(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एव्हाना बऱ्याच ज्ञानशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रकिया बऱ्यापैकी पार पडलीय. पुढील काही दिवसात बहुतेक सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया पूर्ण होईल. ज्या विद्यार्थ्यांना मनाजोगती ज्ञानशाखा मिळाली असेल ते आंनदातच असतील यात शंका नाही. मात्र ज्यांना मनाजोगती ज्ञानशाखा आणि शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला नसेल, त्यांच्यावर नैराश्याचे मळभ दाटून आले असतील. अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं की, एक संधी गेली तर दुसरी संधी सामोरे येतच असते.

अशा काही शैक्षणिक आणि करिअर विषयक संधी या महिन्यात उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नैराश्याला झटकून पुढे आले पाहिजे. बहुतेक सर्व संधीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील एखादी तारीख आहे. सर्व अर्ज ऑनलाइनच भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना पुढे दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा नि प्रवेशासाठी प्रयत्न म्हणजेच योग्य त्या अभ्यासाला मनापासून सुरुवात करावी.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड

ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणारी कंपनी आहे. या कंपनीमार्फत, मरिन इंजिनीअरिंग ट्रेनिंग इंस्टिट्यूट चालवली जाते. या संस्थेमार्फत उत्तम करिअरची संधी देणारा, प्रीसी जीएमइ (ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअरिंग) हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. या अभ्यासक्रमाला मेकॅनिकल किंवा नॅव्हल आर्किटेक्चर किंवा मरिन या शाखेतून बीइ किंवा बीटेक पदवी घेतलेले पदवीधर पात्र ठरतात. या परीक्षेत उमेदवारांना ६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी चाळणी परीक्षा संस्थेमध्ये म्हणजे कोची मध्ये घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२४ आहे.

संपर्क-www.cslmeti.in, ईमेल- methiod@cochinshipyard.in

०००

भारतीय सेना

सिव्हिल, कॉम्प्युटर सायंस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि इतर विषयांमध्ये बीइ आणि बीटेक झालेल्या पदवीधरांना अधिकारी बनण्याची संधी भारतीय (इंडियन आर्मी) सेना नियमिपणे उपलब्ध करुन देत असते. (यंदा या विषयातील पदवी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनासुध्दा अशी संधी आहे. मात्र त्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल १ जून २०२५ पर्यंत लागायला हवा आणि तो त्यांनी सादर करायला हवा.) त्याचाच एक भाग म्हणजे, टेक्निकल ग्रॅज्युएट एन्ट्री अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमाच्या १४१ व्या तुकडीच्या प्रवेशाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२४ आहे.

हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कायम सेवा कमिशन (पर्मनन्ट सर्व्हिस कमिशन) अंतर्गत नियुक्त केले जाते. त्यांच्या सेवेचा प्रारंभ लेफ्टनंट या पदापासून होतो. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देहरादून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी येथे प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सेनादलामार्फत केला जातो. अभ्यासक्रमाच्‍या निवडीसाठी शारीरिक, मानसशास्त्रीय, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या चाळण्या घेतल्या जातात. हा अभ्यासक्रम जुलै २०२५ मध्ये सुरु होईल.

संपर्क-joinindianarmy.nic.in

०००

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही महत्वाची शैक्षणिक संस्था. या संस्थेला स्वायत्‍तता प्रदान करण्यात आली आहे. संस्थेमार्फत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्रिबिझिनेस मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. कृषी आणि कृषी विषयांशी संबंधित इतर शाखेतील पदवीधर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. खुल्या संवर्गातील मुलांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के आणि राखीव संवर्गातील मुलांना किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक.  कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील देशातील हा पहिला अभ्यासक्रम असून हा अभ्यासक्रम करणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्लेसमेंट व वार्षिक पॅकेज मिळते.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) चे गुण ग्राह्य धरले जातात.

संस्थेला अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५.

