(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

कॅक्टस?

गॅलरितील बागेमध्ये तेजोमयीच्या आईने मोठ्या प्रेमाने ब्रम्हकमळ लावलं होतं. या झाडास फुल आलं की आई त्याविषयी आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना उत्साहाने साग्रसंगीत सांगायची.

कळी आल्यापासून ते कळीचं रुपांतर पूर्ण फुलात होईपर्यंत आईचं ब्रम्हकमळय होऊन जाणं हे नित्याचचं झालं होतं. याचं आताशा बाबा आणि तेजोमयीस फारच नवलं राहिलं नव्हतं.

मात्र काही महिन्यांपासून आईच्या ब्रम्हकमळ साग्रसंगीत उत्सवात अलेक्झांडर (द डॉगी)चा समावेश झाला होता. यावर्षी तोही ब्रम्हकमळमय होऊन गेला.

यंदा आईने कळी आली त्या दिवसापासून दररोज व्हीडियो चित्रिकरण केलं. त्यामुळे कळीची वाढ, पूर्ण उमलेलं फुल असा प्रत्येक टप्पा, चित्रित झाला. हा यंदासाठी आईचा नवा आनंद होता.

या आनंदात परवा एक मीठाचा खडा पडला. तिच्या चुलत बहिणीने, ब्रम्हकमळाविषयी एका व्हॉटसॲप ग्रुपवर आलेली माहिती पाठवली. त्यात म्हंटलं होतं की अनेकांच्या घरी असतो तो खरा ब्रम्हकमळ नाहीच्च मुळी. तो एक प्रकारचा कॅक्टस आहे. खरा ब्रम्हकमळ फक्त हिमालयातच एके ठिकाणी उगवतो..

आईने ती माहिती जोराने वाचून दाखवली.

मग आई, तू आता काय करणार? तेजोमयीनं विचारलं.

दु:खी-बिख्खी होऊ नकोस,बाबांनी सल्ला दिला..

अहो, मी कशाला दु:खी होऊ….आपल्या घरी असणारं झाडं कॅक्टसचं असेल म्हणून काय झालं, त्याला येणारी कळी, मग आठ-दहा दिवस तिचं हळूवार मोठं होणं आणि एके दिवशी रात्री छान उमलणं, किती आनंददायी असतं. हे फुल समजा ब्रम्हकमळाचं नसेलही पण पूर्ण उमलेलं फुलं, त्यातले डोलणारे तुरे, कमळाच्या आकाराच्याच पाकळया, थोडा करड्या रंगाची छटा ल्यालेला पांढरा शुभ्र रंग, अहाहा याचा आनंद काय वर्णावा…आई म्हणाली.

बाबा आणि तेजोमयी आईकडे बघतच राहिले. छोट्या छोट्या गोष्टितही आंनद शोधणारी आई खूप ग्रेट असल्याचं तेजोमयीस वाटलं.

तुझ्या आधी ते मला कळलं बाई, असे भाव त्यावेळी अलेक्झांडरच्या डोळयात उमटले होते.

आपणास हे कधी बरं जमेल, असं त्यावेळी बाबांना वाटून गेलं…

सुरेश वांदिले