नृत्य आणि संगीतातील करिअर
अनेक मुलांना बालपणापासूनच गायन,वादन आणि नृत्याची आवड असते.ही आवड वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्तही होत राहते.अशा मुलांना पालकांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा देणं गरजेचं आहे.या क्षेत्रात लगेच उत्तम करिअर घडेल असे नाही.पण मुलामध्ये प्रतिभा असल्यास संयम आणि सरावातील सातत्य याबळावर संधी कधीही चालून येऊ शकते.अशी संधी मिळाल्यावर त्या संधीचे सोने करणे हे आपल्या हाती असते.सध्या विविध प्रकारची माध्यमे उपलब्ध झाली आहेत.त्यामुळेही या क्षेत्रात करिअरच्या संधीही वाढल्या आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक या कलाप्रकारांमध्ये करिअर करण्याची इच्छा आणि आवड असणाऱ्या तरुण तरुणींनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण प्रशिक्षण घेणं आवश्यक ठरतं. अशा संधी देशातील अनेक संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यापैकी काही संस्थांनी आपल्या क्षेत्रात गुणवत्ता आणि दर्जा यात गेल्या अनेक दशकांपासून सातत्य राखलं आहे. या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मोठी साधना आवश्यक असते.अशी साधना चांगल्या संस्थेमधून केल्यावर सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिक याचा पाया मजबूत होतो.
शास्त्रीय संगीत आणि नृत्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आणि आवड असली तरी, यासाठी अतिशय कष्ट करण्याची गरज असते. या क्षेत्रात लगेच संधी मिळेल असे संभवत नाही. त्यामुळे आपली कला सातत्याने उजळण्यासाठी सरावाच्या साधनेला पर्याय नसतो. प्रतिभा आणि परीश्रमाच्या बळावर संधी मिळू शकते. गुरुंकडे प्रशिक्षणाच्या सर्व बाबी आणि पैलू हस्तगत केल्यावर त्याचा वापर सर्जनशीलतने आपल्या कलेत सादर करता येणे गरजेचे आहे. तुमची कला ही इतरांपेक्षा वेगळी असेल तर रसिकांचे लक्ष कोणत्याही टप्यावर जाऊ शकते. चिकाटी सुध्दा महत्वाची ठरते. कोणत्याही टप्प्यावर नैराश्याला थारा देता कामा नये.
काही संस्था
(१) भातखंडे राज्य संस्कृती विश्वविद्यालय
भारतीय संगीताला २००० वर्षाची प्राचीन परंपरा आहे. त्याकाळी गुरुकुल आणि आश्रमांमध्ये संगीताचे अध्ययन केले जात असे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा विकास होण्यासाठी गुरुशिष्य परंपरेचा लक्षणीय हातभार लागला.
कालपरत्वे भारतीय संगीतात विविध प्रयोग होत राहिले. त्यातून कंठ संगीत, वाद्यसंगीत आणि नृत्याचा विकास झाला. या तीनही बाबी भारतीय संस्कृतीच्या अभिन्न अंग बनल्या आहेत. यातूनच संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरुप प्राप्त झाले. संगीताच्या शिक्षण आणि प्रशिक्षणास सैध्दांतिक स्वरुप ब्रिटिशांच्या काळात आले. त्याचा विशिष्ट कालावधी या काळात ठरवण्यात आला.
पंडित दिंगबर पळुस्कर यांनी १९०१ साली लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. संगीत शिक्षणाच्या संस्थात्मक पर्वाचा हा प्रारंभ ठरला. त्यानंतर पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरुप देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. १९२६ साली त्यांनी लखनौ येथे मॅरिस कॉलेज ऑफ म्युझिक या नावाने संगीत शिक्षण संस्था सुरु केली. १९६६ साली हे विद्यालय उत्तर प्रदेश शासनाच्या अखत्यारीत आले. या विद्यालयास भातखंडे कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक असे नाव उत्तरप्रदेश सरकारने दिले. ऑक्टोबर २००० मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. गेल्या अनेक दशके या संस्थेत अनेक श्रेष्ठ गुरु आणि तज्ज्ञांनी प्राचार्य म्हणून कार्य केले.
