करा श्रीमंत,व्हा श्रीमंत
वॉरेन बफेट हे जगातील नामवंत गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की, तुम्ही जेव्हा निद्राधीन होता, तेव्हा जर तुमची संपत्ती (पैसा) कार्यरत नसेल अथवा काम करत नसेल तर तुम्हास मृत्यूपर्यंत काम करतच राहावे लागेल. याचा अर्थ असा की, आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा विनियोग व्यवस्थित व्हायला हवा. आपला पैसा हा केवळ बचतखात्यात पडून राहायला नको. या पैशाची सतत वृध्दी होत राहिली पाहिजे. म्हणजेच संपत्ती वाढली पाहिजे.
ही संपत्ती वाढणार कशी? संपत्ती कधीच जादूने वाढत नाही. जगातील सर्वश्रेष्ठ जादूगारासही हे शक्य नाही. परिश्रमाने कमावलेल्या पैशाची मशागत नीट केली तरच संपत्ती वाढते. अशी मशागत करण्याचे ज्ञान आपणास असेलच असे नाही. पारंपरिक बचतीच्या पलिकडे सर्वसाधारणरीत्या बघितले जात नाही. त्यामुळे बँकेतील बचत खाते, फिक्स डिपॉझिट, पोस्टातील गुंतवणूक आणि विमा पॉलिसी, सोने खरेदी, घर खरेदी, भूखंड खरेदी या मर्यादेतच पैशाची गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीतून सतत वाढणाऱ्या महागाईशी सामना करता येईल इतकीही वाढ होत नाही. महागाई दहा टक्क्याने वाढत असते तर, गुंतवलेल्या पैशाची वाढ ही ७ किंवा ६ टक्क्याने होते. त्यामुळे गुंतवलेल्या पैशाचे दोन ते चार टक्क्याने नुकसान झाले असते.
सुरक्षिततेचा धोका
सामान्य नागरिक गुंतवणूक करताना आपल्या पैशाचे नुकसान होणार नाही, आपली फसवणूक होणार नाही याची काळजी करतो. त्याला भीतीही वाटते. त्यामुळे तो शेअर्स, म्युच्यूअल फंडातील गुंतवणुकीकडे लक्ष देत नाही. त्याबद्दल माहिती करुन घेण्याची तसदीही घेत नाही. संपत्तीच्या वृध्दीमध्ये धोक्यांची जाणीव, त्यातील फायदे अथवा लाभ याबद्दल फारशी माहिती सामान्य नागरिकांना नसते. या दोन्ही बाबींची वस्तुनिष्ठ माहिती करुन घेतली जात नाही. समजा एखाद्या गुंतवणुकीत काही तोटा झाला तर तो मुद्दा पक्का मनात ठसतो. हाच मुद्दा पुढे लक्षात ठेवला जातो. सुरक्षिततेस अधिक महत्व दिले जाते. एखाद्यावेळेस जर गुंतवणुकीत नुकसान झाले तर याचा अर्थ निर्णय चुकला असा होत नाही.
कोणतीही गुंतवणूक करताना ती कां करतो याचा सारासार विचार करायला हवा. त्यातून नफा किती होईल ? त्यातून संपत्तीची वाढ किती होईल ? यात निश्चितता आणि अनिश्चतता किती प्रमाणात राहील? यासर्व बाबी जाणून घेणे आवश्यक ठरते. गुंतवणुकीच्या परिणामांची माहिती नसणे हाच खरा धोका असल्याचे विश्लेषण वॅरन बफेट यांनी केले आहे.
संपत्ती निर्मितीच्या मर्यादा
भारतीय नागरिकांची मानसिकता ही संपत्तीच्या वृध्दीपेक्षा खर्च कमी करण्याकडे असते. पांघरुन बघून हातपाय पसरावे अशी लहानपणापासून शिकवण दिली जाते. ही शिकवण वाईट नाही. पण त्यामुळे संपत्तीनिर्मितीच्या बाबतीत मर्यादा पडतात. त्या मर्यादा ओलांडण्याचे प्रयत्न होत नाहीत. समजा अचानक काही खर्च वाढला तर साधारणत: बऱ्याच अत्यावश्यक बाबींसाठी हात आखूडता घेतला जातो. उत्पन्न वाढीचा विचार केला जात नाही. स्वत:कडे असलेल्या एखाद्या कौशल्याचा वापर संपत्ती निर्मितीसाठी करावा असे वाटत नाही. नियमित स्वरुपाच्या पगाराद्वारे संपत्ती निर्मिती व्हावी यासाठी घर वा अत्यावश्यक खर्चाला कात्री लावली जाते.
