(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गुन्हेशोध शास्त्र आणि तंत्र

 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या कार्यात न्यायवैद्यक(फॉरेंसिक)शास्त्राचा महत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. भारत सरकारने न्यायवैद्यक शास्त्र आधारित शोधाला न्यायदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या सध्याच्या ५० टक्के दरात आणखी वाढ होऊ शकेल. न्यायवैद्यकीय शास्त्राबदृल नागरिक सध्या अधिक जागरुक झाले आहेत. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे सायबर फॉरेंसिकची लोकप्रियता वाढत चाललीय. जेव्हा जेव्हा कायदेशीर बाबी उपस्थित होतात,तेव्हा न्याय वैद्यक शास्त्राचे पुरावे महत्वाचे ठरतात. न्यायवैद्यक शास्त्रज्ञांना गुन्हेगारांनी मागे सोडलेल्या एखाद्या सूक्ष्म बाबींवर, प्रमाणित अशा अनेक चाचण्या कराव्या लागतात. या तज्ज्ञांना न्यायालयात साक्षिदार म्हणूनही उपस्थित राहावे लागते. यामुळेच इतर क्षेत्रातील मनुष्यबळास प्रशिक्षित करण्याऐवजी, न्यायवैद्यक शास्त्रात पारंगत असणारे मनुष्यबळ असण्याची गरज भासू लागली आहे.

 फॉरेंसिक सायन्समध्ये शोधकार्याचे मूलभूत तत्वे शिकवली जातात. त्याचबरोबर गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे तंत्र शिकवले जाते. सध्या बहुतेक सर्वच बँकांना, फ्रॉड (फसवणूक शोध) डिपार्टमेंटसाठी न्यायवैद्यक शास्त्राशी निगडित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. कॉर्पोरेट क्षेत्रातही संभाव्य फ्रॉड थोपवण्यासाठी या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. प्रत्येक राज्य सरकारने न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळा उघडल्या आहेत.

नॅशनल फॉरेसिंक सायंस युनिव्हर्सिटी

अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार करु लागल्याने न्यायवैद्यक शास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळेच भारत सरकारने नॅशनल फॉरेसिंक सायंस युनिव्हर्सिटीची स्थापना केली असून या संस्थेचे कॅम्पसेस गुजरात- गांधीनगर, दिल्ली, त्रिपुरा, भोपाळ, पुणे, गौहाटी, मणिपूर, गौहाटी, धारवाड येथे उघडण्यात आली आहेत. या संस्थेमार्फत ७० हून अधिक देशात या क्षेत्रातील क्षमता बांधणी केली जात आहे. भारताची न्यायवैद्यक क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेमार्फत न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

नॅशनल फॉरेंसिक सायंस युनिव्हर्सिटीचे अभ्यासक्रम (कंसामध्ये अभ्यासक्रम कोणत्या कॅम्पसमध्ये करता येतो,त्याची नावे आहेत.)

स्कूल ऑफ फॉरेंसिक सायंस

(१) बी.एस्सी- एमएस्सी इन फॉरेंसिक सायंस (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, धारवाड), (२) एम.एस्सी इन फॉरेंसिक सायंस (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ), (३) एम.एस्सी इन फॉरेंसिक बायोटेक्नॉलॉजी (गांधीनगर), (४) एम.एस्सी इन मल्टिमीडिया फॉरेंसिक (गांधीनगर), (५) एम.ए इन फॉरेंसिक मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्न्यालिझम-स्पेशलायझेशन इन फॉरेंसिक जर्न्यालिझम (गांधीनगर), (६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्राइम सिन फोटोग्रॅफी (दिल्ली), (७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्राइम सिन मॅनेजमेंट (गांधीनगर, भोपाळ, धारवाड, पुणे, मनिपूर), (८) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिंगरप्रिंट सायंस (गांधीनगर, दिल्ली, भोपाळ, पुणे), (९) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक डाक्युमेंट (गांधीनगर, दिल्ली, भोपाळ, पुणे, गौहाटी, मनिपूर), (१०) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डीएनए फॉरेंसिक (भोपाळ, पुणे, गौहाटी), (१०) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक जर्न्यालिझम (गांधीनगर), (११) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक बॅलिस्टिक्स (गौहाटी,मनिपूर)

प्रवेश प्रकिया

या सर्व अभ्यासक्रमांना नॅशनल फॉरेंसिक ॲडमिशन टेस्ट (एनएफएटी) व्दारे प्रवेश दिला जातो. संपर्क संकेतस्थळ – nfsu.ac.in/admission, ईमेल-info@nfsu.ac.in, दूरध्वनी-०७९- २३९७७ १०३

०००