(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

१० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपल्या. आता निकालाची वाट. तोपर्यंतचा कालावधी हा पालकांच्या  आणि विद्यार्थ्यांच्या हुरहुरीचा. किती टक्के मिळणार नि पुढे काय होणार? आता तसं १२ वीच्या गुणांवर आधारित प्रवेश जवळपास संपल्यातच जमा आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, डिझाइन (अभिकल्प), फॅशन तंत्रज्ञान, विधि, व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थापन, क्रीडा व्यवस्थापन अशा बहुतेक सर्वच शाखांमधील पुढील पदवी अभ्यासक्रमाला, सीइटी(कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन) किंवा अशा प्रकारच्या सामाईक परीक्षव्दारे प्रवेश दिला जातो. या परीक्षांना पात्र ठरण्यासाठी १० व १२ वीमध्ये किमान गुण (उदा-खुल्या संवर्गासाठी ६० टक्के तर राखीव संवर्गासाठी ५० किंवा ५५ टक्के इत्यादी) मिळण गरजेचं असतं. हे किमान गुण बऱ्याच मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे सर्वच शाखांमधील पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी हजारोने किंवा लाखानेच विद्यार्थी बसतात. तेव्हा स्पर्धा अत्यंत तगडी असणार हे ओघानं आलंच. या स्पर्धेला आता कसे तोंड देता येईल, हे पुढील काही महिने बघणं वा त्यावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं.

परीक्षेची तयारी

वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांची विशेषत: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशाची तयारी तशीही १० वी पासूनच करण्याकडे सध्या कल दिसून येतो. आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेश तयारीसाठी सध्या आठवीपासूनच्या “प्रारंभिक शिकवणी” वर्गाला मुलांना पाठवण्याची पालकांमध्ये चढाओढ सुरु असलेली दिसते. (तरी बरे, अजून पहिल्या वर्गापासून अशी तयारी करण्याचं अद्यापतरी कुणाला सुचलं नाही. अन्यथा पहिल्या वर्गात मुलाचं नाव टाकण्याआधी पहिलीपासून आयआयटी कोचिंग क्लासमध्ये नाव टाकण्यासाठी पालकांची धावाधाव सुरु झाली असती.) त्यामुळे १२ वीची परीक्षा संपताच विद्यार्थी, प्रवेश परीक्षेच्या सराव परीक्षेचे पेपरवर पेपर देत सुटतात. पालक आणि त्यांच्या दृष्टिने हा सराव, त्यातील मिळणारे गुण, कथित अखिल भारतीय रँकिंग अत्यंत समाधानकारक असते. त्यामुळे मूळ परीक्षेत असंच घडून मनाजोगत्या अभियांत्रिकी अथवा शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणारच अशी पालक व विद्यार्थ्यांना खात्री वाटते. विशेषत: पालक मंडळींनी देव पाण्यात टाकलेले असतात. प्रत्यक्ष निकाल लागतो तेव्हा अनेकांच्या पदरी घोर निराशा येते. ती तशी येणारच नाही, असं गृहीत धरल्यानं चांगलीच अडचण होते. त्यामुळे विद्यार्थी शांत होतो नि पालक त्याला, त्याच्या आणि स्वत:च्या नशिबाला, राखीव जागांना, परीक्षेतील कथित घोटाळ्यांना अशा अनेक बाबींना दोष देत सुटतो.

दरवर्षी तेच…

वर्षानुवर्षे असंच होत आलय. गेल्या वर्षिचाच पाढा पुन्हा वाचला जातो. त्यात काहीही फरक पडत नाही. त्यापासून कुणी फारसा बोधही घेत नाही. त्यामुळे अपयशाचं रडगाणं काही थांबत नाही.

वेगवेगळया अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या असणाऱ्या मर्यादित जागा आणि या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची “अबाबा!” म्हणायला लावणारी हजारोतील किंवा लाखातील संख्या काही कुणी लक्षात घेत नाही. नॅशनल टेस्टिंग एजंन्सीने दिलेल्या माहितीनुसार २०२४ च्या आयआयटी जेईई (जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन -मेन) परीक्षेत १२ लाख २५ हजार ५२९ विद्यार्थी बसले. यातील १० हजार ५७५ विद्यार्थ्यांनाच आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतो. जेईई मेन परीक्षेतून साधारणत: अडीच लाखाच्या आसपास जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले जातात. त्यातून या १० हजार ५७५ विद्यार्थ्यांची निवड होते. हे अडीच लाख विद्यार्थी जवळपास सारख्याच तोलामोलाचे आणि बुध्दीमत्तेचे असतात. अपवाद वगळता बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वर्षे आयआयटी प्रवेश परीक्षेचा कसून अभ्यास केलेला असतो. हमखास यश देण्याची गॅरेंटी देणाऱ्या कोणत्या ना कोणता कोंचिंग क्लास, लाखो रुपये शुल्क देऊन लावलेला असतो. ही बाब लक्षात घेता जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा (अपवाद वगळता) समसमान पातळीवरच दिली जाते. यात फारसे उन्नीस बीस होत नाही. ही वस्तुस्थिती पालकांनी लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे निकाल आणि नशिब, राखीव जागा, पेपरची काठीण्य पातळी, पेपरमधील चुका किंवा कथित संभाव्य घोटाळा यांचा परस्पर काहीही संबंध नसल्याचं लक्षात येईल.

