गुन्ह्यांचा अचुक शोध
फॉरेन्सिक सायन्स (न्याय सहाय्यक विज्ञान)ही ज्ञानशाखा उत्तम करिअरची संधी मिळवून देऊ शकते.या विषयाचे ज्ञान सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा आणि समाजासाठी उपयुक्त ठरु शकते. सध्या जगाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हे घडविणारे हुषार आणि क्रुर गुन्हेगार जबाबदार आहेत. मात्र या गुन्हेगारांचा शोध घेणे आणि त्यांचे गुन्हे उघडकीस आणणे ही सर्वांची महत्वाची जबाबदारी ठरते.
स्मार्ट गुन्हेगार आपला कार्यभाग साधण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करतात.पुरावे राहणार नाहीत याची काळजी घेतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करतात. त्यामुळे गुन्हेगारांचा माग घेणे हे पोलीस यंत्रणेसाठी अतिशय जिकरिचे ठरते. अशा गुन्हेगारांच्या शोधासाठी फॉरेन्सिक सायन्स या विषयातील तज्ज्ञांचे साहाय्य घेतले जाते.
ही ज्ञानशाखा जगामध्ये विकसित झाली असली तरी आपल्याकडे या विषयाकडे महणावे तितके लक्ष देण्यात आलेले नाही. सध्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता, फॉरेन्सिक सायन्स या विषयातील तज्ज्ञांची गरज वाढलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी या ज्ञानशाखेचे विविध अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम अधिकाधिक कौशल्य निर्मितीस प्राधान्य देणारे आणि प्रात्यक्षिकांवर भर देणारे आहेत. हे अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांमध्ये तार्किक क्षमता आणि वेगळया पध्दतीने विचार करण्याची क्षमता वाढीस लागते.
स्मार्ट गुन्हेगारीचा माग घेण्यासाठी फॉरेंसिक सायंसमधील तंत्र आणि कौशल्य उपयुक्त ठरते. पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था यांच्या मदतीसाठी शासकीय आणि खाजगी न्यायसहाय्यक प्रयोगशाळा निघाल्या आहेत. सध्या देशात सात केंद्रिय न्याय सहाय्यक प्रयोगशाळा आहेत. याशिवाय राज्य, विभागीय, जिल्हास्तरावर आणि फिरत्या न्यायसहाय्य प्रयोगशाळांची संख्याही बरीच आहे.
करिअर संधी
या क्षेत्रातील मनुष्यबळास न्यायसहाय्यक प्रयोगशाळा, इंटेलिजन्स ब्युरो, केंद्रीय शोध पथक, सीआयडी (क्राईम इंव्हेस्टिगेशन डिपार्टमेंट), राज्य पोलीस दलातील गुन्हे शाखा, मोठ्या संख्येने कार्यरत असणाऱ्या खाजगी गुप्तहेर संस्था आणि खाजगी प्रयोग शाळा, बँका,विमा कंपन्या,कार्पोरेट क्षेत्र, न्यायसहाय्य या विषयाचे अध्यापक अशा संधी मिळू शकतात.
स्वत:ची प्रयोगशाळा उघडून व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. अधिक कौशल्य आणि प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर-
अभ्यासक्रम-(१)बीएस्सी इन फॉरेंसिक सायन्स, हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी १२ वी परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो.
(२) एमएस्सी इन फॉरेंसिक सायन्स, अर्हता- बीएस्सी इन फॉरेंसिक सायन्स (३) पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स ॲण्ड रिलेटेड लॉ, अर्हता-भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र/ जैवतंत्रज्ञान/ जैवरसायनशास्त्र/न्याय सहाय्यक शास्त्र/ औषधीनिर्माणशास्त्र या विषयातील पदवी. एमबीबीएस/ बीडीएस/ बीएचएमस हे पदवीधरही या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. (४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल ॲण्ड सायबर फॉरेन्सिक ॲण्ड रिलेटेड लॉ. अर्हता- माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र/ सांख्यिकी/ गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/ बायोइर्न्फमेटिक्स या विषयातील बीएस्सी पदवी/बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ बीई/ बीटेक(कॉम्प्युटर सायंस/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन)
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना २५ विद्यार्थ्यांना आणि पदविका अभ्यासक्रमांना ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
संपर्क- इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स परिसर, रविंद्रनाथ टागोर मार्ग, सिव्हिल लाइन, नागपूर- ४४०००१, टेलेफॅक्स- ०७१२-२५३४५०३, संकेतस्थळ-http://ifscnagpur.in, ई-मेल-ifscngp@fscnagpur.in,
०००
(२) गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, औरंगाबाद
अभ्यासक्रम-(१)बीएस्सी इन फॉरेंसिक सायन्स, (२) एमएस्सी इन फॉरेंसिक सायन्स (३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक सायन्स ॲण्ड रिलेटेड लॉ. (४)पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल ॲण्ड सायबर फॉरेंसिक ॲण्ड रिलेटेड लॉ,
संपर्क- निपटनिरंजन नगर, केव्ह्ज रोड, औरंगाबाद- ४३१००४, टेलेफॅक्स- ०२४०-२४००२१९, संकेतस्थळ-http://www.gifsa.in, ई-मेल-gifsa2009@gmail.com
(३) इन्स्टिट्यूट ऑफ फारेन्सिक सायन्स, मुंबई
अभ्यासक्रम-(१)बीएस्सी इन फॉरेंसिक सायन्स,(२) एमएस्सी इन फॉरेंसिक सायन्स,(३)पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक सायन्स,(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल ॲण्ड सायबर लॉ.
