सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढलीय. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या स्वरुपातील करिअरच्या चांगल्या संधी उपलबध होऊ शकतात.
योगविषयाचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था
मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, या संस्थेची स्थापना, भारत सरकारने योग शिक्षण आणि प्रशिक्षणांसदर्भात, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून स्थापना केली.
अभ्यासक्रम
(१) बी.एस्सी इन योगा– कालावधी तीन वर्षे. अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात सरासरीने ५० टक्के गुण. प्रत्येक विषयात स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचं वय २१ वर्षांपेक्षा अधिक नसावं. हा अभ्यासक्रम गुरु गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या युनिव्हर्सिटीमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.
(२) डिप्लोमा इन योग सायन्स, कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण. वयोमर्यादा १ ऑगस्ट रोजी ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
(३) डिप्लोमा इन योग थेरपी
जीवनशैलीशी निगडित विविध शारीरिक व मानसिक आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योग थेरपी (उपचार पध्दती) शिकवल्या जातात. यामध्ये पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचा समावेश असून व्यक्तिमत्व विकासासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.
हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण.
(४) सर्टिफिकेट कोर्स फॉर योग थेरपी असिस्टंट– कालावधी- ६ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी.
(५) सर्टिफिकेट कोर्स इन योगा फॉर वेलनेस इंस्ट्रक्टर – कालावधी- ६ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी.
(६) डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (योगासन)
हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम असून योगासनांना, क्रीडा प्रकार म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, असं उद्दिष्ट हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागे आहे. योगासनांव्दारे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास व्हावा, खेळाडूंच्या व्यक्तीमत्व विकासाला प्रोत्साहन मिळावं, खेळातील विविध हालचालींचा गुणात्मक आणि संख्यात्मक फरक ओळखता यावा, अशी सुध्दा काही उद्दिष्टे आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर अधिकृत अर्हताप्राप्त क्रीडा प्रशिक्षक म्हणून करिअर संधी मिळू शकते.
हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण.
(७) एम.एस्सी इन योग
या क्षेत्रातील उच्च श्रेणीचा अभ्यास करता यावा यासाठी संस्थेने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता कोणत्याही विषयातील पदवी. या परीक्षेत खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यास ५० टक्के आणि आरक्षित संवर्गातील विद्यार्थ्यास ४५ टक्के गुण मिळायला हवेत.
हा अभ्यासक्रम गुरु गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी युनिव्हर्सिटीमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.
उदिष्ट्ये
(१) योगाशी संबंधित संशोधन कार्यात साहाय्य करणं, (२) रुग्णालयामध्ये डॉक्टरांना योग उपचारांचं प्रशिक्षण देणं अथवा आजारी व्यक्तीच्या आरोग्य विषयक समस्यांच्या निराकरणासाठी साहाय्य करणं, (३) सर्व पातळीवर योग प्रशिक्षकांचं मनुष्यबळ वाढवण्यासाठी साहाय्य करणं अथवा प्रशिक्षण देणं, (४) जीवनशैलीशी निगडित विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणासाठी योग थेरपीचं ज्ञान विद्यार्थ्यांना देणं, (५) योगाच्या माध्यमातून सकारात्मक जीवनशैली आणि व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन आणि चालना देणं, (६) मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रोत्साहन देणं.
संपर्क- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, ६८, अशोका रोड नवी दिल्ली- ११०००१, संकेतस्थळ-http://www.yogamdniy.nic.in/, ईमेल-dr-mdniy@nic.in, दूरध्वनी- ०११-२३३५१०९९
००००
गोरधनादास सेकसारिआ कॉलेज ऑफ योग ॲण्ड कल्चरल सिंथेसीस
या महाविद्यालयाची स्थापना १९५१ साली झाली. या संस्थेमार्फत पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे अभ्यासक्रम चालवले जातात.
(१) बीए योगशास्त्र- कालावधी तीन वर्षे. हा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. प्रवेशासाठी १२ वी परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. (२) एम.ए. इन योगशास्त्र, कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी पदवी परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो.
दोन्ही अभ्यासक्रम कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित आहेत.
