(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट, ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम  व उत्तम करिअर घडवण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन, हा महत्वाचा अभ्यासक्रम आहे. तो जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात येण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षात प्रगत शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. अशा विद्यार्थ्यांना ऑनर्स ही पदवी दिली जाते.

उत्तम दर्जाच्या आतिथ्य सेवेची गरज पंचतारांकित हॉटेल्स, निवासगृहे, रिसॉर्टस, अतिथीगृह आदी  भागवत असतात. उत्तम निवासासोबतच उत्कृष्ट खानपानालाही प्राथमिकता दिली जाते. याबाबींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. ही गरज भागवण्याचे काम, नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट या संस्थेच्या पदवी,पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाने केलं आहे. आतापावेतो या संस्थेने दीड लाखाच्या आसपास उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. यातील बहुतेक उमेदवार देश-विदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रातही या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे.

करिअर संधी

बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम केल्यावर हॉटेल आणि तत्सम व्यवसायामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात होते. उमेदवाराची आवड आणि तज्ज्ञता लक्षात घेऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये () फ्रंट ऑफिस, () फूड प्रॉडक्शन, () फूड ॲण्ड बिव्हरेजेस सर्व्हिस याक्षेत्रातही संधी मिळू शकते. याशिवाय ही पदवी प्राप्त उमेदवारांना () टूर मॅनेजर, () रिटेल मॅनेजर, () ह्युमन रिसोर्स ऑफिसर, () कस्टमर सर्व्हिस मॅनेजर अशा संधीसुध्दा मिळू शकतात.

 निवड प्रकिया

 या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट ७५ संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यामध्ये २१ संस्था या केंद्रीय अर्थसहाय्यित आहेत. २८ राज्य सरकारांच्या अखत्यारित आहेत, १ सार्वजनिक क्षेत्रातील आहे आणि २५ खाजगी संस्था आहेत. देशातील विविध भागात असणाऱ्या ९ फूड क्रॉफ्ट संस्था, हॉटेल उद्योगातील वेगवेगळया कार्यासाठी आवश्यक असणारे स्पेशलाइज्ड डिप्लोमा अभ्यासक्रम चालवतात. तिथेसुध्दा या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. ११ हजारपेक्षा अधिक जागा या परीक्षेद्वारे भरल्या जातात. (महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या मुंबई स्थित इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेत ४५६ आणि सेंट फ्रँसिस इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या खाजगी संस्थेत ६० जागा आहेत.)

काय शिकाल?

    () अन्नपदार्थ निर्मिती, () अन्नपदार्थ व पेये सेवा, () हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस सेवा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र, कौशल्य आणि प्रशिक्षण. () हॉटेल व्यवसायाशी संबंधित लेखाविषयक बाबी (अकाउंटन्सी), () अन्नसुरक्षा व गुणवत्ता व दर्जा नियंत्रण, () मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, () पर्यटन विपणन व व्यवस्थापन आणि व्युहात्मक व्यवस्थापकीय कौशल्य (८) उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या पर्यवेक्षकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता याव्यात यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

अशी  असते परीक्षा

 या परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ट व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात – (१) इंग्रजी भाषा (६० गुण), (२) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३० गुण), (३) सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), (४) संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (३० गुण), (५) कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता (३० गुण), एकूण गुण २००. एका प्रश्नाच्या अचुक उत्तराला एक गुण दिला जातो. पेपरचा कालावधी- तीन तास. प्रश्न पत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असते. त्यामुळे प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नसेल तर हिंदीत वाचून अर्थ काढता येतो. त्याचा फायदा  सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल, याविषयाचे प्रश्न सोडवताना होऊ शकतो. दरवर्षी ही परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देशातील १०९ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे,कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई/नवी मुंबई शहरांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित केला जातो.

  अर्हता- या अभ्यासक्रमास कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. मात्र या उमेदवाराने १२ वीला इंग्रजी विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमास जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने मान्यता प्रदान केली आहे.याच विद्यापीठामार्फत पदवी प्रदान केली जाते.

अर्थसाहाय्य

 केंद्रीय संस्थांमध्ये मेरिट कम मिन्स ही योजना लागू असून त्याअंतर्गत प्रत्येक सत्रातील शुल्काची ५० टक्के  रक्कम परत दिली जाते. प्रत्येक वर्षातील दोन्ही सत्र समाप्तीनंतर होणाऱ्या अखिल भारतीय वार्षिक परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाच्या उमेदवारांना हॉटेल उद्योजकांच्या सहकार्याने गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या राज्यातील शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती मिळू शकते.

शिष्यवृत्ती– या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मेरिटवर आधारित शिष्यवृत्ती  दिली जाते. अखिल भारतीय स्तरावरची ही शिष्यवृत्ती असून प्रत्येक सत्राच्या गुणांवर आधारित पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ती दिली जाते. संस्थेत प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

संपर्क 

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, ए- ३४, सेक्टर ६२, नॉयडा-२०१३०९, दूरध्वनी-०१२०-२५९०६०३, फॅक्स-२५९६०८, ईमेल-jeenchm@gmail.com, संकेतस्थळ-www.nchm.nic.in आणि ईमेल-nchm@nta.ac.in, संकेतस्थळ- www.nchmjee.nta.nic.in

०००

मुंबईतील संस्था

मुंबईतील हॉटेल मॅनेजमेट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या या संस्थेची १९५४ साली स्थापना करण्यात आली. ही आपल्या देशातील आघाडीची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत (१) बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन, (२) एमएस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन, (३) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन, (३) डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस, (४) डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी, (५) डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस, (६) डिप्लोमा इन ऑफिस किपिंग , हे अभ्यासक्रम करता येतात.

सर्व पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दीड वर्षे. या अभ्यासक्रमांना, नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट या संस्थेची संलग्नता मिळाली आहे.

अहर्ता- सर्व पदविका अभ्यासक्रमांना कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी संस्थेमार्फत १२ वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादितील क्रमांक आणि  मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमामध्ये या उमेदवारांनी १२ वीमध्ये इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

०००

डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन- 

काय शिकाल?

पोषण मूल्ये, खाद्य पदार्थांचे मूल्य/किमती, स्वयंपाकशास्त्र, अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, आरोग्यदायक काळजी, वस्तू आणि पदार्थ या विषयघटकांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात वाणिज्यिक (कमर्शिअल) स्वरुपाच्या अन्न पदार्थांच्या पाककृती निर्मितीचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये सर्वप्रकारच्या भारतीय , चायनिज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय वेगवेगळया प्रकारच्या भाज्या, आणि मांस कापणे, फळे आणि भाज्या सजवून त्या ग्राहकांना देण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचा सराव केला जातो. कोठार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. 

पहिल्या ३६ आठवड्यात सैध्दांतिक बाबी शिकवल्या जातात. त्यानंतर २४ आठवड्यांमध्ये वेगळया कंपन्या/औद्योगिक घटक यामध्ये प्रात्यक्षिक करावे लागते.

करिअर संधी

हा अभ्याक्रम केलेल्या उमेदवारांना हॉटेल रेस्टॉरेंट,फास्ट फूड आऊटलेट, रिसॉर्ट, रेल्वे खानपान सेवा, एअरलाइन्स खानपान सेवा, जलवाहतूक खानपान सेवा आणि तत्सम क्षेत्रे  या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते.

संपर्क – इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) – मुंबई-४०००२८, दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१, ईमेल-info@ihmctan.edu, संकेतस्थळ – ihmctan.edu,

सुरेश वांदिले