(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया – भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही एक महत्वाची संस्था आहे. कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील शिक्षण- प्रशिक्षण देणारी व नियमन करणारी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे.

1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेने कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज सातत्याने भागवली आहे. आतापावेतो या संस्थेतून 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. संस्थेचे चार विभागीय केंद्रे (काउंसिल्स) आहेत. परदेशात 10  केंद्रे कार्यरत आहेत.

संस्थेचे अभ्यासक्रम

सीएमए (कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटन्ट) फाउंडेशन कोर्स –  अर्हता – 12 वी उत्तीर्ण. इंटरमिजिएट अभ्यासक्रम – अर्हता – (1) सीएमए फाउंडेशन अभ्यासक्रमक उत्तीर्ण, (2) कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. (3) कोणत्याही शाखेतील अभियंते.

अभ्यासक्रम करण्याचे फायदे – (1) सध्याच्या औद्योगिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. (2) विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम आणि औद्योगिक जगताला उपयुक्त ठरतील असे सीएमए विद्यार्थी, असे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय आहे. (3) संगणकीय आणि व्यक्तित्व विकासाला उपुयक्त ठरणाऱ्या विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. (4) व्यवस्थापन, व्युहनीती, नियामक कार्यप्रणाली आणि वित्तीय अहवाल तयार करणे, या चार मुख्य घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. (5) औद्योगिक जगतास आवश्यक असणाऱ्या प्रात्यक्षिकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

प्रवेश प्रकिया –  फाउंडेशन आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमाला वर्षभर प्रवेश दिला जातो. मात्र ज्या विद्यार्थ्यांना जून महिन्यातील सत्रासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी 31 जानेवारीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबर सत्रासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी 31 जुलैपूर्वी प्रवेश घेणे आवश्यक आहे. अर्ज पोस्टाने पाठवता येतो.

काय शिकाल ?

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय निर्णय प्रकिया, अर्थसंकल्पीय स्थैर्य, प्रभावी कार्यान्वयन आणि निर्मिती सेवा व्यवस्थापनाचे मूल्यांकन, नफ्यातील तफावतीची कारणे आणि जबाबदार घटकांचा शोध घेणे याबाबींचे ज्ञान प्रदान केले जाते.

सीएमएच्या जबाबदाऱ्या

व्यवस्थापकीय माहिती व नियंत्रण यंत्रणेचा सुयोग्य आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, मूल्य/किंमतीच्या प्रकिया आणि पध्दतीचे नियोजन करणे, गणितीय आराखड्याचा उपयोग करुन (वस्तू/ उपकरणे/ उत्पादने/ इतर साहित्य यांच्या) यादीचे नियंत्रण करणे, गुंतवणूक विश्लेषण करणे, प्रकल्प व्यवस्थापन आराखडा तयार करणे, अंतर्गत लेखा परीक्षण करणे, किंमतीविषयक लेखापरीक्षण करणे, आजारी उद्योगांच्या कारणांचा शोध घेणे, किमतीचे नियोजन करणे, व्यावसायिक माहिती व सांख्यिकी बाबींचे एकत्रिकरण करुन त्यांचा अर्थ लावणे व त्याचा उपयोग अचुक व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी करणे, या जबाबदाऱ्या सीएमएला पार पाडाव्या लागतात.

उत्पादनांच्या किंमती व व्यवस्थापकीय लेखा परीक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, त्याविषयीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे, मूल्य/किंमत आणि व्यवस्थापकीय लेखापरीक्षणाबाबतची साक्षरता वाढवणे, राष्ट्रीय गरजांनुसार  तरुणांमध्ये रोजगारक्षम कौशल्यांची निर्मिती करणे, हरीत आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी साहाय्य करणे, शास्वत आणि सर्वसमावेशक विकास प्रक्रियेत सहभाग देऊन अर्थव्यवस्थेच्या वृध्दीसाठी सहकार्य करणे या बाबींची अपेक्षा सीएमएकडून केली जाते.

कॉस्ट अकांउंटन्टची गरज

सध्याच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येक उद्योगाला कॉस्ट अकांउंटन्टची गरज आहे. कारण या मनुष्यबळाकडे व्यावसायिक व्युहनीती आणि मूल्य निर्धारणाचे कौशल्य व विशेष ज्ञान असते. कॉस्ट अकाउंटन्टच्या ज्ञान व कौशल्यावर उद्योगाची उभारणी सक्षमरीत्या होत असल्याचे समजले जाते. या संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे संबंधित उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास होतो. सीएमए हे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार व घडामोडितील महत्वाचा घटक असतात. ते मूल्य निर्धारण करतात, मूल्याची उपयुक्तता वाढवतात, मूल्यांचे परिरक्षण करतात आणि मूल्यांचे अहवाल सादर करतात.

