(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नॅशनल इंस्टिट्यूट डिझाइन: संधी साधा!

गेल्याच आठवड्यात स्कूल ऑफ डिझाइन,आयआयटी मुंबईच्या,डिझाइन विषयातील पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेला सुरुवात झाली की क्रमाक्रमाने इतर राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या वेगवेगळया पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया सुरु होते.याच आठवड्यापासून नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी)या संस्थेच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.

प्रवेश प्रकिया

डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (डीएटी-डॅट)

अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संस्थेमार्फत, डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (प्रिलिमनरी/प्राथमिक) आणि डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (मेन/मुख्य) घेतली जाते. प्राथमिक परीक्षा देशातील अनेक केंद्रावर घेतली जाते. त्याद्वारे मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. प्राथमिक परीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्रे- नागपूर आणि मुंबई.

 मुख्य परीक्षेचे केंद्र प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर घोषित केले जाते. साधारणत: ही परीक्षा अहमदाबाद केंद्रावर घेतली जाते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.३ डिसेंबर २०२४ ही आहे. अर्ज ऑनलाइन भरावा लागतो. ५ जानेवारी २०२५ ला प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल ५ एप्रिल २०२५ रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केला जाईल.२६ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधितील कोणत्याही दिवशी मुख्य परीक्षा घेतली जाईल. यापरीक्षेचा निकाल १६ मे २०२५ रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केला जाईल.

अशी असते परीक्षा

प्राथमिक परीक्षेच्या पेपरचा कालावधी तीन तास. या पेपरमध्ये १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असते.

प्राथमिक परीक्षा-

या पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान व अवतीभवतीच्या घटनांचे आकलन , तार्किक क्षमता, उताऱ्यावरील प्रश्न, संख्यात्मक चाचणी, आकृत्या, कार्यकारण भाव, तपासण्यासाठी प्रश्नाची रचना केली जाते.

भाग दोन हा निबंधात्मक स्वरुपाचा असतो. या भागात वेगवेगळया परिस्थितीचे वर्णन करणारे उतारे दिले जातात. त्यावर आधारित चित्र काढावे लागतात. उमदेवारांच्या चित्रांकनाचे कौशल्य तपासणीसाठी या भागाचा उपयोग केला जातो.

मुख्य परीक्षा- प्राथमिक परीक्षेतील गुणांवर आधारित विशिष्ट संख्येत मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना निवडले जाते. या परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी admissions.nid.edu या संकेतस्थळावर जाहीर केली जाते. ही परीक्षा गांधीनगर/अहमदाबाद किंवा इतर कॅम्पसमध्ये दोन दिवस चालते. ही चाळणी कॅम्पसमधील स्टुडिओमध्ये घेतली जाते. अभिकल्प शिक्षणासाठी विद्यार्थ्याची कलचाचणी करणा-या विविध प्रकारच्या चाळण्यांचा यात समावेश असतो. या चाळणीसाठी १०० गुण ठेवण्यात येतात. चाळणीची भाषा इंग्रजी असते.

एनआयडी अहमदाबादमधील अभ्यासक्रम-

बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन) इन (१) ॲनिमेशन फिल्म डिझाइन (जागा १९) , (२) एक्झिबिशन डिझाइन- (जागा १३), (३) फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाइन (जागा १३) , (४) ग्रॅफिक डिझाइन- (जागा १९), (५) सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन- (जागा १३), (६) फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन ( जागा १३), (७) प्रॉडक्ट डिझाइन – (जागा १९), (८) टेक्सटाइल डिझाइन एकूण जागा (जागा १९)

इतर एनआयडीमधील अभ्यासक्रम

(१) एनआयडी आंध्रप्रदेश (गुंटूर), (२) एनआयडी हरयाणा (कुरुक्षेत्र), (३) एनआयडी मध्यप्रदेश (भोपाळ), (४) एनआयडी आसाम (जोरहट)- बॅचलर ऑफ डिझाइन इन (१) इंडस्ट्रिअल डिझाइन, (२) कम्युनिकेशन डिझाइन  आणि (३) टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन

प्रत्येक स्पेशलायझेशनला प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे.

शैक्षणिक अर्हता() कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पास श्रेणीत १२ वी उत्तीर्ण किंवा बारावीला असलेले विद्यार्थी किंवा (ब) ३ वर्षे कालावधीचा तंत्रशिक्षण मंडळाचा पदविका अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी किंवा (क) किंवा नॅशनल ओपन स्कूलिंग अतंर्गत पाच विषयांसह सिनिअर सेकंडरी स्कूल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी किंवा (ड) हायर  सेकंडरी सर्टिफिकेट व्होकेशनल एक्झामिनेशन.

गुणवत्ता यादी तयार करण्याची पध्दती

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. प्राथमिक परीक्षेला ३० टक्के वेटेज आणि मुख्य परीक्षेला ७० टक्के वेटेज दिले जाते. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचाच विचार अंतिम गुणवत्ता यादीसाठी केला जातो.

