नाटक शिकण्यासाठी…
नाटक रक्तातच असावं लागतं, असं म्हंटलं जातं. ते खरं खोटं माहीत नाही. पण हे रक्त अधिक घट्ट करायचं असेल तर, त्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण -प्रशिक्षण घेणं अत्यंत उपयुक्त ठरु शकतं.
अभियनाची चालती बोलती शाळा समजल्या जाणा-या श्री अमिताभ बच्चन यांनी आणि ज्येष्ठ अभिनेते श्री अनुपम खेर यांच्या प्रशिक्षण अॅकॅडेमीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला अभियनाचं प्रशिक्षण घेता आलं नाही याची खंत व्यक्त केली होती. नाटक-चित्रपट- टीव्हीच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी केवळ प्रतिभा असून चालत नाही त्याला प्रशिक्षणाची जोड दिली तर गुणवत्ता आणि दर्जा या मध्ये वाढ होते, असं अमिताभ यांना सांगायचं होतं.
अशा प्रशिक्षणाद्वारे सैध्दांतिक संकल्पना (कंसेप्ट) स्पष्ट होतात. विषयातील बारकावे कळतात. देश-विदेशातील नव्या प्रवाहांचा परिचय होतो. एकदा थिअरी (सैध्दांतिक ज्ञान) पक्की झाली की मग प्रात्यक्षिकं, सही रे सही व्हायला तेवढी अडचण जात नाही. कामात सफाईदारपणा येतो. त्यामुळे अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य या बाबींचं प्रशिक्षण घेणं अतिशय फायद्याचं ठरतं. अमरिश पुरी, ओम पुरी,रोहिणी हट्टंगडी, राजबब्बर, नसरुद्दिन शहा,मनोज वाजपेयी, वामन केंद्रे, शिवदास घोडके, या सारख्या नाट्य- चित्रपट- टीव्ही या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती या नाटयमाध्यमाच्या विविधं अंगांचं प्रशिक्षण घेतलेल्या आहेत.
आपल्या देशात नाटशास्त्र/ अभिनय/ दिग्दर्शन व इतर तांत्रिक अंग शिकविणा-या ब-याच संस्था आणि विद्यापीठाअंतर्गत विभाग कार्यरत आहेत. या संस्थांच्या अभ्यासक्रमांपेक्षा उजवा ठरणारा व विशिष्ट स्वरुपाची गुणवत्ता आणि दर्जा असलेला अभ्यासक्रम दिल्ली येथे असलेल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे सुरु करण्यात आला आहे.
डिप्लोमा कोर्स इन ड्रॅमॅटिक्स आर्टस
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही स्वायत्त संस्था असून या संस्थेला भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाचं अर्थ साहाय्य लाभलं आहे. या संस्थेच्या वतिनं तीन वर्ष कालावधीचा, डिप्लोमा कोर्स इन ड्रॅमॅटिक्स आर्टस, हा अभ्यासक्रम चालविला जातो. हा अभ्यासक्रम निवासी स्वरुपाचा आणि पूर्णकालीन आहे.
या अभ्यासक्रमाद्वारे अभियन, डिझाइन आणि रंगमंचाशी निगडीत इतर विषयांचं सर्वांगीण ज्ञान उपलब्ध करुन दिलं जातं. संपूर्ण रंगमंचीय व्यक्तिमत्व विकासासाठी हा अभ्यासक्रम उपुक्तत ठरतो. या अभ्यासक्रमाचं माध्यम हिंदी आणि इंग्रजी आहे.
अर्हता: या अभ्यासक्रमाला प्रवेश घेउु इच्छिणारी व्यक्ती कोणत्याही शाखेतील पदवीधर असावी आणि तिचा सहा नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत सक्रीय सहभाग असावा. तिला इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेंचं कामचलाउु ज्ञान असावं. हा अभ्यासक्रम अतिशय कठोर शारीरिक परीश्रम करायला लावणारा असल्यानं उमेदवारांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ असणं गरजेचं ठरतं. संस्थेच्या डॉक्टरांचं फिटनेस प्रमाणपत्र आणि विमा कंपनीचं इंशुरंस प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या व्यक्तिचं वय 1 जुलै रोजी किमान 18 आणि कमाल 30 वर्ष असावं. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या वयात पाच वर्षाची सूट देण्यात येते.
शिष्यवृत्ती – हा अभ्यासक्रम दिल्ली येथे करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा खर्च झेपावा यासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा ९५०० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्याला अभ्यासाची पुस्तके व इतर साहित्य घेण्यासाठीचा खर्च भागवणं सुलभ जातं.
निवड कशी केली जाते? – या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी अखिल भारतीय पातळीवर चाळणी परीक्षा मुंबई, कोलकता,बेंगळुरू आणि दिल्ली या केंद्रांवर घेतली जाते. या परीक्षेत उत्तिर्ण झालेल्या उमेदवारांना दिल्ली येथे चार ते पाच दिवसाच्या कार्यशाळेसाठी बोलावलं जातं. त्यासाठी जाण्या-येण्याचं रेल्वेचं दुस-या वर्गाच तिकिट दिलं जातं. शिवाय खानपानभत्ताही दिला जातो. या कार्यशाळेतील कामगिरीवर आधारित विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते.
संपर्क- असिस्टंट डायरेक्टर (ॲकेडमिक) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, बाहावालपूर हाऊस, भगवानदास रोड, नवी दिल्ली-११०००१, संकेतस्थळ- nsd.gov.in, ईमेल-nationalschoolofdrama@gmail.com, दूरध्वनी- ०११-२३०७३७३३
००००
नॅशनल स्कूल ऑफ ड्रॉमा बेंगळुरु कॅम्पस
या ठिकाणी एक वर्षं कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स इन ॲक्टिंग सुरु करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी आणि नाट्य क्षेत्रातील पुरेसा अनुभव आणि किमान ४ नाट्यकृतिंध्ये सहभाग.
