(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीचे बाबा, अलेक्झांडरला घेऊन सकाळी फिरायला जात. सकाळीसकाळी त्याला फिरायला मजा वाटे. या फिरण्याच्या वेळी बाबा त्याला चार गोष्टीही सांगत. दुसऱ्या डॉगीवर भुंकायचं नाही. उगाचच त्याच्याकडे रागानं बघायचं नाही. रस्त्यावरचं अरबटचरबट खायचं नाही. कुणाच्या अंगावर धावून जायचं नाही. असं त्याला समजवत. हे कितपत त्याला कळत असे, हे त्यालाच ठाऊक. पण तो जास्तीत जास्त शहाण्यामुलासारखा वागत असल्याने, आपलं सांगणं त्याला निश्चित कळत असावं, असं बाबांना वाटायचं. याचं त्यांना कौतुकही होतं. घरी, बरेचदा,हे कौतुक बोलून दाखवत.

“अहो, हे कौतुक तुमचच अधिक होतय.“ एकदा आई म्हणालीच शेवटी.

“असं स्वत:चच कौतुक करायचं नसतं, बाबा. “तेजोमयी हसत म्हणाली. “बरोबरना रे अलेक्झू…“ तिने लगेच अलेक्झांडरकडे बघितलं. त्याला यातलं काहीही नं कळल्यानं त्याने प्रश्नार्थक चेहऱ्यानं आईकडे बघितलं. तिच्याकडे तो शेपूट हलवत गेला नि मान वर करुन, बाबा काय म्हणताहेत हे विचारण्याचा प्रयत्न करु लागला. त्याला जवळ घेत ती त्याला सांगू लागली,

“ठोंब्या, तुझं कौतुक करायचं सोडून, हे स्वत:चच कौतुक करत बसले. तू शहाण्यासारखा वागला नसतास, तर यांचं कौतुक काय कामाचं, बरोबर की नाही.“

आईचं सांगणं, अलेक्झांडरला बरोबर कळतं. त्यामुळे त्याने होकारार्थी मान हलवली. आई त्याला शाब्बास म्हणाली. तेजोमयीने त्याची पाठ थोपटली.

“बरं बुवा, तुमचा लाडका लेकच शहाणा, आम्ही काय बापुडे!”असं बाबा बोलून गेले. त्यात किंचित नाराजिचा सूर होता.

०००

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा अलेक्झांडरला घेऊन फिरायला गेले. कां कोण जाणे, आज त्यांनी सोबत मोबाइल घेतला होता. अलेक्झांडरला बागेमध्ये फिरवत असताना, त्यांचा बहुतेक वेळ मोबाइलवर बोलण्यातच गेला. बाबा, आपणाशी काहीच बोलत नाही हे बघून, अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने नाराजी व्यक्त केली. मात्र, बाबांनी तिकडे लक्ष दिलं नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा तसच घडलं. मोबाइलवर बोलत राहिल्याने बाबांना , अलेक्झांडर सोबत बोलणं शक्य झालं नाही. ते त्याच्यासोबत खेळलेही नाहीत. असं पुन्हा दोन-तीन दिवस घडलं. याचं बाबांना काही वाटलं नसावं. मात्र अलेक्झांडरची चिडचिड वाढली. ती आईच्या बरोबर लक्षात आली.

“काय हो, काय झालं ? ठोंब्याला उगाचच रागावलात तर नाहीना.“ आईने बाबांना विचारलं.

“अहो, मी कशाला रागावू, छान गेलो, दोन राऊंड मारले नि आलो. त्याला रागवायला संधी तरी कुठे होती. शिवाय तो तुमचा शहाणा लेक!त्याला बुवा आम्ही कसं रागावणार?”बाबा किंचित मस्करी करत म्हणाले.

“मग हा फिरुन आल्यापासून कां चिडचिड करतोय?नेहमी फिरुन आला की अधिक आनंदी, उत्साही वाटतो. मात्र कालपासून काहीतरी गडबड झालेली दिसते.“

“मला काय विचारतेस. त्यालाच विचार ना.”बाबा म्हणाले.