बचतीची मानसिकता एखाद्या घटनेशी जोडलेली असते. विशिष्ट वय गाठल्यावर वित्तीय स्वातंत्र्य प्राप्त व्हावे असा विचार केला जात नाही वा तशी अपेक्षा ठेवली जात नाही. गुंतवणुकीच्या निर्णयामध्ये बरेचदा भावनिक बाजू वरचढ ठरतात.
गुंतवणुकीमध्ये भावनिक निर्णय महत्वाचे ठरत नाही. हे निर्णय व्यावहारिकच असायला हवेत. ४५ व्या वर्षी वित्तीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वत:मध्ये आणखी सुधारणा वा कौशल्यवृध्दी करुन संपत्ती निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज असते. संपत्ती निर्मितीची पर्यायी साधने वा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. संपत्तीच्या सुरक्षिततेऐवजी तिची वृध्दी करण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. ही अशी मानसिकता तयार करण्याचे कार्य संपत्ती व्यवस्थापक किंवा संपत्ती वृध्दीसाठी साहाय्य करु शकणारे तज्ज्ञ करु शकतात.
वित्तीय सल्लागार
पारंपरिक गुंतवणुकीच्या पलिकडे जाऊन गुंतवणूक करण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या या वित्तीय सल्लागारांकडे आता हळूहळू कां होईना सल्ला घेण्याची मानसिकता वाढू लागली आहे. गुंतवणूक सल्लागार वा वित्तीय सल्लागार या क्षेत्रात चांगले करिअर करता येणे शक्य आहे. संपत्ती निर्मितीसाठी आवश्यक असणारे शिक्षण आणि प्रशिक्षण घेतल्यास व गुंतवणुकदारांचा विश्वास प्राप्त केल्यास या क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात.
अभ्यासक्रम
बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) इन्स्टिट्यूट – या संस्थेने स्टॉक मार्केट, म्युच्यूअल फंड, संपत्ती व्यवस्थापन, वित्तीय मार्गदर्शन आदी संबधित विविध विषयांवर विविध कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम गुंतवणुकदारांसोबतच उद्योजक, व्यावसायिक यांना उपयुक्त ठरु शकतात.
हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
१) ग्लोबल फायनांशिअल मार्केट्स प्रोफशनल – या अभ्यासक्रमामध्ये कॅश, डेरिव्हेटिव्हज, म्युच्यूअल फंड, बँकिंग कूऑर्डिनेशन, फायनांशिअल मार्केट, बँकिंग ऑपरेशन आदी विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केल्यावर इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकर, बिझिनेस ॲनालिस्ट, रिस्क मॅनेजमेंट फायनांशिअल सर्व्हिस, डेटा गव्हर्नन्स मॅनेजमेंट, क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट, फायनांस मॅनेजमेंट, टेक्निकल ॲनालिस्ट, ऑडिट कन्सलटन्ट, कन्सलटन्ट, वेल्थ मॅनेजमेंट, लोन ऑफिसर, फायनांशिअल ॲडव्हायजर, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ,रिस्क मॅनेजमेंट, सपोर्ट डेटाबेस ॲनालिस्ट, अकाउंटिंग मॅनेजमेंट, क्रेडिट मॅनेजमेंट आणि स्पेशॅलिस्ट, रिटेल बँकिंग मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकर, प्रोफेशनल ट्रेडर, कस्टमर सर्व्हिस मॅनेजमेंट, बँकिंग स्पेशॅलिस्ट, बँकिंग सेंटर सुपरव्हायजर आदी संधी मिळू शकतात.
