(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आपल्या देशातील टेलिव्हीजन माध्यमाचा विस्तार   अबाबा करायला लावणारा आहे. शेकडो  वाहिन्या   आणी  त्यावरील मोजता मोजता थकवून टाकणारे बहुरंगी – बहुढंगी कार्यक्रम. या कार्यक्रमांचा रतीब २४ तास सुरु. त्यामुळे या माध्यमाची “कंटेट” म्हणजेच आशयाची भूक ही कुंभकर्णी  किंवा त्यापेक्षाही कित्येकपट. सगळया  वाहिन्यांना  कार्यक्रम ‍निर्मितीमध्ये जरासुध्दा खंड पाडता येत नाही. इतक्या असंख्य कार्यक्रमाची ‍निर्मिती करायची म्हणजे तसेच  उत्तम दर्जाचे प्रशिक्षीत मनुष्यबळ हवे.  

वाहिन्यांचे सगळे कार्यक्रम हे सर्जनशील  असल्याने त्यासाठी लागणारं मनुष्यबळसुध्दा कौशल्ययुक्त असणं गरजेचं. ही गरज भागवण्याचं काम,  ‍ फिल्म ॲण्ड  टेलिव्हीजन ‍ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, ही संस्था करत असते. ही आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील, या क्षेत्राचं उत्कृष्ट  शिक्षण व प्रशिक्षण देणारी संस्था. या संस्थेतून गेल्या गनेक वर्षात एकापेक्षा श्रेष्ठ कलावंत, लेखक, पटकथाकार, ध्वनी अभियंते, सिनेछायात्रिकार, दिग्दर्शक बाहेर पडले आहेत. या सर्वांनी भारतीय चित्रपट व  टीव्ही माध्यमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.  या संस्थेचे मनुष्यबळ हे जागतिक तोडीचे समजले जाते. त्यामुळेच आज भारतीय चित्रपट व टीव्ही, दोन्ही माध्यमं जागतिक पातळीवर दबदबा निर्माण करण्यास यशस्वी झाली आहेत.

या संस्थेने टीव्ही, चित्रपट, ॲनिमेशन, व्हीएफक्स या  क्षेत्रासाठी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम या क्षेत्रातील नामवंत, यशस्वी व्यक्ती  शिकवतात. सैध्दांतिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिकांवर  भर दिला जातो. संस्थेकडे अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज असा स्टुडीओ आहे. त्यामुळे या संस्थेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी  व विद्यार्थीनी निवडलेल्या क्षेत्रात यशाला गवसणी घालतात.

या संस्थेचा दर्जा  व गुणवत्ता कायम राहावी यासाठी मोजक्याच उमेदवारांना प्रवेश दिला जातो. या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून हजारो  उमेदवार  इच्छूक असतात. त्यातून   सुयोग्य उमेदवारांच्या ‍निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची काठीण्य पातळी उच्च दर्जाची असते.

टीव्ही  माध्यमासाठी अभ्यासक्रम

पोस्ट ग्रॅज्युएट  सर्टिफिकेट कोर्स इन टेलिव्हीजन वुइथ स्पेशलायझेशन इन

(१) टिव्ही डायरेक्शन, (२) इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्रॅफी, (३)  व्हीडीओ एडिटिंग. अभ्यासक्रम १ ते ३ साठी अर्हता कोणत्याही विषयातील पदवी.

(४) साऊंड रेकॉर्डिंग ॲण्ड टेलिव्हीजन इंजिनीअरिंग. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संबंधित विद्यार्थ्याने १२वीत भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.

या चारही अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी एक वर्षाचा. या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता  ‍ मिळाली आहे.

 

चित्रपट माध्यमांसाठी अभ्यासक्रम

पोस्ट ग्रॅज्युएट  डिप्लोमा कोर्स इन (१)  डायरेक्शन ॲण्ड  स्क्रीनप्ले रायटिंग, (२) सिनेमॅटोग्रॅफी, (३) एडिटिंग, (४) साऊंड रिकॉर्डिंग ॲण्ड साऊंड   डिझाइन (अर्हता- अभ्यासक्रम १ ते चार कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी तीन वर्षे.)

(५) आर्ट डायरेक्शन ॲण्ड प्रॉडक्ट   डिझाइन (अर्हता- ॲप्लाइड आर्ट, इंटेरिअर डिझाइन, ऑर्किटेक्चर,  पेंटिंग, स्क्लप्चर किंवा फाइन आर्टमधील पदवी. कालावधी- सहा सत्रात विभागलेली तीन वर्षे),

(६) स्क्रीन ॲक्टींग‌ (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. कालावधी चार सत्रात विभागलेली दोन वर्षे),

(७) स्क्रीन प्ले रायटिंग फॉर टीव्ही,  फिल्म व   वेबसिरीज (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. कालावधी चार सत्रात विभागलेली दोन वर्षे).

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन स्क्रीनप्ले रायटिंग फॉर टीव्ही,  फिल्म व   वेब सिरीज, वगळल्यास इतर सर्व अभ्यासक्रमांना  पदव्युत्तर पदवीचा दर्जा भारतीय विद्यापीठ संघाने (असोशीएशन ऑफ  इंडियन युनिर्व्हसिटीज) दिला आहे.

ॲनिमेशन ॲण्ड  व्हीज्युअल  इफेक्ट्स डिझाइन

    टीव्हीसाठी ॲनिमेशन ॲण्ड  व्हीज्युअल  इफेक्ट्स डिझाइन, हा अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स चालवला जातो.  अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. कालावधी – सहा सत्रांमध्ये  विभाजित केलेली तीन वर्षे.

हा अभ्यासक्रम सर्जनशीलता व  तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा आहे. ॲनिमेशनच्या विविध संकल्पना, दृष्यांचा परिणाम याबाबींचं प्रगत ज्ञान प्रदान केलं जातं. प्रात्यक्षिकांवार भर दिला जातो.