तेव्हा आईने खरोखरच अलेक्झांडरला विचारलं. त्यावेळी बाबा कुणाशीतरी मोबाइलवर बोलत होते. अलेक्झांडरने चक्क त्यांच्या अंगावर उडी घेऊन, मोबाइल हिसकावला. बाबा संतापले. त्याच्यावर ओरडले.

“अहो, ओरडता कशाला?”

“कशाला म्हणजे? तू बघितलं नाहीस का, काय केलं त्याने आता ते. मोबाइल खाली पडला असता तर किती नुकसान झालं असतं. कळतय ना तुला”.बाबांचा राग काही कमी झाला नव्हता.

इकडे अलेक्झांडर मोबाइल सोडायला तयार नव्हता.

“अरे, मोबाइल दे बाबांना“, तेजोमयी त्याला म्हणाली. तेव्हा अलेक्झांडरने दुसरीकडे मान वळवली.

“बघितलं का शहाणा. किती हट्टी झालाय तो.“ आईला उद्देशून बाबा म्हणाले.

“अहो, तुम्ही दररोज त्याला शहाणपणाच्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी सांगताना, असं मोबाइल हिसकावून घेणं बरोबर नाही, हे नाही का सांगितलं त्याला?”आई, बाबांना म्हणाली.

“पण बाबा,मला एक सांगा, आजपर्यंत अलेक्झू असा कधी वागला नाही.मग आजच का?” तेजोमयीनं विचारलं.

“बरोबर बोलतेय तेजो.“आईने तिची बाजू घेतली.

“मला काय माहीत.अती लाडाने शेफारलाय तो.बघाना अजूनही त्याने मोबाइल तोंडातून सोडला नाही.“बाबा गुस्यातच म्हणाले.

“अहो बाबा,तुम्ही असं काहीबाही बोलू नका.अलेक्झू काही शेफारला बिफरला नाही.बाबा मला एक सांगा, दोन तीन दिवसांपासून त्याच्यासोबत फिरताना तुम्ही काय करत होतात.“

“काय करत होतो म्हणजे, त्याला फिरवत होतो.“

“आणखी काय?

“आणखी काय करणार? थोडावेळ मोबाइलवर बोलत होतो.“बाबा बोलून गेले.

“अहो, तुम्ही फिरायला जाताना कधीच मोबाइल नेत नव्हतात.“तेजोमयीनं निदर्शनास आणलं.

“मोबाइलवर थोडावेळ कुठे बालणं होतं का?पूर्ण वेळच तुम्ही बोलत असणार.खोटं बोलू नका.“ आईनं विचारलं.

“नाही म्हणजे… हो, बोलत होतो. महत्वाचं होतं ते.“

“आता कसे अलगत जाळयात सापडलात. तुम्ही अलेक्झांडरशी बोललाच नाहीत. खेळायचा तर प्रश्नच येत नाही. मग त्याची चिडचिड होणार नाही तर काय?” आई म्हणाली.

“आई म्हणतेय त्यात तथ्य वाटत नाही का बाबा तुम्हास?” तेजोमयीनं विचारलं.

बाबांच्या लक्षात त्यांची चूक आलीच होती. पण ते कबूल करावयास धजावत नव्हते.

“तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण असं मोबाइल हिसकावून घेणं तरी बरोबर आहे का?”

“अहो त्याने मोबाइलच हिसकावला,  तुम्हाला चावा घेऊन इंगा नाही ना दाखवला. त्याचे आभार माणून चूक कबूल करा.  उद्यापासून असं काही करणार नाही, हे सांगा ठोंब्याला.“आई म्हणाली.

बाबांनी अलेक्झांडरला जवळ घेतलं. त्याला सॉरी म्हणाले.

अलेक्झांडरला ते कळलं. सोफ्यावर अलगद मोबाइल ठेऊन तो बाबांच्या गळयात पडला.

०००

 

१३