संपर्क- नएसडी, कलाग्राम, मल्लाथल्ली, बिहाईंड बेंगळुरु युनिव्हर्सिटी, बेंगळुरु – ५६
दूरध्वनी- ०८०
-२३१८३०२७ ईमेल- nsd.bengaluruchapter@gmail.com, संकेतस्थळ-
www.centeradmission.nsd.gov.in
याच संस्थेच्या सिक्कीम केंद्रात, एक वर्षं कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स इन ड्रॅमॅटिक आर्ट, वाराणसी केंद्रात एक वर्षं कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स इन इंडियन क्लासिकल थिएटर आणि त्रिपुरा केंद्रात एक वर्षं कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स इन थिएटर इन एज्युकेशन हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. संकेतस्थळ – –www.nsd.gov.in
०००
भारतेंदू ॲकॅडेमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स –
या संस्थेमार्फत दोन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक आर्ट्स हा अभ्यासक्रम चालवण्यात येतो. हा अभ्यासकम अभिनय, दिग्दर्शन, डिझायनिंग आणि थिएटर आर्ट्स या विषयांमध्ये करता येतो. अर्हता – कोणत्या विषयातील पदवी, हिंदी आणि इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक. १ मे २०२२ रोजी वयोमर्यादा-२० ते ३० वर्षे. इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षाची सूट.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा मुलाखत आणि ऑडिशन/आवाज परीक्षा घेतली जाते. अंतिम निवडीसाठी संस्थेमध्ये आयोजित चार दिवस कार्यशाळेत उपस्थित राहावे लागते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, प्रशिक्षण साहित्य आणि भोजनासाठी दरमहा साडेचार हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. एकूण २० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
संपर्क- भारतेंदू भवन, विकास खंड – १, गोमती नगर, लखनौ-२२६०१०, दूरध्वनी – ०५२२-२३००५९८, संकेतस्थळ-www.bnalko.in, ईमेल-bna.lko@gmail.com
०००
सत्यजित रे फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट
अभ्यासक्रम- (१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक ॲण्ड डिजिटल मीडिया, कालावधी– दोन वर्षे, अर्हता–कोणत्याही विषयातील पदवी, निवड – जॉईंट एन्ट्रन्स टेस्टव्दारे.
डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती, अशा कार्यक्रमांचे विपणन (मार्केटिंग) ,विक्री, कार्यान्वयन, निधीची उपलब्धता, नियामक मंडळासोबतच्या समस्यांचे निर्धारण आदी विषयघटकांना या अभ्यासक्रमात शिकवले जाते. व्यवस्थापकीय कौशल्य निर्मितीचे घटक या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. दूरचित्रवाहिन्या, रेडिओ वाहिन्या, जाहिरात संस्था, वेब आणि मोबाईल ही माध्यमे आणि जनसंवाद आणि मनोरंजन क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या व्यवस्थापकीय मनुष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमाव्दारे केली जाते.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन सिनेमा – अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे.अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधर. या अभ्यासक्रमांतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन, छायाचित्रणकला, ध्वनीमुद्रण आणि डिझाइन, संपादन आणि ॲनिमेशन सिनेमा या सहा विषयांपैकी एका विषयात स्पेशलायझेशन करता येते.
दिग्दर्शन आणि पटकथा लेखन – या स्पेशलायझेशनमध्ये पुढील विषय घटकांचा अभ्यास करता येतो. पहिल्या सत्रामध्ये दिग्दर्शन, चित्रपटाचे व्याक्रण, स्थानिक जोडणी, ऐहिक जोडणी, पटकथेची मूलभूत तत्वे, पटकथेचे विविध प्रकार, कथेची रचना, अभिनयाची रचना, नायकाचा प्रवास, मिथक आणि मूळप्रकार, मूक चित्रपटाचा इतिहास, चित्रपट उद्योगाचा इतिहास, चित्रपट तंत्राची उत्क्रांती, चित्रपटाची भाषा, श्रेष्ठ चित्रपट व्यक्तिमत्वाचे योगदान, चित्रपटातील ध्वनीचे आगमन आणि बोलपटाचा जन्म, डॉक्युमेंट्री चित्रपटांचा इतिहास, डॉक्युमेंट्रिचे विविध प्रकार, समकालीन डॉक्युमेंट्रिची तोंडओळख. मानवी मन, आकार, रचना, विकास, जागा, प्रकाश आणि रंग यांचा प्रारंभिक अभ्यास, द्रुष्यात्मक अभिकल्प इत्यादी. स्पेशलायझेशनच्या अभ्यासात चित्रपट दिग्दर्शन, चित्रपटातील दृष्याच्या सुसंगतीचे विश्लेषण, आकलन, पटकथा लेखन, संगीत आकलन, कला दिग्दर्शन, दिग्दर्शकाचा अभ्यास, चित्रांकनाची कला, अभिनयाची कार्यशाळा, निर्मिती डिझाइन कार्यशाळा, कार्यप्रणाली कार्यशाळा, चित्रपट निर्मिती, लघु चित्रपट पटकथा विकास, पार्श्वगायन कार्यशाळा आदी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो.
संपर्क – सत्यजित रे फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन , ई. एम. बायपास रोड, पोस्ट ऑफिस पंचासायार, कोलकता- 700094, दूरध्वनी- 033-24328355,फॅक्स-24320732, ईमेल-registrar@ srfti.ac.in, संकेतस्थळ- http://srfti.ac.in
सुरेश वांदिले