संपर्क-www.manage.gov.in

०००

ओडिशा मेरिटाइम ॲकॅडेमी

या संस्थेने, प्री-सी जनरल परपोज रेटिंग, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रात चांगल्या करिअर संधी मिळतात.

अर्हता- १०वी उत्तीर्ण. इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवेत. इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक किंवा कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवेत. इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक. अशा विद्यार्थ्यांना १० वी मध्ये इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवेत. १० वी किंवा १२ वीत इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक किंवा फिटर/ मेकॅनिक/ मशिनिस्ट/ वेल्डर/ टर्नर या सारख्या ट्रेडमध्ये ४० टक्के गुणांसह आयटीआय. १० वी किंवा १२ वीत इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक.

या संपूर्ण निवासी अभ्यासक्रमाचा कालावधी जून ते जानेवारी २०२५ असा सहा महिन्यांचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२४

संपर्क-www.odishamaritime.com

०००

संशोधन अभ्यासक्रम

उच्चप्रतिक्षित अध्यापक आणि संशोधकांची गरज भागविण्यासाठी नामवंत संस्थांनी पुढीलप्रमाणे पीएचडीची संधी उपलब्ध करुन दिली आहे-

(अ) इंडियन इंस्टिट्टयूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली- (अ) पीएचडी- अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या १५ शाखा, (२) निवासी (रेसिडेंशिअल) एमएस ( मास्टर ऑफ सायंस) – अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या १७ शाखा.

अर्हता- खुला संवर्ग- किमान ६० टक्के. राखीव संवर्ग- किमान ५५ टक्के. ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनअर्स (गेट) परीक्षेत सुयोग्य गुण आवश्यक. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना विद्यावेतन आणि इतर सुविधा दिल्या जातात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे.

संपर्क-home.iitd.ac.in/pg-admission.php>

०००

(ब) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस बेंगळुरु

येथे विज्ञान, अभियांत्रिकी आणि आंतरज्ञानशाखीय विषयांमध्ये संशोधन करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते.

अर्हता- बीइ/ बीटेक/ चार वर्षे कालावधीचा बचलर ऑफ सायंस अभ्यासक्रम. या उमेदवारांना गेट किंवा जेआरएफ(ज्युनिअर रिसर्च फेलोशीप) परीक्षेत सुयोग्य गुण मिळायला हवेत. या गुणांचा आधार घेऊन संशोधन अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. (इकॉनॉमिक्स/ जिऑग्रॅफी/ सायकॉलॉजी/ मॅनेजमेंट/ कॉमर्स/ कॉम्प्युटर सायंस किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयातील पदव्युत्तर पदवीधरही अर्ज करु शकतात. या उमेदवारांना गेट किंवा जेआरएफ परीक्षेत सुयोग्य मिळायला हवेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४

संपर्क-www.iisc.ac.in/admissions

(क) टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंट रिसर्च

या संस्थेत वेगवेगळया विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांमध्ये संशोधनाची संधी उपलब्ध करुन दिली जाते.

अर्हता- संबंधित विषयातील एमएस्सी किंवा एमटेक/एमफार्म. इच्छुक उमदेवारांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतल्या जाणारी केमिकल सायंस मधील ज्युनिअर रिसर्च फेलोशीप (जेआरएफ) ही परीक्षा सुयोग्य गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक. प्रवेशासाठी हेच गुण ग्राह्य धरले जातात. संशोधन अभ्यासक्रम १ जानेवारी २०२५ पासून सुरु होईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३७ हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. याशिवाय ३० टक्के घरभाडे भत्ताही दिला जातो. संपर्क-www.tifr.res.in/-dcs. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.

०००

(ड) नॅशनल सेंटर फॉर रेडियो ॲस्ट्रोफिजिक्स येथे  अतिउच्च श्रेणीचे म्हणजेच पोस्ट डॉक्टोरल अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन आणि इतर सोई दिल्या जातात.

संपर्क-www.ncra.tifr.res.in

सुरेश वांदिले