(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ज्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गायन, वादन, संगीत यात रस आणि गती असेल व या क्षेत्रात करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल त्यांनी आपल्या इच्छेला मुरड मारु नये. प्रतिभा, परिश्रमातलं सातत्य, मिळालेल्या संधीचं सोनं करणं अशा काही घटकांवर लक्ष दिल्यास यशाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो. डिजिटल माध्यमांमुळे अशा संधी आपल्याकडे चालून येऊ शकतात किंवा अशा संधीची निर्मिती स्वत:लाही करता येते. मात्र आपलं नाणं खणखणित वाजलं पाहिजे. ते वाजण्याची क्षमता आहे की नाही हे ज्याला स्पष्टपणे कळतं, त्याला मागे वळून बघावं लागत नाही.

चेन्नईच्या, लायदरन नादस्वरत याची कथा या अनुषंगाने प्रेरणादायी आहे. तो आठ वर्षाचा होईपर्यंत त्याला पियानो वाजवायला खूप आवडू लागलं. मोझार्ट आणि चॉपिन या महान संगीतकाराचं संगीत पियोनोवर तो वाजवू लागला. तेव्हा, लायदरनमध्ये काहीतरी खास असल्याचं त्याच्या बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याला कानमंत्र दिला,शाळेतील गृहपाठात गुंतून राहण्याऐवजी तुझ्या ह्रदयाला जे भिडतं त्यात गुंतून राहा.बाबांचा असा ठोस पाठिंबा मिळाल्यावर लायदरनने रात्रंदिवस पियानोचे धडे गिरवण्यात स्व:ताला झोकून दिलं. या अथक परिश्रमाचं फळ म्हणून दहा वर्षाचा असताना लायदरनने, ट्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिकची, “श्रेणी ८ ही परीक्षा उत्तीर्ण केली. १३ वर्षाचा असताना त्याला, “सीबीएस शो या कार्यक्रमात, “द वर्ल्ड्स बेस्ट“, हा एक मिलियन डॉलरचा पुरस्कार मिळाला.

आता पियानो हाच लायदरनचा ध्यास आणि श्वास बनला. अथक सरावामुळे पियोनोवरील बटनांवर त्याची बोटं फुलपाखरासारखी हलकेच पण गतिनं फिरु लागली. ही गती इतकी शक्य झाली की, १७ व्या वर्षी त्याने, “फ्लाइट ऑफ बंबल बी, हे गाणं सादर करताना एका मिनिटास ३२५ बिट्स  वाजवले. हे बघून अनेक संगीतप्रेमी थक्क झाले. एकदा त्याला “एलेन डीजेनेरेस शोमध्ये कलाकृती सादर करण्याची संधी मिळाली. “एलेन डीजेनेरेस शो“, हा जगातील अतिशय महत्वाचा कार्यक्रम. इथे भल्याभल्यांना संधी मिळत नाही. मोठे कलावंतही इथे आपली कला सादर करताना बरेचदा तणावाखाली येतात. पण लायदरनचं काही तसं झालं नाही.

ज्येष्ठ संगीतकार इलय्याराजा यांनी मूळ गीटारसाठी तयार केलेली शास्त्रीय संगीताची अतिशय व्यामिश्र धून एका कार्यक्रमात लायदरनने पियानोवर वाजवली. ते बघून इलय्याराजा थक्क झाले. ते म्हणाले, “गेल्या चाळीस वर्षात ही अतिशय व्यामिश्र आणि कठीण सुरावट कुणीतरी पहिल्यांदा पियानोवर वाजवली.

महान संगीतकार ए.आर रहमान त्याच्यावर बेहद्द खूश आहेत. ते लायदरनला सतत मार्गदर्शन करतात. संगीतात नवे नवे प्रयोग करण्याची प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी लायदरनचं वर्णन, “भारताचा संगीत सदिच्छा (म्युझिक ॲम्बॅसॅडर ऑफ इंडिया)” असा केलाय. 

लायदरेन म्हणतो, ” शाळेतील पुस्तकाचे धडे मी गिरवले नसतीलही पण पियानोचे धडे मात्र मी मनापासून गिरवले. त्यात माझा आनंद शोधला नि हा आनंद अधिकाधिक मिळत राहावा म्हणून हे धडे गिरवण्यासाठी अखंड झोकूनही दिले. परिश्रम कराल तरच तुम्हाला परफेक्शन प्राप्त होईल. जिथे परफेक्शन तिथे, यश हमखास, हे काही नव्यानं सांगायला नको.

लायदरनच्या कथेचं तात्पर्य असं की, तुमच्यात काहीतरी खास असल्याची पक्की जाणीव झाली असेल तर, त्या मार्गाचा स्वीकार करा. अशा वेगळ्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या मुला/मुलींना पालकांनी मनापासून पाठिंबा द्यायला हवा. अशा मार्गावरुन पुढे निघालेल्या मुला/मुलीने मग अथक परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे सूत्र कायम लक्षात ठेवावे.