आयआयटी प्रवेशसासाठी असणाऱ्या १० हजार ५७५ जागांपैकी ५० टक्के जागा खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना मिळतात. नॉन क्रिमिलेअर इतर मागास वर्गासाठी २७ टक्के जागा राखीव असतात. म्हणजे २७ शे ते ३ हजारच्या आसपास या जागा असतात. अशाप्रकारे इतर राखीव संवर्गासाठीसुध्दा जागा आरक्षित असतात.‍ त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा एकही  अतिरिक्त जागा भरली जात नाही. या सर्व आकड्यांचं गणित लक्षात घेतलं व शांतपणे विचार केल्यास पालकांनी, आपल्या मुलाने, जेईई ॲडव्हान्स्डमध्ये केलेल्या कामगिरीचं अजिबात वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. प्रवेश परीक्षा देतानाच ही आकडेवारी ठाऊक असल्याने विद्यार्थ्यांनीसुध्दा वाईट वाटून घेऊ नये. जेईई-मेनचा कठीण टप्पा पार पांडून जेईई ॲडव्हान्स्डमध्ये येणं हेसुध्दा फार महत्वाचं ठरत. आपली बुध्दीमत्ता खणखणित आणि प्रयत्न दणदणित असल्याचंच हे यश सिध्द करत असतं. त्यामुळे आयआयटीला प्रवेश मिळू नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याची अजिबातच गरज नसते. पालकांनीसुध्दा त्यांच्या नैराश्यात आणि स्वत:च्या चिडचिडेपणात भर टाकण्याची गरज नसते. जेईई ॲडव्हान्स्डमध्ये येणारे हे विद्यार्थी जेईई-मेनच्या सर्वोच्च रँकिंगमध्ये आलेले असतात. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या रँकिंगनुसार देशातील ३१ नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीमध्ये सुलभतेनं प्रवेश मिळवू शकतात. या एनआयटीमध्ये २४ हजारच्या आसपास जागा आहेत. काही विद्यार्थी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) मध्ये प्रवेश मिळवू शकतात. अशा २६ आयआयआयटीमध्ये साडेसहाहजाराच्या आसपास जागा आहेत.     काही सेंट्रल इंस्टिट्यूटमध्येही प्रवेश मिळूशकतो. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स मधील बी.एस्सी रिसर्च या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन/ॲडव्हान्स्ड गुणांचा आधार घेतला जातो. इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधील बीटेक अभ्यासक्रमाच्या ३० टक्के अखिल भारतीय जागा या जेईई मेन गुणांवर आधारित केल्या जातात. त्यामुळे जेईई ॲडव्हान्स्डला निवड झालेल्या विद्यार्थ्यांना  कोणत्या ना कोणत्या चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आयआयटी मिळाली नाही, याच्या विवंचनेत न राहता, अशा विद्यार्थ्यांना या संस्थांमधील अभ्यासक्रमांचा आनंदाने स्वीकार केल्यास त्यांचं करिअर उत्तमरित्या घडू शकते. गेल्या अनेक वर्षांचा हा अनुभव आहे. त्यामुळे जेईई ॲडव्हान्समध्ये निवड म्हणजे आपण उत्तम करिअरसाठी असणारी शर्यत जिंकल्याचं किंवा महत्वाचा टप्पा पार पाडल्याचं ठाम आणि ठोसपणे विद्यार्थी व पालकांनीही समजायलाच हवं.

आयआयटीचा ब्रँड मोठा आहे, तिथे विविध प्रकारच्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतात, या सर्वच बाबी योग्य असल्यातरी देशातील एनआयटी, आयआयआयटी, यासारख्या संस्थासुध्दा याबाबत मागे नाहीत. काही जुन्या एनआयटी या नव्या आयआयटीपेक्षाही सरस आहेत. आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना कोटी कोटीचे पॅकेजेस मिळतात हा एक भ्रम आहे. सगळया आयआयटी मिळून फार तर ५० ते ७५ पर्यंतच ही संख्या जाते. या ७५ जणांना आपसात जोरदार स्पर्धा करावी लागते. अनेक जुन्या एनआयटीमधील प्लेसमेंट हे बऱ्याच आयआयटीपेक्षा चांगले असते. अर्थातच आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला की भरपूर पॅकेज मिळेलच याची जशी शास्वती नसते तसेच एनआयटीचीसुध्दा आहे.

प्रवेश मिळणं हा एक भाग झाला. पण नंतर तुम्ही किती पाण्यात आहात, हे महत्वाचं. जो जितका खोलवर तितक्या अधिक संधी, हे सार्वकालीक तथ्य आणि सत्य लक्षात ठेवायला हवं.

महाराष्ट्राची एनआयटी

विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ही  महाराष्ट्राची एनआयटी नागपूर येथे २१४ एकरच्या विस्तीर्ण परिसरात वसली आहे. याठिकाणी सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, कॉम्प्युटर सायंस, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, मेटॅलर्जिकल ॲण्ड मटेरिअल्स, मायनिंग या अभियांत्रिकी  आणि आर्किटेक्चर ज्ञान शाखातील नऊशेहून अधिक जागा आहेत. यापैकी ५० टक्के जागा महाराष्ट्राचे अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. जेईई-मेन परीक्षेतील महाराष्ट्रातील रँक लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो. १९६० साली या संस्थेची स्थापना झाली. देशातील अग्रगण्य संस्थेमध्ये व्हीएनआयटीचा समावेश होतो. येथील अनेक विद्यार्थी देशविदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदावर पोहचले आहेत. संपर्क- https://vnit.ac.in/

सुरेश वांदिले