(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

मूषक स्वामींचं काय करायचं?

  तेजोमयी,मम्मीने जोराने हाक मारली.

  काय मम्मी,तेजोमयी आतल्या खोलितून पळत किचनमध्ये धावली.

  अगं आपल्याकडे उंदिर आलाय.फ्रिजच्या मागे दडलाय तो.फार मोठं संकट आल्याच्या आविर्भावात मम्मी बोलली.

  मी काय करु मम्मी.

  बाबांना बोलाव.

  कशासाठी मम्मी.

  गधडे सांगितलं तेवढं एैकत जा.मम्मी जोरात म्हणाली.मम्मीचा रागरंग बघून तेजोमयी पुढचा प्रश्न विचारण्याच्या भानगडित न पडता बाबांना बोलवायला बैठकिच्या खोलीत गेली.तिने बाबांना मम्मीचा निरोप दिला. बाबा किचनमध्ये आले.मम्मींने त्यांना फ्रिजच्या मागे उंदिर दडल्याचे सांगितलं.

  मग काय करायचं त्याचं.बाबांनी विचारलं.

  कप्पाळ माझं.अहो हा उंदिर सर्व घरात आता उच्छाद मांडेल,वायर कुरतडून ठेवेल,नासधूनस करेल,एवढं पण तुम्हाला कळत नाही का.

  मग.

  मग काय? त्याला मारुन टाका.मम्मी म्हणाली.

  मारुन टाका काय मम्मी,त्या पिटुकल्या जिवावर दया दाखवायला नको का..आणि बाप्पा काय म्हणतील..तेजोमयी चाचरत म्हणाली.

  तेजोमयीनं बाप्पांचं नाव घेताच,मम्मी जरा चमकलीच.बाबा दचकले.

  बाळ आपण बाप्पांनाच विनंती केली तर.. बाबा म्हणाले.

  कोणती विनंती बाबा..

  उंदराला सांगा की इथे सुखाने रहा,पण गडबड बिडबिड फार करु नको.तुला खायला प्यायला इथे भरपूर मिळेल.

  तेजोमयीला ही कल्पना पटली.तिने जोरात उजवा हात वर करत एस्स म्हंटलं.मम्मीने मात्र कप्पाळावर हात मारुन घेतला.

00

  बाबांनी सुचविल्याप्रमाणे तेजोमयीने बाप्पांना उंदराबाबत विनंती केली.तर ते खो खो हसायलाच लागले.

  यात हसण्यासारखं काय हो बाप्पा.

  अगं बाई,उंदराचं काम हे कुरतडणंच आहे.शतकानुशतके तो हेच करत आलाय.आता मी लगेच सांगितलं की तो एैकेल असं थोडच आहे.

  म्हणजे बाप्पा तो तुमचं पण एैकत नाही.

  माझं एैकतो गं..पण एखाद्याची सवय अशी एका दिवसात जाणार का,तूच सांग बघू..

  मग बाप्पा या उंदरानं आमच्या फ्रिजचं वायर कुरतडलं तर फ्रिज बंद पडेल ना आमचा..

  मग त्याचा बंदोबस्त करा ना..

  म्हणजे काय.मम्मी म्हणाली तसं..

  तसचं कशाला..त्याला पिंज-यात पकडा.त्याला फ्रिजच्या पाठिमागून काढून घरातून बाहेर काढा..हे ही जमलं नाही तर तुमच्याबद्दल त्याच्या मनात विश्वास निर्माण करा.हे कठीण काम आहे हं.पण जमलं तर जशी मनी मँऊ, मोती कुत्रा तुमच्या घरात सुखनैव राहतात,तसाच हा उंदिर मामाही राहील की..आजपर्यंत सारेचजण त्याला हाटहूट करत राहिले.एकदा त्यालाही प्रेम देऊन बघा..

000

                बाप्पांनी सांगितलं की उंदराला प्रेम द्या,त्याच्यामनात विश्वास निर्माण करा,म्हणजे मग मनी मँवू किंवा मोती कुत्रा यांच्याप्रमाणे घरी पाळीव प्राणी बणून राहील.जे काही सांगू ते एैकेल.कुरतडणार बिरतडणार नाही.बाप्पांच्या या सांगण्यावर डायनिंग टेबलवर गोलमेज परिषद भरली.

  बाप्पा काहीही सांगतात,मम्मी गोलमेज परिषदेची सुरुवात करत म्हणाली.

  बाप्पा काहीही कसं सांगतील मम्मी,तेजोमयीने बाप्पांची बाजू घेतली.

  बाबा काहीच बोलले नाही.

  बाबा,तुम्ही गप्प कां,तेजोमयी पुन्हा बोलली.

  मोक्याच्या वेळी गप्प बसणे ही त्यांची जुनीच सवय आहे,मम्मी बाबांकडे बघत म्हणाली.

  तसं नव्हे पण..बाबा अखेर बोलले.      

  काय पण..तेजोमयी बोलली.

  बाप्पा म्हणतात तसं करुन बघायला काय हरकत आहे.बाबा म्हणाले.

  काय डोंबल्याचं बघणार, अहो त्यासाठी ते उंदरोबा हाती सापडायला तर हवे.

  त्याला प्रेमाने बोलावू या ना..तेजोमयी म्हणाली.

  बोलवा बोलवा प्रेमाने बोलवा…तो येईपर्यंत सारं घर तो कुरतडून ठेवलेलं असेल..मम्मी गुस्स्यात म्हणाले.

  अजिबात तसं होणार नाही..दाराजवळून चिरका आवाज आला.तिघांनी त्या दिशेकडे बघितलं.उंदिर एैटित उभा राहून बोलत होता.

  त्याला बघताच आई ताडकन उठलीच.अगं,झाडू आण,मेल्याला झोडपून काढते.

  बाबा म्हणाले, अहो म्हणतो तरी काय हे एैकून घ्या ना..

  तेजोमयी उठत म्हणाली,हाऊ स्वीट..

  आई  तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवा की,बाप्पा म्हणाले तसं..

  मेल्या थांब तुला दाखवतेच आता,असं म्हणत मम्मी त्याच्या अंगावर धावून गेली.ते बघताच उंदिर दाराच्या फटितून बाहेर निसटला.तेजोमयीच्या ह्रदयात चर्र झालं..अगं काय करतेस हे, असं ती जोरात म्हणाली.तिचं हे बोलणं एैकून आई धावत आली.कुणाशी बोलतेस बाई तू..

  म्हणजे तू नव्हतीस मम्मी इथे..

  अगं इथे टीव्हीशिवाय दुसरं काही तरी आहे काय?

  खरचं की,तेजोमयी मनात म्हणाली.टीव्हीवर टॉम आणि जेरीचं कार्टून सुरु होतं.त्या काटूनमध्ये ती आपल्या घरचा उंदिर आणि आई बाबांनी चालवेला खेळ असं चित्र रंगवत होती.याचं तिलाच हसू आलं.