कलेच्या प्रांतात
संगीत, नृत्य आणि नाट्य या सारख्या कला क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार आर्थिक सहाय्य देते. गुरुकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपयुक्त ठरते.
सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स ॲण्ड ट्रेनिंग, ही संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेची स्थापन १९७९ साली करण्यात आली. त्यासाठी कमलादेवी चटोपाध्याय आणि डॉ.कपिला वात्सायन यांनी पुढाकार घेतला. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. भारताच्या विविध प्रांतातील पारंपरिक कला व संस्कृतीशी संबंधित प्राचीन व दुर्मिळ संसाधाने प्राप्त करणे, त्यांचे डिजिटायझेन करणे, व्हीडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग करणे, अशा संवर्धनात्मक बाबी ही संस्था करत असते. या साहित्याचा उपयोग आपल्या देशाच्या समृध्द कलापरंपरेची माहिती विद्यार्थी व नागरिकांना व्हावी यासाठी चित्रफिती , शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली जाते.
या संस्थेमार्फत तरुण कलावंतांना कनिष्ठ आणि वरिष्ठ स्वरुपातील शिष्यवृत्ती दिली जाते. कला क्षेत्रातील सखोल संशोधनात्मक कार्य करण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. कला व्यवस्थापन या नव्या क्षेत्राकडेसुध्दा ही संस्था आता लक्ष पुरवायला लागली आहे.
कल्चरल हेरिटेज यंग लिडरशीप प्रोग्रॅम ही योजना, ही संस्था राबवित असते. सामाजिक मूल्ये आणि सामुदायिक मूल्यांची समाजात निर्मिती होऊन ती वृध्दिगंत व्हावी, यासाठी ही योजना राबवली जाते.
कल्चरल टॅलेन्ट सर्च स्कॉलरशीप
या संस्थेमार्फत कल्चरल टॅलेन्ट सर्च स्कॉलरशीप, ही योजना राबवली जाते. देशातील १० ते १४ वर्षे वयोगटातील प्रज्ञावंत मुलामुलींना त्यांच्या आवडीच्या कला क्षेत्रात पूर्ण वेळ प्रशिक्षण घेता येणं शक्य व्हावं यासाठी ही योजना १९८२ सालापासून राबवण्यात येते. मान्यताप्राप्त गुरुकुलात शिकणाऱ्या अथवा पंरपरेने पारंपरिक कला सादर करणाऱ्या कुटुंबातील मुला- मुलींना संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला आणि दुर्मिळ होत चाललेल्या साहित्यकृतींचे जतन या क्षेत्रात स्पेशलाइज्ड प्रशिक्षण मिळावं, यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. प्रारंभी ही शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी देण्यात येते. त्यानंतर प्रत्येक दोन वर्षानंतर शिष्यवृत्तीचं नूतनीकरण केलं जातं. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या वयाच्या २० वर्षांपर्यंत किंवा या प्रशिक्षणातील विदयापीठीय पदवीचा स्तर गाठेपर्यंत दिला जातो.
या शिषवृत्तीमध्ये दरमहा ३६०० रुपयांच्या अर्थसाहाय्याचा समावेश आहे. या शिवाय ९ हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत दरवर्षी शिकवणी शुल्क, परत केले जाते. या शिष्यवृत्तीसाठी ६५० मुला-मुलींची निवड केली जाते. याध्ये खुल्या संवर्गातील ३६० मुले- मुली, अनुसुचित जमाती आणि आदिवासी सांस्कृतिक संवर्गातील १०० मुले- मुली, पारंपरिक कला जोपासणाऱ्या कुटुंब संवर्गातील १२५ मुले मुली, दिव्यांग संवर्ग २० आणि सर्जनशील साहित्य /दुर्मिळ साहित्य सवंर्ग ३० शिष्यवृत्ती दिल्या जातात.
निवड प्रक्रिया-
या शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांना, मुलाखत/ चाळणीसाठी केंद्रिय निवड समितीकडे बोलावलं जातं. या समितीचा निर्णय अंतिम समजला जातो. अर्ज केलेल्या उमेदवारांमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखत/चाळणीचा दिनांक, ठिकाण आणि वेळ कळवली जाते. साधारणत: ही चाळणी/मुलाखत मे ते ऑगस्ट महिन्यात हैदराबाद, गौहाटी, उदयपूर,या प्रादेशिक केंद्रावर किंवा दिल्ली येथील मुख्य केंद्रावर होऊ शकते. प्रत्येक परिक्षक १ ते १० गुणांच्यामध्ये गुण देऊ शकतात. सर्व परीक्षकांच्या एकत्रित गुणांवर आधारित अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
शिक्षकांसाठी प्रशिक्षण
|
कला क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक/ गुरुंसाठी ही संस्था वर्षभर विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करत असते. कलेच्या प्रांतात करिअर घडवू इच्छिणाऱ्या मुलामुलींच्या व्यक्तिमत्व विकासाठी उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिलं जातं किंवा कार्यपध्दती शिकवली जाते. भारतीय समृध्द कला, संस्कृती आणि पंरपरांचे जतन करण्यासाठी समुदाय आणि विद्यार्थी यांचे सक्रिय योगदान मिळवण्याठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत असते. या कार्यशाळांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे कला, नृत्य, संगीत, नाट्य या क्षेत्रातील ज्ञान वृध्दिगंत करणे सुलभ जावे, या दृष्टिने या कार्यशाळातील प्रशिक्षणाची संरचना केली जाते. भारतीय पारंपरिक कला आणि संस्कृतीच्या जतनाबद्दल जाणिवजागृती व्हावी म्हणून संस्थेतर्फे प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन प्रयत्न केले जातात. संपर्क- (1) सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग, १५- अ, सेक्टर- ७, व्दारका, नवी दिल्ली-११००७५, दूरध्वनी-०११-२५३०९३००, ईमेल-dir.ccrt@gov.in, (2) विभागीय केंद्र, अपोजिट सीआयआय, न्यू गुगल ऑफिस ,माधापूर टू कोंडापूर मेन रोड, माधापरू, हैदराबाद-५०००८४, दूरध्वनी-०४०-२३११७०५०, टेलेफॅक्स-२३११९१८, संकेतस्थळ- https://ccrtindia.gov.in/activities/scholarship-schemes, ईमेल-rchyd.ccrt@nic.in |