आळसाच्या पारंतंत्र्यात!
शुक्रवार संपला की तेजोमयीच्या बाबांचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. कारण पुढे शनिवार-रविवार सुट्टी! या दिवशी त्यांचा दिवस खूप उशिरा सुरु व्हायचा. सूर्यदेव वेळेवर उगवले काय? सकाळ झाली, उठा उठा अशी कोंबडोबाने बांग दिली काय? कावळोबानं काव काव केलं काय? कोकिळेनं कुहू कुहू केलं काय? सूतार पक्षानं शिळ मारल्यासारखा आवाज केला काय? कशाचा म्हणून त्यांच्यावर परिणाम व्हायचा नाही.
सुटिच्या दिवशीच नव्हे तर इतरही दिवशीही सूर्यदेव आठ वाजता उगवले तर कसं मस्त होईल ना! असं ते एकदा अलेक्झांडर (द डॉगी) ला म्हणाले सुध्दा.
ते तुम्ही मला कां विचारता?आईला विचारना,असे भाव तेव्हा अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटले.
सूर्यदेव आठ वाजता उगवले तर तुम्ही दहा वाजता अंथरुणातून बाहेर पडाल?असं तेजोमयी त्यांना म्हणाली.यावर आईने हसत हसत टाळी दिली. अलेक्झांडरनेही आपला पंजा तेव्हा समोर केला.
आता तुम्ही तिघेजण एकत्र आल्यावर मी काय बापुडा!असं बाबा तेव्हा केविलवाणपणाचं नाटक करत म्हणाले.
आईने त्यांना कितीदा तरी या अशा उशिरा उठण्यावरुन नावबोटं ठेवली.तेवढ्यापुरते ते आपली चूक झाल्याचं मान्य करत. पुन्हा दुसऱ्या आठवड्यात ये रे माझ्या मागल्या! त्यामुळे आईने नंतर नंतर त्यांना बोलणं सोडून दिलं. काही दिवस अलेक्झांडरने त्यांचं पांघरुन ओढून त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. डोळयावरचं पांघरुन गेलं की ते डोळयावर उशी घेत आणि पुन्हा निद्रादेवीच्या स्वाधीन होत. असं वारंवार होत असल्याचं दिसल्यानं अलेक्झांडरने त्यांचा नाद सोडला.
पुढे बरेच दिवस या विषयावर कुणीच काही बोललं नाही. त्यामुळे बाबांना वाटलं की चला, आपण जे वागतोय, ते बरोबर असल्याचं या तिघांना पटलं म्हणायचं! पण हा त्यांच्या या आनंदावर रविवारी पाणी फेरलं गेलं. आदल्या दिवशी सकाळ पासून झोपेपर्यंत किमान पाच- सहांदा आईने त्यांना, रविवारी लवकर उठण्याबद्दल सांगितलं.
आपल्या झोपचं यांना विस्मरण झाल्याचं जे समजत होतो,तो आभासच होता म्हणायचा,असं बाबांना वाटलं. रविवारी लवकर उठण्याचं त्यांनी आईला कबूल केलं.कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम म्हणजे त्यांचा जीव की प्राण!आईने या कार्यक्रमाची शपथ घ्या म्हंटलं, तर त्यांनी तेही केलं.किमान करोडपतीच्या प्रेमाखातर तरी बाबा लवकर उठतील याची खात्री आईला झाल्याने ती निश्चिंतपणे झोपली.
पण बाबा आपली शपथ पूर्ण विसरले. आठ वाजले तरी त्यांच्या झोपेची साखर काही विरघळी नाही.
आता मात्र आईचा पारा चांगलाच चढला. तेजोमयीस तांब्याभर पाणी सोबत घेऊन बेडरुममध्ये चलण्यास सांगितलं. सोबत अलेक्झांडर होताच. आईने त्याला बाबांच्या अंगावरचं पांघरुण ओढायला लावलं. तेजोमयीला त्यांच्या तोंडावर पाणी ओतायला सांगितलं. थोडं पाणी नाकावर पडताच बाबा खडबडून जागे झाले.