या संस्थेत उच्च दर्जाच्या शिक्षणावर भर दिला जातो. सध्या १५०० च्या आसपास विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. कला आणि संगीताच्या क्षेत्रात या विद्यार्थ्यांना तत्काळ करिअरच्या संधी प्राप्त होत आहेत. यासाठी संस्थेच्या वतिने विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेत वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या निमित्त श्रेष्ठ कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होतो.
या संस्थेत भारतीय विद्यार्थ्यांसोबत श्रीलंका, युरोप, नेपाळ, भूतान, बांगला देश, मध्य आणि पूर्व आशियातील विद्यार्थी संगीताचे शिक्षण घेण्यासाठी येतात. अनूप जलोटा, दिलराज कौर सारख्या अनेक नामवंत गायकांनी याच संस्थेतून शिक्षण घेतले आहे.
ही संस्था एकाच वेळी दोन पदवी वा पदविका अभ्यासक्रम करण्याची परवानगी देत नाही. वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती आवश्यक असून त्याअभावी वार्षिक परीक्षेला विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. संस्थेमार्फत आजोजित सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
शास्त्रीय संगीत आणि नृत्य या विषयांमध्ये शिक्षण – प्रशिक्षण देणारी ही देशातील महत्वाची शिक्षण संस्था आहे. या विद्यालयात पुढील विषयांचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. (१) कंठसंगीत (शास्त्रीय कंठसंगीत, ठुमरी, दादरा, सुगम संगीत), (२) नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, लोकनृत्य), (३) स्वरवाद्ये (सतार, सरोद, गीटार, व्हायोलिन, सारंगी, हार्मोनिअम, बासरी), (४) तालवाद्य – (तबला ,पखवाज) आणि (५) संगीतशास्त्र. या पाचही प्रकाराचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाच स्वतंत्र विभाग आहेत.
अभ्यासक्रम – (अ) (१)बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स, कालावधी- तीन वर्षे, (२) मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स, कालावधी- दोन वर्षे. (ब) दोन वर्षे कालावधीचे पदविका अभ्यासक्रम- (१) प्रवेशिका, (२) परिचय, (३) प्रबुध्द,(३) पारंगत,(क) दोन वर्षं कालावधीचे स्पेशल(विशेष) अभ्यासक्रम- (१) ध्रुपद धमार , (२) ठुमरी दादरा, (३) हार्मोनियम, (४) लोकनृत्य, (५) सुगम संगीत(क) एक वर्षं कालावधीचे स्पेशल अभ्यासक्रम – (१) लोकसंगीत , (२) ढोलक
प्रवेश प्रक्रिया
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी चाळणी परीक्षा घेतली जाते. भारत सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास संवर्ग आणि दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी संबंधित संवर्गातील उमेदवारांनी अर्ज न केल्यास त्या जागा खुल्या संवर्गातील संवर्गातून भरल्या जातात.
निवास व्यवस्था
या संस्थेत मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात ६० विद्यार्थींनीच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता १५ विद्यार्थ्यांच्या निवासापुरती मर्यादित आहे.
संपर्क-
संपर्क: भातखंडे राज्य सांस्कृतिक विद्यापीठ, १, कैसरबाग लखनौ (उत्तरप्रदेश)-२२६००१, संकेतस्थळ-www.bhatkhandemusic.edu.in, ईमेल-info@ www.bhatkhandemusic.edu.in दूरध्वनी–०५२२–४०४५६८६/२६१०२४८,फॅक्स–२६२२९२६
०००
(२) श्रीराम भारतीय कला केंद्र
दिल्लीस्थित श्रीराम भारतीय कला केंद्र, ही संगीत आणि नृत्य या विषयात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी देशातील महत्वाची संस्था आहे. दिल्लीतील सांस्कृतिक संस्थांचे केद्र बनलेल्या मंडी भागात ही संस्था कार्यरत आहे. संस्थेची स्थापना १९४८ साली करण्यात आली. या संस्थेला मनुष्यबळविकास मंत्रालायाने मान्यता प्रदान केली आहे.
