित करण्यात आला आहे. (१) पहिल्या भागात पायाभूत विषयांमध्ये लक्ष केंद्रित केले जाते. (२) दुसऱ्या भागात व्यवस्थापन विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करावी लागते. १६५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गातील १० टक्के जागांचा समावेश आहे.
अभ्यासक्रमाची संरचना– हा अभ्यासक्रम गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित, मानव्यशास्त्र या चार घटकांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. कम्युनिकेशन मॅनेजमेंट- व्यवसाय संवाद संप्रेषण, इंफर्मेशन सिस्टिम – माहिती कार्यप्रणाली आणि परदेशी भाषा यांचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. चौथ्या आणि पाचव्या वर्षात आयआयएम(रोहतक)च्या दोन वर्षे कालावधीचया अभ्यासक्रमासाठी जे विषय शिकवले जातात तेच विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.(या दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी कॅट(कॉमन ॲडमिशन टेस्ट)व्दारे निवड केली जाते.)
काय शिकाल?
(अ)पहिल्या तीन वर्षी पुढील विषयांचा अभ्यास करावा लागतो. (१) इकॉनॉमिक्स (२) फायनांस (३) अकाउंटिंग (४) लॉ, (५) स्टॅटिस्टिक्स, (६) मॅथेमॅटिक्स (७) फिलासॉफी (८) सायकॉलॉजी (९) बिझिनेस कम्युनिकेशन (१०) पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (११) सोशिऑलॉजी (१२) सस्टेनिबिलिटी (१३) प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट (१४) मीडिया ॲण्ड जर्न्यालिझम (१५) ॲडव्हर्टायजिंग (१५) बिझिनेस हिस्ट्री (१६) इंफर्मेशन टेक्नॉलॉजी.
(ब) चौथ्या आणि पाचव्या वर्षात पुढील विषय शिकावे लागतात- (१) जनरल मॅनेजमेंट (२) बिझिनेस कम्युनिकेशन (३) मार्केटिंग मॅनेजमेंट (४) स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (५) मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम (६) ऑपरेशन मॅनेजमेंट ॲण्ड क्वाँटिटेटिव्ह टेक्निक (७) ह्युमन रिर्सोस मॅनेजमेंट ॲण्ड ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर (८) इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी (९) फायनांस ॲण्ड अकाउंटिंग,
(क) इतर विषय – (१) पब्लिक स्पिकिंग (२) क्रिएटिव्ह रायटिंग (३) रुरल ॲण्ड सोशल इर्मशन प्रोजेक्ट (४) बिझिनेस इंटर्नशीप
अर्हता- (१) खुला संवर्ग /नॉन क्रिमीलेअर इतर मागास संर्व/आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग(ईडब्ल्यूएस)- कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण. दहावीमध्येही किमान ६० टक्के गुण आवश्यक. (ब) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी गुणांची मर्यादा १०वी व १२वीमध्ये ५५ टक्के. (क) २० जून २०२४ रोजी विद्यार्थ्याचे किमान वय २० वर्षे असावे.(यंदा १२वीचे परीक्षा देणारे विद्यार्थी प्रवेश चाळणी परीक्षेला बसू शकतात. तथापि त्यांचा निकाल ३० जून २०२४ पर्यंत लागायला हवा. त्यांना किमान अर्हतेसाठी आवश्यक गुण मिळायला हवेत.)
प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. (या परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४. ही परीक्षा १८ मे २०२४ रोजी घेतली जाईल. महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई, नागपूर आणि पुणे. )
या परीक्षेत, (१) संख्यात्मक कौशल्य चाचणी (क्वांटिटेटीव्ह ॲबिलिटी टेस्ट), (२) तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य चाचणी (लॉजिकल रिझनिंग), (३) इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व चाचणी (व्हर्बल ॲबिलिटी) असे तीन विभाग असतात. प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी ४० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक भागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. प्रत्येक अचुक उत्तराला ४ दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी १ गुण कापला जातो. प्रश्न सोडवला नसल्यास कोणतेही गुण कपात केले जात नाही. प्रत्येक विभागासाठी किमान गुण प्राप्त करण्याची अट ठेवण्यात आलेली नाही.
या चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन मुलाखती जून २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जातील. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्य याची चाचपणी केली जाते.
अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना कल चाचणी परीक्षेतील गुणांना ४५ टक्के वेटेज, मुलाखतीतील गुणांना १३ टक्के वेटेज, आणि शैक्षणिक कामगिरीला ४0 टक्के वेटेज दिले जाते.
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास, एनएच – 10, सुनारिआ रोहतक -124010, दूरध्वनी- 01262 – 228539 , संकेतस्थळ- www.iimrohtak.ac.in,ईमेल- ipmoffice@iimrohtak.ac.in
000
बीटेक-एमबीए
नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने पुढील विषयांमध्ये इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) एमबीए (टेक) इंटिग्रेटेड प्रोग्रॅम (बीटेक आणि एमबीए टेक) – या अभ्यासक्रमांतर्गत पुढील अभियांत्रिकी विषय घेता येतात- कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. व्यवस्थापन विषयात पुढील स्पेशलायझेशन घेता येतात – फायनांस यामध्ये फिनटेकचा समावेश आहे. मार्केटिंग , ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स.हा अभ्यासक्रम शिरपूर कॅम्पसमध्ये करता येतो.
(२) एमबीए (टेक) इंटिग्रेटेड प्रोग्रॅम (बीटेक आणि एमबीए टेक)– या अभ्यासक्रमांतर्गत पुढील अभियांत्रिकी विषय घेता येतात- कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन , मेकॅनिकल , केमिकल, सिव्हिल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. व्यवस्थापन विषयात पुढील स्पेशलायझेशन घेता येतात- फायनांस यामध्ये फिनटेकचा समावेश आहे. मार्केटिंग , ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स.हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पसमध्ये करता येतो.
(३) एमबीए (टेक) इंटिग्रेटेड प्रोग्रॅम (बीटेक आणि एमबीए टेक). या अभ्यासक्रमांतर्गत कॉम्प्युटर विषयात स्पेशलायझेशन करता येते. व्यवस्थापन विषयात पुढील स्पेशलायझेशन घेता येतात- फायनांस यामध्ये फिनटेकचा समावेश आहे. मार्केटिंग , ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स. हा अभ्यासक्रम नवी मुंबई , इंदोर आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये करता येतो.
(४) इंटिग्रेटेड एमबीए इन आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पस मध्ये करता येतो. पाच वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बीबीए(आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस)आणि एमबीए(आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस) या पदव्या प्रदान केल्या जातात.ज्या विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर या अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असले त्यास तशी परवानगी दिली जाते. हा विद्यार्थी बीबीए (आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस) पदवीसाठी पात्र ठरतो. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुंटुंबाधारित उद्योग/व्यवसायाचं नेतृत्व करता येणं शक्य व्हावं अशा तऱ्हेनं या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
(५) बी.फार्म आणि एमबीए (फार्मा टेक्नॉलॉजी) – इंटिग्रेटेड प्रोग्रॅम. हा अभ्यासक्रम मुंबई, शिरपूर आणि हैदराबाद कॅम्पस मध्ये करता येतो.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, एनआयएमआयएस- सीईटी, ही परीक्षा घेतली जाते.
संपर्क – संकेतस्थळ-nmimscet.in ०२२-४२३५५५५५, टोल फ्री क्रमांक- १८००१०२५१३८
०००