विमानतळ व्यवस्थापन
भारतामध्ये हवाईवाहतुकीच्या वाढीचा वेग विस्मयकारक आहे. भारतातील प्रमुख शहरे विमान सेवेने जोडली गेली आहेत. यामध्ये अधिकाधिक शहरांचा समावेश करण्याचा भारत सरकारने संकल्प केला आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने विमानताळाची उभारणी, विमानाचे जाणे-येणे,मालवाहतूक यांची वमोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. विमानतळावर विमानाचे उडणे ते उतरणे या सर्व प्रकियेदरम्यान आठ दहा प्रकारची कार्ये एकाचवेळी सुव्यवस्थितपणे केली जातात. ही कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते. ही गरज भागवण्याचे काम पुढील अभ्यासक्रम करतात.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) राजीव गांधी नॅशनल एविशन युनिव्हर्सिटी
या संस्थेने पुढील दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत- (१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट. विमानतळाच्या प्रत्यक्ष कामकाजाविषयी या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम जीएमआर एविएशन ॲकॅडेमी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे आहे. यातील सहा महिने प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा आहे. हे प्रशिक्षण हे जीएमआरच्या दिल्ली आणि हैदराबाद विमानतळावर दिले जाते. पहिल्या तुकडीतील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना इंडिगो, अदानी एअरपोर्ट, जीएमआर एअरपोर्ट, फेडएक्स, कतार एअर, डी.बी शेंकर या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. दुसऱ्या तुकडीला उपरोक्त नमूद कंपन्यासोबत यूडीएस आणि विस्तारा कंपनीमध्ये संधी मिळाली. सध्या या अभ्यासक्रमाची तिसरी तुकडी प्रशिक्षण घेत आहे.
(२) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन एव्हिएशन सर्व्हिसेस ॲण्ड कार्गो – अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. या तीन वर्षापैकी दोन वर्षे सैध्दांतिक अभ्यासक्रम शिकवला जातो. एक वर्षं प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण इंटर्नशीपच्या स्वरुपात दिले जाते.
अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२वी. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट दिली जाते. हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळातील हवाईवाहतुक तज्ज्ञांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे.
संपर्क- फुरसतगंज विमानधावपट्टीजवळ, फुरसतगंज,अमेठी-२२९३०२,संकेतस्थळ- rgnau.ac.in, ईमेल-info@rgnau.ac.in
(२) द बॉम्बे फ्लाईंग क्लब
या संस्थेने एक वर्षं कालावधीचा, डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु केला आहे. विमानतळावरील व्यवस्थापकीय आणि पर्यवेक्षीय जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना कार्यान्वयन (ऑपरेशन), टर्मिनल मॅनेजमेंट, एअर साईड ड्युटीज, वित्त, सुरक्षा, मनुष्यबळ विकास, वाहतूक व्यवस्थापन, नियामकांची भूमिका (रेग्युलेटरी रोल) आदी करिअर संधी मिळू शकतात. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी. १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. किंवा १० वीनंतर ३ वर्षे कालावधीची गणित विषयासह अभियांत्रिकी पदविका किंवा ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स या विषयातील पदविका.
करिअर संधी- हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात. (१) एअरपोर्ट सुपरव्हायजर, (२) एअरपोर्ट मॅनेजर, (३) एअरपोर्ट ऑपरेशन्स मॅनेजर, (४) एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर, (५) एअरलाइन ॲण्ड स्टाफ मॅनेजर, (६) कार्गो मॅनेजर, (७) एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोलर, (७) फायनांशिअल ॲनॅलिस्ट फॉर एअरलाइन्स, (८) एविएशन फॅकल्टी.
संपर्क – द बॉम्बे फ्लाईंग क्लब, जुहू एरोड्रम, नानावटी रुग्णालयाच्या विरुध्द दिशेला, एस.व्ही रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६,संकेतस्थळ- https://www.thebombayflyingclub.com/
०००