वाणिज्य, वित्त आणि विश्लेषण (2)
गेल्या अनेक वर्षापासून, वाणिज्य शाखेतील सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स या संस्थेने ख्याती प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सूक्ष्म संनियंत्रण, करिअर करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासास उपयुक्त ठरतील अशा विविध विषयांचा समावेश, संशोधनास चालना, आणि उत्कृष्ट प्लेसमेंट सेल या वैशिष्ट्यांमुळे देशातील विद्यार्थ्यांचा या संस्थेतील वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न असतो. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ट्युटोरिअल्स, सहभागी शिक्षण, औद्योगिक प्रकल्पांना भेटी, क्षेत्रीय भेटी,वेगवेगळी चचासत्रे आणि नियमितपणे सारदीकरणाची संधी, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलाजीचा अध्यापनात अधिकाधिक वापर ही आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. संस्थेने २०१८ मध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा काही अभ्यासक्रमांचा प्रारंभ केला. यामध्ये बॅाम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सहकार्याने, बिझिनेस ॲनॅलिटिक्स वुईथ आर (डेटा मायनिंग आणि सांख्यिकी विश्लेषणासाठी उपयोगात आणली जाणारी संगणकीय भाषा), चार्टर्ड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटट्न्टस या संस्थेच्या सहकार्याने डेटा ॲनॅलिटिक्स वुईथ आर, याच संस्थेच्या सहकार्याने अकाउंटन्सी स्टार या लघु मुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संस्थेची गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (मनुष्यबळ विकास मंत्रालाय) संस्थेने वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी नॅशनल रिसोर्स सेंटर म्हणून मान्यता प्रदान करुन तशी सुविधा दिली आहे. यामुळे अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यकांना नवे ज्ञान ग्रहण करणे आणि संशोधन करण्यास साहाय्य होईल.
यामध्ये मॅकन्सी, बीसीजी, ब्लूमबर्ग, केपीएमजी, इम्बाइब, इनमोबी, म्यू-सिग्मा आणि स्टडी पॅड कोगिटा हब, इन्डस इन्साइट्स या स्टार्ट अप कंपन्या आदी संस्थांचा समावेश आहे. ११५ उमेदवारांना विविध श्रेणीच्या रोजगार संधी मिळाल्या. यामध्ये सरासरी पॅकेज हे साडे सात लाख रुपयांचे होते. संस्थेतील एका उमेदवाराची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यास , बँक ऑफ अमेरिका या कंपनीने ३७ लाख रुपयांचे पॅकेज दिले. संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना सुध्दा इंटर्नशीपची सुविधा मिळवून दिली जाते. आपल्याकडील अत्यल्प महाविद्यालयांमध्ये याकडे लक्ष पुरवले जाते. अनेक महाविद्यालये याचा विचारही करत नाही व तशी सुविधाही आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नही करत नाहीत. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना स्टँडर्ड चार्टर्ड, नोमुरा, सिटी बँक, जेएसडब्ल्यू, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल अशा सारख्या कपंन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी मिळाली आहे. याशिवाय संस्थेच्या प्लेसमेंट सेलव्दारे विद्यार्थ्यांची विविध कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स- वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सादरीकरण, संभाषण कौशल्य, समूह चर्चा, मुलाखती, केस स्टडी, अहवाल लेखन, प्रभावी बायोडाटाची तयारी इत्यादी)वाढावित यासाठी टी.एम.एम.इ., परस्पेक्टिको,टीच फॉर इंडिया अशासारख्या संस्थाच्या सहकार्याने आयोजित केली जातात. संस्थेचा प्लेसमेंट सेल हा करिअर सेवा घटक किंवा करिअर सर्विस युनिट सारखा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. या महाविद्यालयात गेल्या वर्षी प्लेसमेंट प्रकियेत १२० कंपन्यांनी सहभाग घेतला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळया कंपन्यांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळाली.
संपर्क- श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, नॉर्थ कॅम्पस, मॉरिस नगर,दिल्ली-११००७, दूरध्वनी- ०११-२७६६७९०५, ईमेल-principaloffice@srcc.du.ac.in, संकेतसथळ-srcc.du.in
००००
एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स
नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मध्ये बी.कॉम (ऑनर्स)हा अभ्यासक्रम करता येतो.वित्तीय आणि आणि आर्थिक जगातील समस्यांचा सक्षमपणे सामना करता येणे शक्य व्हावे यासाठी या अभ्यासक्रमात व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात. या कौशल्यात विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. लेखा, वित्त आणि कर निर्धारण या तीन विषयघटकांवर या अभ्यासक्रमात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना सीए, आयसीडब्ल्यूए, सीएफए,सीएमए,एसीएस, एमबीए आणि वित्त व लेखा विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणे सुलभ जावे या दृष्टिने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना वित्त, गुंतवणूक, लेखा, परीक्षण, माहिती प्रक्रिया या विषयांमध्ये कौशल्य प्राप्त होऊ शकते.