या संस्थेत (१) हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ गायन – खयाल, (२) हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ सुगम गायन आणि गझल, भजन आणि गीत गायन, (३) तबला/ सतार/ सरोद , (४) कथ्थक (जयपूर घराणे आणि लखनौ घराणे), (५) भारतनाट्यम(कलाक्षेत्र शैली), (६) ओडिशी(केलूचरण मोहपात्रा शैली), (७) छाऊ (मयूरभंज शैली), (८) नृत्य-नाट्य याविषयांचे प्रशिक्षण घेता येते.
संस्थेत पुढील अभ्यासक्रम चालविण्यात येतात- (१) संगीत आणि नृत्य रसग्रहण अभ्यासक्रम, कालावधी- एक ते दोन वर्षे, (२) प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी- ३ वर्षे, (३) पदविका अभ्यासक्रम, कालावधी – २ वर्षे, (४) पदविकोत्तर अभ्यासक्रम, कालावधी – २ वर्षे, (५) व्यावसायिक अभ्यासक्रम- हा अभ्यासक्रम पदविकोत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर करता येतो. कालावधी- एक वर्षाच्या पुढे.
संपर्क-श्रीराम भारतीय कला केंद्र, इंस्टिट्यूट ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक ॲण्ड डान्स, १ कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- ११०००१, दूरध्वनी- ०११-४३५०३३३३, टेलेफॅक्स-२३३८६४२८, ईमेल- sbkk@thekendra.com, संकेतस्थळ- sbkk.in
०००
(३) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कथक डान्स – ही संस्था केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या, संगीत नाट्य अकादमीचा एक भाग म्हणून कार्यरत आहे. कथ्थक नृत्याच्या समृध्द परंपरेची जोपासना, प्रोत्साहन, प्रशिक्षण यासाठी या संस्थेची स्थापना १९६४ साली करण्यात आली. कथ्थक नृत्य प्रकारात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्था समजली जाते. संस्थेमार्फत कथक गुरुंमार्फत नव्या कलावंतांना प्रशिक्षित केले जाते.
संस्थेचे अभ्यासक्रम
(१) प्राथमिक (एलिमेंटरी) अभ्यासक्रम- (अ) पाच वर्षे कालावधीचा फाउंडेशन अभ्यासक्रम- या अभ्यासक्रमात कथ्थक नृत्याच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम शाळा अथवा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी करु शकतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १ जून रोजी १० ते १५ वर्षे असणे गरजेचे आहेत. अर्हता- किमान चौथी वर्ग उत्तीर्ण. या वयाशी व वर्गाशी सुसंगत असे हिंदी आणि इंग्रजीमध्ये वाचन आणि संवाद आणि लेखन कौशल्य असावे. नृत्य सादरीकरण, शारीर आणि चेहऱ्यावरील भावभावना व्यक्त करण्याचे कौशल्य असावे. उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य असावे. इच्छूक विद्यार्थ्यांची नृत्याकडे असणारी कलचाचणी घेऊन त्याची या अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. या कलाप्रकारात रस, शरीराचे नियंत्रण, समन्वय आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा समावेश असतो.
अभ्यासक्रमाचे शुल्क – फाउंडेशन – दरमहा ३०० रुपये. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून मागील वर्षी सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या चार विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
(ब) तीन वर्षे कालावधीचा पदविका (उत्तीर्ण) (डिप्लोमा पास कोर्स) अभ्यासक्रम – या अभ्यासक्रमात कथ्थक नृत्याच्या विस्तृत तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाते. वयोमर्यादा १ जून रोजी १५ ते २० वर्षे या दरम्यान असावे. अर्हता- किमान ९ वी वर्ग उत्तीर्ण. हिंदी किंवा इंग्रजी मध्ये या विद्यार्थ्यास लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे. उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य असावे. प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्याची निवड केली जाते.
