कला क्षेत्रात १२ वी केलेल्या मुलांसाठी पुढे काय करायचं, हा आता तितकासा महत्वाचा प्रश्न राहिलेला नाही.या विद्यार्थ्यांना वेगळे काही करण्याची आवड आणि महत्वाकांक्षा असेल आणि जरा हटके विचार करण्याची क्षमता व हिम्मत असेल त्यांच्यासाठी वेगवेगळया विविध संधी पुढीलप्रमाणे आहेत-
खेळणी डिझाइन
सध्या सर्वत्र लहान मोठ्या खेळण्यांचे विक्रेते बसलले दिसतात.या विक्रेत्यांकडे असंख्य प्रकारचे आकार-उकार म्हणजे डिझाइन्स असलेली खेळणी बघून थक्क व्हायला होते.खेळणी निर्मितीचा व्यवसाय हा कायम भरभराटीचा राहिला आहे.आधुनिक डिझाइन्समुळे अधिकाधिक मुले आणि त्यांचे पालकही खेळण्यांकडे आकर्षित होताना दिसतात.त्यामुळे सतत नव्या नव्या अफलातून डिझाइन्सची खेळणी बाजारात येत असतात.हे लक्षात घेतले तर खेळणी डिझाइन्सचे महत्व लक्षात यावे.या क्षेत्रात शिक्षण प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील आघाडीची संस्था महणजे पालडी -अहमदाबाद स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन.या संस्थेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे दोन्ही अभ्यासक्रम करता येतात.पदवी परीक्षेनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी टॉय डिझाइन या विषयाच्या स्पेशलायझेशनसाठी प्रवेश मिळू शकतो.या संस्थेतील प्रवेशासाठी अखिल भारतीय चाळणी परीक्ष घेतली जाते.बॅचलर ऑफ डिझाइनचे अभ्यासक्रम काही खाजगी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात चालविले जातात.पुणे येथे असणारी एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन,मुंबई स्थित इंडियन स्कूल ऑफ डिझाइन ऍ़ण्ड इनोव्हेशन या संस्थां मध्ये डिझायनिंगचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
000
फिल्म एडिटिंग
चित्रपटाचे एडिटिंग हा अतिशय सर्जनशील विषय आहे.अनेकदा चित्रपटाच्या दिग्दर्शकापेक्षा चित्रपटाच्या एडिटरचा त्या चित्रपटाच्या यशात मोठा हातभार लागतो.कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात केले जाते.चित्रीकरणाच्या प्रक्रियेत चित्रपटाची लांबी वाढत चाललीय ही बाब बरेचदा दिग्दर्शकाच्या लक्षात येत नाही.एकदा चित्रिकरण संपले की तो चित्रपट एडिटरच्या हवाली केला जातो.खऱ्या चित्रपटाची निर्मिती त्याच्या टेबलवर होते असे बोलले जाते.कारण एडिटरच चित्रटाची लांबी नियंत्रणात आणतो.गती कायम राखतो.अनावश्यक प्रसगांना कात्री लावतो.दर्शकांना कंटाळा न येता बघण्यासारखी कलाकृती तो आपल्या संपादन कौशल्याने तयार करतो.शोले किंवा हॉलीवूडच्या थरारपटांचे यश हे त्यांच्या संपानादनामुळेच शक्य होऊ शकले.एडिटिंगचे हे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेवूनच बरेच यशस्वी दिग्दर्शक आपल्या चित्रपटांचे दिग्दर्शन स्वत:च करतात.या विषयातील पूर्ण कालीन अभ्यासक्रम पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेत शिकवला जातो. सुभाष घईंच्या व्हिसलिंगवूड या संस्थेतही एडिटिंचा अभ्यासक्रम चालवला जातो.
000
संगीत वाद्यवृंद
संगीत क्षेत्रामध्ये करीअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.सध्या सर्वत्र या ना त्या स्वरुपाचे संगीत जलसे होत असतात.पाश्चिमात्य आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलिंना विविध वादकांची मोठीच गरज भासते.मोठ्या गायक संगीतकाराचे कार्यक्रम सर्व जगभर होतात.या कार्यक्रमांमध्ये 50 ते 100पर्यंत वाद्यवृंद असतात.काही छोटे छोटे संगीतकार पाच दहाच्या गटात एकत्र येऊन आपला बँड स्थापन करतात.असा छोटा बँड विविध कार्यक्रम,हॉटेल्स,लग्नादी संभारभ या ठिकाणी आपली कला सादर करतात.अशा कार्यक्रमांची संख्या सारखीच वाढते आहे.सोसायट्यामंध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना अशा बँड्सना बोलवण्याकडे कल वाढत आहे.या सर्व बाबी या क्षेत्रात करियरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे निर्दशक आहेत.संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि संगीतकार होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हे क्षेत्र स्पर्धात्मक असलं तरी प्रगती आणि उन्नतीची अचुक दिशा दाखवणारं ठरु शकतं.
नव्या तंत्रज्ञानामुळे आणि यूट्यूटब सारखे नवे प्लॅटफार्म उपलब्ध झाल्याने नव्या होतकरु संगीतकारांसाठी आता संधी दारापर्यंत चालून आलीय असं म्हंटल्यास वावगं ठरु नये.हे क्षेत्र आता पूर्ण वेळ करियर करण्यात इतपत सक्षम होत आहे.
