आनंदाचा ठेवा
घरी आल्या आल्या समीर रडू लागला. हे बघून आईला आश्चर्य वाटलं. त्याला कुशित घेत तिने विचारलं, काय झालं बाळा..
तेव्हा काहीही न बोलता समीरनं हुंदका देत वार्षिक परीक्षेची गुणपत्रिका तिच्या हातात दिली.
गुणपत्रिकेतील गुण बघून आई उत्सूर्फतपणे वावा ,असं म्हणून गेली. वर्गात समीरचा दुसरा क्रमांक आला होता. इंग्रजी, मराठी हिंदी, गणित, इतिहास, भूगोल विज्ञान यात त्याला 80 टक्क्यांहून अधिक गुण होते. इतका चांगला निकाल लागला असताना हा रडतोय कशाला, हे आईला कळेना. त्याला जवळ घेऊन त्याचे डोळे पुसत आणि प्रेमानं केसांवरुन हात फिरवित आईनं, पुन्हा विचारलं,
बाळ काय झालं रडायला,
समीरने तिचं लक्ष गुणपत्रिकेतील चित्रकला या विषयाच्या गुणांकडे वेधलं. त्यात त्याला जेमतेम गुण मिळाले होते. खरं तर तो नापास होता होता राहिला होता.
ते गुण बघून आई खुदकन हसत म्हणाली, हात्तीच्या चित्रकलेच्या गुणांसाठी तू रडतोस होय.अरे, या विषयात कमी गुण मिळाले तरी काहीच बिघडत नाही ना.. मग कशाला एवढं दु:ख करतोस.
पण, आई मला चित्रकला विषय खूप आवडतो. चित्र काढताना खूप आनंद मिळतो. पण व्यवस्थित चित्र काढायला जमत नाही. त्यामुळे कमी गुण मिळाले. तुला याचं दु:ख नाही झालं.. समीरनं विचारलं..
यात काय दु:ख करण्यासारंख. अरे तुला गणित,इंग्रजी आणि विज्ञान विषयात उत्तम गुण मिळाले आहेत. चित्रकलेचा पुढे थोडाच उपयोग होतो..
पण आई मला ते विषय आवडत नाही. समीर आईकडे बघत म्हणाला..
०००
त्यादिवशी समीर नीट जेवला सुध्दा नाही. त्याच्या आवडत्या नटाचा चित्रपटाला जायची बाबांची कल्पना त्याने फेटाळून लावला. आजोबांशीही तो फारसा बोलला नाही. रडवलेल्या चेहऱ्यानं झोपून गेला.
चित्रकलेत कमी गुण मिळाल्याचं दु:ख समीरनं करावं याचं फार आश्चर्य आई – बाबांना वाटलं. समीर हुषार असल्यानं तो पुढे नक्कीच डॉक्टर किंवा अभियंता होणार हे आईबाबांनी शंभर टक्के वाटत होतं. पण गणित आणि विज्ञान याविषयांपेक्षा चित्रकला विषय अधिक आवडतो, असं समीरनं सांगितल्यावर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
चित्रकला आवडतो म्हणतो नि त्यात त्याला प्रगती करता येत नाही, याचं त्याला दु:ख झालय. घरी आल्यापासून त्याचा चेहरा मलूल झालाय. आई म्हणाली.
घरातील महत्वाच्या प्रश्नांवर आईबाबा आणि आजोबा यांची गोलमेज परिषद जेवणाच्या टेबलवर भरत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी आईने समीरचा विषय काढून आपली काळजी व्यक्त केली. बाबाही तसच बोलले. त्यांनीही चिंता व्यक्त केली. त्यांचं बोलणं ऐकल्यावर आजोबा हसू लागले.
काय झालं हसायला दादा, समीरचे बाबा म्हणाले.
अरे, तुम्ही आजच्या काळातील मुलं असूनही नको त्या गोष्टीची चिंता कां करता..
समजले नाही दादा,समीरची आई म्हणाली.
समीरला जर चित्रकला खूप आवडत असेल तर तुम्हा दोघांना दु:ख होण्याचं काय कारण..
चित्र काढून आयुष्य जगता येतं का हो दादा, तुमचं आपलं काहीतरीच.. समीरचे बाबा म्हणाले..
समीरला चित्रकलेत रस आहे पण गती नाही ना दादा.. समीरची आई म्हणाली.
पण, त्याला त्यातच खरा आनंद मिळतो की नाही. मघा तो असच म्हणाला.
असा आनंद मिळवून त्याची प्रगती थोडीच होणार दादा..
गणित आणि विज्ञान हे विषयच घेऊन प्रगती होते, हे कुणी सांगितलय तुम्हाला.
सांगायच कशाला.. सगळीकडे दिसतय ना ते.
हे बघा, हा तुमचा गैरसमज आहे. मुलांची प्रगती त्याच्या आवडत्या विषयातच अधिक होत असते. त्याला नावडत्या विषयात तो घोकंपट्टी करुन खूप गुण मिळवेल पण त्याची प्रगती होईलच असं ठामपणे सांगता येत नाही.
मग तुम्हाला काय वाटतं, समीरला चित्रकला एके चित्रकला करु द्यायची.