प्राथमिक परीक्षेत दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास अंतिम गुणानुक्रम देताना पुढील कार्यपध्दतीचा अवलंब केला जातो- (१) प्राथमिक परीक्षेच्या पेपरमधील “पार्ट बी” मध्ये ज्या विद्यार्थ्यास अधिक गुण मिळालेले असतील त्याला वरचा क्रमांक दिला जातो. (२) अशा स्थितीतही दोन्ही उमेदवारांना समान गुण मिळाले असतील तर प्राथमिक परीक्षेतील “पार्ट ए” मध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरची श्रेणी/गुणानुक्रम दिला जातो. (३) याही स्थितीत दोन्ही उमेदवारांचे समान गुण राहिल्यास दोघांनाही एकच गुणानुक्रम दिला जातो.

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील पेपरच्या पुनर्तपणासणीची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाते. एकूण जागांच्या तुलनेत प्रत्येक संवर्गात ३ पट अधिक विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात.

अंतिम गुणवत्ता यादी– ही यादी प्रत्येक संवर्गनिहाय (खुला/अनुसूचित जाती/जमाती/एनसीएल-ओबीसी/ दिव्यांग/ आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट) तयार केली जाते. ही यादी तयार करताना प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील गुणांचे एकूण वेटेज लक्षात घेतले जाते.

पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन)

एनआयडीमधील पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रकिया सुध्दा सुरु झाली. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ ही आहे. प्राथमिक  आणि मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. प्राथमिक परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येऊन १७ फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल घोषित केला जाईल.३ मार्च ते ६ एप्रिल २०२५ कालावधित कोणत्याही दिवशी मुख्य परीक्षा घेतली जाईल.६ मे रोजी २०२५ रोजी निकाल घोषित केला जाईल.

हा अभ्यासक्रम १९ स्पेशलायझेशनमध्ये करता येतो. हे स्पेशलायझेशन गांधीनगर, अहमदाबाद आणि बेंगळुरु कॅम्पसमध्ये करता येतात. या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच वर्षे आहे. या अभ्यासक्रमाला दोन टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्टव्दारे प्रवेश दिला जातो. डिझाइन क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि उमेदवाराच्या वर्तणुकीचा दर्जा यांचे परिक्षण या चाळणी परीक्षेव्दारे केले जाते.

शाखा आणि विषय

(१) कम्युनिकेशन डिझाइन- (अ) फिल्म ॲण्ड व्हिडिओ (अहमदाबाद कॅम्पस), (ब) ग्रॅफिक डिझाइन (अहमादाबाद), (क) ॲनिमेशन फिल्म डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (ड) फोटोग्रॅफी डिझाइन (गांधीनगर कॅम्पस).

(२) इंडस्ट्रिअल डिझाइन- (अ) सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन  (अहमदाबाद कॅम्पस), (ब) फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (क) प्रॉडक्ट डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (ड) टॉय ॲण्ड गेम डिझाइन (गांधीनगर कॅम्पस), (इ) ट्रांस्पोर्टेशन ॲण्ड ऑटोमोबाइल डिझाइन (गांधीनगर कॅम्पस), (ई) युनिव्हर्सल डिझाइन (बेंगळुरु कॅम्पस)

(३) इंटरडिसिप्लिनरी डिझाइन- (अ) डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरियंस ( बेंगळुरु कॅम्पस), (ब) स्‍ट्रेटेजिक डिझाइन मॅनेजमेंट (गांधीनगर कॅम्पस),

(४) आयटी इंटिग्रेटेड डिझाइन, (अ) डिजिटल गेम डिझाइन( बेंगळुरु कॅम्पस), (ब) इंटरॲक्शन डिझाइन( बेंगळुरु कॅम्पस), (क) इन्फॉर्मेशन डिझाइन( बेंगळुरु कॅम्पस), (ड) न्यू मीडिआ डिझाइन( गांधीनगर कॅम्पस).

(५) टेक्स्टाइल,ॲपेरल,लाइफस्टाइल ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन- (अ) ॲपेरल डिझाइन( गांधीनगर कॅम्पस), (ब) लाइफस्टाइल ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन( गांधीनगर कॅम्पस)- (क) ॲक्सेसरी डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस).

अर्हता- (१) कोणत्याही विषयातील चार किंवा तीन वर्षे कालावधीची पदवी किंवा (२) चार वर्षे कालावधीचा डिझाइन/फाइन आर्ट/अप्लाइड आर्ट /आर्किटेक्चर या विषयातील १२वीनंतरची पदविका.

या संस्थेत पीएचडी करण्याची सुध्दा सुविधा आहे.

एनआयडी संस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाची संस्था आहे.या संस्थेत डिझाइन विषयातील देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम शिकवला जातो.पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना संबंधित कंपन्या तत्काळ नोकरी/रोजगार देतात.अनेक विद्यार्थी आपल्या डिझाइन कंपन्या सुरु करतात.त्यांनाही चांगली मागणी असते.

संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन पालडी अहमदाबाद – ३८०००७, दूरध्वनी- ०७९-२६६२९५००,टेलेफॅक्स- २६६२९६००, ईमेल – admissions@nid.edu, प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ- www.admissions.nid.edu, मुख्य संकेतस्थळ- http://www.nid.edu

००००