भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यासाठी प्राधान्य द्यावं यासाठी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (IISER) या संस्थेची स्थापना भारत सरकारने केली.
या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत २०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून महत्वाचा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपर्यंत बीएस-एमएस (ड्युएल डिग्री) प्रवेशासाठी पुढील तीन पध्दतीचा अवलंब करण्यात येत असे. (१) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी थेट अर्ज करु शकत. (२) आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE (ADVANCED) परीक्षेत पहिल्या दहा हजारात आलेले विद्यार्थी थेट अर्ज करु शकत आणि (३) संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा- IISER ॲडमिशन टेस्ट.
मात्र यंदापासून केवळ आयसर ॲडमिशन टेस्ट (आयएटी) व्दारे प्रवेश दिला जाईल. यंदा ही परीक्षा ९ जून २०२४ रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ मे २०२४ आहे.
IISER ॲडमिशन टेस्ट–
या परीक्षेद्वारे या संस्थेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने ११ वीपासूनच तयारी करायला हवी. कारण या परीक्षेचा अभ्यासक्रम हा एनसीइआरटीच्या (नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग) ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असतो. या पेपरमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विषयाचे १५, असे एकूण ६० प्रश्न असतील. प्रत्येक अचुक उत्तरास ४ गुण दिले जातात. अशाप्रकारे एकूण २४० गुणांचा हा पेपर असेल. चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कपात केला जातो. संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) या पेपरमधील प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात.
परीक्षेचा कालावधी – तीन तास. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रावर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे केंद्राचा समावेश आहे. १२ वी विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांनी गणिताऐवजी जीवशास्त्र आणि जीवशास्त्राऐवजी गणित घेतले असेल त्यांनासुध्दा ही परीक्षा देता येते. मात्र या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आयसर ॲडमिशनच्या वेबपोर्टलवर यंदाच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे. लवकरच सरावासाठी पेपरही उपलब्ध करुन देण्यात येईल. माहितीपत्रकात मागील काही वर्षांचे पेपर देण्यात आले आहेत.
अर्हता-
भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यापैक कोणतेही तीन विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण. या परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के तर राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळायला हवे. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या चाळणी परीक्षेला बसू शकतात. यंदा १२ वीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी चाळणी परीक्षेसाठी अर्ज करु शकतात.
या संस्थेचे कॅम्पस पुणे, भोपाळ, थिरुवनंतपूरम, मोहाली, तिरुपती, कोलकता आणि बेरहमपूर या सात ठिकाणी आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये १९३३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये शासनाच्या निर्णयानुसार राखीव जागांचा समावेश आहे.
सर्व कॅम्पसमध्ये बी.एस – एम.एस (बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. याशिवाय भोपाळ कॅम्पसमध्ये चार वर्षे कालावधीचा बीएस इन इंजिनीअरिंग सायन्स आणि बीएस इन इकॉनामिक्स सायन्स हे अभ्यासक्रम करता येतात. या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये गणिताचा अभ्यासक्रम केलेला असावा.
सर्व कॅम्पससाठी एकच अर्ज भरावा लागतो. विद्यार्थांना मिळालेले गुण, गुणवत्ता यादीतील त्याचा संवर्गनिहाय क्रमांक आणि त्याने दर्शविलेला आयसर कॅम्पसचा पसंतीक्रम लक्षात घेऊन वेगवेगळ्या कॅम्पससाठी प्रवेश निश्चित केला जातो.
शिष्यवृत्ती
या अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या काही उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा संपूर्णपणे निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोईंनी युक्त वसतीगृह उपलब्ध करुन दिले जाते.
या अभ्यासक्रमात पहिल्या दोन वर्षात मूलभूत विज्ञानशाखेतील सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय निवडू शकतो.
संपर्क
(१) प्रवेश प्रकिया संकेतस्थळ- https://iiseradmission.in/
(२) पुणे कॅम्पस – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, डॉ.होमी भाभा रोड ,पाषाण पुणे- ४११००८, दूरध्वनी- ०२०– २५९०८०००, ई-मेल-admissions@iiserpune/ac.in,संकेतस्थळ – www.iiserpune.ac.in
०००
नेस्ट
नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्टद्वारे (NEST) भुवनेश्वनरस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम सुध्दा संशोधन कार्यास प्रोत्साहन देणार आहे. हा पूर्णपणे निवासी अभ्यासक्रम आहे.
ही पदव्युत्तर पदवी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयात घेता येते. पाचही वर्षी विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये उन्हाळी किंवा हिवाळी संशोधन प्रकल्प राबवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला दरमहा ५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय वार्षिक २० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर) मधील पदवी होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूट मार्फत तर मुंबई स्थित डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस मधील पदवी मुंबई विद्यापीठामार्फत दिली जाते.
हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधील प्रवेशप्रकियेत थेट मुलाखतीसाठी ग्राह्य धरले जाते.
अर्हता–
१२ विज्ञान शाखेच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण. (२०२२ आणि २०२३ मध्ये १२ वी उत्तीर्ण झालेले आणि यंदा १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी “नेस्ट” परीक्षेला बसू शकतात. या परीक्षेला बसण्यासासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही.)
अर्ज प्रकिया www.nestexam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतो. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. ही परीक्षा ३० जून २०२४ रोजी १२० शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर नांदेड, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
असी असेल परीक्षा
“नेस्ट” परीक्षा संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. पेपरची भाषा इंग्रजी आणि हिंदी असून पेपरमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रावर आधारित चार विभाग असतील. प्रत्येक विभागात प्रत्येकी २० प्रश्न असतील. प्रत्येक अचुक उत्तराला ३ गुण दिले जातील. याचा अर्थ प्रत्येक विभागासाठी ६० गुण असतील. चुकलेल्या उत्तरासाठी १ गुण कपात केला जाईल. न सोडवलेल्या उत्तरासाठी गुण दिले जाणार नाहीत.
चार ही विभागातील ज्या तीन विभागात सर्वाधिक गुण मिळतील त्याचा उपयोग गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी केला जातो. ज्या विभागातील कामगिरी वाईट असेल किंवा अत्यल्प गुण मिळाले असतील ते गुण ग्राह्य धरले जात नाहीत, त्यामुळे सर्व विभागाचे प्रश्न सोडवणे हिताचे ठरेल अशी सूचना नेस्ट संनियंत्रकांनी केली आहे.
परीक्षेतील हे प्रश्न ११ वी आणि १२ वीच्या एनसीइआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. “नेस्ट”च्या माहितीपत्रकात हा अभ्यासक्रम देण्यात आला आहे. शिवाय गेल्या काही वर्षातील प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत. त्याचा सरावासाठी उपयोग करता येऊ शकतो. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर “नेस्ट”च्या पोर्टलवर सरावासाठी अभिरुप (मॉक)पेपर ठेवला जाईल. सरावासाठी आणि परीक्षेतील प्रश्नांचा प्रकार लक्षात येण्यासाठी हा पेपर उपयुक्त ठरु शकतो.
१८० गुणांपैकी मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते.
संपर्क – डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, हेल्थ सेन्टर बिल्डिंग, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी – ०२२-२६५३२१३२, ई-मेल- info@cbs.ac.in,संकेतस्थळ www.cbs.ac.in
सुरेश वांदिले