इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना विज्ञान विषयातील संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली असली तरी आयसर भोपाळ येथील डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजमार्फत, बॅचलर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक सायन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. गणितात गती आणि आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम करावा असे अपेक्षित आहे.
अर्थशास्त्रात संशोधनात्मक करिअर करण्याच्या अनुंषगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी आणि शासकीय संस्थांमध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून करिअरच्या संधी मिळाल्या आहेत. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची इच्छा असल्यास आणखी एक वर्षं अभ्यास करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर त्याला, बीएस-एमएस ही पदवी प्रदान केली जाते.
अर्हता- १२वी विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
वेगळे अभ्यासक्रम
केवळ याच आयसरमध्ये (१) केमिकल इंजिनीअरिंग, (२) डेटा सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (३) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स या तीन अभियांत्रिकी विषयांमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस) हे अभ्यासक्रम करता येतात. अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.
अर्हता- १२वी विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
संशोधनाची संधी
(१) आयसर भोपाळच्या इकॉनॉमिक सायंसेस या विभागामार्फत अर्थशास्त्रात पीएचडी करण्याचीही सुविधा आहे. सध्याच्या काळातील अर्थविषयक महत्वाच्या विषयांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये (१) मायक्रोइकॉनॉमिक्स, (२) गेम थिअरी, (३) ट्रेड थिअरी, (४) इंडस्ट्रिअल ऑर्गनायझेशन, (५) पब्लिक इकॉनॉमिक्स, (६) सोशल चॉइस थिअरी, (७) कॉर्पोरेट फायनांस, (८) ऑप्शन प्रायसिंग, (९) बिहेव्हिरिअल इकॉनॉमिक्स, (९) ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, (१०) एनव्हिरॉन्मेंटल इकॉनॉमिक्स या सारख्या विषयांचा समावेश आहे.
(२) मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र विभागात इंग्रजी साहित्य, भाषाशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांमध्ये पीएचडी करण्याची सुविधा आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संस्थेमार्फत एक तासाची चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते.
संशोधनासाठी घ्यावयाच्या विषयघटकांच्या अनुषंगाने विद्यार्थ्याची विश्लेषणात्मक लेखन कौशल्याची चाचपणी केली लेखी परीक्षेव्दारे केली जाते. प्रवेश प्रकिया वर्षातून दोनदा राबवली जाते. (संपर्क-admission.hssphd@iiserb.ac.in)
संपर्क- भोपाळ बायपास रोड, भौरी, भोपाळ-४६२०६६, vbakshi@iiserb.ac.in
००००
इंटिग्रेटेड इंटरडिस्लिपनरी अभ्यासक्रम
आयसर थिरुवनंतपूर येथे इंटिग्रेटेड इंटरडिस्लिपनरी- बी.एस-एम.एस, अभ्यासक्रम करता येतात. या प्रकारातील अभ्यासक्रम केवळ याच ठिकाणी चालवले जातात.
हे अभ्यासक्रम (१) बायोलॉजिकल सायन्स, (२) केमिकल सायन्स, (३) डेटा सायन्स, (३) मॅथेमॅटिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स या विषयांमध्ये करता येतात.
या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षांचा आहे. पहिली दोन वर्षे सर्वांसाठी समान फाउंडेशन अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या किंवा गती असलेल्या उपरोक्त पाचपैकी कोणत्याही एका विषयाची निवड करु शकतो. हे अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय आहेत. यामध्ये मुख्य विषयासोबत संबधित विषयाशी निगडित स्पेशलाइज्ड विषय घटक विद्यार्थ्यांना शिकता येतात. उदा- (१) बॉयलॉजिकल सायन्समध्ये सिस्टिम्स ॲण्ड सिंथेटिक बॉयलॉजी आणि प्रिसिजन इमेजिंग ॲण्ड मेडिसीन, (२) केमिकल सायन्समध्ये केमिकल बॉयलॉजी ॲण्ड बायोमटेरिअल्स, (३) डेटा सायन्स शाखेमध्ये नैसर्गिक शास्त्राशी निगडित डेटा तंत्र- कौशल्य-शास्त्र, (४) मॅथेमॅटिकल सायन्समध्ये मॅथेमॅटिकल मॉडेलिंग आणि सायंटिफिक कॉम्प्युटिंग, (५) फिजिकल सायन्समध्ये मटेरिअल डिव्हाइस आणि एनर्जी ॲण्ड मॉडेलिंग यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना एक वर्षं कालावधीच्या संशोधन प्रकल्पावर काम करावे लागते. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना देशातील संशोधन संस्था, औद्योगिक संस्था किंवा शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विभागात इंटर्नशीप करावी लागते. अंतिम वर्षातील संशोधन प्रकल्प राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा/ संस्थांमध्ये व त्यांच्या सहकार्याने करावे लागतात. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संवाद संप्रेषण (सायंटिफिक कम्युनिकेशन), बौध्दिक संपदा अधिकार (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स), उद्योजकता, व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र आणि नैतिक मूल्ये अशा विषय घटकांचे ज्ञान प्रदान करुन त्यांना सध्यकालीन सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम केले जाते. प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येकी ८० वद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
अर्हता- भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह १२वी विज्ञान शाखेत किमान ६० टक्के गुण आवश्यक.
