
वाचा म्हणजेच कळेल!
आयआयटी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगसाठी हजारो पालक अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यापलिकडे आपली काही जबाबदारी असू शकते, यावर बहुसंख्य पालकमंडळी विचार करत नाही. कोचिंग क्लासच्या दावणीला मुला/मुलींना बांधले की, संपली आपली जबाबदारी, असं बहुतेक पालकांना वाटत असावं. उदारहण द्यायचं झालं तर, कोचिंग क्लासवर पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या बहुतांश पालकांना, आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ-मेन) या परीक्षेचं माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावेसे वाटत नाही. शंभरच्या आसपास पानांच्या या माहितीपत्रकात, या परीक्षेविषयी प्रत्येक गोष्ट किंवा बाब स्वंयस्पष्टपणे दिली असते.
प्रवेश प्रकियेमध्ये वेगवेगळया प्रकाराच्या आरक्षणाचा, सुट-सवलतींचा लाभ दिला जातो. त्यासाठीचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे कोणती लागतात, याचे सविस्तर विवेचन या पुस्तिकेत दिलले असते. याशिवाय प्रमाणपत्रे किंवा अर्जाचे नमुनेही दिले असतात. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवेश प्रकियेची सुरुवात ते प्रत्यक्ष प्रवेशाचा कालावधी हा किमान सहा महिन्यांचा असतो. या सहा महिन्यात ही प्रमाणपत्रे गोळा करुन ठेवण्याची जबाबदारी, ही पालकांची असते. सहा महिने आधी पूर्वसूचना देऊनही, दरवर्षी प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पालकमंडळी धावपळ करतात. प्रमाणपत्र कोणते नि ते कुठे मिळते, हेच आम्हाला माहीत नव्हतं, असं चमत्कारिक उत्तर दिलं जातं. पालकसंघामार्फत वृतपत्रादीनिवेदनाव्दारे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यासाठी निवेदन दिली जातात. काही राजकीय नेत्यांना सांगून दबावही आणला जातो. दरवर्षी असेच होत असते. याचं महत्वाचं कारण म्हणजे माहिती पुस्तिकाच न बघणे, बघितली तर वरवर चाळणे किंवा बघून न बघितल्यासारखं करणे.
प्रमाणपत्रांचे नमूने
विविध जात प्रवर्गातून प्रवेशासाठी, विहित नमुन्यात प्रमाणपत्र लागते. राज्य आणि केंद्रशासनाचे हे प्रमाणपत्र नमुने वेगवेगळे आहेत. त्यामुळेच त्यांचा नमुना दिला जातो. तो घेऊन संबंधित (राज्य शासनाच्या जिल्हाधिकारी/ उपजिल्हाधिकारी/ तहसलिदार) अधिकाऱ्यांकडे जाऊ त्यांच्या निदर्शनास आणायला हवे. तसे होत नाही. मग कोणता तरी, दलाल किंवा असाच एखादा चाणाक्ष व्यक्ती, ही चूक किंवा घोडचूक बरोबर हेरतो आणि पालकास जाळयात अडकवतो. त्याची किंमत वसूल करुन तो प्रमाणपत्र मिळवून देण्यास साहाय्य करतो. खरंतर याची काहीच गरज नसते. वेळेवर अर्ज केला, अधिकाऱ्यांना भेटलो किंवा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रकिया समजून घेतली तर हा पैशाचा अपव्यय आणि मनस्ताप थांबवू शकतो. शिवाय, सध्या बहुतेक प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. ती आताच समजून घेतली, तरी पुढच्या काही महिन्यात प्रमाणपत्राचे काम सुरळीत मार्गी लागू शकते.
गुणाणुक्रमाचे सूत्र
जेईई ही परीक्षा प्रचंड स्पर्धेची. या परीक्षेमध्ये एका एका गुणांचं महत्व अनन्यसाधारण असतं. त्यामुळे विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करतात. वेगळ्या इर्षेने ही परीक्षा देतात. अनेक विद्यार्थ्यांना समान गुण मिळतात. त्यामुळे त्यांचा गुणानुक्रम ठरवण्यासाठी काही सूत्रं ठरवण्यात आली आहेत. यासूत्रांची विस्तृत माहिती माहिती, या पुस्तिकेत देण्यात येते. ही सूत्रे प्रत्येक पालकाने समजून घेतली पाहिजे. समान गुण मिळवून आपला मुलगा किंवा मुलगी, खालच्या क्रमांकावर कसा? अशी शंका बऱ्याच पालकांना येते. ते मग ,परीक्षेत गडबड, पेपर तपासणीत गडबड, अशा प्रकारचा सुर आवळतात नि स्वत:सोबतच इतरांनाही गोंधळवून टाकतात नि घाबरवून टाकतात. त्यामुळे परीक्षा प्रकियेवरही बऱ्याच जणांना संशय घ्यावासा वाटतो. हे खरंतर फारच दुर्देव्यी आहे. अत्यंत काटेकोरपणेच जेइइ परीक्षा घेतली जाते. कुणावरही अन्याय होऊ म्हणूनच, अशी सूत्रे तयार केली जातात. ती वाचल्याशिवाय कळणार कशी? ज्या पालकांना ही सूत्रे कळणार नाहीत, त्यांनी कोचिंग क्लासवाल्यांकडे धाव घेऊन समजून घ्यायला हवे. मात्र, त्याआधी पालकांनी माहितीपत्रकाचे प्रत्येक पृष्ठ डोळयाखालून घालायला हवे.