प्रगत अभ्यासक्रमात गुरुंच्या मार्गदर्शनाखाली दररोज कथ्थक नृत्याचा सराव, योग अभ्यास, हिन्दुस्थानी कंठ संगीत आणि तबला/पखवाजचे प्रशिक्षण, तज्ज्ञांच्या कार्यशाळा, सुयोग्य अशा सादरीकरणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी, सर्जनशील सादरीकरण, या बाबींचा समावेश करण्यात येतो.
अभ्यासक्रमाचे शुल्क- दरमहा-३५० रुपये. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून मागील वर्षी सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या चार विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
(२) प्रगत अभ्यासक्रम- (अ) तीन वर्षे कालावधीचा पदविका (डिप्लोमा) (ऑनर्स) – या अभ्यासक्रमात कथ्थक सादरीकरणाच्या कौशल्याचा पाया मजबूत करणारे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाला योग, हिंदुस्थानी कंठ संगीत, तबला/पखवाज आणि अभिनय कला यांच्या प्रशिक्षणाचीही जोड दिली जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी १८ ते ३० वर्षे. अर्हता- कथ्थक केंद्राच्या डिप्लोमा पास परीक्षेमध्ये ६० टक्के गुण किंवा इतर गुरुंकडे प्रशिक्षण घेतले असल्यास किमान आठ वर्षाचे प्रशिक्षण, हिंदी वा इंग्रजीमध्ये लिहिता ,वाचता, बोलता आले पाहिजे, उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य.
अभ्यासक्रमाचे शुल्क दरमहा – ५०० रुपये. या अभ्यासक्रमाच्या तिनही वर्षी सर्व विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते. दुस-या वर्षी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून मागील वर्षी सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या तीन विद्यार्थ्यांना दरमहा १५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तिस-या वर्षी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून मागील वर्षी सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या तीन विद्यार्थ्यांना दरमहा २००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. (ब) दोन वर्षे कालावधीच्या पदविका नंतरचा (पोस्ट डिप्लोमा) अभ्यासक्रम- या अभ्यासक्रमात परिपूर्ण कथ्थक नृत्य सारदकर्ता बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वयोमर्यादा १ जून रोजी २० ते २६ वर्षे. अर्हता – १२वी, कथ्थक केंद्राच्या डिप्लोमा ऑनर्स परीक्षेत ६५ टक्के गुण आणि इतर सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण. हिंदी किंवा इंग्रजी मध्ये लिहिता बोलता वाचता आले पाहिजे. उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य. नृत्यातले सादरीकरण आणि संगीताकडे असलेली कलचाचणी घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
व्यावसायिक पातळीवर कथ्थक नृत्यात पारंगत होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा मजबूत पाया या अभ्यासक्रमाद्वारे होतो. या अभ्यासक्रमात कथ्थक नृत्याचे सखोल प्रशिक्षण देण्यासोबसोबतच या नृत्यप्रकाराशी निगडित इतर आंतरविषयातील बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये हिन्दुस्थानी कंठ संगीत, तबला पखवाज, योग यांचे शिक्षण या बाबींचा समावेश आहे.
अभ्यासक्रमाचे शुल्क दरमहा-५०० रुपये. सर्व विद्यार्थ्यांना दरमहा ७०० रुपये विद्यावेतन दिले जाते. दुस-या वर्षी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून मागील वर्षी सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या दोन विद्यार्थ्यांना दरमहा २५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
डिप्लोमा (ऑनर्स) आणि पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम केलेले विद्याथी नृत्य, संगीत, योग, सिध्दांत यामध्ये व्यस्त राहून आपली कला वेगळ्या उंचीवर नेण्याची क्षमता प्राप्त करु शकतात.
(३) प्रिपेटरी फेज (पदविका अभ्यासक्रमासाठी), कालावधी एक वर्षे. अभ्यासक्रमाचे शुल्क – दरमहा चारशे रुपये.
संगीत प्रशिक्षण-
(१) सर्टिफिकेट कोर्स-तबला/ पखवाज, कालावधी – एक वर्षं. वयोमर्यादा- १४ ते १७ वर्षे, अर्हता- किमान ६ वी उत्तीर्ण, इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिता-बोलता आणि वाचता येणे आवश्यक. शैक्षणिक शुल्क – दरमहा- ३०० रुपये.