अर्हता– कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- एक वर्षं
२) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बँकिंग ॲण्ड फायनांस– भारतातील वित्तीय क्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे. त्याचा सातत्याने विस्तार होत आहे. वाणिज्यिक बँका, विमा कंपन्या, इतर वित्तीय कंपन्या, सहकारी संस्था, निवृत्त निधी, म्युच्यूअल फंड, सूक्ष्म वित्तीय संस्था यांची वाढ होत आहे. २०२२ पर्यंत आपला देश जगातील सर्वात मोठा पाचवा बँकिंग आणि विमा क्षेत्र असलेला बनण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या अहवालानुसार २०२२ पर्यंत या क्षेत्रासाठी १४ लाखांच्या आसपास प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल. त्यामुळे वित्तीय तंत्र आणि कौशल्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी– एक वर्षं
३) मास्टर्स इन ग्लोबल फायनांशिअल मार्केट्स– वित्तीय क्षेत्रात प्रगती करण्यासाठी स्पेशलाइज्ड ज्ञानाची गरज भासते. हे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या क्षेत्रातील उमदेवार, विविध बदल आणि चढउतारामध्ये कंपनीची प्रगती साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
वित्तीय मार्केट्समध्ये सातत्याने होणारे बदल, जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि तंत्रज्ञानातील बदल यांच्याशी प्रभावीरीत्या एकरुप होणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज सध्या मोठया प्रमाणावर आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग, फंड मॅनेजमेंट, डेट आणि कॅपिटल मार्केट्स, इन्व्हेस्टमेन्ट ॲनालिसीस आणि रिसर्च अशा क्षेत्रात संधी मिळू शकते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी-दोन वर्षे.
४) मास्टर्स इन फायनांशिअल टेक्नॉलॉजी– वित्तीय व्यवहार अधिक प्रभावी करण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. विद्यार्थ्यांना फायनांस, अकाउंटिंग, बिझिनेस इन्फर्मेशन सिस्टिम आणि ॲनालिटिकल मेथड यांचे प्रशिक्षण दिले जाते. ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल लर्निंग, बॉट्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आल्याने या अभ्यासक्रमाची सध्याच्या स्पर्धात्मक काळात उपयुक्तता वाढली आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी– दोन वर्षे.
लघु मुदतीचे अभ्यासकम
१) सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन कॅपिटल मार्केट्स– कॅपिटल मार्केट, बँक आणि वित्तीय सेवा, वित्तीय व्यवस्थापन संबंधित सर्व पैलूंचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दहा आठवडे. हा अभ्यासक्रम जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे.
२) सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन स्टॉक मार्केट- या अभ्यासक्रमांतर्गत कंपन्यांचे शेअर्स, इनिशिअल पब्लिक ऑफरिंग- आयपीओ, डेरिव्हेटिव, स्टॉक मार्केटचे तांत्रिक विश्लेषण, सूक्ष्मअर्थशास्त्र आणि वित्तीय नियोजन अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. कॅपिटल मार्केट म्हणजेच शेअर मार्केट समजून घेणे आणि त्यात व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. अर्हता– १२ वी उत्तीर्ण.
३) बेसिक प्रोग्रॅम ऑन फायनांशिअल स्टेटमेंट ॲनालिसीस– या अभ्यासक्रमात गुंतवणुकीचे कौशल्य शिकवले जाते. बोनस शेअर्स, राइट इश्यूज, डिव्हिडंट, बाय बॅक, बॅलन्स शीट, कंपन्यांच्या नफा आणि तोट्याचे विश्लेषण आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. अर्हता- १२ वी उत्तीर्ण.
४) बेसिक प्रोगॅम ऑन म्युच्यूअल फंड फॅक्टशीट्स– म्युचूअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची याविषयी या अभ्यासक्रमात शिकवले जाते. म्युच्यूअल फंड घराणे, विविध योजना आणि त्याद्वारे गुंतवणूकदारांच्या निधीची वेगवेगळया ठिकाणी होणारी गुंतवणूक आदी बाबींचे महत्व शिकवले जाते. अर्हता– कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर.
५) सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन कमोडिटी आणि करन्सी मार्केट- या अभ्यासक्रमात मूलभूत गुंतवणूक धोके सिध्दांत, सांख्यिकी व्यवहार, धातू बाजारातील व्यवहार, उर्जा क्षेत्रातील व्यवहार, कृषी क्षेत्रातील व्यवहार, स्टॉक मार्केटची व्यवहार प्रणाली याविषयी माहिती दिली जाते. नियामक यंत्रणा, धोके पातळी जाणून घेणारी तत्वे, खरेदी-विक्रीची व्यूहनीती इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. स्टॉक मार्केट सुरु असतानाचे व्यवहार (डे ट्रेडिंग), तांत्रिक विश्लेषणद्वारे इंट्रा-डे ट्रेडिंग यांचे प्रात्यक्षिक शिकवले जातात. अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी.
इतर अभ्यासक्रम
सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन १) क्रेडिट अॅनालिसीस, २) रिस्क मॅनेजमेंट, ३) डेरिव्हेटिव्ह ,४) फायनांशिअल मॉडेलिंग,५) स्टॉक मार्केट, ६) टेक्निकल अॅनालिसीस, ७) इंव्हेंस्टमेंट बँकिंग, ८)जीएसटी,९) फायनांशिअल आणि वेल्थ मॅनेजमेंट, १०)कॅपिटल मार्केट, ११) कमोडिटी आणि करंसी मार्केट, १२) सेक्युरिटी लॉ,१३) इंसॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड, १४) कॉर्पोरेट फायनांस आणि स्ट्रॅटेजी फॉर व्हॅल्यू क्रिएशन, १५) सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन ॲडव्हान्स्ड ट्रेझरी आणि फॉरेन एक्सेंज रिस्क मॅनेजमेंट.
सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन १६) ॲन्टी मनी लाँड्रिंग, १७)बाँड मार्केट, १८) पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, १९)इक्विटी रिसर्च, २०) वेल्थ आणि इंन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट.
बेसिक प्रोग्रॅम ऑन १) डेरिव्हेटिव्हज २) टेक्निकल ॲनालिसीस, ३) फंडामेंटल ॲनालिसीस,४) म्युच्यूअल फंड फॅक्टशीट, ५) फायनांशिअल स्टेटमेंट ॲनालिसीस, हे लघु मुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
संपर्क-बीएसई इन्स्टिट्यूट लिमिटेड,१८ आणि १९ वा माळा, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई – ४००००१, दूरध्वनी- ०२२-२२७२८३८२, हेल्पलाइन- १८००२२०९३०, ईमेल-admissions@bseindia.com, training@bseindia.com,संकेतस्थळ –www.bsebti.com आणि gfmp.bsebti.com.
आयसीआयसीआय डायरेक्ट सेंटर फॉर फायनांशिअल लर्निंग – या संस्थेचे वर्गात शिकवले जाणारे अभ्यासक्रम – (१) फाउंडेशन प्रोग्रॅम फॉर स्टॉक इन्व्हेस्टिंग, (२) बिगिनर्स प्रोग्रॅम ऑन फ्युचर ॲण्ड ऑप्शन्स, (३) टेक्निकल ॲनालिसीस, (४) ॲडव्हान्स्ड डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, (५) टेक्नो डेरिव्हेटिव्हज, (६) टेक्निकल ॲनालिसीस फॉर ट्रेडिंग प्रोफेशनल, (८) फंडामेंटल्स ऑफ इन्व्हेस्टिंग.
ई-लर्निंग– गेटवे टू स्टॉक इंव्हेस्टिंग (हिंदी आणि इंग्रजी) , गेटवे टू फ्युचर ॲण्ड ऑप्शन्स, गेटवे टू कमोडिटीज, गेटवे टू करंसी ट्रेडिंग, गेटवे टू करंसी ट्रेडिंग, गेटवे टू म्युच्यूअल फंड.
हे अभ्यासक्रम स्टॉक मार्केटमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरु शकतात.
