(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 वेळीच सावध व्हा ! 

१० वीनंतर ११ वीमध्ये प्रवेश घेताना १० वित मिळालेल्या गुणांवर आधारित प्रवेश निश्चित केला जातो. विशेषत: मोठ्या शहरातील नामवंत आणि दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश मिळावा असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. काही महाविद्यालयांमधील प्रवेश हे ९० टक्क्यांपासूनच सुरु होतात. आता तर ९० टक्के गुण मिळणे हे तसे नवलाचे राहिलेले नाही.

मनासारखे महाविद्यालय मिळाल्यावरही पुन्हा विद्यार्थी त्याच्या व त्यांच्या पालकांच्या मते उत्कृष्ट शिकवणी वर्गात नाव नोंदवतात. आर्थिकदृष्ट्या काही सुस्थितीतील पालक आपल्या घरीच शिक्षकांना सुयोग्य अशी बिदागी देऊन शिकवणीसाठी बोलवतात. म्हणजे १० वी नंतर हवे ते महाविद्यालय मिळाल्यावरही आपले समाधान काही होत नाही.

शाळेचे नाव प्रमाणपत्रावर येण्यासाठी प्रवेशाचा अट्टाहास केला जातो की काय? असे वाटावे अशी ही स्थिती. मात्र विद्यार्थ्यांने कोणत्या महाविद्यालयात ११ वी  व १२ वी केले, हे पुढच्या करिअरच्या प्रवासासाठी अजिबातच महत्वाचे ठरत नाही. अमूक एका उत्कृष्ट महाविद्यालयातून ११-१२ वी केले म्हणून काही अतिरिक्त एकही गुण मिळत नाही.

साहित्याचा मारा

चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे उत्तमच. पण हा प्रवेश मिळाल्यावर त्या चांगल्या आणि दर्जेदार महाविद्यालयाचा फायदा करुन घ्यायला हवा ना! आता तर काही पालक, एका शिकवणीसोबत काही विषयांसाठी आणखी एखाद्या अधिक उत्कृष्ट शिक्षकाची शिकणवीसाठी चाचपणी करतात. रिस्क (धोका) नको म्हणून काहीजण त्याही मार्गाने जातात. म्हणजे मुलाने हेही करावे तेही करावे. पुन्हा कुठे अपेक्षित संच वगैरे बाबत कानावर पडले तर तिकडेही धाव घेतली जाते. आणखी एखाद्या शिकवणी वर्गात नाव नोंदवलेल्या जवळच्या नातेवाईक/मित्राच्या मुलामुलिंकडे असलेले, त्या शिकवणी वर्गाचे साहित्य घरी आणून ठेवले जाते. म्हणजे आता बोडाची क्रमिक पुस्तके, शिकवणी वर्गातील शिक्षकांच्या नोट्स, पुन्हा दुसऱ्या शिकवणी वर्गातल्या नोट्स, अपेक्षित संच अशी चौफेर शत्रे मुलांना दिली जातात. या अस्त्राशस्त्रानीशी आपल्या मुलाला प्रचंड यश मिळणारच असा ठाम विश्वास पालकांना असतो. प्रारंभी विद्यार्थीही या सगळयांनी हरखून जातो आणि नंतर मात्र स्वत:ला हरवून बसतो. मग कधी हे बघ तर कधी ते बघ, असे त्याचे सुरु होते. या इकडे तिकडे बघण्यात गाडिची हवा हळूहळू निघायला सुरुवात होते. प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी तर गाडी गडगडू लागते.

११ वी १२ वीमध्ये अभ्यास साहित्याचा मारा करण्याचा सोस पालकांनी टाळला पाहिजे. प्रचंड साहित्य दिल्याने मुलांना खूप गुण मिळतील असे काही शक्य नाही. या खूप साहित्याला बघण्यात आणि वाचण्यात मुलांचा बराच वेळ जातो, हे लक्षात घ्यायला हवे.

वेळ वाचवा

११ वीसाठी शैक्षणिक संस्थेची निवड करताना ही संस्था आपल्या घरापासून किती अंतरावर आहे, ही बाब सुध्दा लक्षात घ्यायला हवी. केवळ दर्जेदार संस्था आहे म्हणून घरापासून बऱ्याच लांब असलेल्या संस्थेत प्रवेश घेतल्यास मुलांचा जाण्या येण्यात वेळही जातो आणि उर्जाही जाते. जाण्या-येण्याच्या या फेऱ्यात मुलांना मग अभ्यास करण्याचा उत्साह कितपत टिकून राहतो, हा संशोधनाचा विषय आहे. शिकवणी वर्गातच काहीही करुन टाकायचेच आहे, असे पक्के ठरवल्यावर पुन्हा दूरच्या महाविद्यालयात पाठवणे श्रेयस्कर ठरत नाही. आता काही महाविद्यालये प्रात्यक्षिक सोडल्यास वर्गात अनुपस्थित राहण्याची परवानगी देतात. याचा सुध्दा बऱ्याच पालकांना अभिमान वाटतो.

मुद्दा ११ वी १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिकाधिक वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. त्याचा बहुमोल वेळ कसा वायाजाणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि, व्यवस्थापन, डिझायनिंग, वास्तुकला आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११ वी १२ वी मधील गुण हे तितकेसे  महत्वाचे ठरत नाहीत. या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (प्रोफेशनल कोर्सेस जसे बीई/ एमबीबीस/ बी.डिझाइन इत्यादी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मिळणारे अधिकाधिक गुण मुलांना इच्छित अभ्यासक्रम आणि संस्थेत पोहचवत असतात.