(२) डिप्लोमा कोर्स- तबला/ पखवाज, कालावधी- पाच वर्षं. वयोमर्यादा- १५ ते २० वर्षे, अर्हता – किमान ८ वी उत्तीर्ण, इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिता-बोलता आणि वाचता येणे आवश्यक. शैक्षणिक शुल्क-दरमहा- ५०० रुपये.
(३) गायन विशेष कोर्स- कालावधी – तीन वर्षं वयोमर्यादा- १८ ते ३० वर्षे, अर्हता – किमान १२ वी उत्तीर्ण, इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिता-बोलता आणि वाचता येणे आवश्यक. शैक्षणिक शुल्क-दरमहा- १००० रुपये.
संपर्क- कथ्थक केंद्र, २, सॅन मार्टिन मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली – ११००२१, संपर्क- ०११-२६८७४२५१, ईमेल-asdmissionkathakkendra@gmail.com संकेतस्थळ- http://kathakkendra.in/
०००
(४) डिपार्टमेंट ऑफ म्युझिक-मुंबई विद्यापीठ
याविभागांतर्गत पुढील अभ्यासक्रम करता येतात.
(१) बॅचलर ऑफ म्युझिक इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल/सितार/तबला. कालावधी-३ वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी, (२) प्री डिप्लोमा फाउंडेशन कोर्स इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक. कालावधी-एक वर्षं, (३) डिप्लोमा इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल/लाइट व्होकल/सितार/तबला, कालावधी- दोन वर्षे,(४) सर्टिफिकेट कोर्स इन साउंड रिकॉर्डिंग ॲण्ड रिप्रॉडक्शन कोर्स,कालावधी-सहा महिने, (५)सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक कंपोझिशन ॲण्ड डायरेक्शन, कालावधी- चार महिने
संपर्क–डिपार्टमेंट ऑफ म्युझिक, दुसरा माळा,सांस्कृतिक भवन,विद्यापीठ परिसराच्या उत्तर दरवाजाच्या विरुध्द दिशेला, हंस भुग्रा रोड, सांताक्रुज (पश्चिम) , मुंबई- ४०००५५, ईमेल-udmusic01@gmail.com,संकेतस्थळ-mu.ac.in/department-of-music
०००
(५) ललित कला केंद्र (गुरुकुल) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ–
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) एकात्मिक (इंटिग्रेटेड) एम.ए (संगीत),(२) एकात्मिक (इंटिग्रेटेड) एम.ए (नृत्य) – दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी ५ वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी. संपर्क – ललित कला केंद्र (गुरुकुल)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे-४११००७, दूरध्वनी- ०२०-०२०-२५६९२१८२, संकेतस्थळ-campus.unipune.ac.in
०००
(६)एचएसएनसी(हैदराबाद सिंद नॅशनल कॉलिजिएट) युनिव्हर्सिटी,मुंबई-
या संस्थेच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बॅचरल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमांतर्गत कथ्थक,भरनाट्यम,ओडिसी,तबला आणि हिंदुस्थानी व्होकल या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.कालावधी- ३ वर्षे.संपर्क-डी.एम.हरीश बिल्डिंग,४७,डॉ.आर.जी.थडाणी मार्ग, वरळी,मुंबई-४०००१८,संकेतस्थळ-www.hsncu.edu.i,ईमेलaskmeanything@ hsncu.edu आणि sopa@hsncu.edu,दूरध्वनी-०२२-६६९८१०००
०००
(७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद
या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या विभागामार्फत बीए इन डान्स आणि बीए इन म्युझिक हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात.अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी-प्रत्येकी ३ वर्षे.
