कथेतील परी आणि परीची कथा
सुटिच्या दिवशी बाप्पा आणि तेजोमयी सकाळच्या नाश्त्यानंतर गप्पा करत बसले होते. आजच्या त्यांच्या गप्पा परीराणीभोवती फिरत होत्या. तेजोमयीला परीराणीबध्दल फार रस होता. तिने बाप्पांना थेट विचारलं.
बाप्पा, तुम्ही कधी परीराणीला बघितलं आहे का ,हो?
हो ना, तुझ्याकडे असलेल्या परीच्या गोष्टींमध्ये कितीदा तरी. तू शाळेत गेलीस की मी बघत असतो या परीराणीकडे. शिवाय पूर्वी तुमच्या टीव्हीवर सुध्दा खुपदा बघितलय मी परीराणीला, बाप्पा उत्तरले.
आमच्या टीव्हीवर तुम्हाला कधी दिसली हो परी. . तेजोमयीने आश्चर्यानं विचारलं.
एवढं आश्चर्य वाटून घेण्याचं कारण काय, तेजू?
अहो,तुम्हाला परी दिसली नि मला कां दिसली नाही.
अग बाई, सोनपरी नाही का?
हात्तिच्या, अहो ती टीव्ही मालिका होती. मी सोनपरीबद्दल नाही विचारतेय. ख–या खु–या परी बद्दल विचारतेय.
सोनपरी खोटी आहे का?बाप्पा म्हणाले.
बाप्पा बोर करु नका ना. मला ख–या खु–या परीबद्दल विचारायचय. .
परीसुध्दा खरी आणि खोटी असते का? बाप्पा डोळे मिचकावित म्हणाले.
बाप्पा तुम्ही ना. . .
मी काय?
बोरिंग आहात.
मी कसा बुवा बोरिंग आहे,
बाप्पा, तुम्ही सारखं टीव्हीतली परी आणि पुस्तकातील परीबद्दल बोलून बोरिंग करत आहात.
असं काही सांगणं हे बोरिंग असतं हे मला आजच कळलं बुवा. जे आपणास ठाऊक असतं त्या सांगण्याला आमच्याकडे बोरिंग नाही म्हणत बर का तेजू.
बाप्पा, आता विनोद पुरे झाला हं. तेजोमयी लटक्या रागानं म्हणाली.
बरं बाबा, बोरिंगलाच तुमच्याकडे विनोदही म्हणतात हे सुध्दा मला आज कळलं. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल थँक्स हं तेजू.
ओह नो बाप्पा.
ओह यस तेजू,
बाप्पा प्लिज सांगा ना, तुम्ही खऱ्या परीराणीला कधी बघितलत कां कधी,
ओके म्हणजे तुला खरी परी बघायचीच तर, दाखवू का?
वाव.
ही काय, माझ्यासमोर उभी असणारी तू, तेजोयमयीकडे बघत बाप्पा म्हणाले.
मी आणि परी? तेजोमयी स्वत:कडे बघत म्हणाली. बाप्पा आपली खेचताहेत हे ठाऊक असूनही त्यांनी आपल्याला परी म्हणावं ही कल्पना तेजोमयीला खूप आवडली. ती खूष झाली.
तुझे बाबा तुला परी म्हणून हाक मारतात की नाही. बाप्पा हसत हसत म्हणाले.
ते खरच होतं. बाबा लाडात आले की तिला परीच म्हणायचे. वाढदिवसाला तर परीसारखा दिसेल असाच ड्रेस ते बरीच वर्षे आणत होते. बाबांच्या आग्रहामुळे ती एकदा शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत परीचा ड्रेस घालून सहभागी झाली होती. तिला पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. बाप्पांनी तिला सांगितलं. बाप्पांना सारं काही ठाऊक असतं, याचं तेजोमयीला खूप आश्चर्य वाटलं. ती बाप्पांकडे कौतुकानं बघत राहिली.
पण बाप्पा, माझं कौतुक आता पुरे झालं हो. खऱ्याखुऱ्या परीबध्दल सांगा ना. तिला कुठे बघितलंत, कशी दिसते ती, कशी बोलते ती, तिला पंख कुठून येतात. मग ती उडत उडत जाते कुठे, तिचे मित्र–मैत्रिण कोण आहेत. हे काही तुम्ही सांगतच नाही. की तुम्हाला काहीच माहीत नाही तिच्याबद्दल, म्हणून तुम्ही सारखं विषयांतर करता?
तेजोमयीच्या या कथनावर बाप्पा खुदकन हसले.
बाप्पा तुम्हाला असं अवचित हसू कां आलं?तेजोमयीनं विचारलं.
अगं,मला परीनं हसवलं.
बाप्पा तुम्ही मला उल्लू बनवता आहात.
छे ग बाई, परीच्या राज्यात सारच काही असतं. उल्लू असतात आणि बल्लू आणि टिल्लू पण असतात.
तुम्ही सारं काही सांगता पण परीराणीला बघितलं का असं विचारलं की विषयच बदलवता. आता पुरे झाला हं टाइमपास. सांगूनच टाका बघू खरं खरं..