ॲनिमेशन चित्रपट तंत्राच्या अनुषंगाने, (१) स्टोरी बोर्डिंग (कथानकाची निर्मिती), (२) ड्राईंग (चित्रांकन), (३) क्रिएटिंग  व्हीज्युएल्स (दृष्यांची ‍निर्मिती), डिझाइन प्रिंसिपल्स (अधीकल्पाची तत्वे),‍ (४)  कॅमेरा    टे‍क्नीक (कॅमेराची तंत्रे), (५) विविध सॉफ्टवेअर यांचं  प्रशीक्षण दिलं जातं.

विविध माध्यमांमध्ये काम करता येणं शक्य व्हावं व सतत नवं तंत्र हस्तगत करता यावं या अनुषगांने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. कथानकाच्या अनुषंगाने  सुयोग्य सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करायचा, हा महत्वाचा   भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्यक्तीगत किंवा समुहामध्ये प्रकल्प दिला जातो. त्याव्दारे प्रत्यक्ष  ॲनिमेशन साकारता येतं. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी ॲनिमेशन  व  व्हीज्युअल तंत्रावर  आधारीत  चित्रपट तयार करण्याची संधी विध्यार्थ्यांना मिळते.

संपर्क – फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड पुणे- ४११००४, दूरध्वनी-०२०-२५५८००००, संकेतस्थळ- www.ftii.ac.in, ईमेल- academic.officeftii@ac.in

०००

सत्यजित रे फिल्म ॲण्ड टे‍लिव्हीजन  इंस्टिट्यूट कोलकता-

डिजिटल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक मीडिआ शाखा

पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन डिजिटल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक मीडिआ-

(१) मॅनेजमेंट, (२) सिनेमॅटोग्रॅफी, (३) डायरेक्शन ॲण्ड प्रोड्युसिंग. (४) साऊंड, (५) रायटिंग, (५) एडिटिंग. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी प्रत्येकी दोन वर्षे किंवा चार सत्रे

चित्रपट  शाखा

(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन  ॲनिमेशन सिनेमा.

(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायरेक्शन ॲण्ड स्क्रीनप्ले रायटिंग फॉर सिनेमा

(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिनेमोटोग्रॅफी.

(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन  एडिटिंग फॉर सिनेमा

(५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन  प्रोड्युसिंग फॉर फिल्म ॲण्ड टीव्ही.

अभ्यासक्रम १ ते  ५ साठी अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे किंवा सहा सत्रे.

(६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन  साऊंड रिकॉर्डिंग ॲण्ड डिझाइन फॉर सिनेमा अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. मात्र संबंधित विद्यार्थ्याने १२वीमध्ये भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. कालावधी तीन वर्षे.

संपर्क- सत्यजित रे फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ,ई.एम बायपास रोड, पोस्ट ऑफिस पंचासायार, कोलकता- ७०००९४, दूरध्वनी-०३३-२४३२,८३५५, फॅक्स- २४३२०७२३, संकेतस्थळ- srfti.ac.in ,ईमेल-contact@srfti.ac.in

प्रवेश प्रकिया

सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी जॉईंट एंट्रस टेस्ट घेतली जाते. (यंदा पदवीच्या  अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.) या परीक्षेचे दोन पेपर्स असतात. एकूण कालावधी तीन तास. यामध्ये १०० गुणाचे प्रश्न विचारले जातात.

पेपर एकमध्ये, (१) भाग एक, हा मल्टीपल ‍ ‍चॉइस  क्वच्छेन ( सिंगल ॲन्सर टाइप– बहुपर्यायी प्रश्न- एकल उत्तर पध्दत) या पध्दतीचा असतो. (२) भाग दोन, हा मल्टीपल ‍ ‍सिलेक्ट  क्वच्छेन (बहुपर्यायी निवड पध्दत) या प्रकारातील असतो. दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी २० गुणांचे प्रश्न विचारले जातात. पेपर दोन हा विस्तृत उत्तर पध्दतीचा असतो. या पेपरचे गुण असतात ६०.

लेखी परीक्षेतील गुणांवर आधारीत प्रत्येक संवर्गनिहाय  गुणवत्ता यादी  तयार केली जाते. या  यादितील सर्वोच्च गुण प्राप्त निवडक  उमेदवारांना कलचाचणी   व  मुलाखतीसाठी बोलावलं जातं. ‍ अंतिम निवड यादी ही लेखी परीक्षेतील गुण, कलचाचणी  व  मुलाखत यावर तयार केली जाते. यानंतर वैद्यकीय चाचणी होते. या चाचणीत  अनुत्तीर्ण झाल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. या परीक्षेतील गुण, उमेदवारांनी दिलेला पर्याय व उपलब्ध जागा लक्षात घेऊन उमेदवारांना पुणे येथील  ‍फिल्म ॲण्ड टेलिव्हीजन ‍ इंस्टिट्यूट  किंवा कोलकता येथील सत्यजीत रे फिल्म ॲण्ड टेलिव्हीजन ‍ इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश दिला जातो. चाळणी परीक्षा मुंबई, पुणे, कोलकता, नवी दिल्ली, चेन्नई, ऐजवाल  व जम्मू या सात शहरांमध्ये  घेतली जाते.

या अभ्यासक्रमातील १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, २७ टक्के जागा  नॉन क्रिमी लेअर इतर मागास संवर्ग, १० टक्के जागा  आर्थिकदृष्ट्या मागास (इडब्ल्यूएस) संवर्गासाठी राखीव आहेत. काही अटीशर्तींसह ५ टक्के जागा  दिव्यांगांसाठी राखीव आहेत.

सुरेश वांदिले