(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बारावी अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होतो न होतो, तोच   ऑक्टोबरपासून देशस्तरीय विविध शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजू लागते. आपल्याकडे (काही अपवाद वगळता), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ) आणि वैद्यकीय शाखांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) या दोन परीक्षांविषयी महाजागृती असते आणि यावरच महाचर्चाही होत राहते. यामध्ये आता फारतर, नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एनडीए) परीक्षेचा समावेश करता येईल. बहुतेक सगळ्यांना डॉक्टर आणि इंजिनीअरच व्हायचं असल्यानं, जेइइ आणि नीटची अशी महाचर्चा होणं स्वाभाविक आहे. मात्र, यामुळे होतं काय की, विविध शाखांच्या शिक्षण देणाऱ्या ज्या देशस्तरीय नामांकित संस्था आहेत, त्यांच्या प्रवेश प्रकियेकडे एकतर फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा नंतर बघू, असा विचार केला जातो. त्‍यामुळे अशा चाळणी परीक्षांना बसणाऱ्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या महाराष्ट्रीय किंवा मराठी मुलांची संख्या समाधानकारक नसते. आपल्याकडे सातत्याने आयएएस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेव्ह सर्व्हिस) मध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, वाढला पाहिजे असं सतत बोललं जातं, मात्र देशस्तरीय राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्येही मराठी मुलांचा टक्का वाढला पाहिजे, यावर अजिबातच चर्चा होत नाही.

यंदा वेगवेगळ्या शाखेत असणाऱ्या बारावितील मुला/ मुलींनी, पालकांनी आणि संबंधित शाळेच्या शिक्षकांनीसुध्दा देशस्तरीय चाळणी परीक्षांचा विचार करायला हवा. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या संस्थेची जाहिरात बहुतेक सगळ्याच महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये येते. त्यानंतर या जाहिराती काही दिवस किंवा आठवड्याच्या अंतरांनी येत राहतात. साधारणत: जानेवारी अखेर पर्यंत अर्ज भरण्याची अखेरची मुदत असते. इतक्या लवकर ही प्रक्रिया सुरु होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या परीक्षांचं संबंध देशात सुव्यवस्थितपणे आयोजन करता येणं शक्य व्हावं, हे असतं. शिवाय निकाल वेळेवर लावून मुलाखत किंवा कलचाचणी असे सोपस्कारही शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी म्हणजे जून किंवा जुलै अखेरपर्यंत पूर्ण करायचे असतात.

देशस्तरीय शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळाला तर पुढे करिअरच्या बाबत फार गोंधळ राहत नाही. उच्च प्रतिचं शिक्षण, प्रात्यक्षिकांवर भर, इंटर्नशीपची सुविधा आणि प्लेसमेंटसाठी साहाय्य यासारख्या कारणांमुळे करिअरची गाडी योग्य दिशेला लागते. अशा काही संस्था व त्यातील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती पुढील प्रमाणे-

(१) अंडर ग्रज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन (यूसीड) – मुंबई आयआयटी मधील, स्कूल ऑफ डिझाइन मधील बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. १२ वीच्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते. या परीक्षेचे गुण आयआयटी दिल्ली, आयआयटी रुरकी, आयआयटी हैदराबाद आणि गौहाटीच्या अंतर्गत येणाऱ्या स्कूल ऑफ डिझाइन, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वीकारतात. संपर्क-https://www.uceed.iitb.ac.in/2024/

(२) डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (डॅट)- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन मधील, बॅचलर इन डिझाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क-https://admissions.nid.edu

(३) एनआयएफटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या  बॅचलर ऑफ डिझाइन इन (१) फॅशन डिझाइन, (२) नीटवेअर डिझाइन, (३) ॲक्सेसरी  डिझाइन, (४)  लेदर डिझाइन, (५)  टेक्स्टाइल डिझाइन, (६) फॅशन कम्युनिकेशन आणि (७) बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (बीएफटी), अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. बीएफटी हा अभ्यासक्रम वगळून इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. बीएफटी या अभ्यासक्राला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीत गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. संपर्क-https://nift.ac.in/admission

(४) जाइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन (जेइइ)- नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत, बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेव्दारे केंद्र व राज्य शासनाच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश दिला जातो. अर्हता -कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क- https://nchm.gov.in/

