(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महिषासूर मर्दिनी-ग्रेटा

ती संपावर जाते तेव्हा…

संयुक्त राष्ट्र संघाचं सर्वात मोठं अधिवेशन. जगातील अनेक देशातील नेते,अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासमोर एक 15 वर्षाची, सडपातळ मुलगी बोलायला उभी राहते आणि त्यांना ठणकावून सांगते की, सर्व वडिलधारी मंडळी सदासर्वकाळ सांगत असतात की त्यांना मुलांच्या भविष्याविषयी फार चिंता वाटते. ते मुलांवर फार प्रेम करतात. हे जर खरं असेल तर तुम्ही वडीलधारे मुलांच्या भविष्याला कां ग्रहण लावताहात? कां मुलांचं भविष्य अंधकारमय करताहात?

हे अधिवेशन होतं वातावरण बदलाचा जगावर होणाऱ्या परिणामांची चर्चा करण्यासाठी.चर्चा काय करता, कृती करा.असं या मुलीने या अधिवेशनात ठणकाऊन सांगितलं.

 वातावरणातील घातक बदल मानवाच्या अंदाधुंद वागणुकीमुळे, कृतीमुळे होत आहेत. हवेतील कर्ब वायुचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तपमान वाढले आहे. बर्फ वितळायला लागला आहे. समुद्रकिना-यावरील शहरांना धोका निर्माण झालाय. जंगलात वनवे पेटताहेत. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. आपली पृथ्वी मरणासन्न होत आहे. अशा आशयाचं तिचं थेट आणि बेधडक सांगणं असतं.

जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांना ती भेटते.तुमच्या हातात सत्ता आहे,तुम्ही नक्कीच यावर उपाययोजना करु शकता. असं ती तळमळीनं सांगते.

या मुलीच्या प्रामाणिक आणि जीवतोडून सांगण्याचा परिणाम जगातील सत्ताधाऱ्यांवर फार होत नाही. पण जगभरातील तिच्या वयोगटातील मुले मात्र,तिच्या विचारांनी भाराऊन जातात. त्यामुळेच वातावरण बदलाविरुध्द आरंभलेल्या तिच्या एकांड्या लढयाला आता जागतिक स्वरुप येऊ शकलं.

तर ही शुरवीर आणि कुणालाही न भिणारी मुलगी  म्हणजे ग्रेटा थनबर्ग.स्वीडन देशातली.

वातावरण बदलाबद्दल जगातील सत्ताधीशांची संघर्ष करण्याच्या अपार आत्मविश्वासाने प्रयत्नशील असलेली ग्रेटा, शाळेत असताना एका घटनेने मुळापासून हादरुन गेली. तेव्हा ती फक्त 11 वर्षाची होती.

एके दिवशी तिच्या शिक्षिकेने वातावरणातील बदलामुळे जग कसं विनाशाकडे चाललय याची माहिती वर्गाला दिली. काही व्हीडिओ दाखवले. तपमानात वाढ झाल्यानं बर्फाचं वितळणं , भयावह महापूर, निसर्गाने सतत रौद्ररुप धारण करणं, ध्रुवावरील अस्वलांचे होणारे मृत्यू, असं त्यात होतं. हे बघून आणि ऐकून सर्व वर्ग स्तब्ध झाला. बाकीची मुलं मात्र लगेच सावरली. पुन्हा खेळायला,बागडायला लागली. मात्र ग्रेटाच्या मनावर या सर्वदृष्यांचा फार आघात झाला. इतका की ती नैराश्यात गेली.ती एकलकोंडी झाली. तिने बोलणं सोडलं. महिनोमहिने तिने एकही शब्द उच्चारला नाही. अन्नावरची वासना तर कधीचीच उडाली. या सर्वांचा तिच्या तब्येतीवर परिणाम झाला. ती कुपोषित झाली. याचा परिणाम तिच्या पुढील शारीरिक विकासावर झाला असता. हे टाळण्यासाठी तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

