(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

सूपरगर्ल!

मी सूपर गर्ल झाले तर तुला तुम्हाला आनंद होईल की दु:ख?तेजोमयीनं बाप्पांना विचारलं.

मला कां बरं दु:ख होईल?बाप्पांनी प्रतिप्रश्न केला.

अरे हो,तुम्हाला कां बरं दु:ख होईल?याचा मी विचारच केला नाही.पण बाप्पा तुम्हाला आनंद तरी नक्की होईल ना?

मला कां बरं आनंद होईल? बाप्पांनी पुन्हा प्रतिप्रश्न केला.

म्हणजे तुम्हाला माझं काहीतरी होण्याचं काहीच कसं वाटत नाही हो? तुम्ही बॉ फारच हे आहात.तेजोयमी रागावून म्हणाली.

हे म्हणजे काय?बाप्पा हसत विचारलं.

हे म्हणजे ते हो!जाऊ दे तुम्हाला नाही कळायचं ते?

पण तुला तरी कळलय का?

हो,पण सांगता येत नाही?

हो का?मग आधी सांगण्याचं शिक आणि नंतर सुपर की ट्युपर गर्ल हो.बाप्पा म्हणाले.

ट्युपर नाही हो,सूपर!तेजोमयीने दुरुस्ती केली.

बरं बरं! सूपरगर्ल बणून तुला काय करायचय?

मला की नाही खूप पराक्रम गाजवायचाय.

त्यासाठी सूपर गर्ल कशाला व्हायला हवं. सिम्पल गर्ल सुध्दा पराक्रम गाजवू शकतात की?बाप्पा म्हणाले.

तुम्हाला नाही कळायचं ते?सूपरगर्लकडे जादू असते.

होका?पण सिम्पल गर्लकडे शक्ती असते.

पण जादुने काहीही करता येतं.कुठेही जाता येतं?

छे.छे! ते फक्त गोष्टीत घडतं.प्रत्यक्षात नाही.

जा बुवा, तुम्हाला माझं म्हणणं पटतच नाही.

पटत गं बाई!पण सूपरगर्ल झाल्यावर काय करणार हेच तुला ठरवता येत नाहीय ना! समजा तू सूपर गर्ल बणून जंगलात गेली नि समोरुन वाघ आला तर?

त्याला जादुने पोपट करीन.

पोपटाने तुझ्यावर झेप घेऊन तुझा डोळा फोडण्याचा प्रयत्न केला तर?

पोपटला चिमणी करीन.

म्हणजे वाघोबास चिमणी करण्यासाठी तुला सूपर गर्ल व्हाययच?

तसं नाही हो बाप्पा.तुम्हाला  काहीच कसं कळत नाही?

म्हणूनच तर विचारतोय ना?

सूपरगर्ल झाल्यावर मला आकाशातून उडता येईल.उडणाऱ्या ढगांच्या आत काय दडलय ते शोधता येईल.इंद्रधुनष्याला हात लावता येईल.उडणाऱ्या गरुडाशी मैत्री करता येईल.त्यांच्या पाठीवर बसून आणखी उंच उंच जाता येईल.

वा वा छान हं.उडता उडता त्या गरुडाने गिरकी घेतली तर तू खाली वाहणाऱ्या नदीत पडशील आणि वाहायला लागशील.नदीतून समुद्रात जाशील.समुद्राच्या लाटांवर वरखाली येणाऱ्या देवमाशाचं लक्ष तुझ्याकडे जाईल.मग तो त्याचा प्रचंड जबडा उघडून तुझ्याकडे वेगाने येऊ लागेल.त्याचे सुळयासारखे दात आणि गुहेसारखं तोंड बघून तू घाबरुन बेशुध्द होशील आणि देवमासा तुला गिळून टाकेल?

खरच की काय?

मी कशाला खोटं बोलू?

पण बाप्पा, तुम्हाला कसं बरं हे माहीत?

मला सारचं माहीत असतं ना!ते एक गुपित आहे.

पण बाप्पा,उलटं सुध्दा होऊ शकतं.

म्हणजे?

एकतर गरुड मला पाडणारच नाही.मला तो आणखी उंच उंच घेऊन जाईल.तिथून मला चंद्राला हात लावता येईल.ते बघून चंद्राला गुदगुल्या होतील.तो हसू लागेल.चंद्राला हसताना बघणारी मी पहिलीच ठरेन.त्याचे दात दिसतील.तो दररोज दात स्वच्छ करतो की नाही हे कळेल.आहे का नाही गमंत?

गमंत आहे खरी?

समजा तुम्ही म्हणता,त्याप्रमाणे गरुडाने मला खाली पाडले.देवमाशाला मी दिसले.तर माझ्याकडे बघून प्रेमाने हसेल.मला पाठीवर बसवेल आणि समुद्राची सैर करु आणेल.अगदी खोलवर.तुम्ही सुध्दा न बघितलेलं पाण्याखालचं जग मला बघता येईल?

खरचं की काय?

पण बाप्पा समजा हे काही घडलं नाही तरी,मी सूपरगर्ल होण्यात अडचण काय बाँ?सूपरमॅन असू शकतो,वंडरवुमन असू शकते,तर सूपरगर्ल कां नाही?पराक्रम काय सुपरमॅनने गाजवायचे का?सूपरगर्लने कां नाही?तेजोमयी म्हणाली.

या प्रश्नावर बाप्पांनाच काहीच बोलता आलं नाही.सूपरगर्लचं होण्याचं तेजोमयीचं स्वप्न साकार करण्यास मदत करण्यास सहाय्य करण्याऐवजी ऐवजी आपण शंकाकुशकांच विचारत बसलो, असं वाटून बाप्पा मनोमन दु:खी झाले आणि तेजोमयीस सॉरी म्हणाले.

सुरेश वांदिले