(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 दुग्ध व्यवसायाची संशोधन दिशा

नॅशनल रिसर्च डेअरी इंस्टिट्यूट या संस्थेने वाणिज्यिक (कमर्शिअल) स्वरुपाच्या आदर्श (मॉडेल) दुग्धप्रकिया केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी ६० हजार लिटर दुधावर दररोज प्रकिया केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कार्याची संधी थेट उपलब्ध होते. वैज्ञानिकांना विविध दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीच्या प्रकियेवर संशोधन करण्याची संधी मिळते.

पहिला मान

डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळवणारी ही कृषीसंस्थांमधील पहिली संस्था ठरली. या संस्थेस सलग तिनदा, सरदार पटेल आऊटस्टॅडिंग आयसीआयआर इंस्टिट्यूट ॲवार्ड मिळाला. दुग्धजन्य व्यवसाय/ उद्योगाच्या विकास आणि वाढीसाठी केलेल्या संशोधानात्मक कार्यासाठी या संस्थेला, ॲग्रिकल्चरल लिडरशीप ॲवार्ड, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुग्धव्यवसाय शिक्षण/संशोधनातील उच्चश्रेणीच्या कामगिरीबद्दल, एज्युकेशन लिडरशीप ॲवॉर्ड, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या संस्थेने गेल्या ९६ वर्षात दुग्ध उत्पादन ,दुग्ध प्रक्रिया, दुध उत्पादन, व्यवस्थापन आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांमध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता स्थापित केली. त्याचा फायदा भारतीय दुग्धव्यवसायाच्या नेत्रदीपक प्रगतीस झाला. जगातील पहिल्या म्हैसीच्या क्लोनची निर्मिती करण्यात या संस्थेने यश मिळवले. विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ, हेल्थ फूड, प्रोबॉयॉटिक चीज आणि दही, स्पोर्ट्स ड्रिंक निर्मितीचे तंत्रज्ञान या संस्थेने शोधले. लो कोलेस्टेरॉल तूप, हर्बल तूप, बर्फी फॉर डायबेटिस, आरोग्यदायी ह्रदयासाठी, फळे, भाजीपाला आणि कडधान्याचा उपयोग करुन अनेक पदार्थांची निर्मिती केली. लहान दुग्धव्यवसायाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीच्या निर्मितीसोबतच संस्थेने मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक यंत्रसामग्रिची निर्मिती केली.

दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती आणि प्रकिया सुलभ, गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणासाठी संस्थेने कार्यपध्दती विकसित केली. या संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान, उपकरणे आणि इतर कार्यपध्दतीचा अवलंब आता देशासोबतच जगातील अनेक राष्ट्रांमध्ये केला जातो. या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ही संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण विषय घटकांच्या संशोधनास प्राधान्य देत असते. या संस्थेत १६० च्या आसपास अनुभवी शास्त्रज्ञ आणि १८५ च्या आसपास अनुभवी तंत्रज्ञ कार्यरत आहेत. 

संशोधनावर भर

या संस्थेने दूध, तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, दुग्ध व्यवसायाशी संबंधित अर्थशास्त्र, पाळीव प्राण्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण आदी विषयांवर सातत्याने संशोधन केले आहे. त्यासाठी कर्नाल,बेंगळुरु आणि कल्याणी या तिनही कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा १०,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

पीएचडी अभ्यासक्रम-

() कर्नाल कॅम्पसमध्ये पुढील विषयांमध्ये संशोधन कार्य करता येते- डेअरी मायक्रोबायॉलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲनिमल बायोकेमिस्ट्री, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल जेनेटिक्स ॲण्ड ब्रीडिंग , लाईव्हस्टॉक प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, ॲनिमल न्युट्रिशन, ॲनिमल फिजिऑलॉजी, डेअरी इकॉनॉमिक्स, डेअरी एक्सटेंशन एज्युकेशन, ॲग्रॉनॉमी (फोरेज प्रॉडक्शन), ॲनिमल रिप्रॉडक्शन, गॉयनॉकॉजी ॲण्ड ऑबस्टेट्रिक्स.

() बेंगळुरु कॅम्पसधील संशोधन संधी– डेअरी केमिस्ट्री, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲनिमल जेनेटिक्स ॲण्ड ब्रीडिंग, लाईव्हस्टॉक प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, डेअरी इकॉनॉमिक्स, डेअरी एक्सटेंशन, डेअरी इंजिनीअरिंग, ॲनिमल न्युट्रिशन.

() कल्याणी कॅम्पसमधील संशोधन संधी- ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, लाईव्ह स्टॉक प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, ॲनिमल न्युट्रिशन.

संशोधन कालावधी- पदवी स्तरीय विद्यार्थ्यांसाठी ३ वर्षे आणि पदव्युत्तर पदवी स्तरीय विद्यार्थ्यांसाठी २ वर्षे. पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना एक वर्षाचा प्रारंभिक अभ्यासक्रम करावा लागतो. संशोधन कार्य सुरु करण्याआधीची ती आवश्यक अर्हता आहे.

अर्हता- संबधित विषयातील ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा या श्रेणितील गुणांक/श्रेयांक. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी ५५ टक्के गुण. यंदा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे उमेदावर पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. मात्र प्रवेशाच्या वेळी त्यांना गुणपत्रिका सादर करावी लागते.