ग्रेटासाठी हे सारं न संपणारं दु:खपर्व ठरलं,असं तिच्या वडिलांनी नमूद करुन ठेवलय. वातावरणातील बदलामुळे इतकी जिवीत हानी होतेय, पृथ्वीचा जीव धोक्यात आलाय तरीही सत्ताधारी काहीच कां करत नाही? हा एकमेव विचार ग्रेटाच्या मनात या काळात येत राहिला आणि तिच्या नैराश्यात भर पडत राहिली. मात्र सारं काही ठीक होईल असं तिचे बाबा तिला सतत सांगत असत. मात्र,आपण सांगतोय ते काही खरं नाही याचीही जाणीव त्यांना होती. कारण दिवसेंदिवस वातावरणातील बदल अधिकाधिक धोकादायायक होत असल्याचं ते बघत होते. आपण मुलीची खोटी समजूत काढण्याऐवजी, किमान आपल्याकडूनतरी कर्बवायू कमित कमी किंवा काहीच जाऊ नये यासाठी स्वत:मध्ये बदल करायला हवं असं त्यांनी आणि ग्रेटाच्या आईने ठरवलं. त्याप्रमाणे ते पूर्णपणे शाकाहारी झाले. त्यांनी सौरउर्जेचा वापर सुरु केला. विमानातून मोठ्याप्रमाणावर कर्बवायू सोडला जात असल्यानं ,त्या दोघांनी विमान प्रवास करायचा नाही असं ठरवलं.हे सर्व ते आपल्या मुलीच्या प्रेमापोटी करु लागले.

रुग्णालयात असताना ग्रेटाला वेगळया प्रकारचा मानसिक आजार झाल्याचं स्पष्ट झालं. अशा व्यक्तींचा मेंदू सर्वसामान्यांपेक्षा वेगळा विचार करतो. शिक्षकांनी वातावरण बदलाचे वाईट परिणाम जेव्हा सांगितले तेव्हा तिचा मेंदू इतर मुलांपेक्षा वेगळा विचार करायला लागला. त्यामुळे मला वातावरण बदलाची समस्या किती गंभीर होत चाललीय हे कळलं, असं ती बरी झाल्यावर सांगू लागली आणि बरं झालं गड्या, हा वेगळा आजार झाला ते! नाहीतर मीसुध्दा इतर मुलांसाठी हुंदडत  आणि उंडारक्या करत राहिले असते, असं ती गमतिने म्हणू लागली.

ग्रेटाचा हा वेगळा आजार तिच्यासाठी वरदानच ठरला जणू! पुढे, बरी झाल्यावर तिने आता वातावरण बदलाचे भयावह परिणाम याच विषयावर जाणीव जागृती करण्याचं मनोमन पक्क केलं.

हवामान बदलाचे परिणाम टाळण्यासाठी करण्यात आलेल्या पॅरीस कराराची अंमलबजावणी स्वीडनच्या सरकारने करायलाच हवी, याचा दबाव आणण्यासाठी शाळा सोडून संपावर जाण्याचा ग्रेटाने निर्णय घेतला.आई,बाबा आणि शिक्षकांनी तिला,असं काही करु नकोस,दुसऱ्या मार्गाने आपला विरोध व्यक्त कर,असं समजावलं.पण ग्रेटा आता माघार घ्यायला तयार नव्हती.

ही गोष्ट होती 20  ऑगस्ट 2018 ची. ग्रेटा एकटीच स्वीडनच्या ससंदेसमोर ठिय्या मांडून बसली. तिच्यासोबत होते दोन तीन पोस्टर्स. त्यावर लिहिलं होतं, माझं नावं ग्रेटा, मी नववीत शिकते. वातावरणात होणाऱ्या भयावह बदलांसाठी संपावर आहे. तुम्हा वडिलधाऱ्यांना माझ्या भविष्याविषयी अजिबात चिंता नाही. आता मलाही तसचं वाटतं…आपल्या या संपाविषयी तिने समाजमाध्यमांवर पोस्ट केलं,त्याचा थोडा परिणाम झाला.

