(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीला प्रश्न पडायचा की, आई कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नावे नाक कां मुरडते?

सतत कुणाच्या ना कुणाच्या कागाळया करणाऱ्या वहिनी, काकू, आजी, मामी, आत्या, सूनबाई, सासूबाई अशी पात्रं असलेल्या मालिका ती देहभान विसरुन बघते. तिच्या काही अशा आवडत्या मालिका सुरु असेल तर तिला काही विचारलेल , टोकलेलं किंवा तिला डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नसे. अशा वेळी तिचा लाडका ठोंब्या अलेक्झांडर असो की मग तेजोमयी किंवा मग तेजोमयीचे बाबा, आईच्या रागाचा मार कुण्याच्याही वाटेला येऊ शके. त्यामुळे सावधगिरी म्हणून तेजोमयी आणि बाबा अशा वेळी दुसऱ्या खोलित जाणं पसंत करत.

 अलेक्झांडर हुषार. आई जेव्हा टक लावून टीव्ही बघते तेव्हा काही गडबड किंवा बडबड करायची नसते, हे त्याला एकदोनदा स्वानुभवावरुन लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याने आईकडे शरणागती पत्करली. आई तिचे आवडीचे कार्यक्रम बघायला लागली की हा पठ्ठ्या आईला खेटून बसून आईसारखाच टीव्हीकडे टक लावून बघत असे. आई उठल्यावरच हा उठणार.

काही दिवसांनी आईला याचं किती कौतुक वाटू लागलं.

अहो, ती मालिका ना इतकी रंगतदार आहे की, आमचा अलेक्‍झांडरही देहभान विसरुन बघतो. असं अनेकदा आई तिच्या मैत्रिणींना सांगायची.

सतत कट कारस्थानात गुंग असलेल्या पात्रांच्या कथा आईला कां आवडत असाव्यात हा प्रश्न जसा तेजोमयीस पडू लागला तसच अलेक्झांडरला या कथा खरच आवडत असतील का, हाही प्रश्न आता तिला पडू लागला.

एकदा तिने बाबांना याविषयी विचारलच.

अगं बाळ, काही प्रश्नांची उत्तर शोधायची नसतात. नसता आपलाच हात पोळायचा.

म्हणजे हो बाबा..

अगं, आईला विचारायची सोय नाही..ती आपल्या अंगावर यायची आणि अलेक्झांडरचं काय तो तर एचएमव्हीच

म्हणजे..

अगं, एचएमव्ही म्हणजे हीज मदर्स व्हाईस..त्याच्या आईचा आवाज.त्याला बरोबर कळलय, कोड-कौतुक, खाणं-पिणं, लाडावणं कोण करतेय ते..त्यामुळे आईला जे आवडणार तेच तो करणार किंवा तसं दाखवणार तरी…लब्बाड लेकाचा..

बाबांच्या या उत्तराने दोघेही मनमुराद हसले.

आई आणि अलेक्झांडर दोघेही मालिकांमध्ये गुंग असल्याने दोघांचेही लक्ष या हसण्याकडे गेलं नाही.

०००