अभ्यासक्रमात इंटर सीए विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सीए, सीएमए, सीएफए या करिअरकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातील विषय घटक उपयुक्त ठरतात.
इतर अभ्यासक्रम
बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनांशिअल मार्केट्स-या अभ्यासक्रमात वित्तीय बाजाराशी निगडित विविधांगी पैलू शिकवले जाते. या अभ्यासक्रमात वित्त, गुंतवणूक, अर्थशास्त्र, गुंतवणुकीतील धोके, वित्तीय बाजारात यशस्वी होण्यासाठी लागणारे विविध सिध्दांत, कायदेशीर बाबी, संवाद कौशल्य आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे कौशल्य या अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कालावधी-तीन वर्षे.
बॅचलर ऑफ कॉमर्स इन अकाउंट्स ॲण्ड फायनांसया अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे आहे. सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आणि वित्तीय विश्लेषक (फायनांशिअल ॲनॅलिस्ट) हे करिअर करण्याच्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. कंपनी/ उद्योगाची वित्तीय बाजू अधिक सक्षम आणि बळकट करण्याचे कौशल्य, हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवार प्राप्त करु शकतात. योग्य वेळी वित्तीय निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमताही या उमेदवारांमध्ये निर्माण होते.आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
संपर्क- नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स ,स्वामी भक्तीवेदांत मार्ग, भागुबाई मफतलाल कॉम्प्लेक्स, कूपर रुग्णालयाच्या विरुध्द दिशेला. विले पार्ले(पश्चिम), मुंबई-५६, दूरध्वनी- ०२२-४२३३८०००, ईमेल- info@nmcollege.in संकेतस्थळ- https://nmcollege.in/
०००
सिडेन्हॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिकस
हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील महाविद्यालय असून ते वाणिज्य शाखेतील शिक्षण देणारे महत्वाचे महाविद्यालय समजले जाते. या महाविद्यालयास १०७ वर्षाची परंपरा आहे. वाणिज्य शाखेतील शिक्षणाचा देशात आणि आशिया खंडात पहिल्यांदा प्रारंभ करणाऱ्या संस्थांमध्ये या महाविद्यालयाचा समावेश होतो. वित्तीय घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या चर्चगेट परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे. या संस्थेचे वाणिज्य शाखेतील ज्ञानाजर्नाचे महत्व आणि कौशल्य लक्षात घेऊन आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्यपूर्व आशियामधील विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छूक असतात. वाणिज्य आणि अर्थशास्त्रातील देशातील नामवंत अध्यापक, तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक हे यासंस्थेच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. विद्यार्थ्यांच्या चौफेर व्यक्तिमत्व विकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरवले जाते. मुंबई विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये ही संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थी अमेरिका,ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षणासाठी मोठ्या संख्येने निवडले जातात. या संस्थेला अनेक मोस्ट ट्रस्टेड ब्रँड अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ही संस्था डॉ.होमी भाभा क्लस्टर युनिव्हर्सिटीचा भाग बनली आहे. ही युनिव्हर्सिटी देशातील तिसऱ्या क्रमांकाची क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे या संस्थेचे अभ्यासक्रम हे अधिक गुणवत्तापूर्ण , काळाशी सुसंगत व व्यावसायिक होतील.
बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे असून, कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. विद्यार्थ्याने एकाच प्रयत्नात १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. बँका, इंश्युरन्स कंपन्या व आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात या हेतुने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. या दोन्ही क्षेत्रात खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे विविध प्रकारच्या संधी उपलबध झाल्या आहेत. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. या क्षेत्रात उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञानही शिकवले जाते.
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज– अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे/सहा सत्रे. १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी सुध्दा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. अशा विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नात किमान ३५ टक्के गुण मिळायला हवे.
संपर्क- सिडेनॅहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, बी रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०, दूरध्वनी- ०२२-२२०४२८९७, ईमेल-sydprincipal@sydenham.ac.in
sydprincipal@yahoo.co.in,संकेतस्थळ- http://sydenham.ac.in/
०००
· ००००
००००
