पुस्तक, ती आणि गाढव
छान छान गोष्टींची पुस्तकं देणाऱ्या स्वप्नातल्या परिराणीशीही ती कट्टी घ्यायची. थेट अट्टीकट्टी गोरगोटी लिंबाचा पाला हलू नको पर्यंत ती पोहचायची. त्यामुळे परिराणी हिरमुसली व्हायची.
व्हाट इज धिस तेजोमयी ती कधी रागाने म्हणायची.
तर, कोंबडिका पिस, म्हणून तेजोमयी खोखो हसत सुटायची..
परिराणीला सूचेना या बयेला पुस्तक आवडावित म्हणून काय करावं बरं.जी मुलं पुस्तक वाचतात तीच परिराणीला आवडायची.
000
परिराणी तेजोमयीच्या दररोज स्वप्नात येण्याचं सुध्दा एक खास कारण होतं. एकदा अशीच या मुलाच्या स्वप्नातून त्या मुलाच्या स्वप्नात जाणाऱ्या परिराणिला खूप तहान लागली.तेव्हा इतर मुलांनी तिला थंडगार पाणी दिलं. पण तेजोयीनं मात्र फ्रिजमधलं पियुष दिलं.इतरांपेक्षा ही मुलगी वेगळी असल्याचं परिराणीच्या लक्षात आलं,तेव्हा पासून तेजोमयी तिला खूपच आवडायला लागली.
एकदा, तेजोमयीनं परिराणीला रसना देऊन , आय लव्ह यू असंही म्हटलं, तेव्हापासून तर परिराणीने तिच्या स्वप्नात जाण्याचा एकही दिवस चुकवला नाही.
अशी ही छान, गोड, गोबरी आणि लाघवी तेजोमयी कुणालाही आवडावी अशीच होती.तिचं सारं काही छानच होतं, पण पुस्तकाचं नाव काढलं की तिचं बिनसूनच जायच. इतकं की हीच का ती शहाणी मुलगी असा प्रश्न पडावा..
000
मात्र हळूहळू तेजोमयीचं मन पुस्तक वाचनाकडे वळवून तिला पुस्तक वाचनाची गोडी लावू अशी परिराणीला खात्री होती. पण तेजोमयी मात्र ढिम्म. पुस्तकांचं नाव परिराणीनं काढलं किंवा एखादं पुस्तकं दाखवलं की तेजोमयी थेट, सेडना या दहाव्या ग्रहावरच पोहचायची. तिथून तिला परत आणनं परिराणीला कठीण व्हायचं.
000
एकदा परिराणिने तिच्यासमोर बालपणीचे गणेश ,हनुमान आणि कृष्णाचं पुस्तकं ठेवलं नि या पुस्तकांमधून या तिन्ही बालवीरांना अलगद बाहेर आणलं.
हनुमान त्याच्या गदेसह आला होता. कुष्णाजवळ बासरी होती. गणेशोबत त्याचा मित्र मुषकस्वामीही होता. बाल गणेशाच्या हातात हॅरी पॉटर आणि फास्टर फेणे याची पुस्तक होती. अँडव्हान्स्ड बूक ऑफ मॅजिक हे पुस्तक वाचण्यात बाल कृष्ण रममाण झाला होता. साने गुरुजींचं पुस्तक एकाग्रचित्ताने वाचण्यात हनुमान गढून गेला होता.
त्या तिघांच्या हातातील पुस्तकांकडे लक्ष जाताच तेजोमयी जोरात ओरडली,
टाका ती पुस्तक खाली आधी, नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही .
जा उडत .. कृष्ण म्हणला,
“मी पुस्तक खाली टाकणार नाही. गणेश म्हणाला.
” मग मी तुझ्याशी खेळणार नाही..” तेजोमयी फुगून म्हणाली.
” नो प्रॉब्मेल.तू खेळली नाहीस तरी काहीच बिघडत नाही. मी या कृष्णाला आणि गणेशाला माझ्या गदेवर बसवतो नि घेउुन जातोआकाशात.. ढगावर बसून आम्ही भेळ खाऊ तिथे..” हनुमान म्हणाला.
