(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

वाघोबा आणि चिचुंद्री

ताडोबातील वाघोबा विश्रांती घेत पहुडले होते. डुलकी येत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या अवती भवती एक चिचुंद्री इकडून तिकडे फिरतेय. आपल्याला सारेचजण भीतात पण या इटुकलीस जराही भीती वाटत नाही, याची आधी त्यांना गंमत वाटली आणि नंतर भीती. आपली सर्व शक्ती,दरारा संपला की काय, असं त्यांना वाटलं नि ते शहारले. ताडकन उभे राहिले. त्यांचा जीव वरखाली होऊ लागला.ते बघून चिचुंद्रीला हसू आले.

वाघोबांना तिने इशाऱ्याने खाली बसा असं वाघोबांना सांगितलं.वाघोबा उसनं हसू आणत खाली बसले.

वाघोबा, आधी जरा श्वास घ्या आणि सोडा. मग पुढचं बोलू. चिचुंद्री म्हणाली. आता चिचुंद्रीचं ऐकायचं की नाही, हा प्रश्न वाघोबांना पडला. आपल्याला खरोखरच भीती वाटली की तो भास होता,असा विचार वाघोबांच्या मनी आला. हा इटुकला जीव आपलं काय वाकडू शकतो म्हणा. असं त्यांचं एक मन म्हणालं. पण दुसऱ्या मनाने त्यांना आठवण करुन दिली, वाघोबा, तुझ्या पणजोबांसमोर हिच्या पणजीची पणजी अशीच येउुन त्याला सांगत होत की बाबा, सावध रहा त्या मनुष्यप्राण्यापासून. त्याच्या हातातल्या बंदुकितली गोळी तुझा घात करेल.पण पणजोबानं काही ऐकलं नाही. तेव्हा तो गर्वाने फुलून गेला होता. त्याने चिचुंद्रिच्या पणजीस हिडीस फिडीस केले. ती काय सांगतेय याकडे लक्ष न देता, तिच्या इटुकल्या पिटुकल्या शरीरावर हसला.त्याने मनुष्यप्राण्याकडे दुर्लक्ष केलं.परिणामी  जीव गमावून बसला. तू शहाणा हो. पिटुकली असली तरी या चिचुंद्रीच काय म्हणणं ते ऐकून घे..बरं का..

वाघोबांना या दुसऱ्या मनाचं सांगणं पटलं.त्यांनी चिचुंद्री सांगितल्याप्रमाणे दीर्घ श्वास घेतला नि सोडला. चिचुंद्रीने त्याने पाच वेळा असं करायला सांगितलं. वाघोबांनी ते आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रेमाणं केलं.

आता डोळे उघडा बघू.. चिचुंद्री वाघोबांना म्हणाली.

वाघोबांनी हळूहळू डोळे उघडले.त्यांना खूप बरं वाटत होतं.त्यांची भीती पळून गेली होती.त्यांनी चिचुंद्रीचं आभार माणले.

वाघोबा मी तर काहीच केलं नाही ना.!

अगं तू आज मला शिकवलस ना उगाचच घाबरायचं नाही,निष्कारण भ्यायचं नाही. आपल्या शक्तिचा अभिमान बाळगायचा नाही.मला वाटलं की मी एवढा शक्तीमान पण पिटुकल्या चिचुंद्रीला जरा सुध्दा भीती वाटत नाहीय माझी. याचं मला हसूही आलं नि आणि आपला अभिमान फुकाचाच असल्याचं जाणवलं.ते तुझ्यामुळे घडलं म्हणून तुझे आभार बरं का चिचू ताई!

वाघोबा,अरे या वनात असणाऱ्या छोट्या छोट्या जीवांकडे त्यांची त्यांची शक्ती असते.त्यांची त्यांची त्यांची बुध्दी असते.शहाणपण असते.त्यांचं ऐकलं तर काहीच बिघडत नाही ना.उगाच आपला दरारा दाखवून काय उपयोग?तुझ्या भीतीने तुझ्याजवळ कुणी येत नाही.एकटा पडलास तू.म्हणूनच तुझ्यावर मनुष्यप्राणी डोळा ठेवायला लागला.तुझ्या बांधवांना ठार करु लागला.हे छोटे छोटे प्राणी तुझ्या अवतीभवती राहिले तर तर तुझी एक संरक्षण भिंत उभी राहिली असती.ही भिंत आणि तुझी शक्ती यामुळे मनुष्यप्राण्याची घाबरगुंडी उडाली असती.

चिचुंद्रीचे म्हणणे वाघोबास पटले.त्याच्या पूर्वजांनी जी चूक केली ती आपण करायचं नाही ही खुणगाठ त्याने मनात बांधली.

वननगरीतल्या लहान मोठया सर्वच प्राण्यांना सन्मानाची वागणूक देऊ लागला.

सुरेश वांदिले