जादूची शाळा
बाबांनी एक सणसणित पिल्लूच्या कानशिलात ठेवली. बाबा असं काही करेल असं पिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्याला हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, तो फार तर, नाही रे माझ्य राज्या, पुन्हा कधीतरी, असं म्हणून पिल्लूच्या गालावर एक हलकीशी टपली मारायच. पण आज भलतच घडलं. एक सणसणित थापड पिल्लूला बसली. पिल्लूला रडू तर येत होतच, पण बाबांच्या या कृतीचा त्याला धक्का बसला. त्यामुळे तो काही क्षण स्तब्ध झाला. भानावर आल्यावर त्याने मग भोकांड पसरलं.
पिल्लूचा हट्ट तरी काय होता? तो आज सकाळपासून जादूच्या शाळेत शिकायचं म्हणजे शिकायचं, यावर अडून बसला होता. बाबा त्याला समजावत होता, की अशी काही शाळा नसते म्हणून. पण तो ऐकायला तयारच होईना. मग हॉगवर्ट काय ? असं त्याने विचारलं. हॅरी पॉटर कसा गेला तिथं शिकायला ? मग मी कां नाही ? असं विचारलं.ते व्हा बाबाने त्याला हॅरी पॉटरची कथा कशी काल्पनिक आहे. तो कसा काल्पनिक आहे. त्याने केलेले चमत्कार कसे काल्पनिक आहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण पिल्लू काही एैकेना. जादूच्या शाळेत शिकण्याचा हट्ट काही तो सोडेना. जादूच्या शाळेत टाकलं नाही तर मी शिकणारच नाही असं जेव्हा पिल्लू बोलून गेला तेव्हा मात्र बाबाची सहनशक्ती संपून त्याने पिल्लूच्या कानशिलात ठेऊन दिली.
पिल्लूचा हा हट्ट चमत्कारिकच होता. पण म्हणून काही बाबाने त्याला असं मारायला नको होतं. असं आईला वाटलं. बाबांचा राग बघून तिने पिल्लूला आतल्या खोलित नेलं. माझं काय चुकलं गं, म्हणून पिल्लू आईच्या कुशित शिरुन हसमसून रडू लागला. आई त्याला समजावू लागली. पण पिल्लूचं रडणं काही कमी होईना. आता काय करावं बरं. आईला प्रश्न पडला. बराच वेळ झाला तरी त्याचं रडणं थांबेना. तेव्हा आईलाही, त्याचा ख्रर तरच राग आला होता. पण ती काही बाबांसारखी कृती करु शकत नव्हती.
आता काय करावं बरं? ती स्वत:शीच म्हणाली. रडत असूनही पिल्लू, आईचं ते बोल ऐकून बोलून गेला, मला जादूच्या शाळेत शिकायला पाठव ना गं आई. अं , हो हो नक्कीच पाठवीन हं राज्या तुला मी. आई बोलून गेली. हे ऐकताच पिल्लूचं रडणं थांबलं. तो चटकन उठून बसला. त्याने आईला मिठी मारली. हलकीशी पप्पी घेतली. यू ऑर ग्रेट आई. असंही म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू परत आल्याचं बघून आई आनंदली.
थोड्यावेळानं पिल्लू आईला विचारुन बाहेर खेळायला गेला. बैठकीच्या खोलित बसलेल्या बाबांकडे त्याने बघितलेसुध्दा नाही. त्याचं रडणं थांबलेलं बघून बाबांना बरं वाटलं. पिल्लू बाहेर गेल्यावर आई बैठकीच्या खोलित आली.
कोणती जादू केलीस गं तू, पिल्लू खुषित दिसला. जादूच्या शाळेत शिकण्याचं भूत गेलं की नाही त्याच्या डोक्यातून. खुळा कुठला. बाबांनी विचारलं.
आता काय उत्तर द्यावं, हे आईला कळेना. ती काही क्षण चूप राहिली. तेव्हा बाबांनी पुन्हा तेच विचारलं. आता मात्र आईनं खरं ते सांगून टाकलं.
म्हणजे तू त्याला खोटं आश्वासन दिलं? जे शक्य नाही ते सांगितलंस?
अहो, ते इतकं उर्त्स्फुत झालं, की मला सुध्दा कळलं नाही.
