नवी जादू..नवा आनंद
टिल्लू आणि त्याच्या मित्रांची टोळी हॅरी पॉटर आणि त्याच्या मित्रांवर जाम खुष होती.
हॅरिचा पराक्रम, त्याच्यावर सतत कोसळणारी संकटं आणि त्यातून सुटका करण्यासाठी त्याने बजावलेली कामगिरी यावर आधारित पाचपाचशे पृष्ठांच्या पुस्तकांची पारायणं टिल्लू आणि त्याच्या टोळीतील मित्रांनी केली होती.
इंग्रजीतली ही पुस्तकं प्रारंभी त्यांना समजायला जडच गेली. एरव्ही शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशाचा वाटेलाही न जाणारी ही टोळी हॅरिची पुस्तकं वाचताना शब्दकोश घेऊन बसायची.
शब्दाचा अर्थ टिल्लू शोधायचा, तो अर्थ एका वहित तेजोमयी नोंदवून ठेवायची. मात्र काही शब्द पुन्हा पुन्हा यायला लागले तेव्हा त्या वहितून शोधायला थोडं जड जावू लागलं तेव्हा कल्याणीला एक कल्पना सुचली. ती म्हणाली,
आपण या डिक्शनरी सारखीच आपली हॅरी डिक्शनरी केली तर पुन्हा पुन्हा येणारे शब्द शोधणं सोप्पं जाईल.
म्हणजे गं काय करायचं? टिंकूनं विचारलं.
आपण आपल्या वहित ए,बी,सी,डी प्रमाणे शब्द लिहून काढू. म्हणजे ए चा शब्द आला की एच्या पृष्ठावर त्याचा अर्थ लिहून ठेवायचा. बी चा शब्द आला की बीच्या पृष्ठावर लिहून ठेवायचा.
ग्रेट आयडिया,असं म्हणत टिल्लूने कल्याणीला टाळी दिली.
सर्वांनाच ही आयडिया खूप आवडली. कल्याणीने वहिची पाने मोजली. ए ते झेड पर्यंत 26 अक्षरं येत असल्याने सव्वीसने या पृष्ठांना भागलं. प्रत्येक अक्षराला 10 दहा पृष्ठ येत होते. ए , एस, टी, आर अशा काही अक्षरांनी सुरु होणारे अर्थ वारंवार येत होते. त्यांना तिने अधिक पृष्ठे दिली तर एक्स, झेड,क्यू अक्षरांनी अल्प शब्द येत असल्याने त्यांची पृष्ठसंख्या कमी केली. त्यानंतर तिने ए ते झेड ही अक्षरे वेगवेगळया रंगांच्या स्केच पेननी पृष्ठांवर लिहून काढली. कोणत्या क्रमांकाच्या पृष्ठावर कोणतं अक्षर येतं याची नोंद तिने वहिच्या पहिल्या पृष्ठावर केली. म्हणजे पृष्ठ क्रमांक 2 वर ए ,पृष्ठ क्रमांक 12 वर बी, पृष्ठ क्रमांक 13वर सी. याप्रमाणे तिने अनुक्रमणिका केली.
पुस्तक वाचताना जो कठिण शब्द येई, त्याच्या आद्याक्षरानुसार मग या वहित नोंद करुन त्या शब्दांचे अर्थ तेजोमयी लिहून काढी. कल्याणीची ही कल्पना अमलांत येण्यापूर्वी ज्या शब्दांचे अर्थ लिहून झाले होते, ते सुध्दा आता ए, बी,सी,डी अशा पृष्ठांवर तिने नोंदवले.
कठिण शब्दांचे अर्थ कळू लागल्याने टोळिला हॅरिचे पराक्रम वाचायला आणखीनच गम्मत येऊ लागली. मात्र पुढे एक नवीच समस्या निर्माण झाली. ज्या मराठी शब्दकोशाचा वापर ते करत होते, त्यात काही शब्दांचे अर्थच मिळायचे नाहीत. त्यामुळे गोळाबेरीज करुन अर्थ लावायचा प्रयत्न केला जाई. पण त्यात एकालाही गंमत वाटेना. नवा मोठा शब्दकोश आणयाचा कुठून, टिल्लूला प्रश्न पडला. इतरांनाही पडला.
आपआपल्या घरी असा शब्दकोश शोध घेण्याचं टोळीनं ठरवलं. शोधाशोधीनंतर एक दोन शब्दकोश मिळाले. पण तेही जुन्याच शब्दकोशासारखेच निघाले.
