(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

कोंबडी आणि शेतकरी

गणपत शेतकऱ्यास दोन मुलं होते.त्या दोघांनांही त्याने लहानपणापासून शेतात श्रम करण्याचे शिकवले होते.दोघेही आनंदाने ते काम करत.दिवसभर राबत.संध्याकाळी शेतातील विहिरीवर आंघोळ करुन ते घरी परत.घराच्या वाटेवर देवीचे मंदिर होते.त्या ठिकाणी जात आणि मनोभावे देवीला नमन करत. मात्र ते दोघेही देवीकडे काही मागत नसत.

याचं देवीला खूप आश्चर्य वाटे.त्यामुळे एके दिवशी देवी त्यांच्यासमोर प्रगट झाली.देवीला आपल्यासमोर बघून दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला.त्यांनी देवीला दंडवत घातला.

देवी प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली,

तुम्ही माझ्या मंदिरात दररोज येता.इतरही भक्त येतात.ते काहीना काही मला मागत असतात.पण तुम्ही मात्र मला काहीच मागत नाही.

देवी माते,तू आम्हाला दररो शेतात कष्ट करण्याची शक्ती देतेस,तीच पुरेशी नाही का?त्यापेक्षा आणखी काय हवे.आमच्या कष्टाच्या घामामुळे शेतीत भरपूर पीक येतं.शेतातललं पिकं म्हणजेच तुझा आशीर्वाद.त्यामुळे आम्ही तुला काही मागत नाही.दोन्ही भाऊ म्हणाले.या उत्तराने देवी खुष झाली.

तुम्ही स्वत:हून मागत नाही म्हणून मी आज तुम्हाला स्वत: भेट देणार आहे.देवी म्हणाली.

नको नको देवी आम्हास काही नको,दोघेही भाउु एकासुरात म्हणाले.

नाही नाही तुम्हाला माझं ऐकावचं लागेल.देवी जरा रागावून म्हणाली

बर तर…

मग काय हवय तुम्हाला.सांगा बघू?

देवी तुला पाहिजे ते आम्हास दे...

बर तर,असे म्हणून देवीने हवेतून दोन कोंबड्या काढल्या.त्या दोघांसमोर ठेऊन देवी म्हणाली,यापैकी ही पिवळी कोंबडी सोन्याचं अंडं देते आणि पांढरी कोंबडी साधं अंड देतं.तुमच्यापैकी ज्याला जी कोंबडी पाहिजे ती त्याने घ्यावी.

देवी असा पेच आमच्यापुढे टाकू नका.तुम्हाला ज्याला कुणाला जी कोंबडी द्यायची आहे ती द्या.दोघेही भाउु म्हणाले.

अच्छा तर, असे म्हणून देवीने अजयला सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिली आणि विजयला साधी अंडी देणारी कोंबडी दिली.त्यांना आशीर्वाद देऊन देवी अंतर्धान पावली.

अजय आणि विजय देवीने दर्शन आणि भेट दिली म्हणून आनंदात घरी परतले.घरी गणपत शेतकरी त्यांची वाट बघत होता.नेहमीपेक्षा जास्त वेळ झाल्याने तो चिंतित होता.

घरी आल्या आल्या अजय आणि विजयने गणपत शेतकऱ्यास देवीच्या मंदिरात घडलेली सगळी घटना सांगितली आणि दोन्ही कोंबड्या त्याच्या हातात दिल्या.

अरे, तुम्ही हे काय केलत लेकरांनो?तो दोघांना म्हणाला.

काय केलं म्हणजे?आम्हाला देवीने दिलेली भेट आणली.चोरी नाही केली कुणाची.अजय म्हणाला.

नाही नाही फार वाईट झालं,चला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत देवीच्या मंदिरात.असे बोलून त्या दोघांना घेऊन गणपत शेतकरी देवीच्या मंदिरात आला.इतक्या रात्री हे तिघेही परत आले आणि त्यांच्याकडे आपण दिलेल्या कोंबड्या बघून देवीस आश्चर्य वाटलं.ती तिघांच्या समोर प्रगटली.तिघांनी देवीला दंडवत घातला.

भक्तांनो काय झाल?देवीनं विचारलं.

देवी आई,ही सोन्याची कोंबडी तुझी तू परत घे.नको आम्हास?

पण बाबा,अजय म्हणाला,ही कोंबडी कां नको?हे तुम्ही सांगितलेच नाही.

हो नाही सांगित. पण इथे देवीआई समोर सांगतो. देवी,सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीचा मोह फार वाईट असतो.ती दररोज एकच सोन्याचं अंडं देणार,पण सोन्याचा लोभ वाढला तर माझा पोरगा,या कोंबडीला कापून काढेल.हे पाप त्याच्याकडून नको घडायला.बिचारी अशीच एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी आम्हा माणसाच्या लोभाला बळी पडली.आता या दुसऱ्या कोंबडीचे प्राण नाही जाऊ द्यायचे मला.गणपत शेतकरी रडवलेल्या स्वरात म्हणाला.

अजय आणि विजयला आपल्या वडिलांचे म्हणणे पटले.त्यांनी देवीला सोन्याची अंडी देणारी कोंबडी परत घेण्याची विनंती केली. मुक्या जीवाच्या प्रति असलेली काळजी बघून देवीला समाधान वाटले. तिने सोन्याचे अंडी देणाऱ्या कोंबडीचे रुपांतर साधे अंडे देणाऱ्या कोंबडीत केले.ही कोंबडी तिने अजयला दिली.

दोन्ही कोंबड्या मग खूप वर्षे अजय आणि विजयला दररोज  अंडी देत. ती अंडी खाऊन त्यांच शरीर आणखी बळकट झालं. त्यामुळे ते आणखी जोमाने शेतात राबू लागले.

सुरेश वांदिले