बर बाई. आता नो टाइमपास. मग ऐक जरा लक्षपूर्वक. एक परीराणी आमच्या शेजारीच राहायची.आमच्या मातेची मैत्रिण होती.
खरं की काय, मला भेटवा ना तिला बाप्पा. काय करायची हो ही परी दिवसभर. तेजोमयीनं विचारलं.
अगं ती गप्पा करायची. गोष्टी सांगायची. माझ्या सोबत खेळायची. गाणं म्हणायची.
कित्ती छान.
माझी जीवाभावाची मैत्रिण झाली होती ती. असे मस्त दिवस चालले होते आमचे आनंदात, मजेत, खेळण्यात, बागडण्यात पण…
पण काय, काही गडबडिबिडबड झाली का? तेजोमयीनं गंभीर होत विचारलं.
हो गं तसच काही समज.
काय झालं हो बाप्पा?
अगं,तिने एकदा मातेकडून पंख मागून घेतले.
दिले का तुमच्या मातेनं पंख तिला?
सुरुवातीला ती द्यायला तयारच नव्हती. पण परीराणीचा खूप आग्रह होता. त्यामुळे मातेने एक अट टाकून तिला पंख दिले..
कोणती होती अट बाप्पा?
अगदी साधी अट होती. की पंख लावून कुठेही भूर्र उडून जायला हरकत नाही. पण संध्याकाळ होण्याच्या आधी किंवा सूर्यास्त होण्याच्या आधी ती परत आली पाहिजे.
इतकी साधी अट होती. मग काय झालं?
परीराणीने अट मान्य केली. मातेनं तिला पंख दिले. पंख लेवून परीराणी आनंदानं भुर्र उडाली.
पुढे काय झालं?
मी संध्याकाळ होण्याची वाट बघू लागलो. परीराणी कधी येते नि मला तिच्या भूर्र उडण्याची गंमत– जंमत सांगते याची उत्सुकता लागून राहिली. काय गंमत – जंमत सांगितली तिने, मला पण सांगा ना बाप्पा.
अग तेजू, मलाच कळलं नाही तर मी तुला कुठे सांगणार?
म्हणजे काय झालं हो बाप्पा. तिने तुमच्याशी कट्टीबिट्टी घेतली की काय?
कट्टी नाही घेतली, पण परीराणी जी भूर्र उडाली ती पुन्हा कधी आलीच नाही. बाप्पा हुंदका देत म्हणाले.
अरेरे ,पण ती गेली तरी कुठे हो बाप्पा.
अगं, पंख लेवून परीराणी सगळया जगाच्या भ्रमंतीला गेली. विविध ठिकाणच्या तुझ्यासारख्या गोड, शहाण्या, खेळकर, हुषार मुला–मुलींचा तिला लळा लागला. त्यांच्यासोबत खेळण्यात, बागडण्यात तिला वेळेचा विसरच पडला.
मग काय झालं?
मातेने सांगितलेली वर येण्याची वेळ निघून गेल्यावर तिचे पंख गळाले. सारं काही मी वरुन बघत होतो. माताही बघत होती.
आता परीराणी समुद्रात पडणार नि बुडणार असं मला दिसलं. मी मातेला विचारलं की जाऊ का तिच्या मदतीला. मातेने नकार दिला.
काय सांगता?
होना. मी हिरमुसलो. ते बघून मातेने परीराणी पडत असणाऱ्या समुद्रात एक मोठ्ठ कमळाचं फुलं तयार केलं. त्यावर परी पडली.
ग्रेट ग्रेट..छान
कसलं छान बाई, अगं वाईट्ट घडलं. .
काय झालं हो बाप्पा. .
ती परी फुलासह बुडाली समुद्रात. .
अ आई ग. .
मला खूप वाईट वाटलं.मी खूप रडलो .मातेने समजूत काढली.
पण माझं रडणं काही कमी होईना. .
मग. .
मातेने समुद्रात उडी घेतली आणि कमळाच्या फुलासह परीला बाहेर काढलं.पण तोपर्यंत परी मरण पावली होती.
अरे बापरे,मग काय झाल हो बाप्पा.
आपल्या जीवभावाची मैत्रिण अशी गेल्याचं बघून मला रडूच आवरेना. मातेचाही मला खूप खूप राग आला. मी तिच्याशी अबोला धरला. ते बघून मातेच्या डोळयात अश्रू आलं. ती माझं सांत्वना करीत म्हणाली की परीराणी जरी मरण पावली तरी तिला मी अमर करुन टाकते.
हो का, काय केलं मातेनं?
तिने कमळाच्या फुलावरील परीच्या देहावर फुंकर मारली. कमळाच्या फुलासह परीच्या देहाच्या असंख्या पाकळया झाल्या. त्या पाकळयावंर मातेनं फुंकर मारली. त्या पाकळया मग पृथ्वीवरील सर्व खंडात गेल्या.
कुठे गेल्या त्या?