शब्दकोशाच्या या शोध मोहिमेचा टोळीच्या पालकांना नवल वाटलं. एखादा खजाना शोधावा तशी मोहीम प्रत्येक घरी राबवल्या गेल्यानं प्रत्येक पालकानं एकमेकांना याविषयी विचारलं. पोरांचं जे काही चाललं होतं, त्याचा सर्व पालकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पिझ्झा, बर्गर किंवा फ्रँकिच्या शोधात सतत असणाऱ्या या पोरांना शब्दकोशाचा शोध घ्यावा वाटतो, म्हणजे गणपतीच पावला म्हणायचा. असं टिल्लूचे पप्पा ,तेजोमयीच्या पप्पांशी मोबाइलवरुन बोलताना म्हणाले.
पण,त्यांना पाहिजे तसा शब्दकोश माझ्याकडे मिळाला नाही हो. तेजोमयीच्या पप्पांनी टिल्लूच्या पप्पांनी सांगितलं. टोळीतल्या सगळ्या मुलांच्या घरी अशीच स्थिती होती.
000
आता काय करायचं रे? कल्याणीने टिंकूला विचारलं.
आपणच पुस्तकांच्या दुकानात जाऊन एखादा मोठा शब्दकोश विकत आणायचा का? टिल्लू बोलला.
पण त्याची किंमत खूप असेल बाबा. सुरेश म्हणाला.
आपण आपल्या खाऊचे पैसे एकत्र करुन डिक्शनरी घेऊ या. तेजोमयी म्हणाली.
टोळीला ही कल्पना आवडली.
पण,सर्वांचे खाऊचे पैसे मिळून दोनशे– तिनशे रुपयेच
झाले. एवढ्या कमी पैशात चांगला मोठा शब्दकोश मिळणं शक्य नव्हतं.
आता काय? टिल्लूने विचारलं.
आईला मागू या का?
नाही तर प्रत्येकाने आपआपल्या पप्पांनाच मागितले तर..
पप्पा मंडळी चिडली तर?
कशाला चिडतील, आपण आईसक्रिमसाठी थोडेच पैसे मागतोय.
पण,आपण शब्दकोशासाठी पैसे मागतोय, म्हणजे काहीतरी गडबड आहे असं त्यांना वाटलं तर..
वाटू शकतं हं या पप्पाजना.
त्यांचंही बरोबरच आहे म्हणा, कारण आपण याआधी कुठे पुस्तकांसाठी पैसे मागितले होते. हॅरी पॉटर आपणच आणला रस्त्यावरच्या पुस्तकवाल्याकडून कमी किमतीत मिळाला म्हणून.
मग आता काय करायचं?
हरमायनी कुठे तरी म्हणालीय ना की ज्या गोष्टीची भीती वाटते तीच आधी करायची.
म्हणजे काय?
पप्पानांच शब्दकोश घेऊन मागायचे.
पाच पप्पांकडून पाच वेगवेगळे शब्दकोश मिळाले तर कोणत्या ना कोणत्या शब्दकोशात कठिण शब्दाचा अर्थ मिळू जाईलच की. तेजोमयी म्हणाली.
तिचं म्हणणं सर्वांनाच पटलं. टोळीतील प्रत्यकानं आपल्या घरी त्याच दिवशी पप्पांकडे चांगला शब्दकोश घेऊन देण्याचा हट्टच धरला.
या हट्टाचा एकाही पप्पाला राग आला नाही. पण एकानेही लगेच शब्दकोश घेऊन देण्याचं कबूलही केलं नाही.
त्यामुळे मुले हिरमुसली. टिल्लूचं घर हे त्यांच्या भेटण्याचा अड्डा होता. तिथे भेटल्यावर प्रत्येकानं त्यांचे त्यांचे पप्पा कसे खडूस आहेत हे एकमेकांना सांगितलं.
000
इकडे मुलांच्या शब्दकोशांची मागणी ऐकल्यावर सर्व पप्पांनी एकमेकांशी संपर्क साधला. पोरांचं कौतुक केलं.त्यांना सोबत घेऊनच पाहिजे तो शब्दकोश घेऊन देऊ असं पप्पा मंडळींनी ठरवलं. रात्री प्रत्येक पप्पानं जेवताना मुलांना सांगितलं. तेव्हा आपले पप्पा खडूस नसून जगातलं सर्वांत चांगले पप्पा असल्याचं मुलांना वाटलं. उगाच आपण काहीबाही पप्पांबाबत बोलत राहतो, याचं सर्वांना वाईट वाटलं. त्यांनी मनातल्या मनात पप्पांना सॉरी म्हणून टाकलं.