अलबत करु द्या. त्याच्यासाठी तुम्ही गणिताची शिकवणी लावता, विज्ञानाची लावता. पण चित्रकलेची शिकवणी लावावी असं कधी वाटलंय का तुम्हाला ?
आँ.. काही तरीच काय दादा..
तुम्ही जर शिकवणी लावत नसाल तर मी माझ्या नातवासाठी इतकं तर नक्कीच करु शकतो. दादा म्हणाले.
000
सकाळच्या गोलमेज बैठक इथे संपली. समीर आज उशीराच उठला. इतका वेळ झोपूनही त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत नव्हता. चेहरा रडवलेलाच होता.
तुझा वर्गात दुसरा क्रमांक आला म्हणून छोटी पार्टी करुया का, बाबांनी समीरला विचारलं. त्यावर समीरनं नकार दिला.
तुझ्या सगळ्या मित्रांना बोलावू की. मस्त धम्माल करा. फुगे फोडा, केक खा, आइसक्रीम खा, बाबा म्हणाले..
नको बाबा, आपण आता पार्टी नको करायला..मला जोपर्यंत चांगली चित्रं काढता येत नाहीत आणि त्यात चांगले गुण मिळत नाही तो पर्यंत मी आइसक्रीम खाणारच नाही, असं ठरवलय मी…
अरे, वेडेपणा आहे हा समीर.. बाबा थोड्याशा चढ्या आवाजात म्हणाले.
मला असाच वेडेपणा करायचाय. समीर बोलून गेला. त्यामुळे बाबांना राग आला. त्यांचा हात त्याला मारण्यासाठी उचलला गेला..
बाजूलाच असलेल्या दादांनी तो अडवला..
काय चाललय तुझं वेड्यासारखं.. दादा चढ्या आवाजात बाबांना म्हणाले. बाबा जरा नरमला.
अहो पण दादा, तुम्ही बघितलत ना कसा वेड्यासारखा बडबडला ते.
बडबडू दे ना.. वेडी माणसेच जीवनात खूप समोर जातात.
दादा याचा अर्थ समीरला आपण स्वत: विहिरीत ढकलून द्यायचंय का..
आता तू वेड्यासारखं बोलायला लागलाय हं.. दादांचा आवाज चांगला चढला होता.. चित्रकला शिकणं म्हणजे विहिरीत ढकलून देण्यासारखं असा, जो समज आहे तो आधी दूर करुन घे..मग वादावादी कर माझ्याशी..
००००
दादांच्या परिचयाचे एक गृहस्थ चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांच्याकडे दादांनी समीरचे आई-बाबा आणि समीरला नेले. सगळं त्यांच्या कानावर टाकलं. चित्रकलेवरुन कसा वादविवाद सुरु आहे हेही सांगितलं.
हे सर्व ऐकून प्राचार्य गंभीर झाले.
ते म्हणाले, पालक आपल्या मुलांच्या स्वप्नांच्या आड कसे येतात, हे याचं उत्तम उदाहरण.
काहीतरीच काय सर, आई म्हणाली.
समीरचं वाईट व्हावं असा आम्ही विचार तरी करु शकतो का..
मग, तुम्ही त्याला चित्रकलेचा आनंद कां घेऊ देत नाही.
त्यात पुढे त्याचं भविष्यच दिसत नाही ना सर आम्हास.
अहो, हा तुमचा गैरसमज आहे.आपल्याकडे पालक त्याच त्या पाच- सहा करिअर पर्यायांकडे बघतात. त्याच वर्तुळात फिरत राहतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत नाही.
म्हणजे काय ?
अहो, चित्रकलेच्या क्षेत्रात सध्या खूप वाव आहे. जाहिराती, ग्रॅफिक्स, ॲनिमेशन, पुस्तके/नियतकालीकांच्या सजावटी, आदी बाबींसाठी चित्रकलेत प्रभुत्व मिळवलेल्यांना संधीवर संधी मिळत राहतात. पेंटिंग्ज, व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, व्यंगचित्रे,पोस्टर अशा कामांची संख्या अमाप आहे. यात गती प्राप्त झाली तर मग एका एका चित्राचे लाखो रुपये मिळवणाऱ्या चित्रकारात सुध्दा मुलांचा विकास होऊ शकतो. अशी शेकडो उदाहरणं मला सांगता येतील.
प्राचार्यांची ही माहिती ऐकून समीर आनंदला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पुन्हा परतला.ते बघून समीरची आईही आंनदली. बाबांचा चेहरा मात्र पडला.
ते काहीच बोलले नाहीत.
तर मग ठरलं तर उद्यापासूनच आमचा समीर तुमच्याकडे चित्रकलेच्या शिकवणीसाठी येईल, दादा प्राचार्यांकडे बघत म्हणाले.
आँ..बाबा म्हणाले..
होय ,आता पक्क ठरलं..काय समीर आता खूश आहेस ना..
होय आजोबा…
मग करायची ना पार्टी…
होय आजोबा.. समीर अत्यानंदाने म्हणाला आणि आजोबांना त्याने घट्ट मिठी मारली.
सुरेश वांदिले
०००
