(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 नव्या दुर्गेचा जन्म

शाळेत एक मुलगी दररोज दुपारच्या सुटित मुलांना काहीतरी वाटत असते, असं शिपायानं मुख्याध्यापकांना सांगितलं.

काय वाटतं हे बघितलसं का?असं मुख्यधापकांनी विचारलं तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितलं.

नसत्या उचापती करतोस कशाला मग. अरे, मुलं दुपारी खेळतात. बागडतात. एकमेकांना चॉकलेट किंवा बिस्किटं खायला देतात,त्यात काय नवल? असं मुख्याध्यापक शिपायास म्हणाले.

सर, ही मुलगी खेळत नाही बागडत नाही, खाऊ तर देत नाहीच नाही. एक बिल्ला मुलांना देते ..शिपाई म्हणाला.

मुख्याध्यापकांची उत्सुकता ताणली गेली. आज दुपारच्या सुटित ही मुलगी नेमका कशाचा बिल्ला वाटप करते हे प्रत्यक्ष बघायच असं त्यांनी ठरवलं.

त्याप्रमाणे ते दुपारच्या सुटित शाळेच्या पटांगणात आले. ही मुलगी मुलांना शर्टावर लावता येईल असा एक बिल्ला देत होती. मुख्याधापक उत्सुकतने तिच्याकडे गेले. त्यांना बघताच इतर मुले बाजुला सरली.

या मुलीने मुख्याध्यापकांना नमस्कार केला. त्यांनाही हा बिल्ला दिला. त्यांनी तो बिला बघितला. त्यावर लिहिलं होतं, पृथ्वीला वाचवा..ते बघून मुख्याध्यापकांना फार आश्चर्य वाटलं.

ती मुलगी त्यांच्या डोळयात डोळे घालून बघत म्हणाली, सर तुम्ही लावणार ना हा बिल्ला तुमच्या शर्टावर…

अं, हो.. हो..कां नाही…पृथ्वीला वाचवा..लावायलाच हवं..मुख्याध्यापक म्हणाले.त्यांनी खरोखरच तो बिल्ला शर्टावर लावला. त्यांनी तिला शाबासकी दिली.

मुख्याध्यापक या मुलीस रागवतील,असे वाटून त्यांच्यापासून दूर गेलेले मुलं-मुली हे बघून आश्चर्यचकित झाली..

या मुलीसही तसं वाटलं होतं.पण मुख्याध्यापक रागावले नाहीत. याचा अर्थ आपण जे करतोय ते त्यांना पटलं म्हणायचं. ती खुदकन हसली. मुख्याध्यापकांना तिने धन्यवाद दिले. मुख्याध्यापक त्यांच्या केबिनकडे निघून गेले.

मुख्यधापकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने काही दिवसांनी शाळेत, अर्थ क्लबची स्थापना केली. हवामान बदल आणि पर्यावरणाचा नाश,जागतिक तपमान अशा अपरिचित विषयांवर,ती शाळेत या क्लबच्या माध्यमातून भाषणं देऊ लागली. पृथ्वीचा जीव कसा धोक्यात आलाय, तिला वाचवली नाही तर आपण कुणीही वाचणार नाही असं ती ठोसपणे सांगू लागली.आपलं म्हणणं  बऱ्याच मोठ्यांना कां पटत नाही, आपण बोलतो तेव्हा ते कां हसतात याचं तिला कोडं वाटायचं. तिच्या वयोगटातील काही मुलं, अतिशहाणी म्हणून तिला हिणवायचे तर काही मुलांना मात्र तिचं म्हणणं पटायचं.अशी मुलं आता तिच्या क्लबची सदस्य झाली. पृथ्वीला वाचवा या मोहिमेस आणखीच धार आली.

आता तिचे अवकाश विस्तारले होते. तिने पुढे पर्यावरण बदलांविषयी जगभर जाणीवजागृती करणाऱ्या प्लांट फॉर द प्लॅनेट या, संघटनेच्या कार्यात झोकून दिले.

2017 सालं दोन गोष्टींसाठी तिच्यासाठी महत्वाचं ठरलं. एक घटना होती कॅनेडातील जंगलाला लागलेला वणवा. या वणव्यामुळे पश्चिम पॅसिफिक किनारपट्टीचा भाग काळ्या धुराने वेढला गेला. लोकांचे श्वास गुदमरु लागले. शेकडो लोक आजारी पडले. या मुलीस ही परिस्थिती बघवली नाही. तिने काही संस्थांचं सहाय्य घेतलं आणि थेट राज्यसरकारला जाब विचारला. त्यासाठी ती कोर्टात गेली. शुध्द पर्यावरण, शुध्द हवा मिळणं हा आमचा अधिकार , हे आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.सरकारच्या बेपर्वावृत्तीमुळे हे घडतय. आमच्या हक्काची पायमल्ली होत आहे.असे तिने या खटल्या दरम्यान ठणकावून सांगितलं..

आता तिच्याकडे थोरामोठ्यांचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले. मात्र तिने आपली पावलं जमिनीवरच घट्पणे रोवून धरली. कौतुक-प्रसिध्दीने ती वाहवत गेली नाही. माझं कौतुक करण्याऐवजी, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे घ्यायला सरकारला सांगा ना. नाहीतर आपल्यासोबत इतरही जीवजंतू नष्ट होतील. सर्वांना नष्ट करत असलेल्या विकासाला काय अर्थ, असं ती विचारायची. यावर मोठी माणसं फारसा प्रतिसाद देत नसतं. त्यामुळे तिला नैराश्य येऊ लागलं.

याच वर्षी अमेरिकेने पर्यावरणाविषयी करण्यात आलेल्या पॅरिस करारातून माघार घेतली. ही दुसरी घटना.

हे वृत्त कानावर पडताच यामुलीने आपलं नैराश्य झटकून टाकलं. पर्यावरण रक्षणासाठी सतत संघर्ष करण्यासाठी व त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने त्यासाठी झिरो अवर ही संस्था स्थापन केली.विविध प्रांतातील मुलांचा पाठिंबा मिळवला आणि हवामानबदलाबद्दल सर्वत्र जाणीव जागृतीसाठी चळवळ आरंभली. या संस्थेमार्फत ठिकठिकाणी मोर्चे निघू लागले. अधिकाधिक तरुण मुलं या चळवळीकडे ओढले गेले.पर्यावरण रक्षणासाठी या मुलीने सुरु केलेल्या या चळवळीची दखल आता राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर आर्वजून घेतली जाते.

आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ,ही सुंदर पृथ्वी नष्ट होऊ न देण्यासाठी

अथक प्रयत्नशील असणारी ही नव दुर्गा आहे अमेरिकत वास्तव्यास असणारी जेमी मार्गोलिन.

सुरेश वांदिले

७०१,सातवा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप,सेक्टर ६,कांदिवली-पश्चिम,मुंबई ६७

९३२४९७३९४७