तिच्या उत्तराची वाट न बघताच हनुमानाने त्या दोघांना गदेवर बसवले. गदा खांद्यावर ठेवली अणि त्याने आकाशात उंच सूर मारला…
आकाशात ढगांच्या राजाने त्यांचं स्वागत केलं. मुलं वर येताच त्याने जादुचा शंख फुंकला.. त्यातून खूप साऱ्या कॅडबरीज बाहेर पडल्या.. आइसक्रिमसुध्दा.तेजोमयीचं आवडत स्ट्राबेरी आइसक्रिमपण होतं. ते बघून तिच्या तोंडाला पाणीच सुटलं. तिघेही जण मस्त मिटक्या मारत आइसक्रिम आणि कॅडबरिवर ताव मारुन खाऊ लागली.
ढगांच्या राजाने मग त्यांना रंगीत पेन्सिली दिल्या.गणेश, हनुमान आणि कृष्ण दे धमाल चित्र रंगवत बसली.थोडया वेळानं आला वडापाव. आता मात्र तेजोमयीला राहवेना.तिच्या तोंडचं पाणी थांबेना.परिराणी दुरुनच ही सारी गंमत बघत होती.
” बघ तुझी संधी गेली. ” परिराणी हळूच तेजोमयीला म्हणाली.
” गेली तरी गेली.” तेजोमयी म्हणाली. त्यांनी पुस्तकं खाली टाकलं असतं, वाचायचं सोडून दिलं असतं तर गेली असते मी त्यांच्यासोबत..”ती म्हणाली.
” पुस्तकं हीच खरी मित्र असतात तेजू.” परिराणी तिला समजावत म्हणाली.
” हे वाक्य मी एकहजार वेळा माझ्या पप्पांकडून, आईकडून आणि टिचरकडून ऐकलय.त्यात नवीन काही नाही..”
” तुझी आवडती काजोल सुध्दा पुस्तक वाचते. वेळ मिळाला की ती पुस्तकातच शिरते.आणि अमिताभ अंकलच तर विचारुच नको…”
” मी विचारतच नाही.” तेजोमयी रागाने म्हणाली.
या हट्टी मुलीचा परिराणीला खूपच राग यायला लागला.तेवढयात परिराणीचं लक्ष ढगांकडे गेलं. तिन्ही मुल उंडारत असताना तिथे अमिताभ अंकल, हृतिक आणि जादू त्यांच्या खास स्पेस क्रॉफ्ट मधून आले,त् ो जादुच्या ग्रहाकडे निघाले होते.ढगांच्या राजाकडे बाल हनुमान,गणेश आणि कृष्णाला बघून अमिताभ अंकलनी स्पेस क्रॉफ्ट तिथे थांबवायला जादुला सांगितलं.
” वाव” तेजोमयीचं लक्ष त्यांच्याकडे जाताच ती उत्स्फुर्ततपणे म्हणाली.तिला जादुला प्रत्यक्ष बघण्याची, त्याला हात लावण्याची इच्छा होती. अमिताभ अंकल आणि ह्रतिकची सहीसुध्दा तिला हवी होती.
गणेशाने आपल्या जवळची वही काढली नि अमिताभ अंकलच्या समोर नेली. अंकलने त्यावर झक्कास सही केली.हनुमानाने कागदावर सही घेतली. सर्वांनी मग बिगफूलचा डाव मांडला. अमिताभ अंकल बिगफूल ठरले.
ढगांच्या राजाने मस्तपैकी भेळ आणि पिज्जा आणला. अंगतपंगत करत सारेच ताव मारु लागले.भोजनानंतर मग झालं सुरु झाला पुस्तक पुस्तक हा खेळ.या खेळात भाग घ्यायला परिराणीही तेजोमयीला सोडून वर उडाली. या खेळात जादुनेही भाग घेतला. या खेळात जो जिंकेल त्याला जादू आपल्या ग्रहावर घेऊन जाईल, असं ठरलं. खेळ सुरु झाला.वेगवेगळया पुस्तकांवरच्या प्रश्नांचा बॉल ढगांचा राजा टाकत होता. या बॉलवर सर्वाधिक सिक्सर मारले ते गणेशानेच.
