(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आंबट द्राक्षे

एकदा कोल्होबा जंगलातून जात होते. वाटेत त्यांना द्राक्षाचं झाड लागलं. ती द्राक्षं बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी ते द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. जमेल तितकी उंच उडी मारली पण, द्राक्षाची एकही फांदी त्यांच्या तोंडात येईना. उड्या मारुन मारुन कोल्होबा थकले. त्यामुळे ते झाडाखाली डोळे मिटून बसले.

काही वेळाने त्या ठिकाणी माकडोबा आले. डोळे मिटलेल्या कोल्होबांना बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी कोल्होबांना हाक मारली. काय झालं ते विचारलं. कोल्होबांनी द्राक्ष तोडण्याची संपूर्ण कथा सांगितली.

‘झालं ते बरच झालं, असं नाही का वाटत कोल्होबा तुम्हास?’माकडोबानं विचारलं.

‘म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय माकडोबा?’कोल्ह्याने विचारलं.

‘अहो, ही द्राक्ष जर आंबट असतील तर तुम्हाला खोकला नसता का झाला?’माकडोबाच्या या उत्तराने कोल्होबा हसले.

‘कोल्होबा कां बुवा हसलात तुम्ही?मी खरंच ते सांगितलं.वाटल्यास आपण वनातील वैद्यांना विचारु या.‘माकडोबा म्हणाला.

‘माकडोबा तुम्ही खरंच बोललात, पण मला माझ्या आजोबांच्या आजोबांच्या खापरपणजोबांची कथा आठवली, आणि त्याचं हसू आलं.‘

‘त्या कथेत द्राक्षं होते काय?’

‘हो ना!’

‘मग ते नक्कीच आंबट असणार!माकडोबा म्हणाला.‘

यावर कोल्होबा पुन्हा हसले.

‘अहो तुम्ही हसता का?मी खर तेच सांगतोय.’

‘नाही हो माकडोबा. तसं नाही.आमच्या आजोबांच्या आजोबांचे खापर पणजोबा असेच जंगलातून जात असताना त्यांना असंच एक द्राक्षाचं झाडं दिसलं. माझ्यासारखच त्यांच्याही तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही. आपणास द्राक्षं खायला मिळाले नाहीत म्हणून इतरानांही खायला मिळायला नको, असा दुष्ट विचार त्यांच्या मनी आला.‘

‘अरे बापरे, मग काय केलं त्यांनी?’

‘अहो, ते द्राक्षाच्या झाडाखाली उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्याला द्राक्ष आंबट आहे, खाऊ नका हं, खोकला होईल असं सांगत राहिले.रात्र पडायला लागल्यावर घरी निघून आले.‘

 ‘अहो, कोल्होबा यात त्यांचं काय बरं चुकलं? ते तर योग्यच सांगत होते.‘

‘माकडोबा, योग्य का अयोग्य याची खात्री केल्याशिवाय कसं काय ठरवणार आपण?’

‘पण, त्यांचं तोंड तर फांदीपर्यंत पोहोचयला पाहिजे होतं ना!’

‘बरोबर!ते शक्य झालं नाही तर त्यांनी चूप राहायला हवं होतं.‘

‘अहो, कोल्होबा तम्ही तुमच्या आजोबांच्या आजोबांच्या खापर पणजोबांची निंदा करताहात असं नाही का वाटत तुम्हाला?’

‘निंदा नाही हो माकडोबा, सत्य सांगतोय. त्यांनी एकतर चूप राहायला हवं होतं किंवा स्वत:चा अंहकार बाजूला ठेऊन कुणाच्या तरी मदतीने द्राक्ष मिळवायचे होते.‘

‘अच्छा तर ,आम्ही तुम्हास मदत करावी अशी अपेक्षा आहे म्हणायची.‘

‘हो, कां नाही?मला बुवा द्राक्ष खाण्याची झालीय इच्छा. फुकाच्या अहंकाराने किंवा मग खोटं बोलून माझं पोट थोडंच भरणारना. तुम्ही झाडावर झरदिशी चढू शकता. झाडावर चढून तुम्ही एक द्राक्ष खाली टाका. आंबट असेल तर लगेच लक्षात येईल.नसेल तर दोघेही किंवा जे कोणी इथे येतील त्यांच्यासह मज्जा करु.‘

माकडोबाने ते मान्य केलं. झाडावर चढता चढता ते कोल्होबास म्हणाले,

“तुम्हाला तुमच्या आजोबांच्या आजोबांच्या खापर पणजोबांचा दुर्गुण लागला नाही, हे  बरं झालं!’

‘अहो माकडोबा, आपण काळासोबत बदलायला हवं.अन्यथा त्यांच्यासारखच मलाही द्राक्ष चाखण्यापासून वंचित राहावं लागेलना!’ कोल्होबा हसत म्हणाले.