(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

संकटमोचक

तेजोमयीच्या कॉलनितील पहिल्या मजल्यावरील मुनघाटे काकांनी नवी गाडी घेतली. त्यांनी कॉलनितील मित्र-मंडळींना गाडी बघण्यासाठी बोलावलं. तेजोमयी आणि बाबा एके दिवशी ही गाडी बघायला खाली गेले. पाठीमागे अलेक्झांडर महाशय होतेच.

मुनघाटे काकांनी उत्साहाने गाडी दाखवली. गाडीच्या आतमध्ये कोणत्या नव्या सुविधा आहेत, याची माहिती दिली.

गाडी एकदम भारी होती. तेजोमयीला फार आवडली. अलेक्झांडरनेही लांब जिभ करुन गाडीत डोकावून घेतले. तो गाडित शिरुन मउुशार गादी खराब करेल अशी काकांना भीती वाटली असावी, त्यामुळे अलेक्झांडरला जरा बाजूला कराना, असं हळूच त्यांनी बाबांना सांगितलं. बाबा अलेक्झांडरला हटकण्याच्या आधीच त्याने शहाण्यासारखं गाडीत डोकावणं सोडून दिलं.

मुनघाटे काका, बाबा आणि तेजोमयी बोलत असताना, अलेक्झांडर गाडीसमोर जाऊन उभा राहिला. गाडीच्या समोर एका दांड्याला लटकवलेल्या लिंबू-मिरचीकडे एकटक बघू लागला. त्याच्या या एकटक बघण्याकडे तेजोमयीचं लक्ष गेलं. तिही त्याच्याकडे गेली. एक लिंबू आणि दोनतीन मिरच्या एका दोरित ओवून, हारासारखं दांड्याला मधोमध लटकावलं होतं. हवेमुळे ते इकडे तिकडे हलायचं. ती गंमत बघून अलेक्झांडरही इकडे-तिकडे मान हलवायचा. तेजोमयीसही मजा येऊ लागली.

बाबा आणि काका गाडीसमोर आल्यावर, बाबा काकांना म्हणाले, मुलं आणि त्यांचे सवंगडी छोट्या-छोट्या गोष्टितही आनंद मिळवतात, बघा.

हवेबरोबर हलणाऱ्या लिंबू आणि मिरचीच्या हारात कोणता आनंद मिळवतोय, असं आश्चर्यानं काकांनी विचारलं.

याचं काही उत्तर बाबा देण्याआधीच तेजोमयीनं विचारलं,

काका, हा लिंबू-मिरचीचा हार कां बरं लावला हो तुम्ही इथे..

असा काही प्रश्न विचारला जाईल याची किंचितही कल्पना नसलेल्या काकांना या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे कळेना.

ते गप्प राहिले. तेजोमयीनं बाबांकडे बघितलं. बाबांना काहीतरी सांगणं भाग होतं.

अगं, लिंबू-मिरचीचा हार लटकवला की गाडीचं रक्षण होतं.

कुणापासून हो बाबा?

चोरापासून..अपघातापासून..संकटापासून..

अच्छा, याचा अर्थ मिरिची-लिंबूचा हा हार संकटमोचक आहे म्हणायचा.

तसं समज. बाबा म्हणाले. या मुलांना फारच प्रश्न पडतात बुवा, असे त्रासिक भाव काकांच्या चेहऱ्यावर उमटले.

नवीन गाडीसाठी बाबांनी,मुनघाटे काकांचं अभिनंदन केले. ते तिघेही घरी परतले.

त्याच दिवशी रात्री सोसाट्याचा वारा सुटला. ढगांचा कडकडाट वाढला. झाडांची सळसळ वाढली. प्रचंड वाऱ्यामुळे कडाडधूम असा मोठा आवाज करत एका झाडाखाली उभ्या असलेल्या मुनघाटे काकांच्या गाडीवर फांदी पडली. गाडी पुरती चेपून गेली. नवी कोरी गाडी पहिल्या दोनतीन दिवसातच खराब झाली. काकांची सांत्वना करायला बाबा गेले.

ते घरी परतल्यावर तेजोमयीनं विचारलं.

बाबा, काकांच्या गाडीला संकटमोचक लिंबू-मिरची हार लटकला होता, तरीसुध्दा गाडीवर फांदी कां पडली. या संकटमोचकाने पडणाऱ्या फांदीचे फुलात कां बरं रुपांतर केलं नाही.

अगं, तुला काय करायचंय, आई रागावली.

आई, बाबांनी परवा मला सांगितलं की लिंबू-मिरचीचा हार संकटापासून रक्षण करतो म्हणून..

त्या हाराची शक्ती कमी झाली असेल.

असं पण होऊ शकतं का..

हो ना, म्हणून तर दर शनिवारी अनेक जण आपल्या गाड्यांना लिंबू-मिरचीचा हार चढवतात. काका विसरले असावेत..

अरेरे, तेजोमयी उत्सुर्फतपणे म्हणाली..आता हसावं की तेजोमयीस रागवावं हे आई बाबा दोघांनाही कळेना.

लिंबू-मिरचीचा संकटमोचक हार दरवाजाला लावण्याचा विचार आई काही दिवसांपासून करत होती. तो विचार तिने आता डोक्यातून काढून आणि. तेजोयमीला कुशित घेऊन तिची पप्पी घेतली.

वाS,पॉवर ऑफ लिंबू-मिरची हार, तेजोमयी पुटपुटली.

सुरेश वांदिले