दुसऱ्या दिवशी एक अनोळखी मुलगा तिच्या सोबतीला आला.काही दिवसातच ही संख्या वाढली. बघता बघता या संपकऱ्यांचा एक समूह झाला. हे सारं स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात सुरु होतं. हजारो लोक आता ग्रेटाला पाठिंबा देऊ लागले. जोपर्यंत स्वीडनचं सरकार पॅरीस करार स्वीकारत नाही तोपर्यंत दर शुक्रवारी संप अधिक जोमानं चालू ठेवण्याचा तिने निर्धार केला. यातून फ्रायडे फॉर फ्युचर (भविष्यासाठी शुक्रवार) या चळवळीचा प्रारंभ झाला. भविष्यासाठी शुक्रवार या संपाचं लोण अल्पावधित सर्व युरोपात पसरलं. दर शुक्रवारी युरोपातील अनेक देशातील विद्यार्थी ग्रेटाच्या विचारानं प्रेरित होऊन संपावर जाऊ लागले. जानेवारी महिन्यात बेल्जियम येथे 35 हजार विद्यार्थी संपावर गेले. या संपकरी विद्यार्थ्यांचा बेल्जियमच्या एका मंत्र्यानं अपमान केला. त्याच्याविरुद जनआक्रोश इतका  वाढला की त्यास लगेच आपल्या पदाचा राजिनामा द्यावा लागला. न्युयॉर्क शहरात अडीच लाख विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला तर लंडनमध्ये एक लाख विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. ग्रेटाची ही चळवळ बघता बघता 600 शहरांमध्ये पसरली.

आता ग्रेटा स्टार झाली. वातावरण बदलाविरुध्द लढणारी जागतिक योध्दा म्हणून तिचा गौरव होऊ लागला. तिला मानसन्मान मिळू लागले. पण तिला याचं फार काही कौतुक नाही. तमिळत असलेल्या प्रचंड प्रसिध्दीचा तिच्या कामावर काहीही परिणाम तझाला नाही. ती गर्वाने फुलून गेली नाही.

वातावरण बदलामुळे होणाऱ्या भयावह परिणामांच्या विरुध्द जी मोहीम ग्रेटाने सुरु केली, त्यामुळे जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांना तिची दखल घ्यावी लागली. रशियाचे सर्वोच्च सत्ताधीश पुतीन म्हणाले, कोण ही ग्रेटा-ब्रिटा,मी अजिबातच तिला भीक लागणार नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेटा म्हणजे, उज्वल भविष्याकडे उगाच डोळे लावून बसलेली एक आनंदी तरुण मुलगी, अशा आशयाचं व्यंगात्मक वर्णन केलं. ब्राझिलच्या राष्ट्रध्यक्षांनी तिचा घाणेरड्या शब्दात उल्लेख केला.पण या सर्व शक्तीमानांच्या शाब्दिक हल्ल्यांनी ग्रेटा जराही विचलित झाली नाही. तिच्या लढ्याला आणखीन धार आली.

वातावरणातीलत बदलाच्या विरोधात जागतिक जनमानस मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. त्याचे धक्के मोठ्या सत्ताधिशांची सत्ता जाण्यात होऊ घातलीय, डोनाल्ड ट्रम्प त्यापैकीच एक.ग्रेटाच्या अथक प्रयत्नांमुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांना,मोठमोठ्या उद्योगपतींना  वातारण बदलाविषयी आता तोंडदेखलेपणे कां होईना बोलावं लागतं.त्यांचं नक्कीच मनपरिवर्तन होईल,याची खात्री ग्रेटास वाटते.या खात्रीतून ती अधिक जोमाने, दररोज पर्यावरण रक्षणाच्या कामाला लागते.

सुरेश वांदिले