आता, कुठून आणायची आपण ही जादूची शाळा. बाबांनी विचारली. अगं जादू-बिदू काही असतं का खऱ्या जगात. हे समजावयचं सोडून हे काय भलतच सांगून बसलीस. बाबा थोडं नाराजिनं म्हणाला. बाबा म्हणाला ते खरच होतं.
आता काय, आई म्हणाली.
आता काय,बाबाही म्हणाला.
००००
पिल्लूच्या डोक्यातून जादूची शाळा गेली नव्हती. अधूनमधून तो त्याची भूणभूण सुरुच असायची. ते ऐकूण आई वैतागायची. पण ती आता चक्रव्युहात सापडली होती. त्यातून बाहेर कसं पडायचं हे तिला काही सुचत नव्हतं.
आपण खोटं बोललो, असं पिल्लूला सांगितलं तर त्याला काय वाटेल. त्याला आपण सतत सांगत असतो की खोटं बोलायचं नाही. खरं तेच सांगायचं. आईच जर खोटं बोलत असेल तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल बरं. पण बाबा खरं बोलला तर ते त्याला पटलं नाही. खोटं बोलण्यानं त्याच्या चेहऱ्यावर आनंद आला. आईचं विचारचक्र सुरु झालं. खरं सांगितलं तर खोटं खरं समजायचं की खोटं सांगितलेल खरं समजायचं? असं तिनं स्वत:ला विचारलं. आईला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळेना. पिल्लूला काय सांगावं हे कळेना.
एके दिवशी सकाळीच पिल्लूने पुन्हा जादूच्या शाळेची भूणभूण लावली तेव्हा आईच्या मनानं काही तरी ठरवलं. दुपारी ती पिल्लूला घेऊन ती शहरातील मोठ्या ग्रंथालयात घेऊन गेली. पिल्लू पहिल्यांदाच तिथे गेला होता. तेथील अबब करायला लावणारे पुस्तकं,ग्रं थ,मासिकं बघून तो हरखून गेला. खरं तर तो हरवूनच गेला. जिकडे पाहावे तिकडे ग्रंथच ग्रंथ. लहान-मोठ्या आकाराचे. कथा कविता, कॉमिक्स, कादंबरी, विज्ञान, मुलांची, महिलांची अंधांसाठी असलेली अशी नाना तऱ्हेची पुस्तकं. त्याने कधी बघितलं नव्हतं असं काही.
आईनं ग्रंथालय दाखवल्यावर त्याचे शुल्क भरुन त्याला ग्रंथालयाचं सदस्य केले. ग्रंथपालाने त्याला मुलांच्या गोष्टीची पाच पुस्तकं दिली. महिन्याभरानंतर ती पुस्तकं परत करायची होती. मोठ्या आंनदानं खुषित पिल्लू घरी परतला. घरी आल्यावर आईनं विचारलं,
कसं वाटलं तुला पिल्लू.
एकदम भारी.
म्हणजे काय? हॉगवार्टच्या शाळेसारखं का ?
आँ. त्याचा इथं काय संबंध बरं?
आपण चुकीचं बोलून गेलो,हे आईच्या लक्षात आलं नि ती चूप बसली.
अगं आई, मी तुला जादूच्या शाळेत घेऊन जा असं म्हणालो पण तू नेलंस ते ग्रंथालयात. पण ते सुध्दा भारी आहे हं.ग्रेट. जाम आवडलं बुवा.
असंच मला आता जादूच्या शाळेतही घेऊन जा बरं एक दिवसं, पिल्लू लाडानं म्हणाला.
आईला वाटलं होतं की, ते अवाढव्य ग्रंथालय बघून पिल्लू जादूची शाळा विसरुन जाईल. पण पिल्लूचं मन मात्र त्यातच गुंतून होतं.
जादूची शाळा-बिळा काही नसते बाळा,असं सांगून टाकावं, असं आईस वाटलं. असं सांगितलं तर पिल्लूचा आपल्यावरचा विश्वास उडणार हे तिला ठाऊक होतं. आई काहीच बोलत नाही बघून पिल्लू म्हणाला,
हे बघ आई, तुला जर जादूच्या शाळेत मला टाकायचं नसेल तर तसं सांग ना. माझी खोटी समजूत घालू नकोस बाँ.
तसं नाही रे राज्या, जादूच्या शाळेचा पत्ता मला अजून मिळाला नाहीय ना. आई बोलून गेली.
पुन्हा आपण पिल्लूशी खोटं बोलल्याचं बघून आईस खूप वाईट वाटलं.
सुरेश वांदिले
००००