डेटा सायंटिस्ट
डेटा सायन्स या विषयातील अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना सध्या काळात विविध क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात. यामध्ये टेलिकम्युनिकेशन, एविएशन, कृषी, बँकिंग, आरोग्यसेवा आणि सुविधा, रिटेल, मॅन्युफॅक्चुरिंग, आदी क्षेत्रांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
डेटा सायंटिस्ट काय करतात?
(१) डेटा सायंटिस्ट, त्यांच्यासमोर आलेल्या माहिती साठा प्रतिमा किंवा व्हिडीओचा सखोल अभ्यास करुन आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढतात. सध्या जगातील विविधांगी उद्योग आणि व्यवसायाच्या दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी उपाय सुचवू शकतात. (२) डेटा सायंटिस्ट सेन्सॉर, कॅमेरा, न्युरल नेटवर्क आणि मशिन लर्निंग अल्गॉरिथम्स यांचा उपयोग करतात. मानवी भावभावना, संभाषण यांचाही उपयोग केला जातो. (३) बँक आणि फिनटेक कंपन्यांकडे कर्जासाठी येणाऱ्या ग्राहकांची अर्हता, पात्रता वस्तुनिष्ठरित्या तपासणाऱ्या मॉडेल्सची निर्मिती डेटा सायंटिस्ट करु शकतात. (४) मुलांच्या अवैध वाहतुकीच्या समस्येच्या निराकरणासाठी या विषयातील तज्ज्ञ माहितीचे विश्लेषण करुन उपाय सुचवू शकतात. (५) ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स, यू ट्यूब सारख्या माध्यमांना त्यांच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार, व्यक्तिगत स्वरुपाच्या सेवा/वस्तू/उत्पादने यांचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी डेटा सायंटिस्ट, माहितीच्या साठ्याचे विश्लेषण करुन व्युहनीती ठरवू शकतात. यामुळे या कंपन्यांची विक्री आणि नफ्यात वाढ होऊ शकते. (६) कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन डेटा सायंटिस्ट यांनी परीक्षेतील गैरव्यवहार थोपवता येतील असे मॉडेल्स तयार केले आहेत. (७) नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या क्षमतेचे अचुक विश्लेषण करणारे मॉडेल्सही विकसित केले आहेत. (८) कॉम्प्युटर व्हिजन तज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. (९) वैद्यकीय क्षेत्रातील डेटा अधिक सोप्या पध्दतीने डॉक्टर आणि सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देता येणे शक्य झाले आहे.
आयआयटी गौहाटीच्या, स्कूल ऑफ डेटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचे प्रमुख रणजित भट्टाचार्य यांच्या मते, बहुतेक सर्वच उद्योगांमध्ये माहितीच्या साठ्याचा विश्लेषणावर भर देण्यात येत असल्याने डेटा सायंटिस्टची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललीय. दररोज माहितीचा साठा निर्माण होत असून, त्यातून कंपनी/ उदयोगासाठी अचूक आणि उपयुक्त माहितीचा शोध घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे अत्यंत फायदेशीर ठरु शकते.
डेटा सायंटिस्टसना, सांख्यिकी, संगणक शास्त्र, व्यवसाय/ उद्योगाच्या मुलभूत बाबी शिकवण्यात येत असल्याने ते उद्योग /व्यवसायांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण प्रभाविरीत्या करु शकतात.
०००
एमएस-डेटा सायंस ॲण्ड मॅनेजमेंट
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदौर या दोन संस्थांनी एकत्र येऊन मास्टर ऑफ सायन्स इन डेटा सायंस ॲण्ड मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- बीटेक/ बीई/ बीएस/ बीफार्मा, बीआर्क, बीडिझाइन, बी. फॅशन टेक्नॉलॉजी, चार वर्षे कालावधीचा बीएस्सी, एमएस्सी, एमसीए, एमबीए.
या अभ्यासक्रमाला कॅट (कॉमन ॲडमिशन टेस्ट), गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग), जीमॅट (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट), जीआरई (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन), जॅम (जॉईंट एन्ट्रन्स फॉर मास्टर्स) यापैकी कोणत्याही एका स्पर्धा परीक्षेचे मागील तीन वर्षाचे गुण ग्राह्य धरले जातील.
या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिल्या नसतील त्यांना, डेटा सायंस ॲण्ड मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (डीएमएटी) ही चाळणी परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा २३ जून २०२४ रोजी इंदौर येथे घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाइन देण्याची सुध्दा सुविधा आहे. या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२४ आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम ऑगस्ट २०२४ मध्ये सुरु होईल. संपर्क – दूरध्वनी – ०७३१-२४३९७३६, संकेतस्थळ- msdsm.iiti.ac.in , ईमेल – msdsm-office@iimidr.ac.in आणि msdsm-office@ iiti.ac.in