करिअर संधी

सीएमए  यांना शासकीय आस्थापना, खाजगी आस्थापना, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र विकास संस्था, शिक्षण – प्रशिक्षण आणि  संशोधन क्षेत्र  यामध्ये मोठी मागणी आहे. या मुनष्यबळाकडे असणाऱ्या स्पेशलाइज्ड ज्ञानामुळे बऱ्याच खाजगी आणि काही सार्वजनिक आस्थापनांमध्ये चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, फायनांस डायरेक्टर, फायनांशिअल कंट्रोलर, चिफ फायनांशिअल ऑफिसर, कॉस्ट कंट्रोलर, मार्केटिंग मॅनेजर, चिफ इंटरनल ऑडिटर अशा सारख्या महत्वाच्या पदांवर नियुक्तीची संधी मिळू शकते. त्यामुळे आपल्या देशात आणि परदेशातील वेगवेगळया उद्योग व व्यवसाय व शासकीय आस्थापनांमध्ये तज्ज्ञ, प्रशिक्षित आणि अनुभवी सीएमए मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर सीएमए व्यावसायिकदृष्ट्या सर्वोच्च स्थानी पोहचू शकतात. बऱ्याच सीएमएंनी स्वत:चा व्यवसाय वा उद्योग सुरु केला असून ज्ञानाच्या बळावर ते त्यात यशस्वी झाले आहेत. अनेक सीएमए हे मूल्याच्या बाबात सल्ला-सेवा देण्यात तज्ज्ञ झाले आहेत. बऱ्याच जणांना कॉस्ट आणि व्यवस्थापकीय लेखापरीक्षण या विषयाचे तज्ज्ञ म्हणून महाविद्यालयात शिकवण्यासाठी बोलावले जाते.

कॉस्ट लेखापरीक्षण हे वित्तीय लेखापरीक्षणापेक्षा महत्वाचे ठरले आहे. औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर क्षेत्रातत सीएमए लेखा परीक्षक हे शास्त्रीय पध्दतीचा अवलंब करुन कमाल उपयुक्तता साध्य करु शकण्यात सक्षम असतात. वित्तीय लेखापरीक्षक हे या बाबत डावे पडतात. वित्तीय लेखापरीक्षक त्यांच्याकडे आलेल्या सांख्यिकी माहितीवरुन निष्कर्ष काढतात. तोपर्यंत संबंधित व्यवसाय/उद्योगात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या असतात. कॉस्ट लेखापरीक्षक हे व्यवस्थापकांना निर्मिती क्रियान्वयन व निर्मिती प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी सहाय्य करु शकतात. ही बाब वित्तीय लेखापरीक्षकांना शक्य होत नाही. सीएमए हे व्हॅट, एक्झाइज, सेबी-सेक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, एनएसडीएल-नॅशनल सेक्यिुरीटिज डिपॉझिटोरी लिमिटेड, इतर नियामक संस्था, सल्लागार संस्था येथे लेखापरीक्षणाच्या सेवा देऊ शकतात. केंद्रीय अकबारी विधिनीयम, सेवा कर कायदा, विविध राज्यांचे व्हॅट कायदे, केंद्रीय अकबारी कायद्याचे प्रमाणीकरण. कॉस्ट रेकॉर्डस मेंटनन्स सल्लागार, स्पेशल ऑडिट अंडर कस्टम्स ॲक्ट, बँकेचे स्टॉक लेखा परीक्षण, बँक क्षेत्रासाठी वसुली सल्लागार आदी क्षेत्रातही सीएमए स्वतंत्रपणे कार्य कार्य करु शकतात.

इतर संधी – कॉस्ट अकाउंटिंग, फायनांशिअल मॅनेजमेंट, फायनांशिअल/बिझिनेस ॲनालिस्ट, सिस्टिम ॲनालिस्ट ॲण्ड सिस्टिम मॅनेजमेंट, ऑडिटिंग, इंटर्नल कंट्रोल, टॅक्स मॅनेजमेंट, प्रोसेस ॲनालिसीस , बिझिनेस इंटेलिजन्स प्रकियेचे निर्धारण, पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या कपंन्या, निर्मिती आणि सेवा उद्योग, विमा कंपन्या, उर्जा व बँकिंग क्षेत्र. संपूर्ण गुणवत्ता नियंत्रण, सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण, उद्योजकीय कामगिरी व्यवस्थापन, जोखिम व्यवस्थापन, उद्योजकीय सुशासन या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीही सीएमएचा विचार केला जातो.

सेवा सल्ला –  वित्तीय नियोजन आणि धोरण निर्धारण, कॉस्ट व्यवस्थापन आणि नियोजन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल व्यवस्थापन आणि नियोजन, कार्यकारी भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल आणि सुसाध्यता अभ्यास, मार्केट संशोधन आणि पुरवठ्यांचा अभ्यास, अर्थसंकल्प आणि नियंत्रण, वस्तुसूची व्यवस्थापन, मूल्य विश्लेषण, संपूर्ण गुणवत्ता नियंत्रण, मूल्य नियंत्रण पध्दती आणि व्यवस्थापन, व्यवसाय प्रकियेनुसार कर्मचाऱ्यांच्या आवशक्यतेचा आराखडा, कर्मचाऱ्यांसाठी लाभ देणारे उपाय, गुणवत्तापूर्ण पर्यावरणीय आणि उर्जा लेखांकन, व्यावसायिक पुनर्रचनेचे मूल्यांकन, व्युहात्मक रणनीती, कार्यप्रणाली विश्लेषण, निधीकोश व्यवस्थापनाबाबत सल्ला. कॉस्ट लेखापरीक्षकांना गुंतवणूक नियोजन, नफ्याचे नियोजन, प्रकल्प व्यवस्थापन आणि सर्वांगीण व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

संपर्क– (1) वेस्टर्न इंडिया रिजनल काउंसिल, रोहित चेम्बर्स, फोर्थ फ्लोअर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट मुंबई-400001, दूरध्वनी- 8828061444

ईमेल- wirc@icmai.in,संकेतस्थळ-www.icmai.in

 (2) सीएमए भवन, 12 सुद्दर स्ट्रीट, कोलकता – 700016, (3) सीएमए भवन, 3, इंस्टिट्यूशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली-110003, संपर्क भ्रमणध्वनी-9372071120,टोल फ्री क्रमांक-1800 345 0092,ईमेल- studies@icmai.in

०००