(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

साशा आणि पायपर

साशा आणि पायपर यांची गोष्ट तुम्हास माहीत आहे का ? काहिंनी ठाऊक असू शकते तर काहींना नाही. तर साशा म्हणजे मी आणि पायपर म्हणजे तो.

हे मी आणि तो कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर मी साशा आणि तो पायपर..हा हा..हा..

 तर आम्ही दोघेही राहतो सिंगापूरमध्ये. या देशातील मिस्टर एक्सवायझेड किंवा श्रीयूत अबक यांचे आम्ही दोघेही शेपूटवाले खास दोस्त.

आम्ही दिसायला गोड-गोबरे-गोंडस-गोजिरवाणे आहोतच. त्यामुळे एक्झवायझेड यांचे खूप खूप लाडके सुध्दा. खा-प्या-मौजमस्ती करा. अशी आमची तिघांची दे धम्माल सुरु असते दररोज.

आमचे मित्र एक्सवायझेड, आम्हा दोघांनांही नव्या फॅशनचे नवे कपडे घालायला देतात. बूट घालायला देतात. झक्कास अशी नेकटायही त्यांनी आणली आमच्यासाठी, परवाच. अहाहा, आमचा स्मार्टनेस कैकपटिने वाढला की ही नेकटाय घातल्यावर..एक्झवायझेडने तर चक्क आनंदानं उडीच मारली. त्याने आमच्या सोबत एक सेल्फी काढली.

आता, सेल्फी मधील सेल्फचा अर्थ स्वत:साठी  असला तरी, त्या अर्थाकडे कोण लक्ष देतय म्हणा. तर आमचे मित्र एक्सवायझेड यांनी ही सेल्फी लगेच टाकली इंस्टाग्रॉमवर. अहो, चमत्कारच झाला नंतर. आमच्या सेल्फीला इतक्या लाईक्स मिळाल्या की काय सांगावं तुम्हाला. बघता बघता हा आकडा हजारात गेला. आमची लोकप्रियता बघून एक्सवायझेडने आमच्या दोघांचं लोमोडॉगिज, हे खास अकाउंट (खातचं) उघडलं. काही दिवसातच आम्हाला २४ हजार फॉलोअर्स पाठिराखे मिळाले. ही संख्या अजूनही वाढतचे आहे.

आणि मग एके दिवशी एक्झवायझेड यांच्याकडे एक कुणीतरी जाहिरातदार आला. शेपूटवाल्या दोस्तांसाठीचे स्पशेल खाद्य, या जाहिरातीचे मॉडेल आम्हाला करण्यात आलं. त्यानंतर मग आम्ही व्हॅक्यूम क्लिनर ते जोडे अशा विविध प्रकारात जाहिराती केल्या.

एका जाहिरात कंपनीने आमच्याशी करारही केला. आम्ही स्टार म्हणजे तारे झालोत.

किती हुषार नाही का दोन पायांचा आमचा दोस्त ! कसं कळतं, सुचतं अशा कल्पना बरं यास. स्मार्टनेस आमचा, पैसा त्याला..यालाच तर आयत्या बिळावर नागोबा म्हणत नसावेना..पायपरने एकदा मला म्हणजे साशाला विचारलं.

जाऊ दे रे, नागोबा आपल्याला डंख मारत नाही ना, तोपर्यंत आपणही मिरवायचं की मस्त..

माझं म्हणणं त्याला पटलं नाही आणि त्याचं म्हणणं मला पटलं नाही.. पण त्यामुळे  काही फरक पडला नाही.

जाहिरातीमुंळे आम्ही स्टार झाल्यानं, आमचं कौडकौतुक जरा जास्तच व्हायला लागलं. मात्र परवा एक्सवायझेडला कळल की ब्रॉसी मॅऊंलिंग्टन हिला इंस्टाग्रॉमवर ५० हजार  पाठिराखे आहेत.. आमच्या मनात पाल चुककली की हो..ही ब्रॉसी म्हणजे मांजर ताई..आमची एवढीच इच्छा आहे की ही मांजर आम्हाला आडवी जाऊ नये म्हणजे मिळवलं….

सुरेश वांदिले