दर्जेदार पुस्तके

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११वी आणि १२वीची क्रमिक पुस्तके ही बरीच स्पर्धात्मक अशी तयार केली आहेत. या क्रमिक पुस्तकांचा व्यवस्थित आणि समजून उमजून  आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या दर्जावर विश्वास ठेऊन अभ्यास करायला हवा. सर्व विषय घटक समजावून घ्यायला हवेत. कोणताही विषय घटक सुटणार नाही हे बघायला (12 वीच्या परीक्षेसाठी असे करणे चालूनही जाईल, मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या चाळणी प्रवेश परीक्षेसाठी असे चालणार नाही.) या क्रमिक पुस्तकांच्या सखोल अभ्यासावर सुध्दा चांगले यश मिळू शकते.

जेईई (जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट), नेस्ट (नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट), आयसर  (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च) ॲडमिशन टेस्ट,नीट (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षा वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थांव्दारे घेतल्या जातात. त्यामुळे प्रश्नपत्रिका या सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सीबीएसईची/ एनसीईआरटीची (नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग) ११ वी व १२ वीची पुस्तके अभ्यासावी असा सल्ला दिला जातो. तो बरोबरही आहे. याचा अर्थ महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची पुस्तके ही दुय्यम दर्जाची आहेत असा होत नाही. जे विषय घटक या पुस्तकांमध्ये नसतील ते एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून करायला हवे. शिकवणी वर्गात विशिष्ट ठोकताळयाप्रमाणे शिकवले जाते. सतत सराव चाचणी परीक्षा घेतल्या जातात. या शिकवणी वर्गांतील शिक्षक आपल्या अध्यापनासाठी ११ वी , १२ वीचे साहित्य, राज्य माध्यमिक बोर्डाचे वापरतात की एनसीईआरटीचे वापरतात की आणखी काही तिसरेच वापरतात याची पालकांनी एकदा तरी स्पष्ट विचारणा करायला हवी.

जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ठरवून दिलेले सर्व विषय घटक शिकवले जातात, याची खातरजमा करायला हवी. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये हा विषय घटक महत्वाचा आणि हा विषय घटक कमी महत्वाचा असा विचार केला जात नाही. शिवाय मागील वर्षी जशा प्रकारचे प्रश्न विचारले असतील त्याच पध्दतीने यावर्षी प्रश्न विचारले जातील असेही नाही. या परीक्षांसाठी जे विषय घटक ठरवले जातात, त्या पलिकडे प्रश्न विचारले जात नाहीत. काहीवेळा तशी ओरड होते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयघटकांचा अभ्यास केलेला असतो, त्यांना संबधित प्रश्नाचा स्त्रोत बरोबर बरोबर लक्षात येतो. तेव्हा प्रवेश परीक्षांसाठी असलेल्या प्रत्येक विषय घटकांचा सखोल अभ्यास आणि संकल्पनांची सुस्पष्टता या दोन बाबी या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

शिकवणी वर्गात दर आठवड्याला किंवा दर दोन दिवसांनी होणाऱ्या सराव परीक्षेतील उत्तम गुण किंवा या शिकवणी वर्ग संस्थांच्या तथाकथित अखिल भारतीय गुणतालिकेत सतत वरचे स्थान मिळणे, हे फार काही कौतुकास्पद नसते आणि त्याचा फार उपयोगही नसतो. अशा शिकवणी वर्गाची गुणतालिका ही फसवी राहते. विद्यार्थ्याला सकारात्मक उर्जा मिळण्यासाठी त्यातील क्रमांक उपयुक्तही ठरत असेल किंवा असतो, मात्र प्रत्यक्ष परीक्षेत त्याचा फार उपयोग होईल याची खात्री शिकवणी वर्ग चालकही देवू शकत नाही.

अशा शिकवणी वर्गात भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये दरवेळेस उत्तम गुण मिळवणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेकदा जेईई  भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये एकही प्रश्न सोडवता न आल्याची उदाहरणे आहेत. आठव्या वर्गापासून जेईईची शिकवणी लावूनही मुलांची विकेट जाते ती अशी. त्यामुळे  शिकवणी वर्ग संस्थेच्या भ्रामक गुणवत्ता यादित  न अडकता विद्यार्थी नेमका अडतो कुठे हे वारंवार समजून घेणे आणि त्यासाठी आग्रही असणे फार महत्वाचे. कारण त्यासाठी आपण किमान लाखभर किंवा त्यापेक्षाही अधिक रुपये मोजले असतात.

जेईई  किंवा नीट परीक्षेसाठी शिकवणी वर्गातील सराव चाचण्यांमध्येही मुलांना प्रारंभापासून चांगले गुण मिळत नसतील, तर धोक्याची घंटी समजावी. आखणी प्रयत्न केले तर जमू शकेल, असे स्वत:ची आणि विद्यार्थ्यांची समजूत काढत राहण्याने अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. अशा कथित सकारात्मक समजुतिने वर्ष सुध्दा वाया जाऊ शकते. ही बाब लक्षात ठेवलेली बरी.

सुरेश वांदिले