परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृती मिळवण्यासाठी पुढील
कार्यपध्दतीचा अवलंब करावा लागतो.
(१) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराच्या निवडीसाठी शासनाने कार्यपध्दती निर्धारित केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. ही यादी तयार करताना १० वी, १२ वी , पदवी , पदव्युत्तर पदवी आणि प्रवेश मिळालेल्या संस्थेची THE किंवा QS संस्थेने जाहीर केलेली क्रमवारी लक्षात घेतली जाते.(उदा- एखाद्या उमेदवारास दहावी आणि १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास त्याच्या गुणांचे मूल्यांकन प्रत्येकी १० ,पदवी परीक्षेत ८० टक्क्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास गुणांचे मूल्यांकन ३० आणि THE किंवा QS ची श्रेणी १ ते ५० असल्यास गुणांचे मूल्यांकन ५० असे केले जाते. याचा अर्थ दोन उमेदवारांना एकाच संस्थेत प्रवेश मिळाला असल्यास ज्या उमेदवाराचे १० वी १२ वी आणि पदवीतील गुण हे दुसऱ्यापेक्षा अधिक असल्यास त्याच्या गुणांचे मूल्यांकन अधिक होऊन तो किंवा ती गुणवत्ता यादित वरच्या क्रमांकावर जाईल.)
(२)या शिष्यवृत्तीसाठी जाहिरात दिली जाते. साधारणत: एक महिन्याचा कालावधी अर्ज सादर करण्यासाठी दिला जातो. अर्ज ऑनलाइन सादर करावे लागतात. आलेल्या अर्जातून गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड शासनाच्या उच्चस्तरीय समिती मार्फत केली जाते. पीएचडी अभ्यासक्रमासाठी एखाद्या शाखेतील उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या वर्षापुरती ती जागा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून भरली जाते. हेच तत्व पदव्युत्तर पदवी /पदविका अभ्यासक्रमासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाही तर अवलंबले जाते. या जागा संबंधित विषयातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जातात.
संपर्क – संचालक तंत्र शिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, पोस्ट बॉक्स क्रमांक १९६७, मेट्रो चित्रपट गृहाच्या विरुध्द दिशेला, दूरध्वनी- ०२२-२२६४११५०, मुंबई- ४००००१, http://www.dtemaharashtra.gov.in/आणि foreignschlolarship2023 dtemaharashtra.gov.in
000
जैवविविधता शिष्यवृत्ती
गुणवंत मुला मुलींना कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठीची नवी योजना वन विभागाने घोषित केली आहे. मरीन सायंस, मरीन इकॉलॉजी,ओशनोग्रॅफी,मरीन बॉयलॉजी,मरीन फिशरीज,मरीन बायोटेक्नॉलॉजी/मायक्रोबॉयलॉजी,बायोडायव्हरसिटी अशासारख्या विषयांमध्ये परदेशातील पदव्युत्तर पदवीसाठी १५ आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी १५ अशा २५ ही शिष्यवृत्या दिल्या जातील. द टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेच्या रँकिंग मधील २००च्या आत आणि क्वॅवक्वेअरल्ली सिमडँस किंवा क्यू एस रॅकिंग मध्ये १५०च्या आत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये येणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. ही शिष्यवृत्ती सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू राहील. यातील ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित उमेदवाराच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. संबंधित उमेदवार जर नोकरी करत असेल तर त्याचेही उत्पन्न यामध्ये धरले जाईल. १ जुलै रोजी, पीएचडी साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ४० आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३५ असावे. या संदर्भातील संपूर्ण माहिती www.mangroves.maharastra.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.
सुरेश वांदिले