०००

आपल्या अंगभूत कलेची जाणीव झालेल्या विद्यार्थ्यांनी सैध्दांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी काही अभ्यासक्रम करायला हवेत. असे काही अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था पुढील प्रमाणे आहेत-

(१) आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय,मुंबई-

भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रितर्थ्य महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार या महाविद्यालयाची पायाभरणी दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी झाली. शासनाने पुढील अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरुपात प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला अकादमीमध्ये सुरु केले आहेत. संगीत क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या प्रतिभावंतांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी एक वर्षाचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर शासनाचं प्रमाणपत्र दिलं जाईल. प्रवेश संख्या – प्रत्येकी २५

(१) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, (२) भारतीय बासरी वादन, (३) तबला वादन, (४) सतार वादन, (५) पियानो/ कीबोर्ड, (६) संगीत निर्मिती, (७) ध्वनी अभियांत्रिकी ,(८) भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-  सहा महिने, प्रवेश संख्या – ५०.

संगीत क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ कलावंत, गुरु आणि तज्ज्ञांना अध्यापनासाठी बोलावण्यात येईल.

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड ऑडिशन (अभियोग्यता) चाचणी नंतर केली जाईल. संबंधित विषयाचे किमान ज्ञान, आवड, कौशल्य, गती या बाबींचा  चाचणीत समावेश असेल.

संपर्क– दुसरा मजला, पु.ल.देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्यमंदीर, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५, संकेतस्थळ-www.doa.maharashtra.gov.in ईमेल- bldmsm@gmail.com

०००

(२) मुंबई विद्यापीठ

या विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ म्युझिकमध्ये संगीत  विषयक पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.

(१) बॅचलर ऑफ म्युझिक (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत- कंठ/ सतार/ तबला)- कालावधी तीन वर्षे. अर्हता- १२ वीमध्ये संगीत विषयाचा अभ्यास केलेला असावा आणि ऑडिशन किंवा कोणत्याही विषयातील १२ वी आणि ३ वर्षे कालावधीचा संगीत विषयातील पदविका किंवा समकक्ष प्रमाणपत्र. उदा – मध्यमा पूर्ण आणि ऑडिशन  किंवा मुंबई विद्यापीठाचा ३ वर्षे कालावधीचा संगीत पदविका अभ्यासक्रम आणि ऑडिशन. ज्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमात ७० टक्के गुण मिळाले असतील त्यांना ऑडिशन देण्याची गरज नाही.

मास्टर इन म्युझिक– हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत- अर्हता- बी.ए ऑनर्स, बॅचलर ऑफ म्युझिक किंवा बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक आणि ऑडिशन किंवा बीए/ बीकॉम/ बीएस्सी/ कोणतीही पदवी आणि संगीत विशारद/ संगीत प्रभाकर /संगीत वीद यासारखी पदविका आणि ऑडिशन किंवा मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ म्युझिक ही पदवी आणि ऑडिशन. या पदवीमध्ये ७० टक्के गुण मिळाले असल्यास ऑडिशन देण्याची गरज नाही.

पदविका अभ्यासक्रम

(१) प्रि डिप्लोमा फाऊंडेशन कोर्स इन हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत, कालावधी एक वर्षं, (२) डिप्लोमा कोर्स इन हिंदुस्थानी शास्त्रीय  कंठ/ सुगम संगीत/ सतार/ तबला/ हार्मोनियम. कालावधी- दोन वर्षे,

(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्ले बॅक सिंगिंग ॲण्ड स्टेज परफॉर्मन्स

प्रमाण पत्र अभ्यासकम

(१) स‍‍र्टिफिकेट कोर्स इन साउंड रिकॉ‍र्डिंग ॲण्ड रिप्रॉडक्शन कोर्स, कालावधी- सहा महिने

(२) स‍‍र्टिफिकेट कोर्स इन म्युझिक कंपोझिशन ॲण्ड डायरेक्शन, कालावधी- चार महिने

संपर्क- डिपार्टमेंट ऑफ म्युझिक, दुसरा माळा, सांस्कृतिक भवन, युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या उत्तर दरवाज्याच्या विरुध्द दिशेला, हंसभुर्गा रोड, सांताक्रुज पूर्व, मुंबई- ४०००५५, ईमेल- udmusic01@gmail.com, संकेतस्थळ- https://mu.ac.in/department-of-music.

संगीत क्षेत्रात नाव कमावलेले श्रीमती उत्तरा केळकर, अभिजित सावंत, सत्यजित तळवलकर, डॉ.मिलिंद मालसे, पिनाज मसानी, डॉ.मनीषा कुलकर्णी, धनश्री पंडित रॉय आदी मान्यवर या विभागाचे विद्यार्थी राहिले आहेत.

०००

(३) माया सोमय्या स्कूल ऑफ म्युझिक ॲण्ड परफॉर्मिंग आर्ट –

बॅचलर  ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन (१) स्वरवाद्य, (२) कंठ संगीत, (३) तालवाद्य. कालावधी- चार वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण आणि गंधर्व महाविद्यालय, प्रयाग संगीत समिती सारख्या संस्थेची संगीत परीक्षा उत्तीर्ण. विद्यार्थ्यांची निवड ऑडिशनव्दारे केली जाईल.

सर्टिफिकेट कोर्स इन (१) म्युझिक ॲप्रिशिएशन ॲण्ड जर्न्यालिझिम, कालावधी- १५ आठवडे, (२) म्युझिक कंपोझिशन ॲण्ड डायरेक्शन. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हे अभ्यासक्रम करता येतात. मुलाखतीव्दारे निवड केली जाते. कालावधी- १५ आठवडे.

मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन (१) स्वरवाद्य, (२) कंठ संगीत, हा अभ्यासक्रमही करता येतो.

संपर्क- संकेतस्थळ https://mssmpa.somaiya.edu ईमेल- admissons@somaiya.edu

सुरेश वांदिले

०००