भातखंडे संगीत संस्था
आक्टोबर 2000 मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. या विद्यालयात पुढील विषयांचे शिक्षण- प्रशिक्षण दिले जाते. (1) कंठसंगीत (शास्त्रीय कंठसंगीत, ठुमरी, दादरा,सुगम संगीत), (2) नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, लोकनृत्य), (3) स्वरवाद्ये (सितार, सरोद, गीटार, व्हायोलिन, सारंगी, हार्मोनिअम, बासरी), (4) तालवाद्य-(तबला ,पखवाज) आणि (5) संगीतशास्त्र. या पाचही प्रकाराचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाच स्वतंत्र विभाग आहेत. या संस्थेत उच्च दर्जाच्या शिक्षणावर भर दिला जातो.सध्या 1500 च्या आसपास विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. कला आणि संगीताच्या क्षेत्रात या विद्यार्थ्यांना तत्काळ करिअरच्या संधी प्राप्त होत आहेत. यासाठी संस्थेच्या वतिनेही विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेत वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या निमित्त श्रेष्ठ कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत असतो.
पत्ता: भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट,कैसरबाग लखनौ(उत्तरप्रदेश.), संकेतस्थळ- www.bhatkhandemusic.edu.in,ईमेल-info@ www.bhatkhandemusic.edu.in
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी साधारणत: 9 जुलै ते 17 जुलै रोजी घेतली जाते. निकाल 20 जुलै रोजी लावला जातो. 27 जुलैपासून प्रत्यक्ष शिकवणीस प्रारंभ होतो. 25 मे ते 25 जून या कालावधीत प्रवेश अर्ज करता येतो. भारत सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास संवर्ग आणि दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी संबंधित संवर्गातील उमेदवारांनी अर्ज न केल्यास त्या जागा खुल्या संवर्गातील संवर्गातून भरल्या जातात. या संस्थेत मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात 60 विद्यार्थींनीच्या राहण्याची व्यवस्था केली जाते .मुलांच्या वसतिगृहाची क्षमता 15 विद्यार्थ्यांच्या निवासापुरती मर्यादित आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथ्थक
डिप्लोमा कोर्स इन तबला वादन / पखवाज वादन : (या अभ्यासक्रमाचा कालावधी 5 वर्ष / वयोमर्यादा -17 ते 22 वर्षं, अर्हता- तबला आणि पखवाज वादनाचा तीन वर्षांचा अनुभव /10 वी उत्तीर्ण ). अभ्यासक्रमाची फी दरमहा 300 रुपये आहे.
पत्ता- कथ्थक केन्द्र,भवालपूर हाउस,भगवानदास रोड नवी दिल्ली 110001/दूरध्वनी:011- 27654232,27654234, संकेतस्थळ-www.sangeetnatak.org,ईमेल-delhi_kathak@yahoo.co.in
00
रविंद्रभारती युनिव्हर्सिटी
(1) बॅचलर ऑफ आर्टस् (स्पेशल ऑनर्स) इन रविंद्र संगीत: अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. (2) मास्टर ऑफ आर्टस् इन रविंद्र संगीत ॲण्ड व्होकल म्युझिक : अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा अर्ज www.dde.rabindrabharatiuniversity.net या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल.
पत्ता: डायरेक्टर,डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन रविंद्र भारती युनिव्हर्सिटी , 56 ए,बी.टी.रोड कोलकता-700050
दूरध्वनी-033-25584443, संकेतस्थळ- www.dde.rbu.ac
000
मुंबई विद्यापीठ
1)बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन व्होकल म्युझिक, 2) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक-हिंदुस्थानी व्होकल क्लासिकल (कालावधी-दोन वर्ष), 2) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी इन्स्ट्रुमेन्टल क्लासिकल (कालावधी-दोन वर्ष), 3) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी व्होकल लाइट (कालावधी-दोन वर्ष), 3) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी इन्स्ट्रुमेन्टल क्लासिकल – तबला (कालावधी-दोन वर्ष), 5)बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन, इन्स्ट्रुमेन्टल क्लासिकल – तबला/सितार (कालावधी-तीन वर्ष),6)मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन, म्युझिक व्होकल (कालावधी-दोन वर्ष)
पत्ता-डिपार्टमेंट ऑफ म्युझिक,विद्यापीठ,विद्यार्थी भवन,बी रोड,चर्चगेट,मुंबई-400020 ,दूरध्वनी-022-2204 8665,फॅक्स-220 42 859, संकेतस्थळ -www.mu.ac.in/arts/finearts
फॅशन प्रमोशन ॲण्ड इमेजिंग
एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अभ्यासक्रम – पुणे येथील या संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फॅशन प्रमोशन ॲण्ड इमेजिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता-कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.कालावधी चार वर्षं. या अभ्यासक्रमाच्या निवड प्रक्रियेमध्ये डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट ,स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत या दोन बाबींचा समावेश आहे.ही चाळणी परीक्षा पुणे,मुंबई,कोलकता,अहमदाबाद, बंगलोर,भोपाळ,दिल्ली या केंद्रांवर घेण्यात येते.
पत्ता– एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, राजबाग,लोणी कालभोर, हडपसरच्या बाजूला, पुणे-412201,दूरध्वनी-020-30693600, फॅक्स-30693601,ई-मेल-admissions@mit.edu.in,
सुरेश वांदिले