(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

मूड

सगळ्यांच्या आधी उठून, आईस थोडा उठायला उशिर झाला तर तिच्याजवळ जाउुन तिला जागा करणाऱ्या, सकाळी खेळण्याच्याच प्रफ्फुलित मूड मध्ये असणाऱ्या अलेक्झांडर(द डॉगी)चं आज काहीतरी बिनसलं होतं. आई, तेजोमयी आणि बाबा उठले तरी तो त्याच्या अंथरुणावरच डोळे मिटून पडला होता. बऱ्याच दिवसात असं घडलं नव्हतं. त्यामुळे तिघांनांही आश्चर्य वाटलं.

काय रे ठोंब्या बरं नाही का तुला, असं म्हणून आई तिच्या कामाला लागली. बाबा फिरायला निघून गेले. तेजोमयी कथ्थक सरावात गुंग झाली. तास दीड झाला तरी अलेक्झांडरची काहीच चाहूल लागेना. एरव्ही सकाळच्या प्रहरी या खोलितून त्या खोलित जा, आईच्या अवतीभवती राहून तिच्याकडून लाड करुन घे, कधी तेजोमयीच्या कथ्थक नृत्याकडे टक लावून बघ तर कधी बाबांसोबत फिरायला जाण्यासाठी तयार हो, असं त्याचं काहीबाबी चालायचं. पण आईची सकाळची कामं आटोपत आली, तेजोमयीचा सराव संपत आला आणि बाबा फिरुन आले तरी, हा आपल्याच जागेवर झोपून.

बाबांनी आल्या आल्या, अलेक्झांडर उठला की नाही याची चौकशी केली. कामाच्या गडबडित विसरुनच गेले बाई, असं म्हणून आई अलेक्झांडरकडे गेली. आईने अलेक्झांडच्या पाठीवरुन मायेने हात फिरवला. त्याला मांडिवर घेतले. पाठ थोपटली. एरव्ही त्याच्यासाठी हे सर्वात मोठे सुख. पण आज मात्र अलेक्झांडरने काहीच प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ डोळेही उघडले नाही.

बाबा, अलेक्झांडरला काही झाले तर नसेलना, तेजोमयीनं विचारलं.

आता ते आपल्याला कसं समजणार. पोट दुखतं का रे, असही त्याला विचारता येत नाही. आई म्हणाली.

आईच्या चेह-यावर हळूहळू काळजीचे ढग दाटू लागले. सगळयात जास्त रागावणं तिच्‍याकडून येत असलं तरी आईचीच माया आपल्यावर अधिक असल्याचं, अलेक्झांडरला कळलं होतं. त्यामुळे त्याची गट्टी आईशीच अधिक होती. त्यामुळे तो काहीच प्रतिसाद देत नाही हे बघून काही वेळाने आई रडवलेली झाली.

अगं, रडतेस कशाला? आपण डॉक्टरांना दाखवू या ना अलेक्झांडरला. असं आईला समजावत त्यांनी डॉक्टरांशी झूमवरुन संपर्क साधला. स्क्रीनसमोर अलेक्झांडरला घेऊन आई बसली. डॉक्टर स्क्रीनवर दिसताच आई ने हुंदका दिला.

वहिनी, अशा रडू नका. काळजी कशाला करता डॉक्टर म्हणाले.

बघाना, कसा बिचारा मलूल झालाय. आई स्फुंदत म्हणाली.

अलेक्झूच्या आई, त्याला बिचारा नाही समजायचं, कधीकधी शेपुटवाल्या दोस्तांना गप्प आणि शांत राहावं वाटतं. त्यांना  आपल्यासारख्या भावना असतात. ते काही चाबी देणारे यंत्र नाहीत. चाबी दिली की सतत आपल्या मनोरंजनासाठी त्यांनी उड्या माराव्यात, गिरक्या घ्याव्यात, शेपटू हलवून शेक्हँड करावा.. त्यांनाही मूड असतो तो अधूनमधून जाऊ शकतो. थोडा वेळ गेला की आपणास कसं बरं वाटतं, उत्साह वाटतो. तसच अलेक्झांडरचही होईल बघा. थोडा काळ त्याला तसच राहू द्या शांत. याउपरही तो तसाच पडून राहिला तर मी आहेच की, त्याला बरं करायला.. आता हसा बघू.. डॉक्टर काका म्हणाले. त्यांच्या आश्वासक बोलण्यानं आईच्या डोक्यावरील मळभ दूर झाले. तणाव कमी झाला.

अलेक्झांडरला सुध्दा कधी कधी त्याचाच फक्त वेळ द्यायला हवा, असा धडा आपल्याला मिळाला आई, तेजोमयी आईकडे बघत म्हणाली.

हो गं माझ्या शहाण्या बाळा, म्हणून आईने तेजोमयीची पप्पी घेतली.

सुरेश वांदिले

९३२४९७३९४७

००००