अहो, हे चालवत तरी काय? झोपलेल्या मानसाच्या अंगावर असं पाणी टाकणं म्हणजे त्याच्या झोपेचा घोर अपमान करणं होय. बाबा रागावून म्हणाले.
असं आठ वाजेपर्यंत अंथरुणात पसरल्यानं देशाचा अपमान होत नाही का? आई चिडून म्हणाली. अलेक्झांडरने मान हलवली.
काही तरी काय बडबडतेस? थोडा अधिकवेळ झोपल्यानं काय देशाचा अपमान होतो होय? बाबा नाराजी व्यक्त करत म्हणाले.
बाबा उद्या पंधरा ऑगस्ट! तेजोमयी म्हणाली. पंधरा ऑगस्ट शब्द कानावर पडताच अलेक्झांडर बाहेर खोलिकडे पळाला. कालच आणलेला तिरंगा झेंडा दातात पकडून त्याने आणला आणि बाबांसमोर हलवू लागला.
ऐ शहाण्या, आगावूपणा करु नकोस, बाबा त्याला रागावत म्हणाले.
अहो, त्याला रागवता कशाला?तुमचं चुकलं हे तुम्हाला कळत कसं नाही? एरव्ही तर झोपताच ना वाट्टेल तितक्या वेळ.
मग आज काय घोडं मारलं मी तुम्हा सर्वांचं?
अहो बाबा, सांगितलं ना मघाच, उद्या पंधरा ऑगस्ट आहे म्हणून!
मग त्यात काय झालं?बाबा चटदिशी बोलून गेले आणि आईचा पारा चढला.
अहो झोपबहाद्दूर, पारतंत्र्यांच्या साखळदंड्यातून आपण सारे मुक्त झालो, त्याचा उद्या अमृतमहोत्सव! त्यासाठी घर सजवायचय,सोसायटीची स्वच्छता करायचीय,झेंडावंदनाची तयारी करायचीय? किती किती मोठा,पवित्र आणि आनंदाचा दिवस,तुम्हाला त्याचं काही महत्व नाही.त्यापेक्षा झोप प्यारी.
आई बरोबर म्हणतेय बाबा, तेजोमयी म्हणाली.अलेक्झांडरने पुन्हा झेंडा हलवला.
जाऊ दे गं बाळ,यांना आणि यांच्यासारख्यांना नाही कळायचं स्वातंत्र्याचं महत्व! हे अजूनही झोपेच्या पारतंत्र्यातच खितपत पडलेत. त्यातून स्वतंत्र व्हावं, मुक्त व्हावं असं काही वाटत नाही यांना.आळसरुपी शत्रू यांना मित्र वाटतोय बघ.आळस घात करतो. प्रगतीच्या आड येतो.तब्येतीच्या आड येतो.या आळसानं यांच्या पोटाला फुगवलं,मधुमेहाला जागवलं,हे काही अशा झोपेटल्यांना कळायचं नाही.पडून राहा झोपेच्या पारतंत्र्यात असच खितपत, आई चिडून म्हणाली आणि पाय आपटत तिथून निघून गेली.
व्हेरी बॅड, तेजोमयीनं बाबांकडे बघून प्रतिक्रिया दिली.
करेक्टच आहे या दोघिंचं , अशा भावना, झेंडा हलवत अलेक्झांडरने व्यक्त केल्या…
०००
देशाला स्वातंत्र्य मिळावा म्हणून स्वातंत्र्यवीरांनी असा आळस केला केला असता तर हे आजचे सुखाचे दिवस आले नसते. दिवस-रात्र प्रयत्न केलेल्या स्वातंत्र्यविरांचा आपण असं वागून घोर अपमान करतो,याची जाणीव बाबांना झाली. यापुढे असं वागायचं नाही.हे त्यांनी मनोमन ठरवलं!
सुरेश वांदिले