संपर्क-आयसीआयसीआय सेंटर,एच.टी.पारेख मार्ग,चर्चगेट,मुंबई-४०००२० दूरध्वनी-०२२-२२८८२४६०, फॅक्स-२२८८२४४५, ईमेल-learning@icicisecurities.com
संकेतस्थळ- icicidirect.com/financiallearning ०००
(7) सर्टिफाइड कॅपिटल मार्केट प्रोफेशनल –
अर्थव्यवहार, वित्त आणि वाणिज्य विषयांशी संबंधित काही लघु मुदतीचे अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई विद्यापीठ, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसइ) यांनी सुरु केले आहेत. सर्टिफाइड कॅपिटल मार्केट प्रोफेशनल (एनसीसीएमपी) कोर्स. शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्यनिर्मिती होण्याच्या दृष्टिने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. कालावधी- तीन महिने. यामध्ये सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिक बाबींवर भर दिला जातो. अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर एनएसइ मार्फत प्रमाणतपत्र दिले जाते. या अभ्यासक्रमात इक्विटी मार्केट, डेट मार्केट, डेरिव्हेटिव्ह, मॅक्रो इकॉनॉमिक्स, टेक्निकल अॅनालिसिस, फंडामेंटल अॅनालिसीस या विषयांचा समावेश करण्यात येतो.
(8) ऑनलाइन एनएसइ ॲकेडमी सर्टिफाइड कॅपिटल मार्केट प्रोफेशनल- (इ- एनसीसीएमपी) हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता येतो. स्टॉक मार्केटमध्ये नित्य वापरात येणारी भाषा व शब्दप्रयोगांची मूलभूत ओळख करुन दिली
जाते. स्टॉक मार्केटमध्ये प्रत्यक्ष कार्यरत होण्यासाठीचे प्रात्यक्षिक शिकवले जाते.
इतर अभ्यासक्रम-फायनांशिएल प्लॅनिंग ॲण्ड वेल्थ मॅनेजमेंट,इक्विटी रिसर्च ॲण्ड व्हॅल्युएशन कोर्स,
पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन फायनांशिएल मार्केट्स.हा अभ्यासक्रम श्री श्री विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे.अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी.कालावधी-एक वर्षं.या अभ्यासक्रमात म्युच्यूअल फंड,कमोडिटी मार्केट,कॅपिटल मार्केट,बँकिंग,अकांउटिंग ॲण्ड टॅक्सेशन,इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजरी या सारखे विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.
संपर्क-नॅशनल स्टॉक एक्सजेंच, एक्सजेंच प्लाझा,सी वन, ब्लॉक जी,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,बांद्रे(पूर्व),मुंबई-400051,दूरध्वनी- 022-26598100,फॅक्स- 26598120 ,संकेतस्थळ- nseindia.com
(9) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बँकिंग ॲण्ड फायनान्स –
भारताचे वित्तीय क्षेत्र व्यापक स्वरुपाचे असून यात सातत्याने वाढ होत आहे. वाणिज्यिक बँका, विमा कंपन्या, इतर वित्तीय कंपन्या, सहकारी संस्था, निवृत्तीवेतन फंड, म्युच्यूअल फंड अशा बाबींचा या क्षेत्रात समावेश असून त्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाली होत असतात. या क्षेत्राचा 60 टक्के भाग हा सार्वजनिक, खाजगी, नागरी, ग्रामीण आणि सहकारी बँकांनी व्यापला आहे. बँकिंग क्षेत्राच्या विस्तारावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या अहवालानुसार 2022 पर्यंत बँकिंग क्षेत्रातील भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनू शकतो. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार 2022 पर्यंत भारतीय बँकांमध्ये 14 लाख व्यक्तिंना रोजगार मिळू शकतो. ही बाब लक्षात घेऊन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंस्टिट्यूटने पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बँकिंग ॲण्ड फायनान्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. बँकिंग व्यवहारात अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने हे कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना पुढील काळात अधिकाधिक संधी मिळू शकते. या अभ्यासक्रमाची संरचना त्याच पध्दतीने करण्यात आली आहे. कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील 60 टक्के गुणांसह पदवी. विद्यार्थ्याची निवड मुलाखत आणि लेखी चाळणी परीक्षेद्वारे केली जाते. संपर्क- बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंस्टिट्यूट लिमिटेड, 18 आणि 19वा माळा, पी.जे.टॉवर्स, दलाल स्ट्रिट, मुंबई-400001, दूरध्वनी- 022-22723250, ईमेल- admissions@bseindia.com, संकेतस्थळ- http://pgpbf.bsebti.com/