(५) ॲडमिशन एन्ट्रन्स टेस्ट (आयएटी) – ही परीक्षा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल या संस्थेच्या बीबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाते. संपर्क- https://www.iittm.ac.in/

(६) ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट (एआयएसटी)- फूटवेअर डिझाइन अॅण्‍ड डेव्हलपमेंट या संस्थेच्‍या बॅचलर ऑफ डिझाइन इन (१) फुटेवअर डिझाइन ॲण्ड प्रॉडक्शन, (२) लेदर, प्रॉडक्ट ॲण्ड लाइफस्टाइल डिझाइन,  (३) फॅशन डिझाइन आणि (४) बीबीए इन रिटेल ॲण्ड फॅशन मर्कंडायजिंग, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क-  https://fddiadmissions.qualcampus.com/

(७) कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (क्लॅट) – देशातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क- https://consortiumofnlus.ac.in/clat-2024/

(८) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन-अंडर ग्रॅज्युएट (सीयुइटी-युजी) – देशातील केंद्रिय विद्यापीठातील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. याशिवाय या परीक्षेतील गुणांचा आधार राज्यस्तरीय विद्यापीठे, स्वायत्त संस्था, खाजगी विद्यापीठे, डीम्ड युनिव्हर्सिटी, प्रवेशासाठी घेतात. संपर्क https://exams.nta.ac.in/CUET-UG/

(९) इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी – कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (आयएमयू- सीइटी)-इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मार्फत चालवण्यात येणाऱ्या (१) बीएस्सी – नॉटिकल सायंस, (२) बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, (३) बीटेक – नॅव्हॅल आर्किटेक्चर ॲण्ड शिप बिल्डिंग, (४) बीटेक-नॅव्हॅल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग, (५) बीएस्सी इन शिप बिल्डिंग ॲण्ड रिपेअर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. अर्हता- १२ वी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेले असावेत. https://www.imu.edu.in/

(१०) आयसर ॲप्टिट्ड टेस्ट (आएटी)- इंडियन  इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या संस्थेच्या, पुणे, भोपाळ, थिरुवंतपूरम, तिरुपती, कोलकता, बेहरामपूर  आणि मोहाली या कॅम्पसमधील बीएस -एमएस, या पाच वर्षे कालावधीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. हा अभ्यासक्रम संशोधन कार्यास प्राधान्य देणारा आहे. संपर्क- https://iiseradmission.in/

(११) नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (नेस्ट)-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायंस ॲण्ड एज्युकेशन भुवनेश्वर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई-डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंस (युएम-डीएइ-सीइबीएस) येथील इंटिग्रेटेड एम.एस्सी  या पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. या दोन्ही संस्थांची स्थापना भारत सरकारच्या ॲटोमिक एनर्जी विभागाने केली आहे. येथे संशोधनकार्यावर भर दिला जातो. अर्हता-भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र घेऊन १२वी उत्तीर्ण.

संपर्क- https://nestexam.in/

(१२) इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (आयपीएम-मॅट)- इंडियन इंस्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट इंदौरच्या, पाच वर्षे कालावधीच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. या परीक्षेतील गुणांचा अधार आयआयएम रांची मार्फत चालवण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रमासाठी घेतला जातो. संपर्क- https://www.iimidr.ac.in/

(१३) जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (जिपमॅट)- आयआयएम बोधगया आणि जम्मू येथील इंटिग्रेटेड एमबीए प्रवेशासाठी ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एंजसी मार्फत घेतली जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क- https://exams.nta.ac.in/JIPMAT/

(१३) इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट- ॲडमिशन टेस्ट (आयएसआय- आयटी)- या संस्थेतील, (१) बीएस्सी ऑनर्स इन मॅथेमॅटिक्स, (२) बीएस्सी ऑनर्स इन स्टॅटिस्टिक्स आणि (३) बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा सायंस (ऑनर्स) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. अर्हता-१२ वीमध्ये गणित/ स्टॅटिस्टिक्स आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा. संपर्क-https://www.isical.ac.in/

(१४) कॉमन एंट्रन्स एक्झामिनेश (सीइइ)- ही परीक्षा नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग संस्थेच्या अंतर्गत कार्यरत विभागीय ‍शिक्षण संस्थांतील इंटिग्रेटेड बीएस्सी-बीएड, बीए-बीएड आणि एम.एस्सी -बीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. https://cee.ncert.gov.in/