000
दुसऱ्या दिवशी टिल्लू ,तेजोमयी आणि टिंकूच्या पप्पांनी त्यांच्या गाड्या काढल्या. टोळीतील सर्व सदस्य आणि त्यांचे पप्पा त्यात बसून बूक मॉलमध्ये गेले. शब्दकोशाचा विभाग आल्यावर त्यातील मोठमोठे शब्दकोश बघून टिल्लू, टिंकू, तेजोमयी, कल्याणी, सुशीम सारेच दंग झाले. कोणता शब्दकोश घ्यायचा हा प्रश्न त्यांना पडला. प्रत्येकानं वेगवेगळा शब्दकोश घेण्याचं मग त्यांनी ठरवलं. इंग्रजी –मराठी, इंग्रजी–इंग्रजी–मराठी, इंग्रजी–इंग्रजी असे नामवंत प्रकाशकांचे शब्दकोश पप्पा मंडळीनी विकत घेतले .म्हणी, वाक्प्रचार, एकाच शब्दाचे अनेक अर्थ अशा वेगवेगळ्या प्रकारातील कोश सुध्दा त्यांनी घेतले.
000
असे विविध आठ कोश त्या दिवशी कॉलनीत आले. हॅरीच्या पुस्तकाचं वाचन टिल्लूच्या घरी होत असल्यानं शब्दकोश त्याच्या घरीच ठेवण्यात आले.
या शब्दकोशांनी नवीच रंगत आणली.
हॅरी पॉटरमधील कठीण शब्दांचे अर्थ शोधता शोधता, मुलांना शब्दांशी खेळण्याचा छंद लागला. शब्दांचे वेगवेगळे अर्थ ,त्याच्या छटा, या शब्दांचे वाक्यांमधील अफलातून उपयोग बघून सर्व मुलं हरखून गेली. हॅरीच्या जादुच्या प्रेमात आधीच ते पडले होते. आता ते शब्दांच्या जादुच्याही प्रेमात पडले.
मराठी शब्दकोशात शब्द मिळाला नाही तर मुलं त्या शब्दाचा इंग्रजी अर्थ शोधू लागली. त्यात कठीण शब्द असेल तर त्याचा मराठी अर्थ शोधू लागली. मराठी– इंग्रजी– मराठी अशा शब्दशोधांची मोहीम आनंददायी झाली.
000
पण केवळ शब्दांचे अर्थ शोधून आणि ते लिहून काढल्यानेच हे अर्थ थोडेच कायमस्वरुपी लक्षात राहणार? कारण काही कठिण शब्द पुन्हा पुन्हा येत तेव्हा त्याचा अर्थ वहित बघावा लागायचा. त्यामुळे वाचनात काही क्षण खंड पडायचा. त्यामुळे रसभंग व्हायचा. लिंकही तुटायची.
यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा. सुशीम म्हणाला.
आपण शब्दच पाठ केले तर..
ई S इतके शब्द …कसे पाठ करणार? कल्याणी उद्गारली.
कसं शक्य आहे? सुरेशलाही प्रश्न पडला
कां शक्य नाही? टप्पू म्हणाला.
कसं बरं? तेजोमयीनं विचारलं.
दररोज प्रत्येकानं दोन तीन शब्द पाठ करायचे..महिन्याभरात 90 शब्दाप्रमाणे पाच जणांचे 540 शब्द पाठ होतील. नाही का, टिल्लू म्हणाला.
काय झक्कास आयडिया आहे रे.
एखादा कठिण शब्द आला की ज्याला त्याचा अर्थ पाठ झालाय, तो त्याने लगेच सांगायचा. म्हणजे आपल्या वाचनात खंड पडणार नाही. नवा शब्द आला की त्याचा अर्थ शोधून लिहून काढायचा नि तो पाठ करायचा.
वा S व.
शब्दांची अशी जादू आपल्याला आधी कां कळली नाही रे.
तेव्हा हॅरीची मैत्री झाली नव्हती ना आपल्या सोबत.
शब्दांची जादू कळायला हवा कशाला हवा होता हॅरी..
आपणच कंटाळा करायचो..
हे ही खरय म्हणा..
नाही हेच खर आहे..
आपल्या प्रत्येक मराठी, हिंदी आणि इंग्रजी धड्याखाली कठिण शब्दांचे अर्थ दिले असतात. आपण ज्या गाइड वाचतो त्यातही कठिण शब्दांचे अर्थ दिले असतात. ते सुध्दा आपण जेव्हाच्या तेव्हा पाठ केले असते तरी सुध्दा आपण शब्दांनी खूप श्रीमंत झालो असतोच की.
जाऊ द्या दोस्तांनो, झालं गेलं गंगेला मिळालं असं माझी आजी म्हणते. आपणही तसं समजूया. तेव्हा नाही केलं पण आता तर करतोय ना..
देर आये दुरुस्त आये..
उशिरा सुचलेलं शहाणपण…
असेना का, कामाचं तर आहे..
अगदी बरोबर, हॅरीला संकटाच्या समयी नेहमीच कामी येणाऱ्या शहाणपणासारखचं हे सुध्दा.टिल्लू म्हणाला..
टोळिने हसत हसत हॅरीचं पुढचं प्रकरण वाचायला सुरुवात केली.
– सुरेश वांदिले
.jpg)