संपर्क-सोनेरी महाल जवळ,जयसिंगपुरा,औरंगाबाद-४३१००४, ईमेल-(१) (डान्स)-drsnb@rediffmail.comसंकेतस्थळ-bamu.ac.in/dept-of-dance
(२) (म्युझिक)- head.music@bamu.ac.inसंकेतस्थळ-bamu.ac.in/dept-of-music
०००००
(८) एनएमआयएमएस- स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स,मुंबई
नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन कंटेम्पोररी वेस्टर्न म्युझिक- या अभ्यासक्रमात संगीताचा इतिहास, व्यवसाय, संगीत तंत्रज्ञान, संगीत सिध्दांत संगीत रचना, की-बोर्ड अभ्यास, म्युझिक अरेंजिंग, कंपोझिशन प्रॉजेक्ट्स अशा विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:चा संगीत अल्बम यू-ट्यूबवर अपलोड करावा लागतो. त्याची लिंक संस्थेकडे पाठवावी लागते. त्यानंतर मुलाखत आणि कलचाचणीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.
(२) बीए इन इंडियन म्युझिम (व्होकल/सतार) कालावधी-तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण.
संपर्क-एनएमआयएमएस-स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स,विलेपार्ले(पश्चिम),मुंबई-४०००५६,दूरध्वनी-०२२-४२३३३०३८,संकेतस्थळ-sopa.nimims.edu,
००००
(९) व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल
या संस्थेच्या स्कूल ऑफ म्युझिकने, बॅचलर ऑफ आर्ट्स इन म्युझिक प्रॉडक्शन ॲण्ड कम्पोझिशन, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संगीत संयोजक, संगीत दिग्दर्शक आणि गीत निर्माते होण्यासाठीचे शिक्षण आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात येते. यामध्ये अत्याधुनिक संगीत साधने, संगणकीय संगीत प्रक्रिया आदिंचा समावेश आहे. जगातील मान्यवर संगीतज्ज्ञांना हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी बोलावले जाते. उच्चदर्जाच्या संगीतकारांची निर्मिती व्हावी या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत, पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत,लोकसंगीताचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना लघु चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी उचलता येते. म्युझिक अल्बम, पार्श्वसंगीत, सोप ऑपेराचे संगीत, जाहिरातीतील संगीत, जिंगल्स मधील संगीताची निर्मिती करण्याची संधी मिळू शकते. संगीताचे अध्यापनही करता येते. अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा द्यावी लागते.हा अभ्यासक्रम राजीव गांधी युनिव्हर्सिटीशी संलग्नित आहे.
काय शिकाल?
भारतीय संगीताच्या मूलभूत बाबी, पाश्चात्य संगीत तंत्र, पियानो तंत्र, ध्वनीच्या मूलभूत बाबी, संगीत व्यवसाय आणि व्यवहार पध्दती/करार आणि सहमती, तबल्याच्या मूलभूत बाबी, ड्रमची ओळख, कर्नाटिक संगीत, भारतीय राग, पाश्चिमात्य संगीत सिध्दांत, ध्वनीमुद्रण तंत्र, संगीत निर्मिती आणि सादरणीकरण, भारतीय संगीत रचना आणि गीत रचना, प्रगती संगीत रचना, आंतरराष्ट्रीय संगीत, सुगम आणि लोकसंगीत, पार्श्वसंगीत, कविता – कला प्रकार आणि भारतीय संस्कृती, स्वतंत्र संगीताचा इतिहास, ध्वनी आणि संगीतातील नवे तंत्र, ऑर्केस्ट्रेशन, जागतिक संगीत, इलेक्ट्रॉनिक संगीतचा इतिहास आणि डीजेईंग, संगीत आणि समाज, नव्या प्रकारचे ध्वनी आणि नवे तंत्र.