केवळ विज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण, विद्यार्थ्यांना जेइइ देता येते, असेच बहुतेक पालकांना वाटते. पण ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीसुध्दा, ही परीक्षा देऊ शकतात, हे किती जणांना ठाऊक आहे?
दिव्यांग संवर्ग
दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राखीव जागा असतात. हे दिव्यांग कोणते? त्याची अर्हता काय? ते प्रमाणपत्र कुणाकडून मिळवायचे, याविषयी आतापासूनच तयारी करणं गरजेचं असतं. दिव्यांगासाठी आवश्यक प्रमाणपत्राचा नमुना या माहितीपुस्तिकेत देण्यात येतो. त्याच नमुन्यात व नमूद केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. इतर कोणतंही प्रमाणपत्र चालत नाही. हे समजून घेतले जात नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी निर्धारित डॉक्टरांचे व नमुन्यातील प्रमाणपत्र सादर केले जात नाही. अशांचा मग, प्रवेशासाठी विचार होत नाही. पालकमंडळी आपल्यावर कसा अन्याय झाला, याचं रडगाणं गात बसतात आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
ज्या दिव्यांगाना लेखनिक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक घेण्याची सवलत दिली जाते, त्यांना एक तास अधिकचा दिला जातो. ही सवलत त्यांनी घेतली नाहीतरी, हा एक तास पेपर सोडवण्यासाठी दिला जातो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ला विनंती केल्यावरच असे, साहाय्यक मिळू शकतात, ही बाब ध्यानात ठेवायला हवी. (दिव्यांगाचं प्रमाण निर्धारित टक्केवारीत नसताना एखाद्याने अशा सवलतीचा लाभ घेतल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास, त्याला संपूर्ण प्रवेश प्रकियेतून बाद केले जाते.) दिव्यांगासाठी असेलेले, युनिफाइड डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन, हे प्रमाणपत्र, जेइइ मेन परीक्षेचा अर्ज सादर करतानाच अपलोड करावा लागतो. परीक्षा केंद्राची निवड करताना, चार केंद्रांची नावं अर्जात नमूद करता येतात. मात्र, ही केंद्रे अथवा शहरे, सध्या उमेदवाराचा जो पत्ता असेल त्याच राज्यातील असणं आवश्यक आहे.
ॲडमिट कार्ड
परीक्षेचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) हे पोस्टाने पाठवले जात नाही. ते ई पध्दतीनेच म्हणजेच ईमेलवर पाठवले जाते. या कार्डावर कोणतीही खाडाखोड वा बदल करता येत नाही. तसे केल्याचे आढळल्यास कार्यवाही होऊ शकते. अपूर्ण अर्ज वा संशयास्पद छायाचित्र अथवा खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास, ॲडमिट कार्ड दिले जात नाही.
ॲडमिट कार्डवर नमूद केलेले परीक्षा केंद्र कोणत्याही स्थितीत बदलवून दिले जात नाही. परीक्षा केंद्रावर ॲडमिट कार्ड नेणे अत्यंत आवश्यक. ते नेले नाही वा घरी विसरल्यास , कोणत्याही स्थितीत परीक्षेला बसू दिले जात नाही.
ॲडमिट कार्डवर नमूद विषयानुसारच, संगणकावर पेपर दिला जातो. समजा तसा तो आला नाही, तर संबंधित उमेदवाराने तत्काळ निदर्शनास आणणे गरजेचे. त्याला सर्व प्रकारचे तांत्रिक साहाय्य पुरवलं जाते.
ॲडमिट कार्ड सोबतच, अधिकृत शाळा ओळख पत्र/ व्होटर कार्ड/छायाचित्र असलेले आधार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ वाहन चालक परवाना/ छायाचित्रासह रेशन कार्ड/ छायाचित्र असलेले एचएससी बोर्ड परीक्षेचे ॲडमिट कार्ड/ छायाचित्र असलेले बँकेचे पासबूक, यापैकी कोणतेही एक ओखळपत्र सोबत असणं आवश्यक.
परीक्षा केंद्रात,किमान दोन तास आधी उमेदवारांनी हजर राहण्याची स्पष्ट सूचना एनटीएने केली आहे. कोणत्याही कारणांमुळे उशीर झाल्यास, परीक्षा हॉलमध्ये देण्यात येणाऱ्या महत्वाच्या सूचनांपासून असे उमेदवार वंचित राहू शकतात. त्याची जबाबदारी एनटीए घेत नाही.
अशा प्रकारची अत्यंत महत्वाची माहिती या पुस्तिकेत देण्यात येते. विद्यार्थी अभ्यासात मग्न असताना पालकांनी या पुस्तिकेचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
सुरेश वांदिले