(३) डिप्लोमा इन योग थेरपी- या अभ्यासक्रचा कालावधी दीड वर्षे. यामध्ये सहा महिन्यांच्या इंटर्नशीपचा समावेश आहे. अर्हता कोणत्याही विषयातील पदवी आणि इंडियन योग असोशिएशनने मान्यता प्रदान केलेला किमान एखादा योग अभ्यासक्रम.
(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग एज्युकेशन- कालावधी ९ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क- स्वामी कुवल्यानंद मार्ग, लोणावळा- ४१०४०३, ईमेल-info@kdham.com, संकेतस्थळ- kdham.com, दूरध्वनी- ०२११४- २७३००१
०००
स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी –
१) बॅचलर ऑफ सायन्स इन नेचरोपथी ॲण्ड योगिक सायन्स (अर्हता – जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी – ५.५ वर्षे),
२) मास्टर ऑफ सायन्स इन योग थेरपी (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी -२ वर्षे),
४) बॅचलर ऑफ सायन्स इन योग ॲण्ड वेदिक थेरपी
५) बॅचलर ऑफ सायन्स इन योग थेरपी (अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण, खुला संवर्ग ५० टक्के, राखीव संवर्ग ४० टक्के. कालावधी – ३ वर्षे),
६) मास्टर ऑफ सायन्स इन योग ॲण्ड वेदिक थेरपी
७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी
८) योगा इन्स्ट्रक्टर कोर्स (अर्हता – १२ वी उत्तीर्ण, कालावधी- साडे चार महिने)
या संस्थेत योग विषयातील पीएचडी करण्याचीही सुविधा आहे.
संपर्क– स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी, प्रशांती कुटिरम, विवेकानंद रोड, कल्लूबल्लू पोस्ट, जिगानी, अनेकल, बेंगळुरु – ५६०१०५, दूरध्वनी – ०८०-२२६३९९६८ संकेतस्थळ – http://www.svyasa.edu.in, ई-मेल- info@svyasa.edu.in
०००
गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय हरिद्वार-
(१) बी.एस्सी ऑनर्स इन योगिक सायन्स
(२) एम. ए. इन योगिक सायन्स
(३) सर्टिफिकेट कोर्स इन योग. कालावधी सहा महिने.
संपर्क- रजिस्ट्रार, गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय, गुरुकुल कांग्री, हरिद्वार- २४९४०४, संकेतस्थळ- http://gkv.ac.in, ईमेल-registrar@gkv.ac.in
९३०९४५५४५५
००.
राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ-
पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन योग थेरपी ॲण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट- कालावधी- एक वर्षं. इंटर्नशीप- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पांतजली योगशास्त्राव्दारे, मानवी मन आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी उपयुक्तता, यावर या अभ्यासक्रमात भर देण्यात येतो. संस्कृत भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिलं जातं.
संपर्क- राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती- ५१७५०७, आंध्रपदेश, संकेतस्थळ- https://nsktu.ac.in,ईमेल-registrar_nsut@nsktu.org दूरध्वनी-०८७७-२२८८७९९
०००
इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन
भारत सरकारच्या युवक कल्याण आणि खेळ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेचे अभ्यासक्रम – १) एम.ए इन योग एज्युकेशन, कालावधी दोन वर्षे. २) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग एज्युकेशन, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं. या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. या संस्थेतही योग विषयात पीएचडी करण्याची सुविधा आहे.
संपर्क – रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्तीनगर, रेसकोर्स रोड, ग्वाल्हेर – ४७४००२, दूरध्वनी – ०७५१ – ४०००९०२, ४०००९१७, ४०००९००, फॅक्स -४०००९९२, ई-मेल- registrar@lnipe.edu.in आणि vc@lnipe.edu.in,संकेतस्थळ – www.lnipe.net.
०००
योग इंस्टिट्यूट
(१) योग टिचर ट्रेनिंग ऑनलाइन कोर्स, (२) ॲडव्हान्स्ड योगा आसन रेग्युलर ऑनलाइन कोर्स, (३) सर्टिफिकेट कोर्स इन ॲडव्हान्स्ड प्राणायम टेक्निक, (४) सर्टिफिकेट योगा थेरपी कोर्स,
संपर्क https://www.theyogainstitute.org/courses
सुरेश वांदिले