(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“अर्थ “पूर्ण ज्ञानसंपन्नता!

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्र विषयातील ज्ञान प्रदान करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून ही संस्था विकसित केली जाणार आहे.

या संस्थेमार्फत पाच वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

अर्थशास्त्राचा सर्वसमावेशक अभ्यास करताना विद्यार्थ्यांना समाजशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, नैतिक मूल्ये आदी सामाजिक शास्त्रातील विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्थशाvस्त्रातील नव्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना शिकवले जाते व स्वतंत्र विचार करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात.

बेंगळुरु हे शहर गेल्या काही वर्षात आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील एक महत्वाचे आर्थिक व्यवहाराचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विविध औद्योगिक घटकांना अर्थकारणाचे विश्लेषण आणि चिकित्सा करणाऱ्या मनुष्यबळाची गरज भासते आहे. अशा मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, त्याने धोरणात्मक आराखडे तयार करण्यात तज्ज्ञता मिळवावी, उद्योजक आणि शासकीय संस्थांना या मनुष्यबळाच्या तज्ज्ञतेचा लाभ व्हावा, अर्थकारणातील प्रवाह आणि पध्दतींचा सखोल अभ्यास करता यावा, ही काही उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहेत.अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे.

रोजगारक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आणि तंत्र शिकवले जातात. नावीन्यपूर्ण विषय घटक तसेच वेगळया शिकवण्याच्या पध्दती, संशोधनात्मक कार्याला प्राधान्य ही काही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

या अभ्यासक्रमामध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या सत्रानुसार क्रेडिट (श्रेयांक)आणि  प्रमाणपत्र/पदविका देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .दुसऱ्या सत्रानंतर ५० क्रेडिट आणि सर्टिफिकेट इन इकॉनॉमिक्ससाठी पात्र ठरवले जाते. चौथ्या सत्रानंतर १०० क्रेडिट आणि डिप्लोमा इन इकॉनॉमिक्ससाठी पात्र ठरवले जाते. सहाव्या सत्रानंतर १४८ क्रेडिट आणि बीएस्सी इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते. आठव्या सत्रानंतर १८९ क्रेडिट आणि बीएस्सी(ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते. दहाव्या सत्रानंतर २२९ क्रेडिट आणि एमएस्सी इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते.

अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. तथापि या विद्यार्थ्यांनी 12 वीमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 12वी परीक्षेत किमान 65 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 60 टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीयुइटी-अंडरग्रॅज्युएट),देणे आवश्यक आहे. संपर्क – www.cucetexam.in

०००

एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स

या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रमही सुरु केला आहे. बी.एस्सी किंवा बी.एस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स या विषयातील पदवीधर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. या विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावर इकॉनॉमेट्रिक्स, मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान 55 टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांची किमान मर्यादा- 50 टक्के.

प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या

टेक महिंद्रा, क्रिसिल, डाटा लॅब, पीडब्ल्यूसी, ग्रँट थॉर्टान, निकोर असोशिएटस, इवाय, कंतार, टीएनएस इंडिया फाउंडेशन इत्यादी

 

संपर्क – जनाभारती मेन रोड, नागरभावी पोस्ट, बेंगळुरु- ५६००७२, दूरध्वनी – ८० – २३९९८५००, ईमेल- info@base.ac.in, संकेतस्थळ-  base.ac.in

००००

इतर महत्वाच्या संस्था

  • मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेला, इंस्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा तामिळनाडू सरकारने दिला आहे. ही स्वायत्त संस्था आपली स्वत:ची पदवी प्रदान करु शकते. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासोबतच संशोधनाची सुविधा आहे.

(१) बीए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स- अर्हता- ६५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण. नॉन क्रिमिलिअर इतर मागास संवर्ग ६० टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्ग ५५ टक्के

(२) एम.ए  इन इकॉनॉमिक्स

या अभ्यासक्रमात पुढील स्पेशलायझेशनची सुविधा आहे- (१) एनव्हिरॉन्मेंटल इकॉनॉमिक्स, (२) फायनांशियल इकॉनॉमिक्स, (३) ॲक्चुरिअल इकॉनॉमिक्स, (४) जनरल इकॉनॉमिक्स, (५) ॲप्लाइड क्वाँटिटेटीव्ह फायनांस.

हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना- (१) एचएसबीसी, (२) आयएफएमआर, (३) सिटीग्रुप ग्लोबल सर्व्हिसेस, (४) इन्फोसिस बीपीओ, (५) जेनपॅक्ट, (६) हेवलेट पॅकार्ड, (७) सिम्फोनी, (८) म्यु सिग्मा, (९) नाथन असोशिएटस या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळालं आहे.

(३) एम.एस्सी इन डाटा सायंस 

दोन्ही पदव्युत्तर पदवीसाठी अर्हता- ५५ टक्के गुणांसह, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान, अभियां‍त्रिकी  किंवा सामाजिक शास्त्रातील पदवी. नॉन क्रिमिलिअर इतर मागास संवर्ग ५० टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्ग ४५ टक्के. डाटा सायंस अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- प्रत्येकी दोन वर्षे

पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला संस्थेच्या वतिने घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- गांधी मंडपम रोड, बिहाइंड गव्हर्मेंट डाटा सेंटर, कोट्टूपूरम चेन्नई – ६०००२५, दूरध्वनी- ०४४- २२३००३०४,ईमेल-info@mse.ac.in, संकेतस्थळ- mse.ac.in

०००

(२) सरला अनिल मोदी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायंस (एनएमआयएमएस), या डिम्ड टुबी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ही संस्था येते. या संस्थेत २०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून, बीएस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स आणि बीएस्सी (ऑनर्स वुइथ रिसर्च) इन इकॉनॉमिक्स, हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आहेत.

अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण.

प्लेसमेंट

नोमुरा, (२) झोमॅटो, (३) डिजिट, (४) ॲक्सिस माय इंडिया, (५) गोल्डमन सॅच, (५) जे.पी.मॉर्गन या कंपन्या संस्थेत प्लेसमेंटसाठी येतात.

एमएस्सी इन इकॉनॉमिक्स

हा अभ्यासक्रम केल्यावर – (१) रिसर्च ॲनॅलिस्ट, (२) डाटा ॲनॅलिस्ट, (३) फायनांशिअल ॲनॅलिस्ट, (४) मॅनेजमेंट कंसलटंट, (६) इन्व्हेस्टमेंट बँकर अशा करिअर संधी मिळू शकतात.

हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून तो कोणत्याही विषयातील पदवीधरास करता येतो. मात्र त्याने १२ वीला गणित किंवा स्टॅटिस्टिक्स या विषयाचा अभ्यास केलेला असावा.

प्लेसमेंट

हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे-

(१) निल्सेन, (२) एचडीएफसी बँक, (३) आरबीएल बँक, (४) क्रिसील, (५) एडेलवीज इत्यादी.

एमए इन इकॉनॉमिक्स

या संस्थेने अमेरिकेतील व्हर्जिनीया टेक विद्यापीठाच्या सहकार्याने एमए इन इकॉनॉमिक्स हा ड्युएल डिग्री अभ्यासक्रमही सुरु केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. या विद्यार्थ्यांनी १२वीमध्ये गणित अथवा सांख्यिकी या विषयांचा अभ्यास केलेला असावा.

या अभ्यासक्रमासाठी निवड दोन्ही विद्यापीठे संयुक्तपणे करतात. एनएमआयएमएस विद्यापीठातील, एमए अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांला चारच्या श्रेणितील सीजीपीएमध्ये ३ श्रेणी मिळायला हवी. हा सीजीपीए मिळाला नाही तर विद्यार्थी व्हर्जिनीया टेक येथे दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरत नाही.

हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एनएमआयएमएस विद्यापीठाची एम.एस्सी (अर्थशास्त्र) आणि व्हर्जिनीया टेक विद्यापीठाची एमए (अर्थशास्त्र),अशा दोन पदव्या दिल्या जातात.

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकते-

(१) रिसर्च ॲनॅलिस्ट, (२) इकॉनॉमिस्ट, (३) मॅनेजमेंट कंसल्टटन्ट, (४) फायनांशिएल ॲनॅलिस्ट, (५) डाटा ॲनॅलिस्ट, (६) इन्व्हेस्टमेंट बँकर, (७) ॲकॅडेमिक रिसर्चर इत्यादी

संपर्क- व्ही. एल. मेहता रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई – ४०००५६, दूरध्वनी-०२२-२६१३४५७७, संकेतस्थळ- economics.nmims.edu, ईमेल- enquiry@ nmims.edu

सुरेश वांदिले

०००