संपर्क- १५, मॅडम कामा रोड, फोर्ट, मुंबई- ४०००३२, टेलेफॅक्स- ०२२- २२८१६१०२, संकेतस्थळ-instforensicscmumbai.in, ईमेल-institute.forensicscience@gmail.com
नागपूर येथील अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाशी, मुंबई येथील अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी आणि औरंगाबाद येथील अभ्यासक्रम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे. या तिनही संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे.
०००
नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी.
ही संस्था पूर्वी गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी या नावाने ओळखले जायची. ऑक्टोबर २०२० मध्ये या संस्थेला भारत सरकारने, इंस्टिटट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आणि केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला.
या संस्थचे अभ्यासक्रम- (१) एम.एस्सी इन फॉरेन्सिक सायन्स –
अर्हता – फॉरेन्सिक सायन्स/ वैद्यकीय/ अभियांत्रिकी/ औषधीनिर्माण शास्त्रातील ५५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती व जमाती संवर्गासाठी ५० टक्के गुण.
(२) एम.एस्सी इन फॉरेन्सिक बायोटेक्नॉलॉजी, अर्हता- रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ पर्यावरणशास्त्र/ फॉरेंसिक सायन्स / औषधी निर्माणशास्त्र / कृषी या विषयांमध्ये ५५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती व जमाती संवर्गासाठी ५० टक्के गुण.
(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिंगरप्रिंट सायन्स, कालावधी – एक वर्षं.
अर्हता – ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती व जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण.
(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन. कालावधी- एक वर्षं, अर्हता – ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती व जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण.
(५) एम.एस्सी इन मल्टिमीडिया फॉरेंसिक
, अर्हता- (५५ टक्के गुणांसह)बी.एस्सी इन फॉरेंसिक सायंस/ भौतिकशास्त्र/ गणित/ संगणकशास्त्र/ माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स/ बीई/ बीटेक (संगणक शास्त्र/ माहिती तंत्रज्ञान/ गणित/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन), राखीव संवर्गासाठी गुण- ५० टक्के.
(६) बीएस्सी-एमएस्सी (फॉरेंसिक सायंस)– राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बीएस्सी-एमएस्सी इन फॉरेसिंक सायन्स हा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- पाच वर्षे. न्याय वैद्यकीय शास्त्रातील विद्यार्थ्यांना पदवीस्तरापासूनच उत्कृष्ट शिक्षण प्रदान करण्यासाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रात क्राइम ॲण्ड सोसायटी, फॉरेंसिक सॉयकॉलॉजी, क्राइम सिन मॅनेजमेंट, बायोमेट्रिक्स क्वच्छन्ड डाक्युमेंट्स, फॉरेंसिक डर्म्याटॉग्लिफिक्स आदी सैध्दांतिक ज्ञान प्रदान करणाऱ्या विषयांचा समावेश आहे. याशिवाय बाह्य आणि अंतर्गत गुन्हे शोध प्रात्यक्षिके, पुराव्यांची हाताळणी आणि पॅकेजिंग, ताब्यातील पुराव्यांची देखभाल आदी विषयांच्या प्रात्यक्षिकांवर भर दिला जाईल. पुराव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणांच्या हाताळणीचे प्रात्यक्षिक दिले जाईल. अर्हता- खुला संवर्ग – १२वी विज्ञान शाखेत ६० टक्के गुण. राखीव संवर्ग – ५० टक्के गुण.
(७)एम.एस्सी इन डिजिटल फॉरेंसिक आणि इन्फर्मेशन सेक्युरिटी, कालावधी- दोन वर्षे / अर्हता- संगणकशास्त्र विषयासह बी.ई/ बी.टेक. अर्हता- संगणकशास्त्र/ संगणक अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयासह बी.ई/ बी.टेक किंवा ५५ टक्के गुणांसह बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / बी.एसस्सी (माहिती तंत्रज्ञान/ संगणकशास्त्र/ /गणित)अनुसूचित जाती, जमाती आणि नॉन क्रिमिलेअर ओबीसी संवर्गासाठी गुणमर्यादा – ५० टक्के.
संपर्क-नॅशनल फॉरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटी, सेक्टर ९, गांधीनगर – ३८२००७, दूरध्वनी- ०७९-२३९७७१०३, , www.nfsu.ac.in/
०००
ओएनजीसीची शिष्यवृत्ती
ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसी मार्फत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.ही शिष्यवृत्ती अभियांत्रिकी, भूभौतिकी-जिओफिजिक्स, भूगर्भशास्त्र-जिऑलॉजी, एमबीबीएस,एमबीए या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. उमेदवारांना पात्रता परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. या शिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी ४८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. संपर्क-
https://ongcscholar.org/
सुरेश वांदिले(ekank@hotmail.com@9324973947)