प्लेसमेंट आणि करिअर संधी

या संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशीप आणि प्लेसमेंट मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेतील‍ शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाचा उच्च प्रतिचा दर्जा लक्षात घेऊन या देशातील नामवंत कंपन्या/उद्योग विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करतात. या कंपन्यांमध्ये आनंदा डेअरी, इंडियन डेअरी मशिनरी कंपनी, क्वालिटी आईसक्रीम, मदर डेअरी, नेसले इंडिया, पंजाब मिल्क फेडेरशन, परफेट्टी व्हॅन, मिल्ले इंडिया, एसपीएक्स टेक्नॉलॉजी, टेट्रापॅक इंडिया आादिंचा समावेश होतो. दरवर्षी यामध्ये नव्या कंपन्यांचा समावेश होत असतो. सर्वांना उत्तम वार्षिक वेतन पॅकेज मिळते.

संस्थेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएचडी अभ्यासक्रम हा संशोधन आणि विकास, गुणवत्ता नियंत्रण आणि दुग्ध व्यवसाय, अन्नप्रक्रिया उद्योग आणि खाद्यान्ने उद्योग व्यवस्थापन यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने अशा संस्था/कंपन्या/ कृषी विद्यापीठे यामध्ये हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणे सुलभ जाते.

संपर्क- ईमेल- dir@ndri.res.in / dir.ndri@gmail.com,संकेतस्थळ- http://ndri.res.in/
दूरध्वनी-०१८४-२२५२८००,फॅक्स-२२५००४२

०००

डिप्लोमा इन  डेअरी टेक्नॉलॉजी

डेअरी तंत्रज्ञान अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना दुग्ध प्रकिया, साठवणूक (स्टोअरेज), पॅकेजिंग, वाहतूक आणि वितरण अशा सारख्या बाबींच्या संनियंत्रणाचे कार्य करावे लागते. दुधाची नासाडी कमी करणे, दुधाचा टिकावूपणा वाढवणे, दुधाचा दर्जा वाढवून ते अधिक आरोग्यदायी व सुरक्षित होईल याकडे लक्ष पुरवणे, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा सुयोग्य वापर होण्यासाठी रासायनिक भौतिक आणि अर्थशास्त्रीय  सूत्राचा वापर करणे, याबाबींकडे या तज्ज्ञास लक्ष पुरवावे लागते.

सध्या भारतात ४००हून अधिक दुग्धजन्य प्रकिया संयंत्रे कार्यरत असल्याने, या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळास चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.

 

महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागाच्या अंतर्गत मुंबई येथील आरे दध कॉलनित, डेअरी  सायंस इंस्टिट्यूट (दुग्धशाळा विज्ञान संस्था) कार्यरत आहे. १९६० साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.

या संस्थेत डिप्लोमा इन  डेअरीटेक्नॉलॉजी, हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकावर अधिक भर दिला जातो. त्यासाठी संस्थेत, विद्यार्थी डेअरीची, स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी १० हजार लिटरचे दुधाचे उत्पादन व प्रकियेची सुविधा आहे. याशिवा पनीर, मटर, आइस्क्रीम, चीज, तूप, क्रीम त्यादीदुग्धपदार्थांचेउत्पादन केले जाते. दूध, प्रक्रिया आणि पॅकेजिंगचे प्रशिक्षण देणारे विभाग कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांना डेअरीरसायनशास्त्र, डेअरी बॅक्टेरिओलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी या विषयांचे परिपूर्ण ज्ञान प्रदान केले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान मिळण्यासाठी कंडेनसिंग युनिट, स्प्रे ड्रायर आणि डेअरी इंजिनिअरिंग प्लांट, चाराफार्म, डेअरी वेस्टवॉटर यांची सुविधा या ठिकाणी आहे. हा निवासी अभ्यासक्रम आहे. या व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्य, ज्ञान आणि तंत्र अवगत व्हावे यासाठी अभ्यासक्रमामध्ये डेअरी तंत्रज्ञान, दुग्धशाळा तंत्रज्ञान, डेअरी अभियांत्रिकी, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, डेअरी अर्थशास्त्र, आर्थिक, लेखा अंकेक्षण, डेटा संकलन तांत्रिक अहवाल, दुग्धव्यवसाय विकास, वैरण आणि दुग्धजन्य पदार्थ या विषयघटकांचा समावेश करण्यात आलाआहे.

या अभ्यासक्रमाला १२ वी विज्ञानशाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. कालावधीदोन वर्षे.

संपर्क प्राचार्य, डेअरी सायन्स इंस्टिट्यूट आरे, मुंबई, दूरध्वनी ०२२२९२७२५२२, ईमेल-principaldsi@gmail.com, संकेतस्थळ- dairy.maharashtra.gov.in

इतर महाविद्यालये

कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी वरुड (पुसद) (पोस्ट मोहा, पुसद-४४५२०४, दूरध्वनी-०७२३३-२४८६९६, संकेतस्थळ- cdtpusad.in, ईमेल-addtcwarud@gmail.com) आणि कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी- उद्गीर,जिल्हा- लातूर (संपर्क-वेर्टनरी उपकेंद्र, उदगीर-४१३५७, दूरध्वनी-०२३८५-२५४७५४, संकेतस्‍थळ- cdtudgir.in) या ठिकाणी बी.टेक ईन डेअरी टेक्नॉलॉजी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या दोन्ही संस्था शासकीय आहेत. प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उत्तम प्रयोगशाळा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत.

ॲग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

गुजराथ राज्यातील आनंद ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमार्फत, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजइन ॲग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (बी.टेकइन एआयटी) हा चार वर्षे कालावधीचा चालवला जातो.

कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. शेतकरी आणि तंत्रज्ञांमधील दरी दूर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. संपर्क- http://www.aau.in

सुरेश वांदिले