लहानपणापासून पुस्तक वाचण्याचा,वाचून समजून घेण्याचा ,समजल्यावर मंथन करण्याची सवय त्याला लागल्यानं त्याला अनेक विषयाचं अद्ययावत ज्ञान होतं. अमिताभ अंकल सुध्दा थक्क झाले. ऋतिकने त्याला चित्रपटात घेण्याचा निर्णय तिथेच सांगून टाकला. हॅरी पॉटर जिथे मॅजिक शिकला त्या हॉगवर्टच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन अमिताभ अंकलनी गणेशाला दिलं. जादुसोबत त्याच्या ग्रहावर जाण्याची संधी गणेशाला मिळाली. परिराणिने त्याला दोन पंख दिले हे पंख लावले की गणेशाला सातासमुद्रावरुन उडण सहज शक्य होतं.
तेजोमयी सारं काही बघत होती.परिराणीने आपल्याला ढगावर नेलं नाही याचं तिला खूप दु:ख झालं नि राग सुध्दा आला.आता परिराणीशी बोलायचच नाही असं तिनं पक्क मनात ठरवलं.
परिराणी जेव्हा तिच्याकडे परत आली, तेव्हा तिने तोंडच फिरवलं..
परिराणीला सारं काही कळलं.
” मी काय करणार.तुला मी खूपदा समजावलं ना पुस्तक वाच म्हणून तू समजूनच घेत नाहीस “
“मला पुस्तकं वाचयाची नाहीत.
“जी मुलं पुस्तकं वाचत नाहीत त्यांचं कसं नुकसान होतं हे तुझ्या कां लक्षात येत नाही. तुला पुस्तकांचा एवढा राग कां येतो.”
” परिराणी तुला माहीत नाही.आम्हाला अभ्यासाची किती पुस्तक वाचावी लागतात ते.”
“मग काय झालं. पुस्तकंामुळे ज्ञान मिळतं ना.हे ज्ञानच मानसाचा पॉवरफुल बनवतं. नॉलेज इज पॉवर म्हणतात ना. गणेश, हनुमान आणि कृष्णाला ते कळलय बघ. म्हणूनच खेळताना सुध्दा त्यांच्या जवळ पुस्तक असतं . वेळ मिळाला की ते पुस्तक वाचतात.त्यामुळे त्यांच्या ज्ञानात सारखी भरच पडतेय.एके दिवशी ही तिन्ही मुलं खूप मोठ्ठ नाव कमावणार. यशस्वी होणार बघ.”
” होऊ दे ना.मला काय त्याचं. मी बाई आपली खेळणार. मी पुस्तकं वाचणार नाही“
” पुस्तक वाचण्याच्या आनंदापासून तू मुकशील. नवं नवं ज्ञान मिळणार नाही ते वेगळचं.”
” सो व्हाट.ज्ञान मिळालं नाही तर काय बिघडेल गं माझं.”
” तू गाढव होशील ना.”
” गाढव तर गाढव .मस्त मजेत राहता येईल.. नि गाढव मस्ती करता येईल.” तेजोमयी म्हणाली. याचा परिराणीला खूप राग आला.”
म्हणजे तू माझं म्हणनं ऐकणार नाहीस तर.”
तेजोमयी काहीच बोलली नाही. परिराणिने जादुची छडी काढली नि तिच्यावरुन फिरवली…
0000
पुढं व्हायचं तेच झालं…तेजोमयी गाढव
झाली. तुम्ही जेव्हा एखादा गाढव बघाल ते गाढव पुस्तक न वाचणारी तेजोमयीसुध्दा असू शकेल. गणेश, कृष्णाकडे वळून त्याला सांगू लागला.
पण त्याचं कुठे लक्ष होतं. तो फास्टर फेणेच्या पुस्तकात डोकं खुपसून बसला होता.
सुरेश वांदिले
00000
.jpg)