संपर्क- मरुथामाला, पोस्ट ऑफिस, विथुरा, थिरुवनंतपुरम-६९५५५५१, दूरध्वनी- ०४७१-२७७८००९, ईमेल- isqare@iisertvm.ac.in, संकेतस्थळ- iisertvm.ac.in
०००००००००००
बीएस – एमएस अभ्यासक्रम
वेगवेगळया आयसरमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात-(१) पुणे – बॉयलॉजी, केमिस्ट्री, अर्थ ॲण्ड क्लायमेट सायंसेस, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स. (२) मोहाली- बॉयॉलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्स, (३) कोलकता- बॉयॉलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, अर्थ सायन्स, मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स, फिजिकल सायन्स, (४) बेहरामपूर- बॉयॉलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्स, (५) तिरुपती – सायन्स, (६) भोपाळ- बॉयॉलॉजिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स, अर्थ ॲण्ड एनव्हीरॉन्मेंट सायन्स, (७) थिरुवनंतरपुरम – बॉयॉलॉजिकल सायन्स, फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स
पीएचडी अभ्यासक्रम
सर्व आयसरमध्ये बॉयलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स,फिजिकल सायन्स आणि मॅथेमॅटिकल सायन्स या विषयांमध्ये इंटिग्रेड पीएचडी आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. इंटिग्रेटेड पीएचडी या अभ्यासक्रमाला बी.एस्सी, बी.ई , बी.टेक पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर एम.एस्सी-पीचडी ही पदवी प्रदान केली जाते. एमएस्सी, अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रम करता येतो. कालावधी दोन वर्षे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात उत्तम प्रतिचे करिअर करता येणे सुलभ जाते.
इंटिग्रेटेड पीएचडी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पोस्ट डॉक्टरोल म्हणजे पीएचडी नंतरचे संशोधन करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट
आयसर भोपाळ आणि थिरुवनंतपुर सह सर्व आयसर मधील बीएस- एमएस आणि बीएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते.
या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग (एनसीइआरटी) च्या ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. २०२३ आणि २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेले आणि मार्च/एप्रिल २०२५ मध्ये १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा देणारे विद्यार्थी आयसर ॲप्टिट्यूड टेस्टला बसू शकतात.
ही परीक्षा ऑनलाइन आहे. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी, संस्थेच्या संकेतस्थळावर मॉक टेस्ट उपलब्ध करुन देण्यात येते. मागील वर्षाचे पेपर सरावासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जातात. या ॲप्टिट्यूड टेस्टला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांसह जीवशास्त्र आणि गणित या दोनपैकी एका विषयाचा अभ्यास केलेला असावा. ॲप्टिट्यूड टेस्ट मध्ये भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या चारही विषयांवर समान गुणांचे प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतो.
महाराष्ट्रात ही परीक्षा अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नासिक, नवी मुंबई आणि पुणे येथे घेतली जाते.
आयसरची प्रवेश प्रकिया एकत्रितरीत्या राबवली जाते. उमेदवारांना हवी असलेली आयसर मिळण्यासाठी उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा उपलब्ध जागा आणि उमेदवारांनी दिलेल्या पर्यायांनुसार जागा भरल्या जातात.
संपर्क- https://iiseradmission.in/
सुरेश वांदिले