(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

खरी दुर्गा

नवरात्रीमध्ये तेजोमयीची आई दररोज देवीची मनोभावे पूजा करते. देवघरात महालक्ष्मी,तुळजाभवानी या देविंच्या मूर्त्या आहेत. नवरात्रात देवघराची विशेष सजावट ठरलेली.

या देविंची पूजा आई कां बरं करत असावी, असा प्रश्न तेजोमयीस गेल्या वर्षी पडला. पण तो विचारण्याची हिम्मत झाली नाही. मात्र यंदा तिने हा प्रश्न आईला विचारलाच शेवटी.

या प्रश्नानं आई गडबडून गेली. तिने अलेक्झांडर(द डॉगी)कडे बघितलं. आईला काही सुचत नाहीय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने तेजोमयीकडे बघितलं. तेजोमयी, आईसमोर उत्तराच्या अपेक्षेत उभी होती. आता आईस काहीतरी बोलणं भाग होतं.

ती म्हणाली,

अगं देवीची पूजा केली की आशीर्वाद मिळतो. कोणत्याही संकटाशी सामना करण्याची शक्ती मिळते.

आई,सांगते ते बरोबर, का बाबा, तेजोमयीनं बाबांना विचारलं.

 आता बाबाही गडबडले. त्यांनीही अलेक्झांडरकडे बघितलं. अरे,या दोघांचं चाललय तरी काय. अशाने मला वेडा करतील, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. मी काय सांगणार बुवा, अशा आशयाची त्याने मुद्रा करुन तो आईच्या पायाशी जाऊन बसला..

काय बाबा, आई म्हणते ते खरय ना..तेजोयमीनं पुन्हा विचारलं..

आई म्हणते म्हणजे ते खरचं असणार ना..

कां?तुम्ही कां म्हणत नाही..

तू काहीही काय विचारतेस..आई किंचित रागावत म्हणाली.

अगं आई, मला एक सांग,तुझ्या आईच्या आईची आई सुध्दा नवरात्रात या दुर्गादेवीची पूजा करत असणार ना..

नक्कीच करत असणार..अगं ती आपली परंपरा आहे..

मग या दुर्गादेवी तुझ्या आजीच्या आजीला आणि तिच्या आजीला, प्रसन्न कां झाल्यात नाहीत.

आँ..म्हणजे गं काय?

म्हणजे असं की, तुझ्या आजोबाचे आजोबा  आणि त्यांचे आजोबा यांनी तुझ्या आजीच्या आजीला आणि तिच्या आजिला कां शिकू दिलं नाही..

कां दिलं नाही..सांग आता..बाबा हसू दाबत म्हणाले.

अहो हसता काय?तुमच्या सुध्दा आजोबाच्या आजोबांनी तुमच्या आजीच्या आजीला पाठवलं होत का शाळेत?आईनं बाबांना प्रश्न विचारुन डाव पलटवला..

दुर्गादेवीच्या पूजेवरुन एका आजीपासून दुसऱ्या आजीच्या शिक्षणापर्यंत चाललेल्या या प्रवासात दुसरंच काहीतरी निघणार हे बाबांनी ताडलं. त्यामुळे त्यांनी तेजोमयीस विचारलं, अगं,तुला म्हणायचं तरी काय..

अहो बाबा,दोन्ही कडच्या आजीच्या आजीला शिकता आलं नाही.हे सत्य मानता ना तुम्ही? दोन्ही कडच्या आज्यांच्या मदतीला कोणतीच देवी आली नाही.हे सत्य स्वीकारणार ना तुम्ही?

हो हो..

मग आईच्या आईला कां शिकता आलं..तुमच्या आईच्या आईला कां शिकता आलं.

कां म्हणजे..त्यांच्या बाबांनी त्यांचं नाव शाळेत टाकलं म्हणून..

वाSव बरोबर उत्तर ..पण या पणजोबा आणि खापर पणजोबांनी कां नाव टाकलं त्यांच्या मुलीचं..

तेजोमयीच्या या प्रश्नांच्या सरबत्तीने हळूहळू आईचा संयम संपत येत होता. बाबांना काही सुचत नव्हतं. या दोघांची अवघडलेली स्थिती बघून अलेक्झांडर मधेमधे शेपूट हलवून मजा घेत होता. हे आईच्या एकदा लक्षात आल्यानं तिने त्याचे कान पिरगळले. तेव्हा त्याने जिभ काढून सॉरीचा अभिनय केला…आता असच चालू राहिलं तर आई थोड्यावेळाने तेजोमयीचेही कान ओढल्याशिवाय राहणार नाही हे,अलेक्झांडरने ओळखलं. ही गंमत कधी घडते हे बघण्यासाठी तो आसुसला..

बाबांचेही ते लक्षात आल्यानं ते तेजोमयीस म्हणाले, अगं तुझ्या मनात काय चाललय ते सांगून टाकना, उगाच कशाला प्रश्न विचारित बसलीस आम्हाला..

हो हो सांगून मोकळी हो बाई..माझी पूजा राहिलीय..

अगं आई..माझ्या खापरपणोजबांना आईला शिक्षणाची प्रेरणा देवघरातल्या तुळजाभवानीने दिली नाही..

काही तरी बडबडू नकोस..आई तेजोमयीस रागावली..

ऐकून तर घे..

   हं..

दुर्गादेवी तर त्याआधीही होत्याच ना देवघरात.. पण तेव्हा सावित्रीबाई नव्हत्या..ना

आँ.

होय आई, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण देण्यासाठी अथक प्रयत्न केले. कष्ट केले. त्रास सहन केला, तेव्हा कुठे महिलांना मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची संधी मिळू शकली….म्हणजे त्याच खऱ्या अर्थाने दुर्गादेवी..

पटतय बाळ तुझं म्हणणं मला..

पटतय ना मग तू देवघरात, तुळजाभवानी, महालक्ष्मी यांच्यासोबत सावित्रीबाईंचा फोटो कां नाही ठेवत?कां नाही त्यांची पूजा करत?..

हा प्रश्नरुपी बॉब्म असल्याचं बाबांच्या लक्षात आलं. तो कधी कसा फुटणार हे काही सांगता येत नव्हतं..मात्र तसं काही झालं नाही..

आईने तेजोमयीस जवळ घेतलं..आईचे डोळे भरुन आले..

अगं बाळं..हे असं कुणीतरी सांगायला हवं किंवा सुचवायला हवं ना..मी आपली झापड लावून जे आधी होत होत ते करतेय..पण तू आज माझे डोळे उघडले हो बाळ..

बाबांचेही डोळे भरुन आले.त्यांनी तेजोमयीला कवेत घेतले. अस्फुटसा हुंदका दिला..

हे अश्रू ढाळणं कशासाठी चाललय हे अलेक्झांडरच्या लक्षात आलं नाही. परिस्थिती जरा गंभिरच दिसतेय हे मात्र त्याने ताडले. आईच्या कुशित शिरुन त्याने आईच्या गालाला हळूवार पंजा घासला..आईची समजूत घालण्याची ही त्याची पध्दत होती…

सुरेश वांदिले