रुग्णालय प्रशासनाचे सूत्रधार
सर्वत्र कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक रुग्णालयांची वाढ झपाट्याने होत आहे. या रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस व्यामिश्र स्वरुपाच्या आणि तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त शेकडो व्यक्तींचा वावर वाढला आहे. या सर्व मनुष्यबळास कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि रुग्णांच्या विविध स्वरुपाचे प्रश्न आणि समस्यांना सोडवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज मोठ्या संख्येने भासू लागली आहे.
रुग्णांची प्रचंड वाढलेली संख्या, वैद्यकीय मनुष्यबळ, उपकरणे, औषधी, पायाभूत सुविधा यांचे सुयोग्य संनियंत्रण करण्यासाठी पुढील काळात रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासन या ज्ञानशाखेत शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. या विषयातील अभ्यासक्रम हे पदव्युत्तर पदवी पातळीवरील असून यंदा पदवी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास पुढील दोन वर्षात त्यांच्यासाठी नव्या संधीचे व्दार उघडले जाऊ शकते.
काही संस्था आणि अभ्यासक्रम
(१) टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेच्या अंतर्गत कार्यरत, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टिम स्टडीज मार्फत, दोन वर्षे कालावधीचा, मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम चालवला जातो.
काय शिकाल?
(१) आरोग्याशी संबंधित अर्थकारण किंवा अर्थशास्त्र, (२) वित्तीय व्यवस्थापन, (३) संस्थात्मक वर्तणूक, (४) रुग्णालय व्यवस्थापनाची तत्वे, (५) रुग्णालयांसाठी संशोधन पध्दती, (६) संस्था आणि सहाय्यकारी कर्मचारी/ कामगार सेवा, (७) संस्था आणि वैद्यकीय व सुपर स्पेशॅलिटी (अतिविशेषज्ञ) सेवांचे प्रशासन, (८) वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान व्यवस्थापन, (९) जैवसांख्यिकीची तोंडओळख, (१०) रुग्णालय माहिती सेवा, (११) रुग्णालय नियोजन आणि कार्यक्रम व्यवस्थापन, (१२) मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कामगार कायदे, (१३) रुग्णालयांशी संबंधित नैतिक बाबी, (१४) रुग्णालय किंवा आरोग्य व्यवस्थेचे गुणवत्ता व्यवस्थापन, (१५) व्यवस्थापकीय विश्लेषण आणि कार्यपध्दतीचे विश्लेषण, (१६) रुग्णालयाच्या व्यावसायिक बाबींच्या कायदेशीर चौकटी, (१७) विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, (१८) व्यवसाय विकास वाढीच्या व्युहनीती, (१९) आरोग्यविमा, (२०) जोखीम व्यवस्थापन, (२१) नागरी आरोग्य, (२२) व्युहात्मक व्यवस्थापन, (२३) संस्थात्मक विकास, (२४) आरोग्य व्यवस्थेतील उद्योजकता, (२५) सेवा व्यवस्थापन.
करिअर संधी
(१) कॉर्पोरेट क्षेत्रातील वा सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये वेगवेगळया विभांगाचे संनियंत्रण (२), रुग्णालयातील नव्या सेवा किंवा नव्या रुग्णालयांचे डिझाइन आणि नियोजन, रुग्णालये सल्लागार कंपन्या (हॉस्पिटल कंसलटन्सी फर्म्स), (३) आरोग्य विमा क्षेत्र, (४) आरोग्य सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (हेल्थकेअर आयटी इंडस्ट्री)
अर्हता- कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औषधीनिर्माण शास्त्र, विधि अशा कोणत्याही शाखेतील पदवी. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात.
संपर्क – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, व्ही. एन. पुरव मार्ग देवनार, मुंबई- ४०००८८, दूरध्वनी- ०२२-२५५२५००० आणि २५५२५२५२, संकेतस्थळ- https://admissions.tiss.edu/
०००
(२) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा, एमबीए इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.
अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क– सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, सिम्बॉयसीस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) युनिव्हर्सिटी कॅम्पस, हिल बेस, लव्हाळे. पुणे-४१२११५, ईमेल- info@sihspune.org, संकेतस्थळ- www.sihspune.org, दूरध्वनी- ०२०-६६९७५०४०