प्रत्येक खंडातल्या थोर थोर लेखकांच्या घरी. या लेखकांनी मग त्या कमळाच्या पाकळीतील परीला शब्दांमध्ये जिवंत केलं. त्यातून तयार झाल्या देशोदेशीच्या परीकथा. मातेनं तिचे शब्द खरे केले. परीकथेतून परी अमर झाली.
मग तुमचा अबोला सुटला की नाही मातेसोबतचा, तेजोमयीनं गंभिरपणे विचारलं.
हो ग,आईसोबत किती क्षण आपला अबोला राहू शकतो नाही का? तेअसू दे,परीराणीची ही गोष्ट कशी होती तेजू ?
छानच होती होती, तेजोमयी म्हणाली. .
गोष्ट छान झाली नसती तर ती तुला बकवास किंवा बोरिंग वाटली असती ना..
म्हणजे तुम्ही सांगितलेली गोष्ट काल्पनिक होती का?
छे गं, गोष्ट गोष्ट असते तिचा आनंद घ्यायचा असतो. नसते प्रश्न पडले तर मग आनंदात विरजण पडतं. एकदा असच झालं. .
आता काय झालं?
मी आणि सिंहमहाराज गप्पा मारत बसलो होतो आमच्या स्वर्गातल्या जंगलात. सिंह महाराजांना मी पृथ्वीवरच्या वनराज आणि उंदराची गोष्ट सांगितली.
कोणती हो?
तिच गं , शिका–याच्या जाळयातून सिहांची सुटका उंदिर कसा करतो ती. पण आमच्या वननगरीतल्या सिंहमहाराजांना ही गोष्ट खोटीच वाटली. उंदरासारखा चिरकूट जीव आपल्यासारख्या शक्तीशाली प्राण्याला कसा काय वाचवू शकतो, असं त्यांना वाटलं. मला तर ते म्हणाले, तुम्ही बकवास करता. खोट बोलता.
थेट तुमच्यावर आरोप. तुम्हाला राग नाही का आला?
नाही गं. उलट हसू आलं. कारण सत्य मला माहीत होतं ना. कधीतरी सिंहमहाराजांना मी जे सांगितलं ते सिध्द करुन दाखवता येईल याची मला खात्री होती. तशी संधी एकदा मला मिळालीच.
अरे वा, नेमकं काय झालं हो बाप्पा, तेजोमयीनं उत्सुकतनं विचारलं.
अगं एके दिवशी आमच्या स्वर्गातले हे सिंहमहाराज एका राक्षसाच्या जाळ्यात सापडले. त्यातून सुटकेसाठी तडफडू लागले. राक्षसाने सिहंमहाराजांचे जाळे पाठीवर टाकले नि तो त्यांना घेऊन आकाशात उडाला. त्याच वेळेला मी चांदोबाकडे मुषकस्वामींवरबसून निघालो होतो. माझं लक्ष राक्षसाकडे गेलं. सिंहमहाराज जोरजोराने सुटकेसाठी आक्रोश करीत होते. आता त्या अगडबंब राक्षसापासून सिहांची सुटका करायची तरी कशी ?असा मला प्रश्न पडला, तेव्हा मुषकस्वामींनी मला हळूच एक युक्ती सांगितली. .
काय सांगितलं त्याने?
मुषकस्वामींनी सांगितलं,त्याप्रमाणे आम्ही हळूच राक्षसाच्या पायाखाली गेलो. मुषकस्वामीने संधी साधून तो राक्षसाच्या पायाला कचकन चावला. राक्षस वेदनेनं विव्हळला. त्याची जाळ्यावरची पकड ढिली झाली. सिंहमहाराज जाळयातून मुक्त झाले. त्यांच्याकडे मी चटदिशी पंख पाठवले. ते त्यामुळे उडू लागले. वेदनेनं विव्हळणाऱ्या राक्षसाच्या दुसऱ्या पायालाही मुषकस्वामींनी चावा घेतला. त्याला काही कळण्याच्या आतच आम्ही तिथून पसार झालो. सिंहमहाराज वेगानं कधीचेच स्वर्गातील वननगरित येऊन पोहचले होते. जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी मुषकस्वामींची क्षमा मागितली.पृथ्वीवरची गोष्ट खोटी ठरवल्याबद्दल त्यांनी माझीही क्षमा मागितली.
इथून तिथून काय तर स्वर्गात सुध्दा उंदिरमामाच सिंह महाराजांच्या सहाय्यला येतो असच ना. .
एस्स बाप्पा म्हणाले.
पण बाप्पा खर आहे को हे सारं.
अगं तेजू,परीकथांच्या बाबत तू कधी शंका घेतेस का?
नाही घेत..
मग ही सुध्दा वेगळी परीकथा समज ना. गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो,शंका उपस्थित नसते करायची.बाप्पा हसत हसत म्हणाले.
0000
सुरेश वांदिले,
वाय 1/15,
शासकीय वसाहत,वांद्रे पूर्व मुंबई– 51,भ्रमणध्वनी– 9324973947
.jpg)