संपर्क – व्हीसलिंग वूड्स इंटरनॅशनल,फिल्मसिटी कॉम्प्लेक्स,गोरेगाव(पूर्व) मुंबई–४०००६५,दूरध्वनी–०२२-६२७१६०७०/८४५१८०३८५२ ईमेल-admissions@ whistlingwoods.net संकेतस्थळ -www.whistlingwoods.net
०००
(१०)सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी,मुंबई
या संस्थेंतर्गत कार्यरत असणाऱ्या माया सोमय्या स्कूल ऑफ म्युझिक ॲण्ड परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हा अभ्यासक्रम करता येतो.यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत(व्होकल/मेलडी इंस्ट्रुमेंट-ताल वाद्य/परक्युशन स्वर वाद्य)या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.कालावधी-चार वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी.संपर्क-ईमेल-admissions@somaiya.edu संकेतस्थळ-www.somaiya.edu, संकेतस्थळ-mssmpa.somaiya.eduभ्रमणध्वनी-७०२८२३३७७७
०००
(११) एमआयटी आर्ट डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे–
या संस्थेने बॅचरल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.त्याअंतर्गत नृत्य,संगीत आणि वाद्ये यामध्ये स्पेशलायझेशन करता येतं.कालावधी-४ वर्षे.अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी.
संपर्क-विश्वशांती संगीत कला ॲकॅडेमी,राजबाग,हडपसरच्या बाजूला,लोणी काळभोर,पुणे,संकेतस्थळ-mituniversity.edu.in,ईमेल-mit.viska@edu.in,दूरध्वनी-९०२१०८०११८
०००
(१२) नालंदा नृत्य कला महाविद्यालय,मुंबई
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत -(१) बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स(नृत्य)– यामध्ये भरतनाट्यम आणि मोहिनी अट्टम या दोननृत्यांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अर्हता-कोणत्याही विषयातील १२ वी,(२) सर्टिफिकेट इन डान्स (ओडिसी), कालावधी-एक वर्षं, अर्हता-१२ वी,(२)डिप्लोमा इन डान्स(ओडिसी),कालावधी-एक वर्षं,अर्हता-पदवी आणि ओडिसीचे प्रशिक्षण घेतल्याचे गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र, (३) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन डान्स(ओडिसी),कालावधी-एक वर्षं,अर्हता-पदवी आणि ओडिसीचे प्रशिक्षण घेतल्याचे गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र, (४) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन भरत नाट्यम,कालावधी-दोन वर्षे(पार्ट टाइम),अर्हता-१२वी, (५)सर्टिफिकेट कोर्स इन डान्स (कथ्थक),कालावधी-एक वर्षं,अर्हता-१२वी, (६)डिप्लोमा कोर्स इन डान्स (कथ्थक),कालावधी-एक वर्षं,अर्हता- अर्हता-पदवी आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतल्याचे गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र, (७)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन डान्स (कथ्थक),कालावधी-एक वर्षं,अर्हता-पदवी आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतल्याचे गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र, (८) डिप्लोमा इन नृत्यशास्त्र,कालावधी-दोन वर्षे,अर्हता-१२वी, (९) सर्टिफिकेट इन फोक डान्स ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गुजरात. अर्हता -कोणत्याही विषयातील १२वी.कालावधी- एक वर्षं
संपर्क-प्लॉट ए७/१,एन.एस रोड नंबर १०,जेव्हीपीडी स्किम,विलेपार्ले(पश्चिम),मुंबई-४०००४९,दूरध्वनी-०२२-२६२०६३२६,ईमेल-nnkm1973@gmail.com,संकेतस्थळ-www.nalandadancecollege.edu.in
०००
(१३) अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल,नवी मुंबई
या संस्थेचे मुख्य संगीत विद्यालय नवी मुंबई वाशी येथे आहे. या संस्थेशी १२शेहून अधिक संस्था संलग्नित आहेत. देशभरात ८००हून अधिक परीक्षा केंद्रे आहेत. या संस्थेमार्फत प्रारंभिक ते पीचडीपर्यंतच्या परीक्षा घेतल्या जातात.
या संस्थेत व्होकल(कंठ संगीत), हार्मोनियम, बासरी, व्हायोलीन, सतार, कथ्थक आणि भारतनाट्यम या विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.
संपर्क– गंधर्व निकेतन, प्लॉट क्रमांक ५, सेक्टर ,सेक्टर ९ ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३,दूरध्वनी-०२२-२७६६२०१५,संकेतस्थळ-abgmvm.org vashioffice@abgmvm.org
सुरेश वांदिले