(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बिग डाटा बायोलॉजी

जैविक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी माहितीवर विश्लेषण करण्यासाठी डाटा सायंटिस्ट आणि डाटा इंजिनीअर्स या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. ही गरज लक्षात घेऊन इंस्टिटयूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स ॲण्ड ॲप्लाइड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने, एम.एस्सी इन बिग डाटा बायोलॉजी, हा अभिनव अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञान,जीवशास्त्र,गणित आणि डाटा ॲनॅलिटिक्स या विषयांचे संमिलीकरण करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा आहे.विज्ञान शाखेतील विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते.त्यानंतर मुलाखती घेतल्या जातात.

 जैविक शास्त्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विविध विषय घटकांमध्ये अभ्यास आणि संशोधन होत आहे. यामुळे अवाढव्य असा माहितीचा साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या माहितीच्या साठ्यातून सुयोग्य माहिती आणि आकडेवारी योग्य त्या कार्यासाठी आणि वेळेवर उपलब्ध करुन घेणे,त्याचे विश्लेषण करणे हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे.

बिग डाटा ॲनालिसीस या नव्या तंत्रामुळे औषधी निर्माण आणि आरोग्य सेवांवर महत्वाचा परिणाम झाला आहे. क्लॉउड कॉम्‍प्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळया प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करुन जैविक संशोधन व आरोग्य विषयक संशोधन अधिक प्रभावी व अचुकरीत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा अभ्यासक्रम आंतरशाखीय अभ्यासक्रम असून तो आरोग्य क्षेत्रातील प्रचंड मोठया प्रमाणावर निर्माण झालेल्या माहितीच्या साठ्याचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी कौशल्य आणि तंत्र प्रदान करणारा आहे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात संगणकीय, सांख्यिकी आणि अभियांत्रिकी विषय घटकांचा समन्वय साधन्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची संरचना ही या क्षेत्रातील सध्या कार्यरत असणाऱ्या उद्योजकीय तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग,इमेज इन्फॉर्मेटिक्स आणि जेनोमिक्स या घटकांवर आधारित सहा महिन्यांचा प्रकल्प करावा लागतो. यामध्ये या या क्षेत्रातील उद्योगांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले जाते.

या अभ्यासक्रमात जैविक माहितीसाठ्याचा अभ्यास आणि विश्लेषण करता येण्यासाठी मशिन लर्निंगचा विकास, प्रतिमांची प्रकिया आणि क्लिनिकल डाटा ॲनालिसीस यांचा ठळकपणे समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे.

संपर्क – बायोटेक पार्क, इलेक्ट्रॉनिक्स सिटी फेज वन, बेंगळुरु – ५६०१००, दूरध्वनी-०८०-२८५२८९००, फॅक्स-२८५३८९०४, संकेतस्थळ- https://www.ibab.ac.in/