(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

विप्रो, टेक महिंद्रा, काग्निझंट, मॅकन्सी, मॉर्गन स्टॅनले, मायक्रोसॉफ्ट, टाटा समूह ,गुगल, फेसबुक, लिंक्डइन, अमेरिकन एक्सप्रेस, डिलॉइट, ॲक्सेंच्युर, लार्सन ॲण्ड टयुब्रो यासारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘, रोबोटिक्स, माहिती लर्निंग, कॉग्निटिव्ह डल्स, ब्लॉक चैन, ऑगमेंटेड रिॲलिटी या नव्या तंत्रज्ञानाची अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यातील काही कंपन्यांनी अशा तज्ज्ञ मनुष्यबळाने कंपनी सोडू नये म्हणून त्यांच्या वेतनात 70 टक्के इतकी भरघोस वाढ केली आहे.  या नवतंत्रज्ञानातील तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्ध आणि गरज यात सध्या मोठी तफावत आहे.  सध्या प्रत्येक 100 जागांमध्ये केवळ 30 प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध होत असल्याने प्रत्येक कंपन्या आपल्याकडेच असे मनुष्यबळ टिकून राहील या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.

ऑटोमेशन आणि डिजिटायझेशनसाठी मागील वर्ष महत्वाचे ठरले. मोठ्या कंपन्या या दोन्ही बाबींवर अधिकाधिक भर द्यायला लागल्या आहेत.  ऑटोमेशनमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उर्जा प्राप्त झाली आहे.  आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन व्यवसायांस गती देण्यात आली आहे.  या सोबतच बिग डाटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कंझुमर इंटरफेस मशिन या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन माहिती तंत्रज्ञान, भविष्यात वेगळ्या उंचीवर जाण्याची चिन्हे आहेत.

बिझिनेस अनॅलिटिक्स

तंत्रज्ञानातील सतत होणारे बदल आणि व्यवसायामध्ये निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन मोठी व्यावसायिक घराणी, कॉर्पोरेट हाऊसेस व्यवसायवृध्दीसाठी कमी खर्चातील उपाययोजना कशा करता येतील याकडे लक्ष पुरवित आहेत. अनेक संस्था आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी सरसावल्या आहेत.

व्यावसायिक संस्था, विक्री, विपणन, संशोधन, ग्राहकसेवा आदी मार्गातून अनेक प्रकारची व्यामिश्र माहिती गोळा करत असते. या माहितीचा प्रचंडसाठा कालपरत्वे गोळा होत जातो. साठलेल्या या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर संस्था किंवा कार्पोरेट हाऊसेस  यांना भविष्यात येणाऱ्या समस्या, प्रश्न याची कल्पना येऊ शकते. कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची आवशक्यता आहे, हे कळू शकते. कंपनीच्या महसुलात वाढ करण्यासाठी या विश्लेषणा(डिजिटल आकडेमोड)चा उपयोग होऊ शकतो.

सध्या () बँकिंग, () टेलिकम्युनिकेशन, () आऊटसोर्सिंग, () सोशल मीडिया, () फायनांशिअल सर्व्हिसेस, () मॅन्युफॅक्चुरिंग, () हेल्थकेअर, () ट्रॅव्हल, () एनर्जी, (१०) ई-गव्हर्नन्स आणि (११) ई-कॉमर्स या क्षेत्रात बिझिनेस अनॅलिटिक्स यांची सेवा मोठया प्रमाणावर घेतली जात आहे.

गेल्या दोन वर्षात बिझिनेस ॲनलिटिक्स या क्षेत्रासाठी ९० बिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले. भारतात या ज्ञानशाखेतील मनुष्यबळाची मागणी मोठया प्रमाणावर वाढली आहे. मात्र सध्या तरी या क्षेत्रात पुरेशा प्रमाणात असे मनुष्यबळ उपलब्ध नाही. () बिग डाटा (गोळा होणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीचा साठा), () ॲनॅलिटिक्स (साठलेल्या माहितीचे सांख्यिकीय निष्कर्ष काढणे किंवा विश्लेषण करणे), सांख्यिकी, () प्रॉबेबिलिटी (संभाव्यता), () मॅनेजिंग ॲबिलिटी (व्यवस्थापकीय कौशल्य), () बिझिनेस अंडरस्टँडिंग (व्यवसाची सूक्ष्म जाणीव), () मेंटनिंग रिसोर्सेस (संसाधनाची देखभाल) हे विषय हाताळणाऱ्या उच्चप्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आढळून येत आहे.

बिझिनेस ॲनॅलिटक्स प्रणालीद्वारे निर्णय क्षमतेसाठी आवश्यक ठरणाऱ्या विश्लेषणात्मक, कार्यात्मक आणि तांत्रिक कौशल्यात वाढ करणे शक्य होऊ शकते.

करिअर संधी

या मनुष्यबळास () डाटा अनॅलिटिक्स, () फंक्शनल मॅनेजर्स (वित्त/ मनुष्य बळ/ विपणन/ वित्त/ कार्यान्वयन इत्यादी), () बिझिनेस ॲनॅलिस्ट प्रोजेक्ट मॅनेजर, () बिझिनेस इंटेलिजन्स एक्सपर्ट, () बिझिनेस ॲनॅलिटिक्स कन्सलटंट, () डाटा अनॅलिस्ट, () बिगडाटा अनॅलिस्ट, () डाटा अनॅलिटिक्स प्रोग्रॅमर, () डाटा मायनिंग एक्सपर्ट , (१०) डाटा वेअरहाऊस एक्सपर्ट, (११) प्रेडिक्टिव्ह मॉडेलर , (१२) क्वालिटेटिव्ह अनॅलिस्ट अशा सारख्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.

सुरेश वांदिले